You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता विल्यम्स यांच्यासारखं नासामध्ये अंतराळशास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावं लागतं?
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स 19 मार्चच्या पहाटे 285 दिवस अंतराळात घालवल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) संशोधन करण्यासाठी 2024 च्या जून महिन्यामध्ये त्या गेल्या होत्या, तेव्हापासून त्या तिथंच अडकल्या होत्या.
5 जून 2024 रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना बोईंगच्या नव्या स्टारलायनर अंतराळयानातून तिसऱ्यांदा अंतराळात पाठवण्यात आलेलं.
अंतराळात असताना स्टारलायनरच्या पायलट म्हणून त्या काम करत होत्या.
आयएसएसमध्ये संशोधन करणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशिक्षण आणि चांगला अनुभव आवश्यक आहे.
1998 पासून नासामध्ये अंतराळ संशोधनावर काम करणाऱ्या सुनीता विल्यम्स या नासाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत.
शिक्षण, प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या.
त्यांच्या या कामगिरीमुळे नासामध्ये अंतराळवीर म्हणून काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.
मात्र, यासाठी काय तयारी करायची असते? कोणती पदवी नासामध्ये काम करण्याची संधी देऊ शकते? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
सुनीता विल्यम्स यांच्याप्रमाणे अंतराळवीर होण्यासाठी आवश्यक पात्रता काय असतात?
नासा आपल्या विविध मानवी अंतराळ उपक्रमांसाठी काळजीपुर्वक अंतराळवीरांची निवड करतं.
नासामध्ये अंतराळवीर होण्यासाठी सशस्त्र दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकही अर्ज करू शकतात.
नासामध्ये अंतराळवीर होण्याची पात्रताः
- अर्जदार अमेरिकन नागरिक असणे आवश्यक आहे
- मान्यताप्राप्त महाविद्यालयातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.
- बायोलॉजिकल सायन्स, फिजिकल सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर पदवीही वैध आहे. तसेच वैद्यकीय पदवीही वैध आहे.
- पदवीनंतर पुरेसा कामाचा अनुभवही असायला हवा. पदव्युत्तर पदवीनंतर जेट विमानाचा पायलट-इन-कमांड म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव किंवा एक हजार तासांचा अनुभव (विमान उडविणे) असावा.
- नासाची दीर्घ कालावधीची अंतराळ उड्डाण शारीरिक चाचणीही पार पाडावी लागते. या चाचणीत दृष्टी तपासली जाते, रक्तदाब आणि उंची मोजली जाते. उंची 62 ते 75 इंच दरम्यान असावी.
सुनीता विल्यम्स यांना मिळालेल्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी यूएस नेव्हल ॲकॅडमीमधून फिजिकल सायन्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.
फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी इंजिनीअरिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय.
1998 मध्ये जेव्हा त्यांची नासामध्ये निवड झाली तेव्हा त्या अमेरिकन नौदलात कार्यरत होत्या.
त्यांनी अमेरिकन नौदलात अकरा वर्ष विविध पदांवर काम केलं. तसेच आतापर्यंत 30 प्रकारची विमानं त्यांनी उडवली आहेत.
नासामध्ये अंतराळवीर निवडीची प्रक्रिया कशी असते?
मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी नासा अर्ज मागवतं, ज्यामध्ये अमेरिकन नागरिक आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे कर्मचारी अर्ज करू शकतात.
नासामध्ये अंतराळवीरांच्या निवडीची जबाबदारी 'ॲस्ट्रोनॉट सिलेक्शन बोर्ड' या अंतराळवीर निवड मंडळाकडे असते.
येणाऱ्या सर्व अर्जांची पडताळणी या मंडळाकडून केली जाते. पडताळणी दरम्यान अर्जदाराची शैक्षणिक पात्रता व इतर माहितीची पडताळणी केली जाते.
सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर हे निवड मंडळ काही लोकांना मुलाखतीच्या पहिल्या फेरीसाठी बोलावतं.
ही मुलाखत अमेरिकेतील ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये घेतली जाते.
ही मुलाखतीची प्रक्रिया आठवडाभर चालते. पहिल्या फेरीत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या पुन्हा मुलाखती घेतल्या जातात.
अंतिम मुलाखतीनंतर नासाच्या नव्या अंतराळवीरांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.
जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं आणि ते दोन वर्षांचं असतं.
नासामध्ये अंतराळवीरांना कसं प्रशिक्षण दिलं जातं?
निवड झालेल्या उमेदवारांना जॉन्सन सेंटरमध्ये मूलभूत अंतराळवीर प्रशिक्षण दिलं जातं.
ज्यामध्ये अंतराळात चालणं, अंतराळ स्थानक चालवणं, टी -38 जेट विमान उडविणं आणि रोबोटिक हात चालविणं या गोष्टींचा समावेश असतो.
याशिवाय स्पेकवॉक, अंडरवॉटर लिव्हिंग, स्कूबा डायव्हिंग सह इतर अनेक कौशल्यं शिकवली जातात.
याशिवाय 'डायव्हिंग टेस्ट' अनिवार्य आहे. या चाचणीत, पोहताना 25 मीटर लांबीच्या जलतरण तलावात न थांबवता तीन फेऱ्या पुर्ण कराव्या लागतात.
त्यानंतर दुसरी जलतरण चाचणी घेण्यात येते, ज्यामध्ये 25 मीटर लांबीच्या तलावाच्या तीन फेऱ्या स्पेस फ्लाइट सूट आणि टेनिस शूज घालून कराव्या लागतात. यातही न थांबता तीन फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात.
वातावरणातील ताण सहन करण्याचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं. याशिवाय मॉडिफाइड जेट एअरक्राफ्टमध्ये मायक्रोग्रॅव्हिटीचं प्रशिक्षणही दिलं जातं. हे दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करावं लागतं.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यानं हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात संगणकावर आधारित प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये नासाचे स्पेस शटल, प्रक्षेपण यान आणि अंतराळयान कसं चालवायचं हे शिकवलं जातं.
अंतराळयानाच्या यंत्रणेत बिघाड झाल्यास तो कसा ओळखायचा आणि त्याची दुरुस्ती कशी करायची याचंही प्रशिक्षणही दिलं जातं.
जॉन्सन सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी आयएसएसचं मॉडेल तयार करण्यात आलं आहे.
तिथं प्रशिक्षणार्थींना अंतराळातील जेवण तयार करणं, उपकरणांचा वापर व देखभाल, कॅमेऱ्यांचा वापर व विविध प्रकारची कामं याबाबत महत्त्वाची माहिती दिली जाते.
संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींचं मूल्यमापन केलं जातं.
जर एखाद्या व्यक्तीनं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं तर त्याची नासामध्ये अंतराळवीर म्हणून नियुक्ती केली जाते.
ज्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांना नासाच्या इतर विभागांमध्ये काम दिलं जातं.
भारत ही करतोय मानवी अंतराळ मोहिमेची तयारी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देखील गगनयान मोहिमेवर काम करत आहे.
यामध्ये तीन अंतराळवीर तीन दिवस अंतराळात राहतील आणि त्यानंतर पृथ्वीवर परत येतील.
ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे. इस्रोनं या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड केली आहे.
यामध्ये प्रशांत बाळकृष्ण नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशू शुक्ला यांची प्रदीर्घ निवड प्रक्रियेनंतर या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे.
रशियात 13 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे चारही अंतराळवीर इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
इस्रोनं 2035 पर्यंत अंतराळात स्वत:चं अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणा केली आहे. जे भारतीय अंतराळ स्थानक म्हणून ओळखलं जाईल.
2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची इस्रोची योजना आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.