दिल्लीच्या राजकारणात अडकला 'महिला सन्मान'; 2100 रुपये 'आम आदमी'ला तारणार?

आम आदमी पक्षानं आणलेल्या दोन सरकारी योजनांवर टीका होत असल्यानं पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झालीय.

आम आदमी पक्ष सत्तेवर आला तर 'महिला सन्मान योजना' लागू करून प्रत्येक महिलेला महिना 2100 रुपये दिले जातील, असं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

याशिवाय, दिल्लीच्या सरकारी आणि खासगी अशा सगळ्या रुग्णालयात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी 'संजीवनी योजना'ही सुरू करणार असल्याचं ते म्हणाले होते.

या दोन्ही योजनांसाठीची नोंदणी आम आदमी पक्षाकडून सुरू झाली आहे. पण दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि महिला आणि बाल विकास विभागानं या योजनेशी आपला संबंध नसल्याचं‌ म्हटलंय.

या दोन्ही विभागांच्या कृतीकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिलं जात आहे. आम आदमी पक्ष या योजनांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत मतं खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हटलं जातंय.

दिल्लीच्या सरकारी विभागांचं म्हणणं काय?

'संजीवनी' सारखी कोणतीही योजना त्यांच्याकडे नसल्याचं दिल्लीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने म्हटलं आहे.

ज्येष्ठ नागरिकांची खासगी माहिती घेण्यासाठी कोणाचीही नेमणूक केलेली नाही आणि कोणतं कार्डही वितरित करत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

कोणताही राजकीय पक्ष किंवा माणूस अशा पद्धतीने योजनेच्या नावावर लोकांकडून अर्ज भरून घेत असेल तर ती पूर्णतः फसवणूक आहे. ते अनधिकृत आहे, असं अधिकारी म्हणाले.

अशा फसवणुकीच्या गोष्टींची जबाबदारी विभागाची असणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे.

तसंच, महिला आणि बाल विकास विभागानंही एक निवेदन जाहीर केलं आहे. महिला सन्मान योजनेसारखी कोणत्याही योजनेची सूचना त्यांच्यापर्यंत अजूनही आलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.

एक राजकीय पक्ष 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतंर्गत' दिल्लीतल्या महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार असल्याचा दावा करत असल्याचं त्यांना वृत्तसंस्था आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्समधून कळालं असंही या निवेदनात सांगितलंय.

"दिल्ली सरकारनं अशा कोणत्याही योजनेची माहिती दिलेली नाही हे स्पष्ट केलं जात आहे," असं निवेदनात लिहिलंय.

केजरीवाल काय म्हणाले?

या योजना जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी घरोघरी जाऊन 'संजीवनी' आणि 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजने'साठी नोंदणी अभियान सुरू केलं जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन माहितीही भरून घेत होते.

या योजनांची जाहिरात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. एका जाहिरातीमध्ये केजरीवाल सांताक्लॉजच्या अवतारात दाखवण्यात आले आहेत.

पण दिल्लीच्या दोन्ही सरकारी विभागांनी आम आदमी पक्षाच्या योजनांविरोधात सूचना जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

"महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेमुळे हे लोक गोंधळले आहेत. येत्या काही दिवसांत खोटी प्रकरणं दाखवून आतिशी यांना अटक करण्याचं कारस्थान रचलं आहे. त्याआधी आपच्या ज्येष्ठ नेत्यांवर धाड टाकली जाईल," अशी पोस्ट केजरीवालांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली.

"आम आदमी पक्षाने प्रत्येक महिलेला 2100 रुपये तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देण्याचं वचन दिलं आहे. इतर कोणत्याही पार्टीनं असं वचन दिलेलं नाही.

उलट, आम आदमी पक्षाला हे जमणार नाही, असं इतर पक्ष म्हणत आहेत. पण आम्ही हे शक्य करून दाखवू. आता काय करायचं हे जनतेलाच ठरवायचं आहे," असं आपचे मंत्री सौरभ भारद्वाज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात दिल्लीत छापेमारी केली जाईल अशी अफवा जोर धरत आहे. सोबतच मुख्यमंत्री आतिशी यांनाही अटक करण्यासाठी कट रचला जात आहे.

विरोधकांचा निवडणूक प्रचार हाणून पाडण्यासाठी भाजप असं करत असतं, हे आपण पाहिलं आहे, असंही भारद्वाज पुढे म्हणाले.

भाजपनं काय म्हटलं?

आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या या दाव्यांविरोधात दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहितात, ''डिजिटल फ्रॉड करणारी लोकं करतात तेच सगळं दिल्लीचं सरकार करतेय ही फारच दुःखद गोष्ट आहे. सरकारी माहितीशिवायची योजना आणून जनतेला आणि खास करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना फसवलं जातंय."

10 वर्ष सत्तेवर असूनही मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्ष इतिहासात पहिल्यांदाच खोट्या योजना आणतंय. अशा फसवणुकीपासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांनाच आपलं कर्तव्य बजावत सार्वजनिक सूचना जाहीर करावी लागतेय, असंही ते पुढे म्हणालेत.

"मुख्यमंत्री आतिशी घटनात्मक पदावर आहेत. महिला सन्मान किंवा संजीवनी योजना ही दिल्ली सरकारची कायदेशीर मान्यता असणारी योजना आहे काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं," असं त्यांनी लिहिलंय.

"ही माहिती खोटी असल्याचं आतिशी म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी लगेचच राजीनामा द्यायला हवा," असंही सचदेवा पुढे म्हणालेत. दिल्लीच्या सरकारचीच ही जहिरात आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळू शकत नाही, असं ते लिहितात.

"अशा पद्धतीची योजना विधानसभेत संमत झाली असेल तर त्याची अधिकृत नोटीस काढली जावी. पण खरंतर, अशी कोणतीही योजना काढलीच गेलेली नाही. हीच गोष्ट या निवेदनातून स्पष्ट होतेय. अशा पद्धतीनं योजनेतंर्गत कोणाचीही माहिती भरून घेणारे फसवणूक करत आहेत हेच त्यात लिहिलंय," असं सचदेवा म्हणाले.

भाजप नेते मनोज तिवारींच्या मते, "कोणत्याही योजनेचे निकष आलेले नसताना, महिलांची स्वाक्षरी कशी घेतली जाऊ शकते? असं होत असेल तर त्याचं उत्तर मुख्यमंत्री अतिशी यांनी द्यायला हवं आणि या चुकीची जबाबदारीही घ्यायला हवी. हा देश कायद्याने चालतो."

आतिशींचा भाजपवर पैसे देण्याचा आरोप

कर मर्यादेत नसणाऱ्या महिलांना महिन्याला 1000 रुपये देण्याच्या योजनेला दिल्ली सरकारनं महिन्याच्या सुरूवातीला हिरवा झेंडा दाखवला.

पण अजूनही अधिकृत नोंदणी सुरू झालेली नाही. त्याची ऑनलाईन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये होऊ घातलेल्या दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष जिंकला तर महिलांना वाढीव 2100 रुपये दिले जातील असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं.

अशी योजना जाहीर केल्यानंतर लगेचच केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला भाजपनं घेरलं. या योजनेमुळे दिल्लीतले मतदार आम आदमी पक्षाला पसंती देतील अशी भीती त्यांना वाटतेय.

येत्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजप दोघंही आक्रमक पद्धतीने एकमेकांविरोधात उभे आहेत. दोन्ही पक्षांत आरोप प्रत्यारोपांची मालिकाच सुरू आहे.

मुख्यमंत्री आतिशी यांनी बुधवारी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यावर नवी दिल्लीच्या काही भागांत लोकांना पैसे वाटल्याचा आरोप केला.

"अरविंद केजरीवाल निवडणूक लढवतात त्याच भागात भाजप मतदारांचं मतदान कार्ड पाहून पैसे वाटत आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आलं. खासदार म्हणून मिळालेल्या निवासस्थानाच्या बाहेरच त्यांनी दिल्लीच्या विधानसभा मतदारसंघातील काही महिलांच्या गटांना बोलावून पाकिटात 1100 रुपये घालून दिले," असं आतिशी म्हणाल्या.

प्रवेश वर्मा यांच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोख पकडली असल्याचं त्यांनी सांगितलं. ईडी, सीबीआय आणि दिल्ली पोलिसांना त्यांच्या घरी धाड टाकण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

प्रवेश वर्मा यांना अटक करण्याचीही मागणी त्यांनी केलीय.

भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांनी या आरोपांवर उत्तर दिलं. "मी काल अरविंद केजरीवाल आणि आज दिल्लीच्या मुख्यमंत्रांची पत्रकार परिषद ऐकली. आम आदमी पक्षाचे खासगार संजय सिंह माझ्या घराच्या आसपास घुटमळत होते," असं ते म्हणाले.

त्यांच्या वडिलांनी 25 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वाभिमान संस्थेंतर्गंत गरजू आणि गरिबांना मदत करण्यासाठी हे पैसे दिल्याचं त्यांनी सुचित केलं.

"गेल्या 11 दिवसांपासून एका महिलेचं दुःख मी जवळून पाहतोय. गेल्या 11 वर्षांत केजरीवाल यांनाही ते दिसलं नाही. त्यांच्या वस्तीत गेलो तेव्हा त्यांच्याकडे पेन्शन, रेशन कार्ड, नोकरी, औषधोपचाराची सोय काहीही नाही हे मला समजलं. तेव्हा माझ्या संस्थेकडून एक योजना काढून सगळ्या महिलांना दर महिन्याला मदत करायचं मी ठरवलं," असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)