You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केजरीवाल यांच्या उपस्थितीत आतिशी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतील का?
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी शनिवारी (21 सप्टेंबर) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या सर्वांत तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
त्यांच्यासोबत गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
आतिशी यांनी दिल्लीतील स्टीफन्स कॉलेज आणि इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. 43 वर्षांच्या आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
2013 मध्ये आतिशी आम आदमी पार्टीच्या सदस्य झाल्या होत्या. अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्यानंतर त्या पक्षाच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 11 वर्षांच्या कार्यकाळानंतर आता आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे.
या पार्श्वभूमीवर अरविंद केजरवाल यांच्या उपस्थितीत आतिशी यांना स्वत:चा ठसा उमटवता येईल का? त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करता येईल का? आणि सध्या विविध संकटांना तोंड देत असलेल्या आम आदमी पार्टीला नवी उमेद त्या देऊ शकतील का? हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल विस्तारानं जाणून घेऊया.
आतिशींनी पक्षात हाताळल्या आहेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
डिसेंबर 2013 मध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ते 45 वर्षांचे होते. राजकारणात नवखे होते. त्या तुलनेत आतिशी अधिक तरुण आहेत. मात्र मुख्यमंत्री पदापर्यंतचा पल्ला गाठण्यापूर्वी त्यांच्या गाठीशी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
एक कार्यकर्ती म्हणून आतिशी यांनी आम आदमी पार्टीतून राजकारणास सुरूवात केली. त्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांनी माजी उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत काम केलं.
त्यांनी दिल्लीतील शैक्षणिक धोरणाव्यतिरिक्त पक्षाचा जाहीरनामा निश्चित करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दोन वर्षांपूर्वी आम आदमी पार्टीवर कथित मद्य घोटाळ्याचे आरोप झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक त्यांचे नेते तुरुंगात गेले. त्यावेळेस सरकार चालवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्यावर विश्वास दाखवला होता.
मनीष सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत आतिशी यांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय त्यांच्यावर चौदा इतर मंत्रालय आणि विभागांची देखील जबाबदारी होती.
आतिशी आतापर्यंत कोणत्याही वादात अडकलेल्या नाहीत. त्यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची आहे. त्यांच्यावर कोणताही थेट आरोप झालेला नाही.
मात्र जरी आतिशी मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावं लागणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर आतिशी यांनी पहिल्याच वक्तव्यात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणाची भरपूर स्तुती केली.
त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या राजकारणात प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचं उदाहरण घालून देत पदाचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की फक्त न्यायालयाचा निकाल पुरेसा नाही.
"मी जनतेच्या न्यायालयात जाईन आणि जोपर्यंत माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत मी पदाची जबाबदारी स्वीकारणार नाही."
मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात आतिशी म्हणाल्या, "या देशाच्या किंबहुना जगाच्या राजकीय इतिहासात प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचं जो वस्तुपाठ अरविंद केजरीवाल यांनी घालून दिला आहे, तसं क्वचितच इतर कोणी केलं असेल."
आम आदमी पार्टीनं ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र आतिशी यांनी आपल्या पहिल्याच वक्तव्यात संकेत दिले आहेत की त्यांचं सरकार फेब्रुवारी पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करेल.
आतिशी म्हणाल्या, "दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे."
आतिशी आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यांवरुन ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, भलेही मुख्यमंत्रीपदावर आतिशी जरी असल्या तरी दिल्ली सरकार अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावरच चालणार आहे.
आतिशी यांनी दिल्लीतील लोकांना आम आदमी पार्टी सरकारच्या कामांची देखील आठवण करून दिली. त्याचबरोबर ही भीती देखील दाखवली की जर त्यांच्या पक्षाचं सरकार पुन्हा आलं नाही तर लोकांना मिळत असलेल्या अनेक सुविधा बंद होऊ शकतात.
आतिशी म्हणाल्या, "दिल्लीकरांना आज जी मोफत वीज मिळते आहे, ती भाजपाचं सरकार आल्यावर बंद होईल. अरविंद केजरीवाल यांनी शाळांची स्थिती सुधारली आहे, शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. या शाळांची स्थिती पुन्हा वाईट होईल.
"महिलांना असणारी मोफत बस प्रवासाची सुविधा बंद होईल. हॉस्पिटलमधील मोफत उपचार बंद होतील."
जर आतिशी यांनी फेब्रुवारीपर्यंत दिल्ली सरकार चालवलं तर त्यांना पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. म्हणजेच काम करण्यासाठी त्यांच्याकडे फार मोठा कालावधी नाही.
पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार?
आतिशी मुख्यमंत्री झाल्याचा आम आदमी पार्टीवर काय परिणाम होईल, असाही प्रश्न आहे.
एक महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी पक्षाला नवी ऊर्जा देऊ शकतात. आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाकडे एक राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून देखील पाहिलं जातं आहे.
विश्लेषकांना वाटतं की पक्षाची प्रतिमा उंचावणं हा देखील आतिशी यांना पुढे आणण्यामागचा हेतू असू शकतो. आम आदमी पार्टी सद्य परिस्थितीत कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपात अडकली आहे.
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे अनेक नेते भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातूनच राजकारणात आले होते. त्यांनाच आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं आहे.
अशा परिस्थितीत पक्ष ज्या मूळ विचारसरणी आणि मूल्यांवर उभा आहे, त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विश्लेषकांना वाटतं की, आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यामागे पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा उंचावण्याचा हेतू देखील असू शकतो.
आतिशी यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप झालेले नाहीत, त्यामुळे त्यांची प्रतिमा एका उच्चशिक्षित आणि स्वच्छ नेत्याची आहे.
वरिष्ठ पत्रकार शरद गुप्ता म्हणतात, "आतिशी यांच्या स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमेच्या माध्यमातून पक्षाविरुद्ध होत असलेल्या नकारात्मक प्रचाराला उत्तर देण्याचा आम आदमी पार्टीचा प्रयत्न आहे. सध्या पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकला आहे."
विश्लेषकांना असंही वाटतं की, महिला असल्यामुळे देखील आतिशी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीतील महिला मतदारांना आम आदमी पार्टीकडे खेचण्यात पक्षाला यश येऊ शकतं.
शरद गुप्ता म्हणतात, "आतिशी यांनी त्यांच्यातील क्षमता सिद्ध केली आहे. दिल्लीत शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम झालं आहे, त्याचं प्रत्यक्षातील काम आतिशी यांनीच केलं होतं. एक महिला असल्यामुळे त्या अर्ध्या लोकसंख्येला आम आदमी पार्टीकडे आकर्षित करू शकतात."
आतिशी दिल्लीतच वाढल्या आहेत. त्याउलट पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांचा जन्म दिल्लीबाहेर झाला आहे आणि नंतरच्या काळात दिल्ली ही त्यांची कर्मभूमी झाली आहे.
शरद गुप्ता म्हणतात, "आतिशी यांचं बालपण दिल्लीतच गेलं आहे. त्यांचे कुटुंबीय दिल्लीतच शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांचं दिल्ली विषयीचं आकलन अधिक चांगलं आहे."
पुढच्या फळीतील नेत्यांवर भर?
अर्थात हे देखील तितकंच खरं आहे की मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचा कार्यकाळ फारच छोटा असणार आहे. विश्लेषकांना असं देखील वाटतं की, आतिशी यांना त्यांची क्षमता, कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी हा वेळ कदाचित पुरेसा ठरणार नाही.
1998 मध्ये सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यावेळेस दिल्लीत कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. त्याचा फटका भाजपाला बसला होता. निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला होता.
आतिशी यांच्या समोर देखील अशीच परिस्थिती आहे. त्यांचा कार्यकाळ खूपच छोटा आहे. मात्र विश्लेषकांना असं वाटतं की आता दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
शरद गुप्ता म्हणतात, "सद्यपरिस्थितीत आम आदमी पार्टीला कोणताही मोठा विरोध होताना दिसत नाही. त्याचबरोबर थेट जनतेवर नकारात्मक परिणाम करणारा कोणताही मुद्दा नाही. अशा परिस्थितीत आतिशी यांच्यासमोर जितका कालावधी आहे, त्या काळात काम करून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची चांगली संधी त्यांना आहे."
शरद गुप्ता पुढे म्हणतात, "आतिशी यांच्याकडे आम आदमी पार्टीची डागाळलेली प्रतिमा पुन्हा एकदा उंचावण्याची संधी देखील आहे. भलेही त्या केजरीवाल यांच्या प्रभावाखाली काम करतील, मात्र पार्टी आणि सरकार या दोन्हींवर स्वत:ची वेगळी छाप पाडू शकतात."
अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि पक्षाचे इतर नेते कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर आहेत. जर हा खटला आगामी काळात आणखी गुंतागुंतीचा झाला तर पक्षासमोर नेतृत्वाचं गंभीर संकट निर्माण होऊ शकतं.
अशा परिस्थितीत आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा हा देखील संकेत आहे की आम आदमी पार्टी दुसऱ्या फळीतील नेत्यांची हाती धुरा देते आहे. जेणेकरून भविष्यात काही अडचणीची परिस्थिती निर्माण झाली तरी पक्षाची वाटचाल पुढे सुरू ठेवता येईल.
शरद गुप्ता म्हणतात, "अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते जवळपास एकाच वयोगटातील आहेत. मात्र आतिशी, सौरभ भारद्वाज, दिलीप पांडेय, राघव चढ्ढा आणि इतर युवा नेते त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहेत आणि दुसऱ्या फळीतील आहेत.
"अशा परिस्थितीत आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यामुळे ही बाब देखील स्पष्ट होते की पार्टी पुढील काळासाठी नेत्यांची जडणघडण करते आहे."
शरद गुप्ता पुढे म्हणतात, "आतिशी मुख्यमंत्री झाल्याचा आम आदमी पार्टीवर आणखी एक परिणाम होईल, तो म्हणजे आता पक्षात तरुण चेहऱ्यांना प्राधान्य मिळेल. त्यांच्या मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज आणि मुकेश अहलावत यांच्यासारखे नेते पक्षाच्या पुढील फळीचं प्रतिनिधित्व करत आहेत."
दरम्यान, आतिशी यांचा कार्यकाळ आताच सुरू झाला आहे तरी विरोधी पक्षांनी त्यांना 'डमी सीएम' म्हणण्यास सुरुवात केली आहे.
आतिशी यांच्यासमोरील सर्वांत मोठं आव्हान म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वत:ची वेगळी ओळख, वेगळं स्थान निर्माण करायचं आहे.
आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वाभोवतीच फिरते. शरद गुप्ता म्हणतात, "आम आदमी पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल हेच सर्वेसर्वा आहेत. ते जे ठरवतात तेच पक्षात होतं."
अशा परिस्थितीत एक प्रश्न असा आहे की, आतिशी यांना मुख्यमंत्री करून आम आदमी पार्टी स्वत:ची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न देखील करते आहे का? या प्रश्नाचं उत्तर पुढील काही महिन्यांतच मिळू शकेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.