आतिशी : केजरीवाल सरकारमध्ये मंत्रिपदही न मिळण्यापासून ते थेट दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत

दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाचे नेत्या आतिशी यांचा शपथविधी पार पडला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना शपथ दिली.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाकडून आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत.

आतिशी यांच्यासोबत कैलाश गेहलोत, गोपाल राय, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मुकेश अहलावत हे मंत्रिमंडळातील नवा चेहरा आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

15 सप्टेंबर 2024 रोजी केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यावेळीही निवडणुका जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जनता आदेश देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पुन्हा बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले होते.

केजरीवाल यावेळी म्हणाले, ''मी दिल्लीच्या गल्लीबोळांत, घराघरांत जाणार आहे. केजरीवाल प्रामाणिक आहे, असा निकाल जनता जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही.”

दिल्लीतील कालकाजी येथील आमदार आतिशी यांच्याकडे सध्या शिक्षण आणि सामाजिक बांधकाम या सारखी महत्त्वाची खाती आहेत.

मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्रिपद सोडले आणि त्यानंतर आतिशी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.

अरविंद केजरीवाल हे दिल्ली मॉडेलबद्दल बोलताना, शिक्षण मंत्रालय हा एक मजबूत स्तंभ असल्याचं म्हणतात. दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाचे नेते अनेकदा दिल्लीच्या सरकारी शाळांचे कौतुक करतात.

2012 मध्ये पक्षाची स्थापन झाली. आतिशी या 2019 साली सक्रिय राजकारणात आल्या. त्यावेळी पक्षाने आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती.

यात आतिशी यांचा या निवडणुकीत 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला, त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

मात्र, पुढच्या वर्षी कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. तीन वर्षांनंतर मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनल्या.

आतिशींचा जन्म दिल्लीतील एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचं कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिल्लीतूनच झालं आहे पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या.

आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब कसं झालं?

सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आतिशी यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर होतं. केजरीवाल तुरुंगात असताना आतिशी यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयांची जबाबदारी होती.

मनीष सिसोदिया शिक्षणमंत्री असताना त्यांनी शिक्षण विभागात उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसंच सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत त्यांनी शिक्षण मंत्रालयही सांभाळलं. तसंच त्या केजरीवालांच्या विश्वासू आहेत.

सद्यपरिस्थितीत त्यांचं नाव आघाडीवर होतं अशी माहिती पक्षातील सूत्रांनी बीबीसीला दिली होती.

जेव्हा आतिशी यांना मंत्रीपदही मिळालं नव्हतं

2020 च्या विधानसभा निवडणुकांनंतर केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कोणत्याच महिलेला स्थान मिळालं नाही.

आतिशी यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे पक्षाच्या काही नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर टीकाही केली होती.

त्यावेळी केजरीवाल यांना 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. त्यात आठ महिला आमदारांचा समावेश होता.

त्यानंतरही केजरीवालांनी एकाही महिला नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. मात्र कालानुरूप दिल्लीतली राजकीय परिस्थितीही बदलली.

मनीष सिसोदिया, संजय सिंह, आणि मग खुद्द केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर आतिशी यांनी सरकारसह पक्षातही महत्त्वाची भूमिका बजावली.

आतिशी 2023 मध्ये पहिल्यांदा केजरीवाल सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाल्या.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार आतिशी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक विजय कुमार सिंह आणि तृप्ता वाही यांच्या कन्या आहेत.

आतिशी यांनी दिल्लीतील स्प्रिंगडेल शाळेतून शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहास या विषयात पदवी घेतली.

आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापाठीतून मास्टर्स डिग्री घेतली. त्यानंतर त्यांना चिवनिंग शिष्यवृत्तीही मिळाली.

त्यानंतर आतिशी यांनी आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली शाळेत मुलांना शिकवलं. त्या सेंद्रिय शेती, आणि शिक्षण व्यवस्थेशी निगडित क्षेत्रांमध्ये सक्रिय होत्या.

त्यानंतर त्या भोपाळमध्ये आल्या. तिथे त्यांनी अनेक एनजीओंबरोबर काम केलं. त्याचवेळी त्या आम आदमी पार्टी आणि प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आल्या.

अण्णा हजारे आंदोलनातही त्या सक्रिय होत्या आणि आता त्या ‘आप’ च्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

आतिशी 2013 मध्ये पक्षात आल्या. 2015 ते 2018 या काळात त्या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम करत होत्या.

आम आदमी पार्टीच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार असताना त्यांनी दिल्लीच्या शाळांची परिस्थिती सुधारणं, शाळेत व्यवस्थापन समितीची स्थापना आणि खासगी शाळांची अमर्याद फीवाढ थांबवण्यासाठी कडक नियम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आतिशी पक्षाच्या राजकीय प्रकरणाच्या समितीच्या सदस्य आहेत.

आतिशी यांच्याकडे सध्या शिक्षण, उच्च शिक्षण, टेक्निकल ट्रेनिंग अँड एज्युकेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा, महसूल, योजना, वित्त, दक्षता, पाणी, जनसंपर्क आणि कायदा न्याय हे विभाग आहेत.

जेव्हा आतिशी यांनी त्यांचं आडनाव काढून टाकलं होतं

आतिशी यांनी पहिल्यांदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या आतिशी मार्लेना या नावाने ओळखल्या जायच्या.

त्या आधी आतिशी पडद्यामागच्या सूत्रधार म्हणून परिचित होत्या.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सामान्य जनतेत गेल्यावर आतिशी यांच्या हातात माईक पाहिल्यावर निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तसंच आप च्या मुख्य महिला नेत्या होऊ शकतात याचा अंदाज आला.

त्यावेळी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आतिशी यांनी पक्षाच्या सर्व नोंदीत तसंच निवडणुकीशी निगडित सर्व कागदपत्रांमध्ये त्यांचं मार्लेना हे आडनाव काढलं होतं.

त्यावेळी भाजपने त्यांना आडनावावरून त्या विदेशी आणि ख्रिश्चन आहेत अशी टीका केली होती.

मात्र ओळख सिद्ध करण्यात वेळ घालवायचा नाही म्हणून आडनाव हटवत आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

आतिशी यांचे आईवडील डाव्या विचारसरणीचे आहेत असं मानलं जातं आणि कार्ल मार्क्स आणि व्लादीमिर लेनिन यांच्या नावांना जोडून आतिशी यांना ‘मार्लेना’ हे आडनाव दिलं होतं.

त्या निवडणुकीत आतिशी यांचा पराभव झाला होता आणि गौतम गंभीर यांचा विजय झाला होता. त्यानंतर आतिशी यांनी एक्स हँडलवरून आडनाव काढलं होतं.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)