जगभरात एकीकडे 80 कोटी लोक उपाशी अन् दुसरीकडे 105 कोटी टन अन्नाची होते दरवर्षी नासाडी

जगभरात एकीकडे 80 कोटी लोक उपाशी अन् दुसरीकडे 105 कोटी टन अन्नाची होते दरवर्षी नासाडी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, मुंबई

जगभरात रोज 78.3 कोटी लोक उपाशी राहत असताना दुसरीकडे 1.05 अब्ज टन म्हणजेच 105 कोटी टन अन्न फुकट जातंय.

युनायटेड नेशनच्या एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमने प्रसिद्ध केलेल्या Food Waste Index Report 2024 मध्ये हे म्हटलंय.

अन्नाची नासाडी कुठे आणि किती होतेय?

या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे.

याशिवाय अन्नधान्याची छाटणी होऊन ते रिटेल व्यवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या पुरवठा साखळी दरम्यानच्या प्रवासात आणखी 13% अन्नाचा नाश होतोय.

अन्न सर्वाधिक फुकट जातं ते घरगुती पातळीवर. 2022 वर्षात जितकं एकूण अन्न वाया गेलं त्यापैकी जवळपास 60% म्हणजे 63.1 कोटी टन अन्न घरांमध्ये वाया गेलं होतं.

एक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 किलो अन्न वाया घालवतेय.

आणि हे फक्त श्रीमंत देशांमध्येच होतंय असं नाहीये तर उच्च उत्पन्न गट, उच्च / वरिष्ठ मध्यम उत्पन्न गट आणि निम्न मध्यम उत्पन्न गट अशा तीनही प्रकारच्या देशांमधल्या घरांमध्ये दरवर्षी - प्रत्येक घरात वाया जाणाऱ्या अन्नाच्या प्रमाणात फक्त 7 किलोंचा फरक आहे.

अन्नाची नासाडी

फोटो स्रोत, Getty Images

यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागांनुसार काही भेद आहेत. म्हणजे मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ग्रामीण भागांतल्या घरांमध्ये तुलनेनं कमी अन्न वाया जातं.

उरलेलं अन्न गुरांना-पाळीव प्राण्यांना देणं, घरातल्या कम्पोस्टमध्ये खतासाठी घालणं या सवयींमुळे हे प्रमाण कमी होतं.

इतकं अन्न का वाया जातंय?

उष्ण हवामान असणाऱ्या देशांमध्ये अन्न वाया जाण्याचं प्रमाण अधिक आहे. हे देश असे आहेत जिथे ताजं अन्न खाण्यावर भर आहे आणि त्यातला काही भाग असा असतोच जो खाल्ला जाऊ शकत नाही.

शिवाय या देशांमध्ये कोल्ड चेन म्हणजे अन्न नियंत्रित तापमानाखाली साठवून ठेवण्यासाठीच्या सोयी पुरेशा नसल्यानेही नासाडी होते.

वाढणारं तापमान, उष्णतेची लाट, दुष्काळ या कारणांमुळे अन्न साठवून ठेवणं, त्यावर प्रक्रिया करणं, वाहतूक आणि विक्री यासगळ्या गोष्टी कठीण होतात.

वैयक्तिक पातळीवर विचार करायचा झाला तर अन्न फुकट जाण्याचं जगभरातलं एक मोठं कारण आहे - आपल्या ताटांचा -डिशचा वाढलेला आकार. 1970च्या दशकात साधारण 22 सेंटीमीटरची असणारी डिनर प्लेट आता वाढत वाढत 28 सेंटीमीटरची झाली.

ताटाचा आकार वाढल्याने आपण किती अन्न वाढून घेतो, त्यातही वाढ झाली. परिणामी एकीकडे माणूस जास्त खायला लागला, पण दुसरीकडे पानात वाढलेलं अन्न फुकट जाण्याचं प्रमाणही वाढलं.

अन्न वाया जाण्याचे परिणाम

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात भूक - उपासमारी हे इतकं मोठं संकट असताना दुसरीकडे हे अन्न वाया जातंय.

जगभरातल्या एकूण 78.3 कोटी म्हणजे लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांना सध्या अन्न दुर्भिक्ष्याला सामोरं जावं लागतंय.

जगभरातल्या उपासमारीच्या समस्येबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सोपी गोष्ट 1076 नक्की पहा किंवा ऐका.

व्हीडिओ कॅप्शन, दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश धोरणांमुळे भारतात बंगालमध्ये उपासमारीची वेळ ओढवली होती.

जगभरातल्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी 8 ते 10 टक्के वायू उत्सर्जन हे वाया गेलेल्या अन्नामुळे होणाऱ्या कचऱ्यातून होतं.

तुलना करायची झाली तर हवाई वाहतूक क्षेत्रामुळे होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापेक्षा हे प्रमाण 5 पटींनी जास्त आहे. हे वायू हवामान बदलाला हातभार लावतात.

अन्न वाया जाऊ नये म्हणून काय करायचं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

G20 गटाच्या सदस्य देशांपैकी फक्त चार देशांनी - ऑस्ट्रेलिया, जपान, युके आणि अमेरिका या देशांनी आणि युरोपियन युनियनने 2030 पर्यंतची अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी करण्याची उद्दिष्टं ठरवली आहेत.

अन्न वाया जाण्याचं प्रमाण घटवता येऊ शकतं हे जपान आणि युके या देशांनी दाखवून दिलंय. जपानमधला अन्न वाया जाण्याचा दर 18 टक्क्यांनी तर युकेचा दर 31% कमी झालाय.

जगभरातल्या देशांनी फुड वेस्ट इंडेक्सचा आधार घेत आपल्या देशातल्या नुकसानाचा अंदाज घ्यायला हवा आणि देशपातळीवरची उद्दिष्टं ठरवून त्यानुसार पावलं उचलली जात आहेत का, याकडे लक्ष द्यायला हवं असं UNEP ने म्हटलंय.

अन्न वाया जाऊ नये यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक - संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे.

यामध्ये वैयक्तिक - स्वत:साठीच्या सवयी म्हणजे - जेवढी गरज आहे तेवढ्याच गोष्टी विकत घ्या. खाणार असाल तितकंच शिजवा आणि पानात घ्या. उरलं तर फेकून देता त्याचा वापर करा.

फूड लेबल्स म्हणजे पाकिटबंद वा बाटलीबंद पदार्थांवरील तपशील योग्य रीतीने वाचता येणंही नासाडी कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. एखादा पदार्थ वा खाद्य उत्पादन कसं ठेवलं वा साठवलं तर ते दीर्घकाळ टिकू शकतं, याची माहिती असणंही नासाडी कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे.

मोठ्या पातळीवर काय करायला हवं - तर पुरवठा साखळी सुधारायला हवी - नाशिवंत फळं - भाज्या यांच्यावरच्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवं. नवीन टेक्नॉलॉजी वापरून अन्नाचा - पदार्थांचा दर्जा सुधारण्यावर भर द्यायला हवा.

फूड वेस्ट - म्हणजेच अन्नाची नासाडी कमी करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी अन्न फुकट जातं त्यावेळी ते पिकवण्यासाठी लागलेलं पाणी - जमीन - इंधन - मजुरी - पैसा हे सगळं वाया जात असतं. भविष्यात याच सगळ्या कारणांमुळे महागाई वाढते.