भोपळ्यामुळे कुपोषणावर मात करता येणार का? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राशी गोयल
- Role, बीबीसीसाठी
भोपळा आपल्या सर्वांनाच परिचित आहे. वर्षाच्या शेवटी हॅलोविनमुळे भोपळ्यांची चर्चा रंगू लागते. परंतु भोपळ्याची इतर वैशिष्ट्य म्हणजे ते दुष्काळाचा सामना करू शकणारं, स्थिर आणि भरपूर पोषणमूल्ये असणारं बहुपयोगी पीक आहे. म्हणूनच की काय तो भविष्यातील सर्वोत्तम खाद्यपदार्थ (सुपरफूड) असू शकेल का?
पाश्चिमात्य देशांमध्ये पारंपारिक ‘हॉलिडे पाय’ या गोड पदार्थामध्ये भोपळा हा मुख्य घटक असतो. परंतु भोपळा अतिशय पौष्टिक असून औषधी गुणांसाठीही वापरला जातो.
आवश्यक पोषणमुल्यांनीयुक्त, वाढ होण्यास तुलनेने सोपं, टणक आणि दुष्काळ सोसू शकणारं हे पीक कायमच दुर्लक्षित राहिलंय.
शेतकऱ्यांना पाणी टंचाई आणि लहरी हवामानाचा सामना करावा लागत असताना, स्थानिक समुदाय आर्थिक विवंचनेचा सामना करत असताना आणि वाढत्या प्रदुषणामुळे जगात कुपोषितांची संख्या वाढत असताना भोपळा आशेचा किरण ठरतोय.
बांगलादेशातील छोटे वाळवंट म्हणून ओळखलं जाणाऱ्या सॅन्ड बार्स वाळवंटात हवामान बदलामुळे पावसाळ्यातील पाच महिने पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली.
प्रदुषित नदीच्या साचलेल्या गाळात अत्यंत विषारी घटक असतात आणि त्यामुळे जमीन नापिक होते. परंतु नदीने खरवडून नेलेल्या आणि गाळ पसरलेल्या जमिनींचा वापर आता भोपळा पिकवण्यासाठी होतोय ज्याचा उपयोग अन्न असुरक्षितता, बेरोजगारी आणि कुपोषण यांच्याशी सामना करण्यासाठी केला जातोय.

फोटो स्रोत, Nazmul Chowdhury
2005 मध्ये "पंपकिन्स अगेन्स्ट पॉव्हर्टी" (गरिबी विरुद्ध भोपळे) नावाचा प्रकल्प सुरू झाला.
कुठलाही आर्थिक फायदा डोळ्यांसमोर न ठेवता निव्वळ एक व्यावहारिक कृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता ‘पंपकिन प्लस’ नावाच्या फायदेशीर उपक्रमात रूपांतर झालंय.
"आम्ही एक हजारहून अधिक कृषी-उद्योजकांसोबत काम करतोय. कतार, मलेशिया, सिंगापूर आणि इतर देशांमध्ये भोपळे निर्यात करतोय आणि व्यावसायिक शेतीमध्ये वैविध्य आणण्यासाठी स्थानिक लोकांना बळ देण्याचा प्रयत्न करतोय," असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नझमुल इस्लाम चौधरी म्हणतात.
“स्थानिक लोकं पाच महिन्यांच्या कालावधीत सरासरी सुमारे 6,000 पौंड (7,340 डॉलर) कमावतात."
दुष्काळातलं आश्वासक पीक
दुष्काळ सहन करण्याची क्षमता आणि पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशांसाठी भोपळा ही एक आदर्श वनस्पती आहे.
पाण्याची कमी गरज आणि खारटपणा सहन करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता बांगलादेशातील शेतकरी इतर उत्पादनांच्या तुलनेत चांगला नफा कमावण्यासाठी वाळूच्या पट्ट्यामध्ये भोपळ्याचे पीक घेण्यास प्राधान्य देतात.
तुर्कस्तानच्या सेल्कुक विद्यापीठातील संशोधक काही विशिष्ट जातींवर आधारित भोपळ्याच्या नवीन जाती विकसित करण्याचा प्रयत्न करताहेत ज्यामुळे दुष्काळ सहन करू शकणारं पीक घेता येऊ शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशातील अनपेक्षित पुरामुळे चौधरी आणि त्यांच्या टीमसमोर अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत. पण झिम्बाब्वेस्थित मुकुशी सीड्ससाठी काम करणारे वनस्पती प्रजनन तज्ज्ञ प्रिन्स माटोवा यांना वाटतं की पिकांची स्वत:ला अनुकूल बनवण्याची क्षमता विविध गोष्टींद्वारे वाढवली जाऊ शकते.
"उदाहरणार्थ लवकर सुरू होणाऱ्या किंवा कमी हंगामासाठी प्रजनन, पुनरुत्पादक शेती पद्धतींचा अवलंब, सिंचन पद्धतीचा पूरक वापर, आणि अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पर्यावरणाचा आघात सहन करण्यासाठी पिकांची लवचिकता वाढवणं इ.”
जमिनीची गुणवत्ता वाढते?
भोपळे केवळ पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशातच वाढण्यास योग्य आहेत असं नाही तर त्याचं पीक ज्या जमिनीत घेतलं जातं त्या जमिनीसाठीही ते फायदेशीर मानले जातात.
शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी युंगांडातील शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या ‘अॅडव्होकसी कोईलेशन फॉर सस्टेनेबल अॅग्रिकल्चर’ (ACSA) चे धोरण अधिकारी नासुना फ्लॉरेन्स भोपळ्याच्या देशी वाणांच्या शेतीद्वारे तापमानवाढ कमी करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत.
प्रकल्पासाठी “जमिनीची धूप कमी करण्यासाठी, वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मातीचे आरोग्य सुधारण्याच्या क्षमतेच्या आधारावर भोपळ्याची निवड करण्यात आली आहे".

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायदेखील या पिकामध्ये रस दाखवतोय. इजिप्तमध्ये देशातील पाण्याची वाढती गरज आणि कमतरतेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, शास्त्रज्ञ अन्न असुरक्षिततेला तोंड देण्यासाठी भोपळ्याच्या वंशाच्या जातींच्या बिया शोधण्याचा आणि जतन करण्याचा प्रयत्न करतायत.
युनायटेड अरब अमिराती (यूएई) मध्ये ‘एलिट ॲग्रो’ (Elite Agro) नावाची कंपनी युएईच्या थँक्सगिव्हिंग सीझनची मागणी पूर्ण करण्यासाठी उच्च तापमान-नियंत्रण पद्धतींसह युरोपीयन नवकल्पना आणि तंत्रज्ञान वापरून ग्रीनहाऊसमध्ये भोपळ्याचं उत्पादन घेतेय.

फोटो स्रोत, Nazmul Chowdhury
भोपळ्यांवर खूप संशोधन झाले आहे यात काही आश्चर्य नाही – भोपळे पौष्टिक देखील आहेत. भोपळ्याच्या पिकामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे विविध कर्करोग टाळण्यास मदत करतात. पौष्टिक, कमी उष्मांक असलेलं, पाण्याने समृद्ध असलेलं हे फळ व्हिटॅमिन-ए चा एक उत्तम स्रोत आहे.
हे फळ बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लोह आणि फोलेट इत्यादींनीदेखील समृद्ध आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
मलेशियातील पुत्रा विद्यापीठाच्या 2021 च्या अभ्यासात भोपळ्यांना “युगातील क्रांतीकारक पीक" म्हटलं आहे. भोपळा हे "संतुलित अन्नाचा स्त्रोत आहे आणि इतर प्रमुख पिकांपेक्षा कमी माती आणि कोणत्याही वातावरणीय परिस्थितीशी जुळवून घेणारं पीक आहे."
भोपळ्यांच्या बियांमध्ये काय असतं?
भोपळा हे जीवनसत्त्व आणि पोषक तत्वांनीयुक्त असल्यामुळे ज्या प्रदेशात पौष्टिक अन्न मिळणं कठीण आहे, त्या प्रदेशांसाठी ते एक आदर्श पीक आहे.
यूएस मधील इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन विद्यापीठातील पीक विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक असलेल्या सारा हिंद म्हणतात की, “विकसनशील देशांमधील लोकांसाठी भोपळ्याची फळं ही अत्यावश्यक जीवनसत्त्व, खनिजं आणि चरबीचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये ट्रिप्टोफॅन, अर्भकांच्या वाढीसाठी आणि शरीराचे स्नायू आणि प्रथिने राखण्यासाठी आवश्यक असलेले अमिनो अॅसिड देखील असतं.
युगांडामधील एक कंपनी, बायफे फूड्स ही सोया, बाजरी आणि तांदळाच्या पिठात वापरता येणारी भोपळ्याची उत्पादनं बनवण्यात अग्रस्थानी आहे. कंपनी तिचे सर्व भोपळे जमिनीची धूप होऊन खराब झालेल्या नदीकाठावर उगवते.
बायफे फूड्स निर्मित भोपळा उत्पादनं लहान मुलांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी लापशी म्हणून खायला घालतात. केनियामध्ये ज्वारीच्या पिठात भोपळा मिसळून मुलांच्या शरीरातील जीवनसत्वाची कमतरता दूर केली जात आहे.
भोपळ्याचं पिकातील आव्हानं
भोपळा हे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेसाठी परिवर्तन घडवून आणणारं पीक ठरू शकतं, असं चौधरी आवर्जून सांगतात.
उष्णकटिबंधीय प्रदेशातील देशांसाठी देखील ते आदर्श पीक आहे, कारण ते खूप काळ टिकतं. साठवण करून ठेवणे, साठवण करण्यासाठी थंड हवामानाची गरज नसणे या गुणधर्मांमुळे गरीब देशांसाठी आणि ग्रामीण भागात जिथे वीज नियमितपणे उपलब्ध नसते, अशा प्रदेशासाठी भोपळा ते अतिशय योग्य पीक आहे, असं प्रिंस मातोवा म्हणतात.
भोपळे पिकवण्यात काही आव्हानंसुद्धा आहेत. हिंद म्हणतात, "भोपळ्याची झाडे त्यांच्या फुलांचे परागीकरण करण्यासाठी मधमाशांवर अवलंबून असतात, परंतु इतर किटक फुलांकडे आकर्षित होऊन झाडांना नुकसान पोहोचवू शकतात”.

फोटो स्रोत, Nazmul Chowdhury
परंतु असं दिसतं की अडचणींपेक्षा याचे फायदे जास्त आहेत. भारतातील उष्णकटिबंधीय प्रदेशातील गोव्यासारख्या काही भागात कंपोस्टच्या डब्यात भोपळ्याच्या बियांपासून भोपळ्याच्या वेली सहज वाढलेल्या दिसतात. या पिकाच्या सर्व भागांचा म्हणजेच फळं, बिया, फुलं, पानं आणि अगदी कोवळ्या देठांचादेखील वापर केला जातो, त्यामुळे हे पीक अधिक उपयुक्त ठरतं.
भारत आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये भोपळ्याची पानं खाल्ली जातात, तसंच पशुधन आणि सागरी जीवांसाठी खाद्य म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
टोकाची हवामान परिस्थिती असलेल्या प्रदेशात सहज उगवणारे, पौष्टिक, स्वयंपाकात जवळजवळ प्रत्येक भाग वापरता येणारं हे पीक, अन्न-असुरक्षितता असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जीवनदायी ठरू शकतं.
‘यूएन’च्या अन्न आणि कृषी संघटनेने घालून दिलेल्या अन्न सुरक्षेच्या चार निकषांमध्ये - सुलभता, उपलब्धता, उपयोग आणि स्थिरता मध्ये भोपळा योग्यरित्या बसतो.
तापमानवाढीचा सामना आणि जगातील वाढत्या लोकसंख्येला पोटभर, पौष्टिक अन्न खाऊ घालायचं असेल तर भोपळ्याला सुपरफूड म्हणून स्वीकारणं हा एकमेव मार्ग आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








