बंगालचा दुष्काळ: 'जेव्हा अन्नासाठी लोकांनी आपल्या मुला-मुलींना विकलं होतं'

फोटो स्रोत, SAILEN SARKAR
- Author, कविता पुरी
- Role, बीबीसी न्यूज
1943 सालच्या बंगालच्या दुष्काळाने पूर्व भारतात तीस लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला.
दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या गटातील नागरिकांची झालेली ही सर्वात मोठी हानी होती.
या दुष्काळात मरण पावलेल्या लोकांचं जगात कुठेही स्मारक, संग्रहालय किंवा त्यांच्या नावाचा एखादा फलकसुद्धा नाही.
हा दुष्काळ पाहिलेल्यांपैकी काही लोक आजही हयात आहेत. त्यांच्याच शब्दात या महाभयंकर दुष्काळाचे चटके सोसलेल्यांच्या कहाण्या वाचा.
'भूकेने आमचा पाठलाग सुरू केला'
“मूठभर तांदळासाठी अनेकांनी आपल्या मुला-मुलींना विकलं. अनेक बायका आणि तरुणी त्यांच्या ओळखीच्या किंवा अनोळखी पुरुषांचा हात धरून पळून गेल्या."
बंगालच्या दुष्काळात लोकांनी अन्न शोधण्यासाठी केलेल्या असाध्य उपायांचं वर्णन बिजॉयकृष्ण त्रिपाठी करतात.
त्यांना त्यांचं नेमकं वय ठाऊक नाही, पण त्यांच्या मतदार ओळखपत्रानुसार ते 112 वर्षांचे आहेत. आपत्तीच्या आठवणी स्मरणात असणाऱ्या काही शेवटच्या लोकांपैकी ते एक आहेत.
बंगालमधील मिदनापूर या जिल्ह्यात मोठं होतानाच्या धुरस आठवणींबद्दल ते सावकाशपणे बोलतात. तांदूळ हे मुख्य अन्न होतं आणि 1942 च्या उन्हाळ्यात त्याची किंमत “अचानक” वाढल्याचं त्यांना आठवतं.

फोटो स्रोत, BRITISH PATHE
त्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या चक्रीवादळाने त्यांच्या घराचं छप्पर उडून गेलं आणि त्या वर्षीचं भाताचं पीक उद्धस्त झालं. लवकरच त्यांच्या कुटुंबाला तांदूळ परवडेनासा झाला.
"भूकेने आमचा पाठलाग सुरू केला. उपासमार आणि साथीचे रोग आले. सर्व वयोगटातील लोक मरायला लागली.”
लोकांना अन्नधान्याचा पुरवठा झाल्याचं बिजॉयकृष्ण यांना आठवतं, पण तो अपुरा होता, असं ते म्हणतात.
"प्रत्येकाला रिकामी पोटी दिवस काढावे लागले. खायला काही नसल्यामुळे गावातली बरीच लोकं मृत्यूमुखी पडली. अन्नाच्या शोधात लोकांनी लुटालूट सुरू केली," असं ते सांगतात.
त्यांच्या घराच्या व्हरांड्यावर बसून त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्या त्यांना ऐकत होत्या.
त्यांच्यासोबत सायलेन सरकार देखील आहेत, जे गेल्या काही वर्षांपासून बंगालच्या ग्रामीण भागात फिरत आहेत आणि विनाशकारी दुष्काळातून वाचलेल्या लोकांकडून माहिती गोळा करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ही 72 वर्षीय व्यक्ती प्रेमळ, तारूण्याचा सळसळता झरा आणि सहज स्मितहास्य करणारी आहे. म्हणूनच तुम्हाला दिसतं की बिजॉयकृष्णासारखी लोकं त्यांच्यासमोर मोकळेपणाने बोलू लागतात.
पायाची बोटं उघडी असणारी सँडल घालून, कुठल्याही हवामानात, पाठीवरची बॅग घेऊन आणि विडी घेऊन ते ग्रामीण भागात फिरतात. ते जुन्या जमान्यातील आहेत, लोकांचं म्हणणं ते पेनाने कागदावर उतरवून घेत असतात.

बंगालच्या दुष्काळाबाबत त्यांना पहिल्यांदा कौटुंबिक फोटो अल्बमने 'वेड' लावलं, असं सायलेन म्हणतात. कलकत्ता (आता कोलकाता) मधील एक छोटा मुलगा म्हणून ते हतबल लोकांच्या छायाचित्रांकडे ते टक लावून पाहत असत.
ही छायाचित्रे त्यांच्या वडिलांनी टिपली होती. स्थानिक भारतीय धर्मादाय संस्थेत ते कार्यरत होते आणि दुष्काळात लोकांना मदत करत होते. सायलेन म्हणतात की त्यांचे वडील गरीब होते. ते म्हणतात, "माझ्या लहानपणी मी त्यांच्या डोळ्यांत उपासमारीची दहशत पाहिली होती.”
मात्र, आता निवृत्त शिक्षक असलेल्या सायलेन यांनी 2013 पर्यंत या गोष्टींचा शोध घ्यायला सुरूवात केली नव्हती. मिदनापूरमध्ये फिरत असताना ते एका 86 वर्षांच्या वृद्धाशी दुष्काळाबद्दल संवाद करू लागले.

फोटो स्रोत, SAILEN SARKAR
बिजॉयकृष्णाप्रमाणे श्रीपतीचरण समांता यांनाही विनाशकारी चक्रीवादळ आठवतं. तोपर्यंत आयुष्य आधीच कठीण झालेलं आणि तांदळाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती.
ऑक्टोबर 1942 पर्यंत ते दिवसातून एकदाच थोडासा भात खायचे. त्यानंतर वादळाचा तडाखा बसला.
चक्रीवादळानंतर तांदळाचे भाव कसे गगनाला भिडले आणि जे काही शिल्लक होतं ते व्यापाऱ्यांनी कोणत्याही किमतीला कसं विकत घेतलं याची आठवण श्रीपतीचरण सांगतात.
ते सांगतात, “लवकरच आमच्या गावातला तांदूळ संपला. काही काळासाठी लोक साठवून ठेवलेल्या साठ्यावर जगले पण नंतर फक्त निदान भात तरी खायला मिळावा म्हणून लोकांनी जमिनी विकायला सुरुवात केली."
वादळानंतर, त्यांच्या कुटुंबाचा तांदळाचा साठा काही दिवसच पुरला आणि नंतर संपुष्टात आला.
इतर हजारो लोकांप्रमाणे श्रीपतीचरण यांनीदेखील ग्रामीण भाग सोडला आणि काही दिलासा मिळेल आशेने कलकत्ता येथे धाव घेतली.
तिथे त्यांचे नातेवाईक असल्याने ते भाग्यवान ठरले आणि ते वाचले. परंतु इतर लोकं त्यांच्याइतकी भाग्यवान नव्हती. लोकं रस्त्याच्या कडेला, कचरापेटीच्या आजूबाजूला कोसळून पडत होती आणि फुटपाथवरच मरत होती - त्यांना वाटलेलं की शहरातील अनोळखी लोक त्यांना मदत करतील.
काळाच्या पडद्याआड गेलेलं प्राक्तन
दुष्काळाची अनेक कारणं आहेत आणि ती गुंतागुंतीची आहेत आणि त्यावर आजपर्यंत अनेकदा व्यापक चर्चा होत आलेय.
1942 साली बंगालमध्ये तांदळाच्या पुरवठ्यावर प्रचंड दबाव होता.
बंगालच्या सीमेवर असलेल्या बर्मावर जपानने वर्षाच्या सुरुवातीला आक्रमण केलं आणि त्या देशातून तांदळाची आयात अचानक थांबली.
बंगाल सर्व आघाड्यांवर पुढे होतं आणि शेकडो-हजारो मित्र राष्ट्रांचे सैनिक आणि युद्धकाळातील उद्योगातील कामगारांचं यजमानपद कलकत्ता शहर भूषवत होतं, ज्यामुळे तांदळाची मागणी वाढली. युद्धकाळात प्रचंड महागाई होती, ज्या लोकांच्या आयुष्यात आधीच जगण्यामरण्याचा संघर्ष सुरू होता अशा लाखो लोकांसाठी तांदळाच्या किमती आवाक्याबाहेर होत्या.
दरम्यान, जपानी लोकं पूर्व भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करून "नकार" धोरणाला प्रवृत्त करतील याची ब्रिटीशांना भीती वाटली. यामध्ये बंगाल डेल्टामधील शहरं आणि खेड्यांमधून अतिरिक्त तांदूळ आणि बोटी जप्त केल्या गेल्या. चाल करून येणा-या कोणत्याही शक्तीसाठी अन्न पुरवठा आणि आणि त्याच्या वाहतुकीला नकार देणं हे उद्दिष्ट होतं, परंतु यामुळे आधीच नाजूक झालेली स्थानिक अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि किंमती आणखी वाढल्या. अन्नसुरक्षेसाठी अनेकदा फक्त नफ्यासाठी तांदळाचा साठा केला जात असे.

फोटो स्रोत, Getty Images
हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, ऑक्टोबर 1942 च्या विनाशकारी चक्रीवादळाने भाताची अनेक पिकं नष्ट केली, पिकांच्या रोगाने उर्वरित शेती उद्ध्वस्त केली.
या मानवनिर्मित आपत्तीसाठी कोण दोषी आहे आणि अनेक आघाड्यांवर लढाई सुरू असताना दुष्काळाची तीव्रता लक्षात आल्यानंतरही भारतीयांना मदत करण्यासाठी विशेषतः ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी पुरेसे प्रयत्न केले का, यावर दीर्घकाळ आणि अनेकदा ज्वलंत चर्चा झडत आल्या आहेत.
1943 च्या अखेरीस नवीन व्हाईसरॉय फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांचं आगमन झाल्यानंतर मदतीचे प्रयत्न सुरू झाले. पण तोपर्यंत अनेकजण मृत्यूमुखी पडले होते.
'एक जिवंत संग्रह'
दुष्काळाची कारणं आणि त्याला कोण दोषी आहे यावरील चर्चेमध्ये अनेकदा वाचलेल्या लोकांच्या कहाण्या झाकोळल्या गेल्या.
सायलेनने आतापर्यंत 60 हून अधिक प्रत्यक्षदर्शींच्या भेटी घेतल्या आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते ज्या लोकांशी बोलते ते अशिक्षित होते, आणि दुष्काळाबद्दल क्वचितच कधी काही बोलले होते किंवा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबानेही त्यांना याबाबत कधीही काहीच विचारलं नव्हतं.
दुष्काळातून वाचलेल्यांची साक्ष गोळा करण्यासाठी काहीही संग्रहीत केलेलं नाही. या लोकांच्या कहाण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं, कारण ते समाजातील सर्वात गरीब लोक होती, असं सायलेनला वाटतं.
“कुणीतरी आपलं म्हणणं ऐकावं, याची ते सर्वजण वाट पाहत होते, असं वाटत होतं,” असं ते म्हणाले.
सायलेन तिला भेटला तेव्हा निरातन बेडवा 100 वर्षांची होती. मुलांची काळजी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातांच्या व्यथांचं तिने वर्णन केलं.
"मातांना दुधाचा पाझर फुटत नव्हता. त्यांच्या शरीरावर मांस नव्हतं, फक्त हाडं शिल्लक होती,” असं त्या म्हणाल्या.
"अनेक मुलं जन्मताच मरण पावली आणि त्यांच्या मातासुद्धा मृत्यूमुखी पडल्या. जे निरोगी जन्माला आले तेही उपासमारीमुळे तरुण वयातच मरण पावले. त्यावेळी अनेक स्त्रियांनी आत्महत्या केली."
जे पती आपल्या पत्नीला खायला देऊ शकत नव्हते त्यांच्या बायका इतर पुरुषांसोबत पळून जात होत्या, असंही तिने सायलेनला सांगितलं.
त्या म्हणतात, "जेव्हा तुमच्या पोटात अन्न नसेल, आणि तुम्हाला खायला घालणारा कोणी नसेल, तेव्हा तुमच्या चारित्र्याबाबत कोण शंका उपस्थित करणार आहे?"
सायलेनने दुष्काळातून फायदा झालेल्या लोकांशीही चर्चा केली. एका माणसाने कबूल केलं की त्याने "तांदूळ आणि डाळ किंवा थोड्या पैशाच्या बदल्यात" बरीच जमीन विकत घेतली. त्याने सायलेनला असंही सांगितलं की एका कुटुंबाला कुणीही वारस नव्हतं, ते मरण पावल्यावर त्यांनी त्या जमीनीवर स्वत:ची म्हणून ताबा सांगितला.

फोटो स्रोत, KUSHANAVA CHOUDHUR
बंगाली-अमेरिकन लेखक कुशानवा चौधरी हे सायलेनसोबत त्यांच्या एका भेटीच्या वेळी काही वाचलेल्या लोकांना भेटायला गेले होते.
"आम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागला नाही - ते कुठेही लपून बसले नव्हते, ते सर्वजण नजरेसमोरच होते, संपूर्ण पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील खेड्यांमध्ये ही माणसं जगातील सर्वात मोठं संग्रहालय म्हणून स्वत: समोर बसलेली होती,” असं ते म्हणतात.
"कोणीही त्यांच्याशी बोलण्याची तसदी घेतली नाही. मला त्याबद्दल प्रचंड लाज वाटली."
त्या काळातील प्रतिष्ठित भारतीय चित्रपट, छायाचित्रे आणि रेखाटनांमध्ये दुष्काळाची आठवण ठेवली जाते, परंतु कुशानवा म्हणतात की पीडित किंवा वाचलेल्यांच्या मुखाने तो क्वचितच लोकांच्या समोर आला: “अशा लोकांद्वारे कथा लिहिली गेली ज्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. प्रसंग कुणाच्या बाबतीत घडला आणि कथा कुणाकडून सांगितली गेली ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे."
दुष्काळग्रस्तांचं भवितव्य कदाचित यामुळे झाकोळलं गेलं कारण 1940 हे भारतासाठी "मृत्यूचं दशक" होतं, असं केंब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापिका श्रुती कपिला म्हणतात.
1946 मध्ये कलकत्ता येथे मोठ्या प्रमाणात जातीय दंगली घडल्या ज्यात हजारो लोक मरण पावले.
एक वर्षानंतर, ब्रिटीश निघून गेले आणि देशाची हिंदूबहुल भारत आणि मुस्लिमबहुल पाकिस्तानमध्ये फाळणी झाली. स्वातंत्र्याचा आनंद होता, परंतु फाळणी रक्तरंजित आणि क्लेशकारक होती - धर्मांतरामुळे दहा लाखांहून अधिक लोकं मरण पावले. 12 दशलक्ष लोकांनी नवीन सीमा ओलांडली.
बंगालसुद्धा भारत आणि पूर्व पाकिस्तानमध्ये विभागला गेला, जो नंतर बांगलादेश म्हणून अस्तित्त्वात आला.
प्राध्यापक कपिला या कालखंडाबद्दल म्हणतात, "सामुहिक मृत्यूच्या घटनांच्या मालिकेमध्ये फारच कमी पोकळी शिल्लक आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की बंगालचा दुष्काळ त्या कथेत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी एकप्रकारे संघर्ष करतोय."
परंतु पीडितांचं त्यांच्या स्वतःच्या शब्दात मोठ्या प्रमाणावर ऐकलं गेलं नाही, परंतु त्या म्हणतात की अनेक भारतीय साम्राज्याचा चिरस्थायी वारसा म्हणून दुष्काळ आणि उपासमारीकडे पाहिलं गेलंय.

फोटो स्रोत, SAILEN SARKAR
ऐंशी वर्षांनंतर, काही मोजकीच लोकं वाचली आहेत. सायलेनला आठवतं की अनंगमोहन दास नावाच्या एका माणसाला ते जेव्हा भेटले तेव्हा ते 91 वर्षांचे होते.
सायलेन त्यांना कशासाठी भेटायला गेले होते, हे ऐकून ती व्यक्ती काही काळ शांत बसली.
"तू एवढ्या उशिरा का आलास?" असं म्हणताना त्याच्या आत गेलेल्या गालावरून अश्रू ओघळत होते.
परंतु सायलेनने एकत्रित केलेली डझनभर लोकांची माहिती ही एका घटनेचं एक छोटसं मृत्युपत्र आहे, ज्यामुळे लाखो लोकं मरण पावली आणि लाखो लोकांचं आयुष्य बदललं.
"जेव्हा तुम्हाला तुमचा इतिहास विसरायचा असतो, तेव्हा तुम्हाला सर्वकाही विसरायचं असतं,” असं ते म्हणाले. असं होता कामा नये, हा सायलेनचा निर्धार आहे.











