जागतिक पर्यावरण दिनः पाण्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो?

फोटो स्रोत, Alamy
- Author, अबायगेल बीएल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाणी हा पृथ्वीवरील एक महत्त्वाचा घटक आहे, पण हे मूल्यवान द्रव्य अचानक मिळेनासं झालं तर आपलं काय होईल?
झाम्बेझी नदी त्याच्यापासून फारशी दूर नव्हती. चाझ पॉवेलला खालच्या बाजूला अगदी काही शे मीटरांवर दरीमध्ये खडकांवर उसळणारं नदीचं पाणी दिसत होतं. अगदी तहान चाळवेल इतक्या जवळ पाणी असूनही त्याला तिथे पोहोचता येत नव्हतं.
"मला किती तहान लागलेली ते शब्दांत सांगताही येणार नाही," पॉवेल म्हणतात. दरीच्या वरच्या बाजूला एका कड्याच्या टोकावर ते अस्वस्थ होत बसले होते, त्यांच्याकडचं पाणी संपलेलं आणि खाली नदीपर्यंत जाण्यासाठी काहीच वाट नव्हती. प्यायला काहीतरी कसं मिळवायचं, या विचाराने त्यांच्या जीवाची काहिली झाली होती आणि ते भयग्रस्त झाले होते, असं ते सांगतात.
"तोवर मला अगदीच आजारी असल्यासारखं वाटायला लागलं," ते म्हणतात, "मला एकदम गरम वाटत होतं आणि माझ्या शरीराचं तापमान अविश्वसनीय वाटेल इतकं वाढलं."
युनायटेड किंगडममधील श्रॉपशायर इथे निसर्गमोहिमांचे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्यापैकी बहुतांश लोक जी वस्तू गृहित धरून चालत असतात तिच्याविना आपण कुठे अडकून पडलो तर काय होईल, याचा अनुभव पॉवेल यांना सहन करावा लागला.
बहुतांश विकसित देशांमध्ये स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी केवळ नळाची तोटी फिरवावी लागते. या भागांमधील लोक दररोज दात घासताना, शॉवरखाली आंघोळ करताना, टॉयलेटमध्ये फ्लश सोडताना विचारही न करता कित्येक लीटर पाणी गटारांमध्ये ओतत असतात. पण जगभरातील सुमारे १.१ अब्ज लोकांना सुरक्षित पिण्याचं पाणीही उपलब्ध होत नाही, आणि एकूण 2.7 अब्ज लोकांना वर्षाकाठी किमान एक महिना पाणी मिळणं अवघड जातं.
पाणी हा पृथ्वीवरील जीवनासाठी एक मूलभूत महत्त्वाचा घटक आहे आणि आपली शरीरंही मुख्यत्वे त्यानेच बनलेली असतात. आपल्याला पाण्याविना जगायची सक्ती होते, तेव्हा परिस्थिती अत्यंत वेगाने बिघडत जाते.
झाम्बेझी नदीच्या काठाने एकट्याने मोहिमेवर गेलेलं असताना पॉवेल यांनी हा अनुभव घेतला. या नदीचा उगम झाम्बियामध्ये होतो, तिथून त्यांनी चालायला सुरुवात केली. पूर्व अंगोल्यामधून जाऊन नामिबिया आणि बोट्सवानाच्या सीमांवरून जात ते झाम्बिया आणि झिम्बाब्वेच्या सीमेवर व्हिक्टोरिया धबधब्यांनंतरच्या दरीपाशी पोहोचले होते. इथला भूभाग पार करणं खूप जास्त अवघड होतं.
"इथल्या दऱ्या खूप खोल आहेत, सुमारे 150 मैलांपर्यंत कड्यांमधून जावं लागतं," असं पॉवेल सांगतात. ऑगस्ट 2016 मधील ही गोष्ट आहे, तो वर्षातील सर्वांत उष्ण काळ होता, दिवसाच्या वेळात तापमान 50 अंशांपर्यंत जात होतं. त्या वेळी पॉवेल 38 वर्षांचे होते. जवळपास 90 टक्के काळ पाण्याखाली असणाऱ्या बरोस्ते पूरप्रदेश टाळण्यासाठी त्यांना याच दिवसांमध्ये ही मोहीम करणं शक्य होतं.

फोटो स्रोत, Chaz Powell
त्यांचा हा प्रवास सुरळीत सुरू होता, रोज ते जवळपास 20 मैल (36किलोमीटर) चालून जात होते. पण एकदा दरीच्या भागात असताना पॉवेल यांचा वेग चांगल्यापैकी मंदावला. "मी बहुधा ताशी दोनेक मैल वेगाने चालत असेन, खडकांवरून पलीकडे गेल्यावर माझा वेग मंदावला," असं ते सांगतात.
इतक्या कमी वेगाने गेलं, तर दरीपलीकडे जायला एक महिना लागेल, असा अंदाज पॉवेल यांनी बांधला. कित्येक मैल आसपास कोणीच लोक नव्हते, आणि त्यांच्याकडचं अन्नही संपत आलं होतं. "काही माकडं दगड टाकत होती आणि प्रचंड प्रवाह दरीतून वाहत होता, एवढंच मला दिसलं," ते सांगतात.
दरी ओलांडायची वाट शोधण्यात दोन आठवडे घालवल्यावर पॉवेल यांनी दुसरा रस्ता शोधण्याचा निर्णय घेतला. झाम्बेझीमध्ये येऊन मिळणारी आणखी एक बऱ्यापैकी मोठी नदी असल्याचं त्यांना नकाशावर दिसत होतं. "या दुसऱ्या नदीपर्यंत जाण्यासाठी सुमारे 20 किलोमीटर (12मैल) चालावं लागणार होतं, मग वर जाता येईल, असा मी विचार केला," ते म्हणतात.
"त्या ठिकाणी जमिनीच्या वरच्या बाजूला कसं असेल ते मला माहीत नव्हतं. वेगाने चाललं तर बहुधा चार तास लागतील, आणि तेवढं मला करता येईल, असा माझा अंदाज होता."
पहाटे चारला निघून पॉवेल दरीतून दोन लीटर पाण्याच्या बाटल्या भरून वरच्या बाजूला आले. थेट झाम्बेझी नदीचं पाणी पिण्याची त्यांना सवय झाली होती, त्यामुळे याहून जास्त पाणी घ्यायची गरज नाही, असं त्यांना वाटलं. त्यांनी चालायला सुरुवात केली तेव्हा 48 अंश सेल्सियस इतकं तापमान झालेलं होतं आणि तीन तासांनी ते दरीतून बाहेर पडले. दरीचा चढ सुमारे 750 मीटर ते एक किलोमीटर होता, असा त्यांचा अंदाज आहे. या वेळी त्यांच्याकडची पाण्याची एकच बाटली उरली होती. पण माथ्यावर पोचल्यावर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच चित्र होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"माथ्यावरची जमीन अगदी सपाट असेल आणि चालायला सोपं जाईल, असं माझ्या मनात होतं, पण इथे सगळीकडे काटे वाढलेले होते आणि अनेक लहान टेकड्यांची रांगच खाली दलीकडे जात होती," असं पॉवेल सांगतात. तीन तास गोलगोल फिरून वाट शोधल्यावर पॉवेल यांच्याकडचं सगळं पाणी संपून गेलं.
"मी बहुधा साधारण दोन किलोमीटर चाललो असेन," ते सांगतात. "पण मी खुद्द दरीतूनही बाहेर पडलेलो नसल्याचं माझ्या लक्षात आलं, त्यामुळे प्रयत्नपूर्वक पुन्हा खाली जायचं मी ठरवलं." पण ते जिथून वर आले त्या ठिकाणी आता नव्हते, ते कड्याच्या टोकावर पोचलेले होते. त्यांना खाली खूप दूर दरीमध्ये नदी दिसत होती, पण तिथे जाण्याचा काही मार्ग दिसत नव्हता.
मानवी शरीरामध्ये सरासरी सुमारे 60-70 टक्के पाणी असतं, हे प्रमुख मुख्यत्वे आपल्या वयावर अवलंबून आहे. लघवी, घाम, विष्ठा आणि श्वास यांद्वारे आपल्या शरीरातून पाणी बाहेर जातं, त्यामुळे पिऊन आणि खाऊन (आपल्या शरीरातलं सुमारे एक तृतीयांश पाणी अन्नातून येतं) आपल्याला सतत नवीन पाणी शरीरात आणावं लागतं. हे केलं नाही, तर आपलं शरीर शुष्क होत जातं.
शुष्कतेची पहिली पायरी म्हणजे तहान. शरीराचं 2 टक्के वजन कमी झाल्यावर तहान लागते. "तहान लागल्यावर आपलं शरीर उर्वरित सर्व ओलावा पकडून ठेवतं," असं गॅस्ट्रोइन्टेस्टायनल शस्त्रक्रियेचे प्राध्यापक दिलीप लोबो सांगतात.
द्रव्यं आणि विद्युत अपघटनी यांच्यातील समतोलावर ते संशोधन करत आहेत. "आपली मूत्रपिंडं मूत्राशयाकडे कमी पाणी पाठवतात, त्यामुळे लघवी गडद होते. घाम कमी बाहेर पडल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं. रक्त अधिक घट्ट आणि संथ होतं. ऑक्सिजनची पातळी टिकवण्यासाठी हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढतो."

फोटो स्रोत, Alamy
शुष्कता किती प्रमाणात होईल हे शरीर कोणत्या टोकाच्या परिस्थितीत आहे त्यावर अवलंबून असतं. पण 50 अंश सेल्सियस तापमानात पाणी नसणं, सोबतच आत्यंतिक शारीरिक हालचाल, यांमुळे निर्माण होणारी शुष्कता प्राणघातक ठरू शकते.
"किती उष्णता सहन करता येईल याची काहीएक कमाल मर्यादा मानवांमध्ये असते. त्यानंतर उष्णता झाल्यास ताण येतो आणि मृत्यूही होण्याची शक्यता असते," लोबो सांगतात. "आत्यंतिक थंडीच्या दिवसांमध्ये मृत्यूदर वाढतो, पण आत्यंतिक उष्णतेच्या काळात त्याहून अधिक वेगाने मृत्यूदर वाढतो."
उष्ण वातावरणात व्यायम करताना मानवी शरीरातील सुमारे 1.5 ते 3 लीटर पाणी दर तासाला घामावाटे बाहेर पडतं. आसपासच्या हवेतील आर्द्रतेनुसार उच्छ्वासाद्वारे आणखी 200 ते 1,500 मिलिलीटर पाणी बाहेर पडतं.
याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम मूलगामी असतो. अगदी माफक शुष्कता आली तरी आपल्याला जास्त थकल्यासारखं वाटू लागतं आणि शारीरिक हालचाल कमी करावीशी वाटते. आपण अधिक पाणी गमावत असल्यामुळे घामावाटे शरीर थंड होण्याची क्षमताही कमी होते, त्यामुळे अतिउष्णतेचा धोका वाढतो.
आत येणाऱ्या पाण्यापेक्षा शरीरातून बाहेर पडणारं पाणी जास्त झाल्यामुळे, आपलं रक्त घट्ट होतं आणि अधिक संप्लृक्त होऊ लागतं, म्हणजे हदयवाहिकासंस्थेला रक्तदाब योग्य पातळीवर ठेवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात.

फोटो स्रोत, Alamy
लघवी कमी करून अधिक पाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपली मूत्रपिंडं करतात. आपल्या पेशींमधूनही रक्तप्रवाहामध्ये पाणी जातं, त्यामुळे पेशींचा आकार आकुंचन पावतो. आपल्या शरीराचं वजन पाण्याच्या अभावाने 4 टक्क्यांनी कमी होतं, तेव्हा आपला रक्तदाब खालावतो आणि शुद्ध हरपते.
शरीराचं 7 टक्के वजन कमी झाल्यावर अवयव निकामी व्हायला सुरुवात होते. "रक्तदाब टिकवणं शरीराला अवघड जातं," लोबो सांगतात.
"जीव टिकवण्यासाठी शरीर मूत्रपिंड आणि आंत्र यांसारख्या कमी महत्त्वाच्या अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह संथ करतं, त्यातून अवयव निकामी होऊ लागतात. मूत्रपिंडं आपल्या रक्ताची चाळणी करत नसल्यामुळे पेशींमध्ये लवकर कचरा निर्माण होतो. आपण अक्षरशः पाण्याच्या पेल्याअभावी मृत्यूच्या दिशेने जाऊ लागतो."
पण काही लोक अशा आत्यंतिक शुष्कतेमध्येही तग धरू शकतात, इतकंच नव्हे तर त्यांचं कामही उच्च पातळीवरून सुरू राहू शकतं. दीर्घ पल्ल्याचे धावपटू आणि प्रशिक्षक आल्बर्तो सालाझआर यांनी 1984मधील लॉस एन्जेलीस इथे ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये धावताना प्रति तास अंदाजे 3.06 लीटर पाणी घामाद्वारे गमावलं होतं आणि त्यांच्या शरीराचं वजन 8 टक्क्यांनी खाली आलं. परंतु, मॅरेथॉन संपल्यावर सालाझार यांना लगेच पाणी शरीरात घेणं शक्य होतं आणि त्यांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा चमू होता.
परंतु, पाण्याच्या स्त्रोताकडे जाण्याचा काहीच मार्ग नसल्याने पॉवेल यांनी मदत मागण्याचं ठरवलं. त्यांनी स्वतःकडील एसओएस फोन सुरू केला, हा फोन अमेरिकास्थित एका कंपनीच्या सेवेशी जोडलेला होता. त्यांचा फोन लागला, पण त्या भागात मदत करायला कोणीच उपलब्ध नसल्याचं कंपनीकडून त्यांना कळलं. आता ते भयाच्या गर्तेत जायला लागले.

फोटो स्रोत, Chaz Powell
पॉवेल यांनी कोरड्या मातीमध्ये खड्डा खणून थंड राहायचा प्रयत्न केला आणि स्वतःचीच लघवी ते प्यायले, त्यासोबत ओलाव्यासाठीची पुडीही वापरली.
सुदृढ प्रौढ व्यक्तीच्याबाबतीत लघवी म्हणजे 95 टक्के पाणी असतं आणि बाकीचा मूडपिंडांकडून टाकलेलं लवण आणि आमोद यांसारखा कचरा असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये शुष्कता आलेली असते तेव्हा पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं, त्यामुळे लघवी पिणं म्हणजे समुद्राचं पाणी पिण्यासारखंच वाटतं.
"पुन्हा पाणी मिळवण्यासाठी लघवी पिणं थोड्या काळापुरतं सुरक्षित असतं, पण शुष्कतेला शरीराचा प्रतिसाद लवण ऐण् पाणी जतन करून ठेवणं हाच असतो," असं लोबो सांगतात.
"लघवीचं प्रमाण कमी होतं, आणि अखेरीस माणसाच्या मूत्रपिंडाला गंभीर इजा होऊ शकते आणि अमूत्रताही येते (मूत्रपिंड लघवी निर्माण करत नाहीत). त्यामुळे मध्यम कालावधीच्या बाबतीत लघवीचं प्रमाण पाणी टिकवून ठेवण्यासाठी पुरेसं नसतं."
आवश्यक प्रमाणात मुबलक पाणी न वापरता पुनर्जलीकरणासाठीची लवणं खाल्ल्याने पॉवेल यांना लवण आणि साखर यांचं प्रमाण टिकवायला मदत झाली, पण त्यांच्या शरीरात आणखी नकारात्मक असमतोल निर्माण होण्याच धोका त्यातून तयार झाला. लवण पातळीबाबत आत्यंतिक असमतोल निर्माण झाला, तर झटके येऊ शकतात आणि मेंदूत रक्तस्त्रावही होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्या खड्ड्यात पॉवेल थंड होत होते, पण त्यांची शुष्कताही वाढत होती. 'वॉकिंग द नाईल' नावाचा एक माहितीपट पाहिल्याचं त्यांना आठवलं, त्यात प्रवासविषयक लेखक मॅट पॉवर यांना नाईलच्या काठावरून चालत जाताना उष्माघाताचा झटका आला.
"खूप लवकर ते घडल्याचं मला आठवत होतं," पॉवेल सांगतात. "त्यामुळे माझं शरीर उष्ण पडत असल्याचं मला जाणवत होतं, म्हणजे मलाही तसंच होतंय, मी आजारी पडतोय, असे विचार मनात येत होते."
अखेरीस एसओएसकडून पॉवेल यांना कळवण्यात आलं की, त्यांच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर पाठवणं शक्य होतंय, पण त्यासाठी चार तास लागतील. "चार तासात मी मेलेला असेन," असा विचार त्या वेळी मनात आल्याचं ते सांगतात.
"अखेरीस इथे नुसतं बसून मरण्यापेक्षा कड्यावरून उडी मारून मरावं, असंही मला वाटलं." त्यांनी कड्याचं निरीक्षण केलं आणि तिथून बाहेर आलेली काही झाडांची मुळं त्यांना दिसली. या मुळांना पकडून खाली जाण्याचा प्रयत्न करायचा, असं त्यांनी ठरवलं, पण या खटपटीत ते 15 फूट खाली पडले आणि त्यांचं नाक फुटलं.
मुळं धरून खाली उतरायचा प्रयत्न करायचा, हा त्यांचा निर्णयही अंशतः शुष्कतेमुळे घेतलेला असू शकतो. शुष्कता आणखी खालावत गेल्यावर आपल्या मेंदूच्या कामकाजावर परिणाम होतो, आपली मनस्थिती बिघडते, आणि स्पष्ट विचार करण्याची क्षमताही मंदावते.
आपल्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि खुद्द मेंदूचं घनफळही कमी होतं. सौम्य ते मध्यम पातळीवरची शुष्कता- शरीरातील 2 टक्के किंवा अधिक पाणी कमी होणं- आपल्या अल्पकालीन स्मृतीला, आपल्या सजगतेला, गणिती क्षमतेला आणि संयोजन कौशल्यांना बाधा पोचवू शकते- विशेषतः उष्ण वातावरणात ताण येणारं काम करताना हे दिसून येतं. काही अभ्यासांमध्ये, विशेषतः वृद्ध रुग्णांसंदर्भातील अभ्यासांमध्ये असं आढळून आलं आहे की, शुष्कतेमुळे चित्तभ्रम निर्माण होतो.

फोटो स्रोत, BBC/Niranjan Chhanwal
अॅड्रिनलिन आणि जगण्याची इच्छा यांमुळे पॉवेल तग धरून खाली उतरत राहिले, कड्यावर जे काही दिसेल ते त्यांनी पकडलं. ते खडकांच्या रांगेपाशी पोचले तेव्हा त्यांची शुद्ध हरपली आणि थोडा वेळ डोळ्यांसमोर अंधार पसरला, मग थोड्या वेळाने पुन्हा ते शुद्धीवर आले.
"माझे हात रक्ताळलेले होते, माझा चेहरा रक्ताने खलेला होता, माझ्या पायांवर जखमा झालेल्या होत्या," ते सांगतात.
तरीही पॉवेल यांनी स्वतःला कड्यावरून खाली न्यायचा प्रयत्न सुरूच ठेवला. जवळपास एका तासाने ते नदीपाशी पोचले. तिथे त्यांना तासभर बसून राहावं लागलं, शरीर त्यांनी थंड केलं आणि पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी सॅटेलाइट फोनवरून त्यांची सुटका करायला येणाऱ्यांशी संपर्क साधला आणि आता ते ठीक असल्याचं कळवलं.
"पाण्याचा पुरवठा आणि सावली शोधल्यामुळे ते वाचले," असं नतालिआ कूक्सन सांगतात. लंडनमध्ये त्या आपातकालीन वैद्यकीय उपाचारांसंबंधीच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. "सावलीत राहिल्याने शरीराचं तापमान कमी झालं, त्यामुळे शुष्कतेची प्रक्रिया मंदावली."
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अखेरीस पॉवेल पाण्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे त्यांच्या शरीराने गमावलेलं द्रव्य परत मिळवता आलं. "शुष्कतेची प्रक्रिया उलटी फिरवता येते, त्यासाठी शरीरातील पाणी वाढवावं लागतं, मग माणूस पुन्हा पूर्ववत होतो," असं कूक्सन सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Niranjan Chhanwal
पॉवेलना पुन्हा पाणी पिता आलं नसतं, तर त्यांची मूत्रपिंडं निकामी झाली असती. मूत्रपिंडांमधून पुरेसा पाणीपुरवठा न गेल्यामुळे विष निर्माण होऊ शकतं, त्यामुळे मूत्रपिंडांचं कामकाज बिघडतं. यातून मूत्रपिंडाला बाधा पोचते, त्याला तीव्र नलिकाकार विकार असंही म्हणतात. अशा वेळी शरीरात पुन्हा पाणी आलं तरी बरं होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.
त्यांच्या हृदयावर जास्तीचा ताण आल्यामुळे हृदयाचे ठोकेही अनियमित होण्याची शक्यता असते, रक्तदाब खालावतो आणि झटकाही येऊ शकतो. शुष्कतेमुळे हृदयवाहिकासंस्थेचे रक्तवाहिन्यांसारखे काही महत्त्वाचे भाग घट्ट होऊ लागतात, त्यातून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
उष्ण हवामानात पाणी कमी झाल्याने ही समस्या आणखी गंभीर होते.
"या उष्णतेचे नियमन करणं शरीरा अशक्य होतं, त्यामुळे सर्वसाधारण चयापचयी मार्गांमधील कळीचे विकर नष्ट होतात, परिणामी मेंदू, हृदय आणि फुफ्फुसं यांसारख्या अवयवांचं काम बंद पडतं," असं कूक्सन सांगतात. अखेरीस यातून झटका, कोमा आणि शेवटी मृत्यू इत्यादी शक्यता संभवतात.
पाण्याविना नक्की किती काळ जिवंत राहता येतं, यावर अजूनही एकवाक्यता नाही. कोणतंही अन्न किंवा पाणी ग्रहण न करता माणसं केवळ काही दिवस जगू शकतात, यांवर बहुतांश वैज्ञानिकांची सहमती आहे.
1944 साली दोन वैज्ञानिकांनी पाणी पिणं थांबवलं- एकाने तीन दिवस आणि एकाने चार दिवस, पण ते केवळ सुकं अन्न खात होते. त्यांच्या प्रयोगाच्या अखेरच्या दिवशी त्यांना गिळताना त्रास व्हायला लागला, त्यांचे चेहरे काहीसे "सुरकुतल्यासारखे आणि रोडावल्यासारखे झाले", पण शरीराची अवस्था धोकादायक पातळीइतकी खालावायच्या आधी त्यांनी प्रयोग थांबवला.
पाण्याविना जगण्याची क्षमता व्यक्तिगणिक टोकाची बदलू शकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नियमितपणे किती पाणी पिते, त्या पातळीशी मानवी शरीर जुळवून घेऊ शकतं, असं पुरावा सांगतो.
ऑस्ट्रेलियातील 18 वर्षीय वीटकामगार अँद्रेस मिहावेझ याला 1979 साली 18 दिवसांसाठी पोलीस कोठडीत डांबण्यात आलं होतं, आणि तो आत असल्याचं कोठडीचे अधिकारी विसरूनच गेले होते. कोणत्याही माणसाने पाण्याविना सर्वाधिक काळ तग धरल्याची ही ज्ञात घटना आहे. त्यांचं नाव 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्येही नोंदवलं गेलं.
इतक्या टोकाच्या शुष्कतेचा अनुभव आपल्यापैकी फारच थोड्या लोकांना येण्याची शक्यता आहे, पण जगातील सुमारे चार अब्ज लोकांना वर्षाकाठी किमान एक महिना पाण्याचं तीव्र दुर्भिक्ष्य अनुभवावं लागतं. हवामानबदलामुळेही जगातील अनेक भागांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा अवघड होणार आहे. काही अंदाजांनुसार 2025 सालापर्यंत जगातील जवळपास दोन तृतियांश लोकसंख्येला पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवेल.
पॉवेल यांच्याबाबतीत कठोर उष्णतेमध्ये 10 तास पाण्याविना काढण्याची वेळ आली. ते नशिबवान होते. लिव्हिंगस्टोनला परतल्यानंतर त्यांनी एक आठवडा विश्रांती घेतली, त्यानंतर वेगळ्या मार्गाने त्यांना त्यांचा प्रवास पुन्हा सुरू करणं शक्य झालं. त्यांनी 137 दिवसांमध्ये ही मार्गक्रमणा केली. त्यांचा अनुभव म्हणजे संयम कसा राखावा याचा धडा देणारा होता, पण त्याचसोबत पाणी किती महत्त्वाचं असतं याचाही धडा त्यांना यातून मिळाला.
"आता मी पाण्याची उपलब्धतात गृहित धरत नाही," असं ते म्हणतात.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









