मुंबईत पाणीकपात: शहरात पाऊस पण पाणीकपातीची टांगती तलवार

मुंबई पाणीकपात

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

ऐन पावसाळ्यात मुंबई शहरावर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. एकीकडे मुंबईत पाऊस पडत आहे तर दुसरीकडे पाणी कपातीचं संकट मुंबईकरांसमोर आहे. पाच ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात होणार असल्याचं मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि मुंबईकरांना पाणी जपून वापरा असं आवाहनही केलं होतं.

आता तुम्ही म्हणाल की, मुंबईत तर इतका पाऊस पडतो, की शहरात पाणी तुंबून राहतं. मग त्याच मुंबईवर पाणीटंचाईचं संकट कसं ओढवलं? त्याचं कारण, म्हणजे मुंबई शहरात जरी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पण मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ज्या भागात आहेत, तिकडे म्हणजे मुंबईच्या साधारण उत्तरेला ठाणे जिल्ह्यात तुलनेनं पाऊस यंदा कमी पडला आहे.

पालघर, रायगडमध्येही हीच स्थिती आहे. ज्या भागात जुलैमध्ये दिवस-दिवस पाऊस थांबतच नाही, त्याच भागात यंदा असं चित्र आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं यंदा या जिल्ह्यांमधील अनेक लहान-मोठी धरणं अजून भरलेली नाहीत.

यातल्याच काही धरणांमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे केवळ मुंबईच नाही, तर या परिसरातल्या सर्वच शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो.

मुंबईत पाणीकपातीची वेळ का ओढवली?

मुंबईचा विचार केल्यास या शहराला पाणी पुरवणारी सात मुख्य धरणं आहेत. त्यातले दोन तलाव म्हणजे विहार आणि तुलसी मुंबईच्या हद्दीत आहेत. तर ठाणे जिल्ह्यातली भातसा आणि तानसा तसंच वैतरणा नदीवरील मोडकसागर, मध्य वैतरणा आणि नाशिकमधील अप्पर वैतरणा या धरणांतूनही मुंबईत पाणी येतं.

गेल्या वर्षी जुलै अखेर यातली बहुतेक धरणं 90 ते 99 टक्के भरलेली होती. म्हणजे गेल्या वर्षी या धरणांमध्ये साधारण 85 टक्के उपयुक्त साठा होता.

यंदा मात्र 31 जुलैला केवळ 34.49% उपयुक्त साठा शिल्लक होता. या सात तलावांपैकी केवळ एकच म्हणजे सर्वात लहान असलेला तुलसी तलावच यंदा पूर्णपणे भरला आहे. बाकी सहा तलावांत त्यांच्या क्षमतेपेक्षा बराच कमी पाणीसाठा आहे. म्हणजे पाऊस अजिबातच आला नाही, पाणी कपात केली नाही, तर मुंबईचं पाणी साधारण 130 दिवसांत संपेल.

धरण

फोटो स्रोत, Getty Images

आता मुंबईला किती पाणी लागतं? याचा नेमका आकडा सांगता येणार नाही, कारण काही ठिकाणी भूजलाचा, विहिरींचा वापरही केला जातो. तर पवईतल्या या तलावांसारखे पाण्याचे स्रोत औद्योगिक कारणांसाठी वापरले जातात.

पिण्यायोग्य पाण्याचा विचार केला, तर दरदिवशी मुंबई महापालिका त्यांच्या आखत्यारीतील क्षेत्रात दररोज 3,800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा करते.

यात जवळपास 48 टक्के पाणी हे भातसा धरणातून येतं. भातसा धरणाची क्षमता 976.1 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. पण एक ऑगस्टच्या आकडेवारी नुसार भातसा धरणात 537.74 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. म्हणजे भातसा धरणात यंदा साधारण 53.47% टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण 89.15% एवढं भरलं होतं.

म्हणजे सध्या या धरणांमध्ये जेवढं पाणी आहे, ते पुढचं अर्ध वर्षही पुरणार नाही. म्हणूनच मुंबई महापालिकेनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लोकांना पाणी वाचवण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत.

पाणी जपून वापरा, महापालिकेच्या सूचना

  • पाणी पिण्‍यासाठी लहान आकाराचे पेले वापरा.
  • दाढी करताना, दात घासताना पाण्‍याचा नळ बंद ठेवा.
  • आंघोळ करताना शॉवर सतत सुरु ठेवू नका.
  • नळाखाली बादली भरत ठेवून पाणी वाहू देऊ नका.
  • घरातील इतर कामे करत असताना नळ बंद ठेवा.
  • वाहत्‍या नळाखाली कपडे-भांडी धुऊ नका.
  • गळके नळ, जलवाहिन्‍या त्‍वरित दुरुस्‍त करुन घ्‍या.
पाणी कपात

फोटो स्रोत, Getty Images

  • आदल्‍या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकू नका.
  • गॅलरी, व्‍हरांडा व लादी धुण्‍याऐवजी ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या.
  • वाहने न धुता ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या.
  • पाण्‍याच्‍या टाक्‍या वाहू देऊ नका. त्‍यांना बॉलकॉक बसवा.
  • पावसाचं पाणी साठवा आणि वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर करा.
  • झाडांसाठी गरजेपेक्षा जास्‍त पाण्‍याचा वापर करु नका.

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, अजून पावसाळा संपलेला नाही. ऑगस्ट महिन्यात कोकण परिसरात विशेषतः उत्तर कोकणात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण भर पावसात पाणीकपातीची टांगती तलवार पाहता, पाणी जपून वापरलेलंच बरं. आणि ही सूचना मुंबईसारखीच महानगर क्षेत्रातल्या बाकीच्या शहरांनाही लागू पडते.

मुंबईतील तलावांतील उपयुक्त पाणीसाठा

4 ऑगस्ट 2020, सकाळी सहाची स्थिती

तलाव - उपयुक्त पाणीसाठा (2020 आणि 2019)

  • तुलसी - 100% (गेल्या वर्षी याच दिवशी 100%)
  • विहार - 79.41% (गेल्या वर्षी याच दिवशी 100%)
  • भातसा - 39.29% (गेल्या वर्षी याच दिवशी 88.32%)
  • तानसा - 25.17% (गेल्या वर्षी याच दिवशी 100%)
  • मोडक सागर - 38.34 % (गेल्या वर्षी याच दिवशी 100%)
  • मध्य वैतरणा - 35.24% (गेल्या वर्षी याच दिवशी 92.53%)
  • अप्पर वैतरणा - 17.62% (गेल्या वर्षी याच दिवशी 89.76%)

एकूण - 34.95 % (गेल्या वर्षी याच दिवशी 91.61%)

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उपयुक्त पाणीसाठी अत्यंत कमी असल्याचं ही आकडेवारी सांगते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)