You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरडा ब्रेड आणि पिण्यासाठी टॉयलेटमधील नळाचे पाणी; सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचे हाल
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात सुरू असलेल्या हिंसक संघर्षात आतापर्यंत शंभरहून अधिक भारतीय अडकले असल्याचं अनुमान आहे. हे सगळेजण हॉटेलच्या खोल्यांमध्ये तसंच घरांमध्ये दैनंदिन गोष्टींच्या टंचाईने त्रस्त आहेत.
यापैकी कर्नाटकच्या काही लोकांशी बीबीसीने संवाद साधला. त्यांच्याशी बोलत असताना मागे गोळीबाराचे आवाज ऐकू आले.
गोळीबार फक्त सुदानची राजधानी खार्तूमपुरता मर्यादित नाही तर राजधानीपासून दूर अल फशीर शहरातही असाच संघर्ष सुरू आहे.
बुधवारी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुदान लष्कर आणि निमलष्करी दळ ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ यांच्यात 24 तास संघर्षविरामाची घोषणा करण्यात आली.
खार्तूममधल्या लढाईचा हा सहावा दिवस आहे. आतापर्यंत हिंसाचारात दोनशे लोकांचा मृत्यू झाला आहे. माणसं शहरं सोडून पळून जात आहेत.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार सुदानमध्ये 181 भारतीय नागरिक अडकले आहेत.
सुदानमध्ये सत्तेच्या हस्तांतरणाची मागणी 2021 पासूनच होत आहे. मुख्य वाद लष्कर आणि निमलष्करी दल आरएसएफ यांच्या विलीनीकरणाचा आहे.
ताज्या हिंसाचारानंतर अनेक दिवस प्रमुख शहरांमध्ये तणावाचं वातावरण होतं. आरएसएफच्या तुकडीचा धोका लक्षात घेऊन लष्कराने अतिरिक्त कुमक तैनात केली होती.
ऑक्टोबर 2021 नंतर नागरिक आणि लष्कर यांच्या संयुक्त सरकारच्या खांदेपालटानंतर लष्कर आणि अर्धसैनिक दल आमनेसामने आहेत.
सुदानच्या हवाई दलाने 60 लाख लोकसंख्येच्या खार्तूम शहरावर हल्ले केले. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची शक्यता आहे.
टॉयलेटमधील नळाचे पाणी पिण्याची आली वेळ
कर्नाटकमधल्या मांड्या जिल्ह्यातील नागमंगलाचे रहिवासी संजू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “आम्ही हॉटेलात राहत आहोत. संघर्ष सुरू झाल्यापासून कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधून पलायन केलं आहे. हॉटेलात शिल्लक राहिलेले ब्रेडचे तुकडे आणि टॉयलेटच्या नळाला येणाऱ्या पाण्यावर जगत आहोत. एका खोलीत आम्ही दहाजण राहत आहोत.
अल-फशीर मध्ये अडकलेल्या प्रभू एस यांनी सांगितलं, “इथली परिस्थिती भयंकर आहे. चित्रपटात जसा गोळीबार आपण पाहतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गोळीबार आम्ही पाहत आहोत. आम्ही इथे 31 लोक आहोत. एक दुकान उघडलं. तिथे आम्हाला थोडे तांदूळ आणि पाणी मिळालं”.
कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यातील चन्नागिरी इथे राहणारे प्रभू यांनी सांगितलं, “तीव्र स्वरूपाचा गोळीबार प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी होतो. तो रात्रीपर्यंत सुरू राहतो. दुपारी तुलनेनं शांत असतं”.
संजू यांनी तिथे सुरू असलेल्या वीजटंचाईबद्दलही सांगितलं. “तुम्हाला मी बोलत असताना मागे गोळीबाराचे आवाज ऐकू येतील. अनेक तास हेच सुरू आहे.”
बाजूच्या पाच मजली हॉटेलात 98 लोक आहेत. आम्ही भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. आम्हाला बाहेर जायला मनाई आहे. किती दिवस खाण्यापिण्यावाचून काढू शकतो? असा सवाल त्यांनी केला.
संजू आणि त्यांची पत्नी 18 एप्रिलला भारतात येणार होते. पण त्याच्याआधी तीन दिवस उड्डाणं बंद करण्यात आली.
कर्नाटकातल्या शिवमोगा इंजिनियर कुमुदा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “काही ठिकाणी सुदानच्या लोकांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. मी दोन दिवसांपूर्वी माझ्या मुलीशी आणि जावयांशी बोललो. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.”
कर्नाटकातील लोक तिथे कसे पोहोचले?
कर्नाटकातील हक्कीपिक्की (आदिवासी) समाजाची बहुतांश माणसं हर्बल आणि आयुर्वेदिक अर्क स्थानिकांना विकण्यासाठी सुदानला जातात.
यापैकी काहींचा वापर गॅस्ट्रोसारखा आजार तसंच डोकेदुखी कमी करण्यासाठी केला जातो. केसांना लावलं जाणारं तेलही विकलं जातं. हे तेल लावलं तर केसगळती कमी होऊन थांबते.
प्रभू यांनी सांगितलं, “आम्ही या तेलांचा आणि अर्काचा वापर मालिशसाठीही करतो. प्रभू यांनी आपली उत्पादनांच्या विपणनासाठी भारतातल्या अनेक राज्यांचा दौरा केला आहे. त्यांची उत्पादनं औषधी वनस्पतींवर आधारित आहेत.”
शिवमोगाजवळच्या हक्कीपिक्की समाजातील 33 वर्षीय शिक्षक रघुवीर सांगतात, “मी इथे येऊन पाच-सहा महिने राहतो आणि पैसे कमावून परत जातो.”
ते पुढे सांगतात, “त्यांची बहीण आणि भावोजींनी पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि पाच नातेवाईकांसह सुदानला रवाना झाले. त्यांनी आपल्या मुलांना सासूबरोबर इथेच ठेवलं होतं. मी त्याआधी 10 दिवस त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांचा पाय मोडला होता. त्यानंतर त्यांच्याशी बोलणं कठीण झालं.”
म्हैसूर विद्यालयातील सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल एक्सक्लूजन अँड इन्क्लूसिव्ह पॉलिसीचे उपसंचालक डॉ. डीसी ननजुंदा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, “महिला तेल तयार करण्यात आपल्या पतीला मदत करतात. आजाराने पीडित लोकांना तेलाने मालिश करण्यातही या महिला मदत करतात."
हक्कीपिक्की ही एक आदिवासी जमात आहे. 2011 जनगणनेनुसार या जमातीची लोकसंख्या 11,892 एवढी आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात या जमातीची माणसं आहेत.
हक्कीपिक्की या शब्दाचा अर्थ आहे पक्ष्यांचे शिकारी. 1970च्या दशकात पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर या जमातीची माणसं वनस्पतींपासून औषधी उत्पादनं बनवण्यात अग्रेसर आहेत. ही उत्पादनं देशात आणि विदेशात विकली जातात.
डॉ. ननजुंदा सांगतात, “मी उत्पादनं विकण्यासाठी सिंगापूर आणि मलेशियाला जातो. संशोधनादरम्यान आमच्या लक्षात आलं की जमातीच्या बहुतांश लोकांकडे पासपोर्ट आहे. ते सगळे आपल्या कुटुंबीयांना घेऊन विदेशात भ्रमंती करतात. हा समाज बागडी नावाची भाषा बोलतो. गुजराती भाषेशी या भाषेचं साधर्म्य आढळतं”.
संजू सांगतात, “भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केला. इमारतीतून बाहेर पडण्यास त्यांनी मनाई केली आहे. आम्ही केवळ प्रतीक्षा करत आहोत”.
कर्नाटक राज्य आपात्कालीन नियंत्रण विभागानेही त्यांना घरातच राहण्याची सूचना केली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अल-फशीर इथे अडकलेल्या लोकांशी संपर्क केलेला नाही.
काँग्रेस नेता सिद्धरामय्या यांनी ट्वीट करुन पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्रालय आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना याप्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षितपणे परततील यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असं त्यांनी म्हटलं आहे.
ट्वीटवर परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “तुमच्या ट्वीटने अवाक झालो. सुदानमधल्या नागरिकांचे जीव पणाला लागले आहेत. यामध्ये राजकारण आणू नका. 14 एप्रिलला संघर्ष सुरू झाल्यापासून सुदानमधील भारतीय दूतावास आणि तिथल्या भारतीयांशी नियमित संपर्कात आहोत.”
यावर सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे, “तुम्ही परराष्ट्र मंत्री आहात म्हणून तुमच्याकडे मदतीसाठी विनंती केली आहे. तुम्ही घाबरून गेले असाल तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा त्यांच्याशी संपर्क करू जो आपल्या माणसांना सुदानमधून सुरक्षितपणे परत आणेल.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)