100 ठार, एका भारतीयाचाही मृत्यू: सुदान का पेटलंय? 5 प्रश्न, 5 उत्तरं

    • Author, बेवर्ली ओचिएंग
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग, नायरोबी

सुदानचं लष्कर आणि निमलष्करी दल ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ म्हणजेच आरएसएफ मध्ये 24 तासांच्या संघर्षविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

हा संघर्षविराम भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार (19 एप्रिल) रात्री 9.30 वाजल्यापासून सुरू झाला.

आरएसएफने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “संघर्षविरामाचं पालन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत आणि दुसरा पक्षही नियोजित काळासाठी संघर्ष विरामाचं पालन करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

लष्कराची या विरामाला सहमती आहे की नाही, हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये.

मंगळवारी (18 एप्रिल) दोन्ही बाजूंनी 24 तासांचा संघर्षविराम पाळण्याची घोषणा झाली होती. हा विराम स्थानिक वेळेनुसार इफ्तारनंतर तातडीने सुरू होणार होता. मात्र, त्यानंतरही भीषण संघर्ष सुरूच राहिला. विशेषतः राजधानी खार्तूमच्या आसपास अधिक संघर्ष पाहायला मिळाला.

सुदानमध्ये सध्या देशाचं लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभं ठाकलेत.

सुदान ईशान्य आफ्रिकेतला एक मोठा देश. इथल्या साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येत मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण सुदान जगातल्या सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे.

राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय. या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर देशांचेही लोक तिथे अडकलेत.

एका भारतीयाचाही तिथे मृत्यू झाल्याचं भारतीय दूतावासाने सांगितलंय. तसंच केरळचा एक तरुण जगभ्रमंतीवर निघाला होता आणि नेमका सुदानमध्ये अडकला.

आफ्रिकेतला हा देश कशावरून पेटलाय? समजून घेऊ या 5 प्रश्नांच्या उत्तरांमधून.

1. सुदानमध्ये नेमका वाद काय?

राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या तीन दशकांच्या सत्तेविरोधात सुदानमध्ये आंदोलनं झाली. संधी साधून लष्कराने बंड पुकारलं आणि अखेर 2019मध्ये सत्तापालट झाला.

देशात लष्करी-नागरी असं संयुक्त सरकार झालं, ज्याचं नेतृत्व लष्करी अधिकाऱ्यांच्या एका समितीकडे होतं. या काउन्सिलमधल्या दोन प्रमुख जनरल्समधलीच ही लढाई आहे.

एकीकडे आहेत जनरल अब्देल फताह अल-बुरहान जे सुदानच्या सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत आणि काउन्सिल ऑफ जनरल्सचे अध्यक्षही. दुसरीकडे आहेत जनरल मोहम्मद हमदान डगालो, जे रॅपिड सपोर्ट फोर्सेस या निमलष्करी दलाचे प्रमुख आहेत, आणि या काउन्सिल ऑफ जनरल्सचे उपाध्यक्ष.

पण सुदानी लोकांना हे लष्करी सरकारही मान्य नव्हतं आणि त्यांनी पुन्हा लोकशाहीवादी सरकारसाठी आंदोलनं केली. परिणामी ऑक्टोबर 2021मध्ये दुसऱ्यांदा बंड झालं, त्यानंतर सुदानमध्ये नागरी शासन कसं यावं, यासाठी चर्चा सुरू झाल्या.

लोकशाही मार्गाने सत्तांतरासाठी डिसेंबरमध्ये एका आराखड्यावर सहमती झाली होती, पण अंतिम वाटाघाटीच्या चर्चा फसल्या.

मुळात या नागरी शासनावरूनही दोन्ही जनरल्समध्ये मतभेद होतेच, पण खरी ठिणगी पडली एका प्रस्तावामुळे – तो प्रस्ताव होता की एक लाख सैनिकांच्या रॅपिड सपोर्ट फोर्सचं सुदानच्या मुख्य लष्करात विलीनीकरण व्हावं. पण या विलीनीकरणानंतर या सैनिकांचं नेतृत्व कोण करणार, हा कळीचा मुद्दा बनला.

2. वादग्रस्त रॅपिड सपोर्ट फोर्सेस काय आहेत?

रॅपिड सपोर्ट फोर्सेस या निमलष्करी दलाची स्थापना 2013 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या आदेशाने झाली होती. पूर्व सुदानच्या दारफूर प्रांतात काही आफ्रिकन बंडखोर सशस्त्र गटांचा सामना करायला या दलाची स्थापना झाली होती.

पण तेव्हापासून जनरल डगालो यांनी या दलाची शक्ती वाढवून तिला लिबिया आणि येमेनमधल्या संघर्षातही ढकललंय. याशिवाय त्यांनी सुदानमधल्या काही सोन्याच्या खाणींवरही ताबा मिळवायला या निमलष्करी दलाचा वापर केला आहे.

या RSFवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा ठपका आहे – जून 2019मध्ये 120 आंदोलकांच्या हत्येचा त्यांच्यावर आरोप आहे.

तरीही हे सैन्य अस्तित्वात आहे. आणि देशाच्या प्रमुख लष्करासमोर एवढं शक्तिशाली सैन्य असणं, हेच सुदानमधल्या अशांततेचं मोठं कारण ठरलं आहे.

3. दोन्ही जनरल्सची नेमकी भूमिका काय?

या RSFचे प्रमुख जनरल डगालो म्हणतात की सुदानी लष्कर एक 'कट्टरतावादी मुस्लीम गट' आहे आणि त्यांचं रॅपिड सपोर्ट फोर्स 'लोकांच्या मागणीनुसार देशात लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.'

पण RSFचा डागाळलेला इतिहास पाहता अनेकांना जनरल डगालोंच्या या वक्तव्यावर भरवसा नाही.

दुसरीकडे सुदानच्या काउन्सिल ऑफ जनरल्सचे अध्यक्ष जनरल बुरहान. ते म्हणतात की, त्यांचा नागरी सरकारला संपूर्ण पाठिंबा असेल, पण ते सत्ता लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या व्यक्तीकडेच सुपूर्द करतील.

अनेकांना हीच भीती आहे की दोन्ही जनरल्स त्यांची पदं सोडू इच्छित नाहीत, कारण नवीन लोकशाही सरकार आलं की त्यांची शक्ती कमीच होईल.

4. आताच्या हिंसाचाराचं कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून निमलष्करी RSFचे सैनिक देशभरात तैनात केले जात होते. सुदानच्या मुख्य लष्कराला हा एक धोका वाटला. तणाव वाढला.

आधी असं वाटलं होतं की दोन्ही दलं चर्चा करून तणाव कमी करतील, पण तसं कधी झालंच नाही.

आता शनिवारी, म्हणजे 15 एप्रिलला नेमकी पहिली गोळी कुणी झाडली माहिती नाही, पण तेव्हापासून आतापर्यंत देशात 100हून जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. लोकांना पाणी, अन्न आणि औषधांसाठी संघर्ष करावा लागतोय.

Central Committee of Sudanese Doctors (CCSD) या वैद्यकीय संघटनेनुसार राजधानी खार्तूममधल्या 59 पैकी 39 रुग्णालयांमध्ये काम ठप्प झालं आहे.

5. दोन नेत्यांमधल्या संघर्षात नागरिकांचा बळी का?

ही लढाई दोन नेते आणि त्यांच्या सैन्यांमधली दिसत असली, तरीही ती होतेय बहुतांशी शहरांमध्ये, जिथे नागरिक अचानक चकमकीत सापडतायत. RSFचे सैनिक नेमके कुठे ठाण मांडून बसलेत, अद्याप स्पष्ट नाही, पण ते दाटीवाटीच्या भागांमध्ये फिरतायत, असं दिसतंय.

त्यामुळे सुदानच्या वायुदलाने राजधानी खार्तूमवर हवाई हल्ले सुरू केलेत. या शहराची लोकसंख्या 60 लाखपेक्षाही जास्त आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होतेय.

16 एप्रिलला काही काळासाठी लढाई रोखण्यात आली होती, जेणेकरून नागरिक सुरक्षितरीत्या बाहेर पडू शकतील, पण ही शांतता फार काळ टिकली नाही.

रविवारीच एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचं भारतीय दूतावासानेही स्पष्ट केलं आहे

कुठलाही सशस्त्र संघर्ष एक मोठं मानवी संकटही उभा करतो. अशात तिथल्या नागरिकांचे होणारे हाल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी बीबीसी वेळोवेळी तुमच्यापर्यंत आणत राहील. तोवर वाचत राहा, पाहात राहा बीबीसी मराठी.कॉम.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)