'लाडकी बहीण'ची रक्कम कधी वाढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

लाडक्या बहिणीची रक्कम कधी वाढणार? शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

फोटो स्रोत, Twitter/@Dev_Fadnavis

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारसमोरच्या आगामी समस्यांबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमचे रोल बदलले असले तरी सरकारची दिशा तीच राहणार आहे. आमच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकात आम्ही तिघांनीही एकत्रितपणे धोरणात्मक निर्णय घ्यायचं ठरलं आहे."

ही आता आमची टेस्ट मॅच आहे, असेही ते म्हणाले.

विरोधकांबाबत बोलताना ते म्हणाले की, "विरोधकांच्या संख्याबळानुसार आम्ही त्यांचं मूल्यमापन करणार नाही. विरोधकांनी महत्त्वाचे मुद्दे उचलले तर त्याची दखल घेऊ."

या निवडणुकीमध्ये 'लाडकी बहिण योजना' अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरल्याचं जाणकार सांगतात.

या योजनेतून मिळणारी रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "लाडकी बहीण योजना आम्ही यापुढेही सुरू ठेवणार आहोत. आगामी बजेटवेळी याबाबत विचार करू. आश्वासन पूर्ण करू पण त्यासाठी नियोजन करू."

लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसलेली काही प्रकरणं समोर आल्याचंही ते म्हणाले. निकषांच्या बाहेर कुणी असतील तर त्यांचा पुनर्विचार करू, असंही ते म्हणाले.

नव्या सरकारचा शपथविधी संपन्न

"मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..." भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी ही शपथ घेतली आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस

या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

तसेच देशभरातील बहुतांश भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख केला. राज्यपालांनी थांबवल्यानंतर त्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे अखेर महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत.

महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे यावं यासाठी एकनाथ शिंदेनी प्रयत्न केले होते. मात्र भाजपने कुठलीही तडजोड न करता राज्याचे प्रमुखपद स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं आहे.

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने कळवल्याचं बोललं गेलं. त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले आणि थेट त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले होते.

एकनाथ शिंदेंच्या तब्येतीमुळे महायुतीच्या त्यादिवशीचा बैठकाही रद्द झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी एकनाथ शिंदे मुंबईत परतले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

2019 साली 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

गेली 10 वर्षं देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे भाजपच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ज्या नव्या राजकीय रचना, डावपेच, घडामोडी या दशकभरात महाराष्ट्रात घडल्या, जे दशक राजकीय अनागोंदीसाठीही उल्लेखात राहील, त्या सगळ्यांमध्ये इतर समकालीन नेत्यांसोबत फडणवीसांचाही ठसा आहे.

2014 पर्यंत राज्यातल्या इतर नेत्यांपैकी एक असलेले फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची मुख्यमंत्रीपदाची निवड बनले आणि केंद्रस्थानी आले. दिल्लीत वाजपेयी-अडवाणींची भाजप बदलून मोदी-शाहांची नवी भाजप तयार झाला, तसा महाराष्ट्रात मुंडे-गडकरींचा भाजप नव्यानं फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा भाजप बनत गेला.

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

केवळ भाजपमध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही या दशकात नवे प्रवाह तयार झाले. फडणवीसांच्या राजकारणाचा प्रभाव त्यांच्या समर्थक आणि विरोधकांवरही होता. ज्या अभूतपूर्व नव्या आघाड्या, युती, पक्षफुटी महाराष्ट्रानं पाहिल्या त्यावरही फडणवीसांचा प्रभाव होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पिढ्यांमध्ये होतं ते स्थित्यंतर या काळात घडून आलं. विविध पक्षांमध्ये, घराण्यांमध्ये नवी पिढी राजकारणात आली. त्यामुळे राजकारणाचा बाज बदलला.

तंत्रज्ञानातल्या बदलांमुळे, समाजमाध्यमांच्या प्राबल्यामुळे, जगभरातच व्यक्तिकेंद्रित राजकारणाचं स्तोम नजीकच्या इतिहासात पहायला मिळतं. महाराष्ट्रात या बदलला नव्या पिढीच्या देवेंद्र फडणवीसांनी आत्मसात केलं.

पण या नव्या बाजाचे, चांगले आणि वाईट, असे दोन्ही परिणाम असतात. फडणवीसांच्या राजकारणावर असे दोन्ही प्रभाव दिसतात.

शपथविधी समारंभ

आपल्या समकालिनांना वा समवयस्कांना वेगाने ओलांडून ते पुढे गेलेले दिसतात. बहुमतामुळे आणि केंद्राच्या पाठिंब्यामुळे काही दशकांनंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे मुख्यमंत्री ते झाले. त्यांच्याच नेतृत्वात भाजपनं 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदारांची शंभरी ओलांडली.

1995 पासून सगळ्या आघाड्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना करावी लागलेली सगळ्यांना सतत सांभाळून घेण्याची कसरत फडणवीसांना फारशी करावी लागली नाही.

त्यांच्या काळात समृद्धी महामार्गापासून राज्यांतल्या शहरांतले प्रस्तावित मेट्रोमार्ग मार्गी लागले, काही नव्या प्रकल्पांची योजना झाली, त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी 'विकासपुरुष' अशी त्यांची प्रतिमा उभी केली. केंद्रातही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमतातलं सरकार असल्यानं आवश्यक असलेला राजकीय आणि आर्थिक पाठिंबाही त्यांना कायम मिळाला.

प्रसंगी हिंदुत्वावरही आक्रमक बोलत विचारधारेचं राजकारण ते करत राहिले. संघाचा पाठिंबा त्यांना होताच. मोदीनंतर अमित शाह आणि योगी आदित्यनाथांसोबत फडणवीसांचंही नाव दिल्लीत घेतलं जाऊ लागलं.

पण दुसरीकडे, डावपेचांमुळे राजकारणात स्वपक्षीय आणि बाहेरच्या प्रतिस्पर्ध्यांचं राजकारण अडचणीत आणणारे अशीही त्यांची प्रतिमा कालांतरानं होत गेली. जेव्हा उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये निवडणुकीनंतर पाठिंबा देण्याचं नाकारलं, त्यानंतर जे राजकारण महाराष्ट्रात घडलं, त्यानंतर फडणवीसांची ही प्रतिमा अधिक बळकट होत गेली.

देवेंद्र फडणवीस आणि मावळते भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि मावळते भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा

शिवसेना फुटणे, नंतर राष्ट्रवादी फुटणे, यातला त्यांचा सहभाग आणि संख्या असूनही पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळणे याचे परिणाम झाले.

2019 पूर्वी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घालून, उच्च न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्यानंतर या समाजातले समर्थक आपल्याकडे आणि भाजपकडे वळवण्यात फडणवीस यशस्वी झाले होते. त्याचे परिणाम 2019 च्या निवडणुकीतही दिसले होते.

पण मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यावर, इतरही समाज आरक्षण प्रश्नावर आक्रमक झाल्यावर, राजकीय अडचणीची स्थिती निर्माण झाली. फडणवीस विरोधकांचं लक्ष्य बनले. या बदललेल्या राजकीय स्थितीचा फटका भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसला.

मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवाला पुसून काढत फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेत पुनरागमन केलं आहे.

सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार

अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम रचला आहे. पंधराव्या विधानसभेसाठीचा शपथविधी आज मुंबईत पार पडला.

2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य आमदार घेऊन अजित पवार सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाले. सध्या 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या असून शरद पवार गटाने दहा जागांवर विजय मिळवला आहे.

देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, FACEBOOK/AJITPAWARSPEAKS

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून 2023 मध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवारांनी तेव्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

'अजित पवार नॉट रिचेबल' ते 'अजित पवार बंड करणार' असे एक ना अनेक मथळे 'ब्रेकिंग न्यूज'च्या घणाघाती आवाजानं दर काही महिन्यांनी दृकश्राव्य माध्यमांच्या पडद्यावर आदळत असायचे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

पण शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तर, अजित पवारांकडे पक्षाची धुरा सोपवणार असल्याचीही चर्चा झाली. मात्र, शरद पवारांनीच राजीनामा मागे घेतल्यानं या चर्चा थांबल्या.

त्यांनंतर मात्र अजित पवारांनी थेटपणे भूमिका घेतली आणि बंडखोरी केली. राष्ट्रवादीतील मोठ्या गटासह अजित पवार महायुतीत सहभागी झाले.