'आमच्या गावात दररोज सिंह आणि बिबटे येतात', शेकडो सिंह फिरत असलेल्या परिसरात लोक कसं जीवन जगतात?

    • Author, गोपाळ काटेशिया
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुजरात सरकारनं 10 ते 13 मे 2025 दरम्यान राज्यातील सिंहाची गणना केली असून त्याची माहितीही जाहीर केली आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये सिंहांची (आशियाई) संख्या 899 झाली असून 2020 मध्ये ही संख्या 674 होती.

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आकेडवारीवरून दिसून येतं की, गेल्या 5 वर्षांमध्ये गुजरातमध्ये सिंहांची संख्या 227 ने (32.2 टक्के) वाढली आहे. पण, धक्कादायक म्हणजे अर्धे सिंह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांसारख्या संरक्षित वनक्षेत्रात नसून मानवी वस्ती असलेल्या भागात राहतात.

अधिकृत आकडेवारीनुसार, 2020 पर्यंत सौराष्ट्र प्रदेशात 30 हजार चौरस किलोमीटर सिंह होते आणि 2025 पर्यंत हे क्षेत्र 35 हजार चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं.

गावात सिंह येत असल्याची तक्रार स्थानिक करतात, तर आमच्या गावात रस्त्यांवर सिंह फिरत असल्याचं काही गावातील ग्रामस्थ सांगतात.

सिंह आणि बिबट्या मानवी वस्ती असलेल्या भागात प्रवेश करत असल्यानं सौराष्ट्रातील लोकांना त्यांची जीवनशैली आणि अधिवास बदलावा लागला आहे. तसेच मानवी वस्तीत सिंह आणि बिबटे संचार करत असल्यानं मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

वनअधिकाऱ्यांनी सांगितले की, सिंह सहसा मानवांवर हल्ला करत नाहीत. तसेच सौराष्ट्रातील लोक सुद्धा प्राण्यांबद्दल संवेदनशील आणि सहनशील आहेत. त्यामुळे मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण, लोकांना बिबट्यांचा खूप त्रास आहे.

'बाहेर बांधलेल्या जनावरांना धोका'

अमरेलीच्या राजुला तालुक्यातील धाथरवाडी नदीच्या काठावर असलेल्या जपोदर गावात गेल्या 15 वर्षांपासून सिंह फिरत आहेत, असे गावातील 75 वर्षीय शेतकरी आपा भाई धाकडा सांगतात.

"मी लहान असताना आम्ही गढिया गावात (अमरेलीच्या धारी तालुक्यातील गीर सीमेवर) आमच्या नातेवाईकांच्या घरी जात होतो. त्यावेळी तिथले लोक आम्हाला सिंह दाखवायचे. तेव्हा आमच्या गावात आम्हाला कधीही सिंह दिसायचे नाहीत. आम्ही शेतात दिवसरात्र काम करत होतो आणि रात्री शेतातच झोपायचो. पण, सिंह आणि बिबटे गेल्या 15 वर्षांपासून आमच्या गावात येत आहेत."

"गेल्या 10 वर्षांपासून ते आमच्या गावात राहत आहेत. आता आम्ही शेतात बाहेर झोपू शकत नाही. बिबट्या कधी येईल आणि हल्ला करेल सांगता येत नाही. आम्ही गुरांना देखील बाहेर बांधत नाही. त्यांच्यासाठी खास शेड बांधले आहे," असं धाकडा सांगत होते.

"मुलांना झोपण्यासाठी पिंजरा तयार केला"

जाफराबादच्या भाकोदर गावात भरतभाई राहतात. 6 महिन्यांपूर्वी भरतभाईंच्या पत्नीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. त्यानंतर भरतभाईंचे वडील खिमाभाई यांचे 2 महिन्यानंतर निधन झालं.

नवजात मुलगा, 5 मुली आणि आईची काळजी घेण्याची जबाबदारी भरतभाईंवर आली.

भरतभाई बीबीसीशी बोलताना म्हणाले, "माझी मोठी मुलगी 10 वर्षांची आहे. माझी आई 70 वर्षांची आहे. तिला रात्रीही शेतात काम करावं लागतं. मी ज्या शेतात काम करतो त्या शेताजवळ घरं नाहीत. आम्ही झोपडीसारख्या घरात राहतो जे दोन्ही बाजूंनी रिकामे आहे."

"माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला आमच्या घराजवळ एक बिबट्या दिसला. तेव्हापासून मला माझ्या मुलांच्या सुरक्षिततेची खूप काळजी वाटत होती. मी 10 हजार रुपयांच्या घरात एक मोठा पिंजरा बांधला. आम्ही रात्रीही काम करत असल्यानं मुलांना त्या पिंजऱ्यात झोपवतो."

सिंह आणि बिबट्यांमुळे पिकांना धोका

गीर सोमनाथ जिल्ह्यातील कोडीनार तालुक्यातील अलीदर गावातील शेतकरी चेतन बरड यांनी वनविभागानं दिलेल्या 15 हजार रुपयांच्या अनुदानातून शेतात मचान तयार केली. तसेच त्याला लोखंडी कुंपण बसवलं.

लोखंडाचे चार पाईप वापरून 10 फूट उंच मचान बांधली ज्याला चारही बाजूंनी लोखंडी कुंपण आणि छत बसवण्यात आलं.

चेतन सांगतो "रानडुक्कर आणि नीलगाय पिकं खातील अशी भीती आम्हाला आहे. आम्ही रात्रभर शेतात पहारा देतो जेणेकरून प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण होईल. आमच्या शेतात सिंह आणि बिबटे सुद्धा येतात."

"बिबट्यांची भीती जास्त आहे. कारण, ऊसाच्या शेतात बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते. त्यात त्यांना गरजेचा असलेला थंडावा आणि पाणी मिळतं. सिंह सहसा माणसांवर हल्ला करत नाही. पण, बिबटे कधी हल्ला करतील सांगता येत नाही. सरकारनं कुरणांची उभारणी करण्यास मदत केल्यानंतर आम्हाला थोडा दिलासा मिळाला."

पुढे ते म्हणतात, "कधीकधी जेव्हा सिंह आमच्या शेतातून जातात तेव्हा आम्हाला खूप भीती वाटते. पण, आमच्या शेतात सिंह असणं फायद्याचं देखील आहे. सिंहांमुळे रानडुक्कर शेतात येत नाहीत."

"आमच्या गावात दररोज सिंह दिसतात"

बीबीसीनं 21 मे रोजी राजुला तालुक्यात पिपवाव बंदराजवळली रामपारा 2 गावाला भेट दिली.

या गावातील बाघाभाई वाघ नावाच्या शेतकऱ्याच्या गाईवर सिंहांनी हल्ला केला होता. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली होती.

"आमची गाय गोठ्यात होती. ती पाणी पिण्यासाठी बाहेर पडली, तेव्हा 5 ते 6 सिंहांनी तिच्यावर हल्ला केला. लोकांनी मोठ्यानं आरडाओरडा केल्यानं सिंह पळून गेले आणि आम्ही गाईला वाचवलं. पायाला जखम झाल्यामुळे गाय उभी राहू शकली नाही," असं बाघाभाई सांगतात.

रामपारा गावाभोवती सरकारी आणि खासगी जमिनीवर झाडे आणि झुडुपे आहेत. इथं रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना नीलगाय दिसतात. याच निलगाय सिंहांचं भक्ष्य आहेत.

"आमच्या गावातल्या रस्त्यांवर दररोज सिंह दिसतात. मध्यरात्री त्यांच्या गर्जना ऐकू येतात. शेतावर काम करण्यासाठी कोणतेही मजूर तयार होत नाहीत. महिला एकट्या शेतात जात नाहीत. त्यांना पिकांची भीती वाटत नाही, त्यांना शेतात जाताना सिंह हल्ला करतील याची भीती वाटते, " असं 55 वर्षीय लक्ष्मणभाई वाघ म्हणाले.

मानव-प्राणी संघर्षाबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं काय?

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आणि पर्यावरणतज्ज्ञ भूषण पंड्या म्हणतात की, जेव्हा सिंह नवीन क्षेत्रात जातात तेव्हा त्यांना मानव आणि इतर सिंहांची देखील भीती वाटते.

ते म्हणतात, "सिंह फिरत असलेल्या परिसरात लोक गेले तेव्हा सुरुवातीला सगळ्यांना भीती वाटली. त्यांना वाटत होतं की सिंह लहान मुलांवर हल्ला करेल. पण, त्यांना हे माहिती नव्हतं की सिंह देखील घाबरतात."

"सिंह हा सर्वात मोठा मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे लोक सावध असतात. एका भागातले सिंह दुसऱ्या परिसरातल्या सिंहांना आपल्या परिसरात येऊ देत नाहीत."

"जर लोकांनी त्यांची वर्तवणूक समजून घेतली, तर शांततेत जगणं शक्य आहे आणि वर्षानुवर्ष हेच घडत आलंय. जेव्हा सिंह मानवी वस्तीत येतात तेव्हा ते त्यांचं वर्तन बदलतात आणि लोक सुद्धा त्याच प्रकारे वागतात."

"गीर सिंहांचे मुख्य भक्ष्य नीलगाय, चितळ आणि रानडुक्कर आहे. हे सगळे प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात. जर सिंह नसते, तर या प्राण्यांची संख्या वाढली असती आणि शेतकऱ्यांपुढे एक मोठी समस्या निर्माण झाली असती," असंही ते म्हणाले.

सरकारचं म्हणणं काय आहे?

"महसूल क्षेत्रात सिंहांची संख्या वाढल्यानं मानव-वन्यजीव संघर्ष वाढेल असं मला वाटत नाही," असे गुजरात सरकारचे मुख्य वनसंरक्षक जयपाल सिंग म्हणाले.

उलट लोकांना वाटतं की, सिंहांनी आपल्या शेतात यावं. सिंह दुसऱ्या भागात निघून जातात आणि तिथेच राहतात. तेव्हा सिंह कधी परत येतील? असं स्थानिक शेतकरी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारतात. कारण, पिकांचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून सिंह संरक्षण देतात, असंही जयपाल सिंग म्हणाले.

ते पुढे म्हणतात की, सिंहांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढेल याची चिंता नाही. पण, या भागात बिबट्याचा लोकांना त्रास आहे. वर्षभरात मानवांवर झालेल्या 20 वन्यजीव हल्ल्यांपैकी 19 हल्ले बिबट्यांनी केले आहेत. आम्ही हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)