गुरपतवंत सिंह पन्नू प्रकरण : निखिल गुप्तांच्या नातेवाईकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गुरपतवंत सिंह पन्नू

फोटो स्रोत, SOCIALMEDIA

फोटो कॅप्शन, गुरपतवंत सिंह पन्नू
    • Author, जुगल पुरोहित आणि उमंग पोद्दार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकन न्यायालयात आरोपी बनवण्यात आलेल्या निखिल गुप्ताच्या कुटुंबीयांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निखिल गुप्ता यांच्या कुटुंबीयांची याचिका फेटाळताना म्हटलंय की, “सरकारला याबाबत कारवाई करायची आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे, त्यांना निर्णय घेऊ द्या.

"सध्याच्या रिट याचिकेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा आम्ही विचार केलाय. आंतरराष्ट्रीय कायद्याची तत्त्व, सार्वभौमत्व आणि वेगवेगळ्या देशांच्या न्यायालयांच्या अधिकार क्षेत्राचा विचार करता, कोणत्याही अर्जाला मंजूरी देता येणार नाही, असं आम्हाला वाटतं.”

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार निखिल गुप्ता यांना कायदेशीर मदत फक्त भारताकडूनच दिली जाऊ शकते.

यावर निखिल गुप्ता यांच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील सी आर्यमान सुंदरम यांनी न्यायालयाला सांगितलं की, निखिल गुप्ता यांना अद्याप वकील देण्यात आलेला नाही.

ते म्हणाले, "मी भारत सरकारकडून मदतीची मागणी यासाठी करतोय कारण ही बाब पूर्णपणे या गोष्टींवर अवलंबून आहे की मी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काम करतोय. स्वतःला वाचवण्यासाठी मला मंत्रालयाकडून थोड्या मदतीची आवश्यकता आहे."

न्यायालयाने त्यावर म्हटलं की, तुम्ही भारत सरकारकडे जाण्यास मोकळे आहात जे कायद्याप्रमाणे कारवाई करू शकतील.

याआधी काय घडलं?

अमेरिकन नागरिक असलेला शीख फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंह पन्नू याला मारण्याचा प्रयत्न निष्प्रभ करण्यात आला, असं काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं सांगितलं.

हत्येच्या प्रयत्नाच्या या कथित कटाच्या केंद्रस्थानी आहेत भारतातील सरकारी कर्मचारी असलेले निखिल गुप्ता.

निखिल गुप्ता कोण आहेत?

गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकन-कॅनेडियन नागरिक आहेत. फुटीरतावादी खलिस्तान आंदोलनाचे पन्नू समर्थक आहेत. हे आंदोलन स्वतंत्र शीख राष्ट्राची मागणी करत.

गुरपतवंत सिंह पन्नू यांना भारतानं दहशतवादी घोषित केलंय. मात्र, पन्नू यांनी हे आरोप फेटाळून स्वत:ला कार्यकर्ता म्हणटलंय.

दुसरीकडे, या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निखिल गुप्ता यांना याच वर्षी जूनमध्ये अमेरिकेच्या सांगण्यानंतर चेक प्रजासत्ताक इथं अटक करण्यात आली.

भारतीय सरकारी कर्मचाऱ्याच्या आदेशानुसार पन्नूच्या हत्येसाठी शस्त्रांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेनं निखिल गुप्तांवर केलाय.

निखिल गुप्ता यांचे स्थानिक वकील पेट्र स्लेपिचका यांनी सांगितलं की, निखिल गुप्ता आताच्या घडीला चेक प्रजसत्ताकच्या पँक्रॅकच्या तुरुंगात बंद आहेत.

अमेरिकेनं या प्रकरणात अद्याप कोणतेही पुरावे सामायिक केले नाहीत, असा दावा निखिल गुप्तांच्या वकिलानं बीबीसीशी बोलताना केला.

अमेरिकेनं कोणते पुरावे दिले?

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पेट्र स्लेपिचका यांनी म्हटलं की, “आम्हाला कुठलाही पुरावा मिळाला नाही. चेक न्यायालयाच्या फाईलमध्ये केवळ एका अमेरिकन एजंटचा जबाब आहे, त्यामुळे आम्हाला माहिती नाही की, त्यांचे दावे खरे आहेत की नाहीत.”

अमेरिकेच्या आरोपांशी संबंधित कागदपत्रांमध्ये निखिल गुप्तांना जोडण्यासाठी कम्युनिकेशन डिटेल्ससोबत फोटो असल्याचा दावा करण्यात आलाय.

यावर स्लेपिचका यांचं म्हणणं आहे की, “काही पैशांच्या देवाण-घेवाणीचा फोटो आहे. मात्र, तो फोटो काहीच सांगत नाही. असा फोटो भारत, पाकिस्तान, अमेरिका किंवा चेक प्रजासत्ताक यातल्या कुठल्याही देशात काढला जाऊ शकतो. कुठल्याही प्रकरणात, आता माझ्या देशात हे त्यांच्या गुन्ह्याबाबत नाही. हे केवळ त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत आहे. आमच्याकडे केवळ अमेरिकन एजंटचा जबाब आहे. त्याहून अधिक काही नाही.”

गुरपतवंत सिंह पन्नू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरपतवंत सिंह पन्नू
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्लेपिचका यांनी सांगितलं की, यापूर्वी या प्रकारच्या जबाबांवरून प्रत्यार्पणाची परवानगी दिली गेलीय. आताही प्रत्यार्पणासाठी अमेरिकन एजंटचा जबाब पुरेसा ठरू शकतो.

आपल्या कायदेशीर रणनितीवर बोलताना स्लेपिचका म्हणतात की, आता आम्ही आमची रणनिती बदललीय.

ते पुढे म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की, निखिल गुप्ता अमेरिकेतील प्रकरणाशी जोडलेले नाहीत. आम्ही असं यासाठी म्हटलं, कारण यापूर्वी आरोपपत्रात त्यांच्याबाबत काहीच माहिती नव्हती. अमेरिकेच्या आरोपपत्रात त्यांची उंची, वजन आणि कसे दिसतात याचं वर्णन याबाबत काही चुका होत्या. त्यामुळे मला वाटलेलं, त्यांची अटक एखाद्या गैरसमजाचा प्रकार असू शकतो.

“मात्र, प्रकरणानं आता मोठं वळण घेतलंय. गेल्या महिन्यात दिल्या गेलेल्या अमेरिकन आरोपपत्रांनंतर कथित गुन्ह्याबाबत अधिक माहिती मिळाली. त्यामुळे आता वाटतंय की, हा एक राजनैतिक प्रकरण असू शकतं. हे आमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. मात्र, केवळ चेक न्यायालयच यावर निर्णय घेऊ शकतं.

“आरोपपत्र सर्वसामान्य लोकांकडे सामायिक केलं जात नाही. किमान मला तरी तसं वाटतं. पण अमेरिका तर सर्वसामान्यांपर्यंत सामायिक करतंय. मला हे जरा विचित्र वाटतंय. भले यातला मी विशेषज्ज्ञ नसेन.”

पेट्र स्लेपिचका पुढे म्हणतात की, निखिल गुप्ता चेक प्रजासत्ताकच्या म्युनिसिपल कोर्टात आपल्या प्रत्यार्पणाचा खटला पराभूत झाले होते. आता हायकोर्टाचे दार ठोठावण्याच्या तयारीत ते आहेत.

चेक प्रजासत्ताकमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही

स्लेपिचका म्हणतात, “इथे प्रत्यार्पणासाठी चार टप्पे आहेत, पहिला महापालिका न्यायालय, नंतर उच्च न्यायालय, नंतर घटनात्मक न्यायालय आणि शेवटी न्याय मंत्रालय. निखिल गुप्ता प्रकरणात महापालिका न्यायालयाचा निर्णय अमेरिकेच्या बाजूनं लागलाय. पण ते कायद्याने बंधनकारक नव्हतं. त्यामुळे आता आम्ही वरच्या कोर्टात अपील करत आहोत.”

या महिन्याच्या सुरुवातीला निखिल गुप्ता यांच्या कुटुंबीयांनीही भारतातील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आपल्या याचिकेत निखिल गुप्तांच्या कुटुंबाने मागणी केलीय की, निखिलला शोधण्याची, तसंच चेक प्रजासत्ताकातून न्यायालयात हजर करण्याची मागणी केलीय.

शिवाय, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत भारत सरकारच्या हस्तक्षेपाची मागणीही निखिल गुप्तांच्या कुटुंबीयांनी केलीय. ही याचिका 4 जानेवारी 2024 ला सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर येणार आहे.

जूनमध्येच निखिल गुप्ताला अटक करण्यात आली होती. मग त्यांच्या कुटुंबाने आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा का ठोठावला, असा प्रश्न मी स्लेपिचक यांना विचारला.

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

त्यावर ते म्हणाले, “गुप्ता सप्टेंबरमध्ये माझे क्लायंट बनले. माझ्या हस्तक्षेपानंतर गुप्ता यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला, पण मी त्यांच्या कुटुंबीयांना भारतात सल्ला देत नाही. कारण मला भारतीय कायदे किंवा सरकारची माहिती नाही.”

मग चेक प्रजासत्ताकमधील भारतीय दूतावासासोबत तरी तुमचं बोलणं सुरू आहे का, असं विचारल्यावर स्लेपिचक म्हणतात की, भारतीय दूतावास आमच्याशी बोलू इच्छित नाहीय.

ते म्हणतात की, “भारतीय दूतावासासोबत आमचा कुठलाच संपर्क नाहीय. मी प्रयत्न करत होतो, पण ते आमच्याशी बोलू इच्छित नाहीत. माझी फी गुप्ता कुटुंब भरत आहे, भारत सरकार नाही.”

“निखिल गुप्तांची मदत करण्यासाठी दूतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला दोन तास वाट पाहावी लागली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतरच मला कुणीतरी भेटलं.”

निखिल गुप्तांच्या कुटुंबाची सुप्रीम कोर्टात याचिका

निखिल गुप्ता यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भारतीय अधिकाऱ्यांवरही आरोप केले आहेत. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांचे ‘मूकदर्शक’ असं वर्णन केलंय.

चेक प्रजासत्ताकच्या तुरुंगात निखिल गुप्ता एकांतात असल्याचं सांगत, याचिकेत म्हटलंय की, “याचिकाकर्त्यांवर आरोप कबूल करण्यासाठी आणि अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याची परवानगी देण्यासाठी अवाजवी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, याचिकाकर्त्यानं नकार दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं की, भारतीय दूतावास हे ठरवेल की, प्रत्यार्पणाचा खटला स्वतंत्र आणि निःपक्षपाती पद्धतीने चालवली जाईल."

"मात्र, याचिकाकर्ते आणि त्यांच्या कुटुंबाला परराष्ट्र मंत्रालयानं खूप निराश केलं. कारण परराष्ट्र मंत्रालय आपलं कर्तव्य पार पाडण्यात आणि गंभीर आरोपांचा सामना करत असलेल्या भारतीय नागरिकाला मदत करण्यात अयशस्वी ठरलं आहे.”

पेट्र स्लेपिचक
फोटो कॅप्शन, निखिल गुप्ताचे वकील पेट्र स्लेपिचक

याविषयी अधिक माहितीसाठी बीबीसीने परराष्ट्र मंत्रालय आणि चेक प्रजासत्ताकमधील भारतीय मिशनशी संपर्क साधला होता, पण त्यावेळी (22 डिसेंबर 2023) पर्यंत ही बातमी प्रकाशित होईपर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

गुरुवारी (21 डिसेंबर 2023) रोजी परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले,

"आम्ही अमेरिकेने दिलेले इनपुट गांभीर्याने घेतो. स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या सर्व पैलूंवर लक्ष देईल. या प्रकरणात तुमच्याशी सामायिक करावं, असं अद्याप काही हातात आलं नाहीय."

“मात्र, आम्ही तुम्हाला सांगू शकतो की, एका भारतीय नागरिकाला चेक अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अमेरिकेत त्याचं प्रत्यार्पण प्रकरण प्रलंबित आहे. आम्हाला कॉन्सुलर अॅक्सेस मिळाला आहे. आम्हाला आतापर्यंत तीनदा अॅक्सेस मिळाला आहे. ते जे काही मागत आहेत, ते आम्ही देत आहोत. त्यांचे कुटुंबीय सुप्रीम कोर्टात गेले आहेत, त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. आम्ही यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू."

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फायनान्शिअल टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “अमेरिकेतील हत्येच्या कटाशी संबंधित असलेल्या कथित दुव्यांबाबत भारत नक्कीच तपास करेल. या आरोपांचा भारत-अमेरिका संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.”

जेव्हा निखिल गुप्ता यांच्या वकिलाला विचारण्यात आलं की, भारताच्या प्रतिसादामुळे ते किंवा त्यांचे क्लाएंट निराश झाले आहेत का, तेव्हा ते म्हणाले, “मी माझं काम करत आहे. भारतीय किंवा चेक किंवा अमेरिकन अधिकाऱ्यांच्या वृत्तीने मी निराश होऊ शकत नाही. गुप्ता यांची मानसिकता माझ्यापेक्षा वेगळी आहे. मी फक्त एक प्रोफेशनल म्हणून काम करत आहे. त्यांना काय वाटतं यापेक्षा मी फक्त त्यांच्या केसवर लक्ष केंद्रित करत आहे."

वकिलानं सांगितलं की, चेक प्रजासत्ताकमधील तुरुंग अधिकाऱ्यांना निखिल गुप्तांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती केव्हा देण्यात आली हे स्पष्ट झाले नाही.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "तुरुंग प्रशासनाला स्थानिक पोलिसांकडून निखिल गुप्ता यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती मिळाली. हा धोका कोणाकडून आहे, हे मला माहीत नाही. आता त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. येथील तुरुंगात ते अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळे निखिल गुप्ता समाधानी आहेत. तुरुंग अधिकारी त्याच्यासोबत आहेत. आता ते त्याच्या कुटुंबालाही तिथं बोलावू शकतात."

आरोप काय आहेत?

आरोपानुसार, मे 2023 मध्ये एका अधिकाऱ्याने निखिल गुप्तांना अमेरिकेत हत्या घडवून आणण्याचं काम सोपवलं.

दस्तावेजानुसार, निखिल गुप्ता भारतीय नागरिक असून ते भारतात राहतात.

गुप्ता यांनी मारेकऱ्याशी संपर्क साधण्यासाठी गुन्हेगारी विश्वातील एका जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधला. खरंतर, ही व्यक्ती अमेरिकन गुप्तचर संस्थेचा विश्वसनीय स्रोत होती.

अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या विश्वसनीय सूत्राने गुप्ताची ओळख अमेरिकन एजन्सीच्या दुसऱ्या एका गुप्तहेर एजंटशी करून दिली.

अमेरिका

फोटो स्रोत, US DEPARTMENT OF JUSTICE

गुप्ता आणि त्या गुप्तहेर एजंटमध्ये एक लाख अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार झाला. त्याबदल्यात हत्या केली जाईल असा करार करण्यात आला.

निखिल गुप्ता यांनी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील त्याच्या संपर्कातील एका दुसऱ्या अमेरिकन एजंटद्वारे पंधरा हजार अमेरिकन डॉलर्स दिले.

हत्येसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम होती. त्याचा व्हीडिओही एजंटने रेकॉर्ड केला असून तो खटल्यात सादर करण्यात आला आहे.

आरोपानुसार, हे काम देणाऱ्या भारतीय अधिकाऱ्याने जून 2023 मध्ये गुप्ता यांना ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे त्याची माहिती दिली. गुप्ता यांनी ही माहिती अमेरिकन एजंटला पुरवली.

यामध्ये त्या व्यक्तीचे फोटो आणि घराचा पत्ताही होता.

आरोपानुसार, अमेरिकेच्या विनंतीनंतर निखिल गुप्ता यांना 30 जून 2023 रोजी चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)