You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेशात स्मशानभूमी आणि मंदिरात चोरी आणि हत्या, भारताच्या शेजारी नेमकं काय सुरू आहे?
बांगलादेशच्या उत्तर भागातील नाटोर जिल्ह्यातील स्मशानभूमीत शनिवारी (21 डिसेंबर) एक मृतदेह सापडला.
बीबीसी बांगलाच्या माहितीनुसार, प्राचीन अशा स्मशानभूमीतील मंदिरात ठेवण्यात आलेल्या कांस्याच्या, पितळी आणि तांब्याच्या जुन्या वस्तूंची देखील चोरी झाली आहे.
पोलिसांचं म्हणणं आहे की, शनिवारी (21 डिसेंबर) सकाळी ज्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला, ती व्यक्ती 24 वर्षांपासून या मंदिरात राहत होती. त्या व्यक्तीचं नाव तरुण दास आहे.
45 वर्षांचे तरुण दास नाटोरमधील अलाईपूरमधील रहिवासी असलेल्या काली चंद्र दास यांचे पुत्र होते.
इस्कॉन या हिंदू धार्मिक संस्थेनं देखील या घटनेचा निषेध केला आहे. तसंच, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.
उपजिल्हा कार्यकारी अधिकारी अख्तर जहां यांनी बीबीसीला सांगितलं की, शनिवारी (21 डिसेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर राजशाहीहून सीआयडी आणि पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
ते म्हणाले, "प्रथमदर्शनी हे चोरीचं प्रकरण दिसतं आणि ही हत्या चोरट्यांनीच केली आहे. मृत पावलेली व्यक्ती थोडीशी अस्वस्थ होती, मात्र ते रात्री मंदिरात थांबले होते."
सुबल दास मंदिराच्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, तरुण दास मंदिरात काम करत नव्हते, मात्र गेल्या 24 वर्षांपासून ते रात्री मंदिरातच मुक्काम करायचे.
पोलिसांनी सांगितलं की, या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आणि या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काय आहे सर्व प्रकरण?
पोलीस अधिकारी महबूब उर रहमान म्हणाले की, तरुण दास यांचा मृतदेह एका बेंचवर दोरीनं घट्ट बांधलेला होता.
दास यांचा मृतदेह सापडल्यानंतर मंदिरात दरोडा पडल्याची गोष्ट सर्वत्र पसरली. रहमान यांचं म्हणणं आहे की, सुरुवातीला हा दरोडा आहे असं त्यांना वाटलं नाही.
मंदिराच्या समितीचे अध्यक्ष सुबल दास म्हणाले की, ही स्मशानभूमी शेकडो वर्षे जुनी आहे. या परिसरातील हिंदू लोकांसाठी हे एक महत्त्वाचं धर्मस्थळ आहे. इथे दररोज नियमितपणे पूजा होते. तसंच, वार्षिक पूजा देखील होते. त्याव्यतिरिक्त दर शुक्रवारी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मंदिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरक्षा रक्षक असतो. मात्र, रात्री कोणताही सुरक्षा रक्षक नसतो. शुक्रवारी (20 डिसेंबर) रात्रीच्या वेळेसच हत्या झाली असेल."
त्यांनी सांगितलं की, तरुण दास यांचं शहरात घर होतं, मात्र ते रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीतच थांबायचे.
ते म्हणाले, "चोरी झालेली असो किंवा दरोडा पडलेला असो, जे लोक आले होते त्यांनी मुख्य मंदिराला लावण्यात आलेलं ग्रिल तोडलं. ते आत शिरले आणि स्टोअर रुममधून अनेक जुन्या मौल्यवान वस्तू घेऊन गेले. यात कांस्य, पितळ आणि तांब्याच्या वस्तू होत्या."
जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अख्तर यांनी सांगितलं की कदाचित तरुण दास यांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरांनी त्यांना घट्ट बांधून ठेवलं असेल आणि जखमी होऊन दीर्घकाळ तसंच पडून राहिल्यामुळे दास यांचा मृत्यू झाला असेल. मात्र, मृत्यूमागचं खरं कारण शव विच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.
पोलिसांनी सांगितलं की, स्मशानभूमीचा परिसर एकांतात वेगळा आहे. तिथे लोकांचं फारसं येणं-जाणं नसतं. या परिसरात बऱ्याच वेळा अंमली पदार्थांचं सेवन करणारे आढळतात.
इस्कॉनचं काय म्हणणं आहे?
इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधाराम दास यांनी नाटोरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "नाटोरमधील मंदिरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि मंदिरातील सर्व मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्या. तरुण चंद्र दास यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं."
"या घटनेमुळे त्या परिसरातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. इतकंच काय हिंदूंची स्मशानभूमी, ज्याला अंतिम शांततेचं ठिकाण मानलं जातं, तिथं देखील या प्रकारचे गुन्हे घडत आहेत."
आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणाले की, 8 डिसेंबरपर्यंत बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकाच्या बाबतीत याप्रकारच्या 2,200 घटना झाल्याची पुष्टी भारत सरकारनं केली आहे.
याच आठवड्यात भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ति वर्ध्दन सिंह यांनी लोकसभेत सांगितलं की, यावर्षी 8 डिसेंबरपर्यंत बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकाच्या बाबतीत याप्रकारच्या 2,200 घटना झाल्या आहेत.
इस्कॉननं या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की धार्मिक अल्पसंख्यांकांना सुरक्षा पुरवण्यात देशातील हंगामी सरकारला अपयश आलं आहे. शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून अल्पसंख्यांकांना छळ आणि हिसांचाराला तोंड द्यावं लागतं आहे.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर हल्ले
याच वर्षी 5 ऑगस्टला बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारला सत्तेतून हटवल्यानंतर तिथल्या अनेक भागांमध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या घर आणि मालमत्तेवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयानं 10 डिसेंबरला माहिती दिली की 5 ऑगस्टपासून 22 ऑक्टोबरपर्यंत देशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या हिंसाचाराच्या 88 प्रकरणांमध्ये 70 जणांना अटक करण्यात आली आहे.
यानंतर घडलेल्या घटनांसदर्भात देखील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की पोलीस अशी घटनांची एक यादी देखील तयार करत आहेत.
शफीकुल आलम, मोहम्मद युनूस यांचे प्रसार माध्यम सचिव आहेत. त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, "अटक होणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल. एक-दोन घटना आणखी होऊ शकतात. कारण सुनामगंजमध्ये देखील एक घटना झाली होती. चितगाव, तुराग आणि ढाक्यातील नरसिंगडीमध्ये काही ठिकाणी या प्रकारच्या घटना झाल्या आहेत."
चिन्मय कृष्ण दास पूर्वी बांगलादेशातील इस्कॉनशी जोडलेले होते आणि सम्मिलित सनातनी जागरण ज्योतचे प्रवक्ते आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर सनातनच्या अनुयायांवर अत्याचार आणि छळ झाल्याचे आरोप देखील झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्यातच चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. या मुद्द्यावरून भारत आणि बांगलादेशमधील तणाव आणखी वाढला.
पाच ऑगस्टनंतर सम्मिलित सनातनी जागरण ज्योत संघटना बांगलादेशात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात निदर्शनं करतं आहे.
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्याच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र तिथल्या उच्च न्यायालयानं ही मागणी करणारी याचिका फेटाळली होती.
अल्पसंख्यांकाच्या बाबतीत होत असलेली हिंसा आणि छळ यासंदर्भात भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या म्हणजे प्रोपगंडा असल्याचं बांगलादेश सरकार सुरूवातीपासून म्हणतं आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव
अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून भारत आणि बांगलादेशातील तणाव कमी होताना दिसत नाही.
एका बाजूला भारताच्या संसदेत बांगलादेशात अल्पसंख्यांकावर झालेल्या हल्ल्यांची आकडेवारी देण्यात आली, तर त्याच दिवशी बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या मीडिया टिमनं पत्रकार परिषदेत म्हटलं की "ही माहिती चुकीची आणि वाढवून सांगण्यात आलेली आहे."
त्यांच्याकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की "लॉ अँड आर्बिट्रेशन सेंटर 'आईन ओ सालिश केंद्र' या स्वंतत्र मानवाधिकार संघटनेुसार नुसार, जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत बांगलादेशात अल्पसंख्यांकाच्या बाबतीत हिंसाचाराच्या 138 घटना घडल्या. यात 368 घरांवर हल्ले करण्यात आले आणि त्यात 82 जण जखमी झाले."
पोलीस मुख्यालयानुसार, "4 ऑगस्ट ते 10 डिसेंबर दरम्यान किमान 97 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांकावर झालेल्या हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये 75 जणांना अटक करण्यात आली."
याच महिन्यात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी ढाक्याचा दौरा केला होता. तिथे त्यांनी इतर विविध मुद्द्यांबरोबरच अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील मांडला होता.
मात्र, बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी भारतानं बांगलादेशच्या अंतर्गत गोष्टींवर प्रतिक्रिया देणं टाळावं, असा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला होता.
5 ऑगस्टनंतर, बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार महफूज आलम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्यांनी बांगलादेशच्या नकाशात पश्चिम बंगाल सह ईशान्य भारतातील अनेक राज्यांचा समावेश केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता.
अर्थात नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. मात्र भारतानं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)