You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आईनं माझ्यासमोरच श्वास सोडला, भाऊ तर दिसलाही नाही' – गोव्यातल्या चेंगराचेंगरीचा ग्राऊंड रिपोर्ट
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, शिरगाव, गोवा
"माझी आई माझ्या पुढे होती, मागून जोराचा धक्का बसला आणि सगळे खाली पडलो. माझ्या समोरच तिने श्वास सोडला. माझ्या भावाला तर बघायलाही मिळालं नाही," हे शब्द आहेत दहावीत शिकणाऱ्या ऋतिकाचे.
गोव्याची राजधानी पणजीपासून 23 किलोमीटर अंतरावर शिरगावात श्री लैराई देवीच्या जत्रेत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. 3 मे 2025 च्या पहाटे तीनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली आणि सहा भाविकांचा चिरडून जागीच मृत्यू झाला, तर 74 भाविक जखमी झाले.
या घटनेमुळे शिरगावपासून 11 किलोमीटरवर असलेल्या थिविममधील औचित वाड्यातील कवठणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
11 वीत शिकणारा आदित्य, त्याची 52 वर्षीय काकू तनुजा आणि त्यांची दहावीत शिकणारी मुलगी ऋतिका हे तिघेही उत्साहाने जत्रेत सहभागी झाले होते.
श्री लैराई देवीच्या या जत्रेत एक परंपरा पार पाडली जाते. तलावात अंघोळ करून होमकुंडाकडे चालत जाण्याचा प्रवास पवित्र मानला जातो. हे करत असतानाच चेंगराचेंगरीची घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं.
जत्रेच्या आनंदात दंग असलेल्या या तिघांच्या आयुष्यावर काळाने घाला घातला. त्या तीव्र उताराच्या रस्त्यावर अचानक चेंगराचेंगरी झाली. यात कवठणकर कुटुंबातीन दोन सदस्य काळाने हिरावून नेले.
या घरातील एका आईने आपला मुलगा गमावला तर एका मुलीने आपली आई गमावली.
57 वर्षीय तनुजा आणि 17 वर्षांचा आदित्य या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले.
ही बातमी कवठणकर कुटुंबासाठी आकाश कोसळल्यासारखी होती.
"माझ्या बाळाला कोण परत आणणार?" असं म्हणत आदित्यची आई विचारत होती.
आदित्यचे वडील अंकुश कवठणकर यांच्या मनात दुःखाबरोबरच प्रचंड संताप होता. ते म्हणाले की, "गेल्या वर्षीही अशीच घटना घडली होती, पण प्रशासनाने आणि देवस्थान काहीच शिकलं नाही. माझा मुलगा आता गेला, आता कोण आणणार त्याला परत?"
त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, "चेंगराचेंगरीनंतरच पोलीस आले. आधी बंदोबस्त का वाढवला नाही?"
धोंडांच्या वर्तनाबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "पडलेल्यांना उचलायचीही तसदी ते घेत नाहीत. माझ्या मुलाला अडकल्याचं कळलं, पण धोंडांनी वाटच दिली नाही," असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली.
या दुर्घटनेत ऋतिकाही जखमी झाली. तिच्या कंबरेला जबर मार लागल्याने तिच्या एका पायाला संवेदनाच जाणवत नाही. एकीकडे आईचं छत्र हरपलं, दुसरीकडे स्वतःचं शरीर साथ देत नाही, ही वेदना तिच्यासाठी असह्य आहे.
पाणावलेल्या डोळ्यांनी ऋतिका म्हणाली, "माझी आई माझ्या पुढे होती, मागून जोराचा धक्का बसला आणि सगळे खाली पडलो. माझ्या समोरच तिने श्वास सोडला. माझ्या भावाला तर बघायलाही मिळालं नाही."
घटनास्थळी गेल्यावर लोकांनी काय सांगितलं?
ही दुर्दैवी घटना कशी घडली, याचा अहवाल अजूनही सरकारकडे सादर झालेला नाहीय. या घटनेची माहिती घेण्यासाठी बीबीसीची टीम शिरगावात पोहोचली.
जिथे चेंगराचेंगरी झाली त्याच्या आसपास राहणारे ग्रामस्थ, जत्रेतील दुकानदार, शिरगावच्या शेजारील गावांमधले ग्रामस्थ, लैराई देवस्थानाचे पदाधिकारी यांच्याशी आम्ही बलोलो. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, या चेंगराचेंगरीला अनेक त्रुटी जबाबदार आहेत.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी तीव्र उतार आहे. या उतारामुळे तोल जाऊन ही चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली.
तर धोंड जेव्हा या उतारावरून पुढे सरकत होते, तेव्हा रांगेवरून काही जणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी उपलब्ध असलेल्या दृश्यांमध्ये हातातील वेताने काही जण एकमेकांना मारत असल्याचं दिसत आहे. या विषयी उघडपणे कोणी बोलत नाहीये, पण दबक्या आवाजात लोक सांगत होते.
या जत्रेमध्ये गेल्या 35 वर्षांपासून दुकान लावणारे दिनकर नाईक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "जे धोंड देवीच्या दर्शनासाठी येतात, त्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. पुढेही ती वाढत राहणार. पण या ठिकाणी जो रस्ता आहे तो तसाच राहिला आहे. यावर काही तरी केलं गेलं पाहिजे. ही घटना अत्यंत वाईट आहे. ती व्हायला नको होती. पण यापासून धडा घेणं आवश्यक आहे."
इथलेच सचिन बांदोडकर सांगत होते की, "या जत्रेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा दुकांनाची संख्या प्रचंड असते. या दुकांनामुळेही रस्ता अरूंद होते. धोंडांना होमातून जायचं असं. त्यावेळी त्यांची मनस्थितीही वेगळी असते. त्यामुळे माझं कमिटीला असं सांगणं आहे की, दुकाने जर त्याठिकाणी नसती तर ही चेंगराचेंगरी झाली नसती. त्या रस्त्यावर जागा भरपूर आहे. पण दुकांनामुळे ती जागा अरूंद झाली होती."
मात्र, पुढच्या वर्षी सरकार आणि समिती यावर नक्की विचार करेल, अशी आशाही सचिन बांदोडकरांनी व्यक्त केली.
काही भाविकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर आपली नाराजी बीबीसीसोबत व्यक्त केली. या नागरिकांच्या मते, "पोलिसांकडून धरण्यात आलेली नायलॉनची दोरी थोड्या उंचीवर धरायला हवी होती. त्यामुळेही काही लोक पडत होते. त्याचबरोबर तलावातून आंघोळ करून आलेले धोंड एकदमच पुढे सरकत होते. खरंतर त्यांना पोलीस प्रशासनाकडून हळूहळू सोडणं अपेक्षित होतं. शिवाय, अधिकचं पोलीस बंदोबस्त चेंगराचेंगरीच्या ठिकाणी असायला हवं होता. मात्र, तो बंदोबस्त प्रत्यक्षात केवळ मंदिराच्या इथे होता."
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची बदली
या घटनेनंतर सरकार, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पीडितांची त्यांनी भेट घेवून त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी महसूल आयुक्त संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या चेंगराचेंगरी मागची कारणे शोधून 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप अहवाल सादर करण्यात आला नाहीय.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी तातडीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिट्टे, पोलीस अधीक्षक अक्षत कौशिक, पोलीस उप अधीक्षक जीवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक दिनेश गाडेकर यांची बदली केली आहे.
या घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची आणि जखमींना एक लाख रूपयांची तातडीची मदतही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केली आहे.
सरकारच्या या निर्णयाबद्दल काँग्रेस मात्र समाधानी नाहीय. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. शिवाय, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख रूपये आणि जखमींना 10 लाख रूपये देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
गोवा सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरली आहे, असा अरोपही त्यांनी केला आहे.
देवस्थानचे अध्यक्ष काय म्हणाले?
लैराई देवस्थानाचे अध्यक्ष ॲड. दिनानाथ गावकर यांनीही दुकान आणि उताराचा मुद्दा मान्य केला आहे. ते म्हणाले की, "दुकानं हटवण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सूचना केली आहे. मुख्यमंत्री आणि ग्रामस्थांनी सांगितलेली बाजू योग्य आहे. दुकाने हटवल्यानंतर मंदिराचा आणि खाजगी जागा मालकांचा महसूल बुडेल, पण लोकांचा जीव जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे यावर देवस्थान आणि ग्रामपंचायत आणि मिळून योग्य तो निर्णय पुढच्या वर्षी घेऊ."
तसंच, गावकरांनी आणखी काही मुद्द्यांवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "गावातील हा उतार कमी करावा यासाठी मी ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, मला त्यामध्ये अद्यापही यश आलेलं नाहीये. या प्रकरणी आता तरी योग्य ती कार्यवाही होईल अशी मी अपेक्षा करतो."
लैराई देवस्थानाची ही जत्रा सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील-गोवा सीमेवर असेललं शिरगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गपासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर आहे. या जत्रेच्या काळात लैराई देवीच्या दर्शनासाठी गोवाबरोबरच महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी येत असतात.
या वर्षी जत्रेच्या दिवशीच चेंगराचेंगरीमध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाल्यानं या जत्रेवर दुखाचं सावट पसरलं आहे. या घटनेमुळे लइराई मंदिरातील धर्मिक विधी वगळता सर्व कौल प्रसादाचे कार्यक्रम देवस्थानाने रद्द केले आहेत. त्यामुळे लोकांना या ठिकाणी येऊ नये, असं आवाहन देवस्थानाचे अध्यक्ष अॅड. दिनानाथ गावकर त्यांनी सर्वांना केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)