You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तिरुपती बालाजी मंदिराकडे 10 टन सोन्यासह 2 लाख कोटींची संपत्ती
तिरुमला-तिरुपती देवस्थान ट्रस्टने आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार, या ट्रस्टकडे 10.3 टन सोनं, 5 हजार 300 कोटी रुपये बँकेत जमा आहेत. त्याचसोबत, तिरुमला-तिरुपती देवस्थान ट्रस्टकडे 15 हजार 938 कोटींची रोख रक्कम आहे.
तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला-तिरुपती देवस्थान (टीटीडी) ट्रस्टने श्वेतपत्रिका जारी करत संपत्तीची घोषणा केलीय.
टीटीडीच्या माहितीनुसार, ट्रस्टकडे एकूण 2.26 लाख कोटींची संपत्ती आहे.
2019 मध्ये वेगवेगळ्या बँकेत 13 हजार 25 कोटींच्या एफडी होत्या. यात आता वाढ होऊन ती रक्कम 15 हजार 938 कोटी रुपये झालीय.
म्हणजे गेल्या तीन वर्षांदरम्यान गुंतवणुकीतून 2 हजार 900 कोटी रुपयांचा नफा झालाय.
काही वर्षांपर्वी बीबीसी मराठीनं तिरुपती बालाजी मंदिरात दिल्या जाणाऱ्या प्रवेशाबाबत बातमी केली होती. ती इथे देत आहोत :
तिरुपती बालाजी मंदिरात हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्मीयांना प्रवेश देण्याच्या अटीवरून वाद का?
तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टिटिडी) तिरुपती बालाजी मंदिरात प्रवेशासाठी अन्य धर्मीयांसंबंधीचे नियम बदलले नसल्याचं संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तिरुपती तिरुमाला देवस्थानमचे संस्थापक वाईवी सुब्बा रेड्डी यांनी सांगितले, " जगभरातून हजारो भक्त आहेत ज्यांचा श्रीव्यंकटेश्वर स्वामींवर विश्वास आहे. सर्वसाधारण 80 हजार ते 1 लाख भाविक इथं दर्शनासाठी येतात. त्यात इतर धर्माचे लोकही असतात. एवढ्या सर्व लोकांमध्ये प्रत्येकाकडून 'डिक्लेरेशन ऑफ फेथ अँड बिलिफ म्हणजेच 'श्रद्धा आहे असा जाहीरनामा' प्रत्येकाकडून घेणे शक्य नसल्याचं मी पत्रकारांना सांगितलं."
याचा अर्थ अहिंदूंच्या वर्गीकरणाचा नियम रद्द केला जात आहे असा नसल्याचंही रेड्डी यांनी स्पष्ट केले. या संबंधित सर्व बातम्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
तिरुपती तिरुमालाचा वार्षिक ब्रह्मोत्सवम रविवारपासून (20 सप्टेंबर) सुरू होत आहे. पण हा उत्सव यंदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
नऊ दिवसांच्या ब्रह्मोत्सवात यावेळी कोरोनाच्या साथीमुळे सामान्य लोकांचा सहभाग नसेल.
मंदिराची देखरेख करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी सांगितले. हा सण काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल, पण नेहमीप्रमाणे सर्व परंपरांचे पालन केले जाईल.
23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी भगवान व्यंकटेश्वराला 'पट्टू वास्तुरम' देण्यासाठी मंदिरात पोहोचणार आहेत. ते तिथे 'फेथ फॉर्म' भरतील की नाही, यावरुन आता चर्चा सुरु झाली आहे.
शनिवारी (19 सप्टेंबर) तिरुमला येथे या विषयावर पत्रकारांशी बोलताना टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, "भगवान व्यंकटेश्वरावर विश्वास ठेवणारे सर्व धर्माचे लोक दर्शन घेण्यासाठी येतात."
त्यांच्या या वक्तव्यानंतर तिरुपती मंदिरात आता सर्व धर्माच्या लोकांना सहज प्रवेश करता येणार का ? टीटीडी मंदिर अहिंदूंसाठी असलेले प्रवेशाचे नियम बदलणार आहे का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
हे नियम कोणते आहेत ?
तिरुपतीला येणाऱ्या अन्य धर्मीय भाविकांना, आपण हिंदू धर्माचे नसलो तरी देव वेंकटेश्वर यांच्यावर आपली पूर्ण श्रद्धा आहे असे सांगणारा एक 'फेथ फॉर्म' म्हणजे 'श्रद्धा आहे' असे सांगणारा एक लेखी अर्ज भरुन द्यावा लागतो.
जून 2012 मध्ये विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख होते. पोटनिवडणुकीपूर्वी ते दर्शनासाठी मंदिरात गेले, पण मंदिरात प्रवेश करण्यासाठी लागणारा फेथ फॉर्म त्यांनी भरला नाही आणि वादाला तोंड फुटले.
जगनमोहन रेड्डी यांचा ख्रिस्ती धर्मावर विश्वास आहे.
त्यामुळे टीटीडीने मंदिराचे नियम मोडल्याचा आरोप केला विविध हिंदू धर्म संघटनांनी केला आणि जगनमोहन रेड्डी यांचा निषेध नोंदवला.
याविषयी बोलतना कार्यकारी अधिकारी एलवी सुब्रमण्यम यांनी सांगितले, "2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मंदिराला भेट दिली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी 'फेथ फॉर्म' भरला होता. तेव्हा पुन्हा त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही कारण मंदिरात आल्यावर प्रत्येक वेळी फॉर्म भरणे आवश्यक आहे असा कोणताही नियम नाही."
त्यानंतर 2014 मध्ये राज्यपालांनी मंदिर प्रशासनाला अहिंदूंकडून 'फेथ फॉर्म' घेणे बंधनकारक आहे, अशी सूचना केली.
पण हा वाद इथेच थांबत नाही. पाच वर्षांपूर्वी तिरुपतीला आल्यावर सोनिया गांधींकडून 'फेथ फॉर्म' भरुन घेतला होता का ? असा प्रश्न टीटीडीचे माजी अध्यक्ष करुणाकरन रेड्डी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला.
या विषयावर चर्चा करण्यासाठी 26 जुलै रोजी टीटीडीची बैठक झाली. 'फेथ फॉर्म'मध्ये आपल्या धर्माचा उल्लेख केल्याशिवाय कुणालाही आतमध्ये प्रवेश देता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)