'कानिफनाथ कुण्या एका समाजाचा नाही, तर सगळ्यांचा देव,' मढी गावातील मुस्लीम व्यापारी काय म्हणतात?

"मुस्लीम माणसं फार पूर्वीपासून याठिकाणी पुजेत आहेत आणि नाथांनी कधीही कुणाचाही भेदभाव केलेला नाही."

डॉ. रमाकांत मरकड, नाथ संप्रदायाच्या परंपरेविषयी सांगत होते. डॉ. मरकड हे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आहेत. 10 वर्षं त्यांनी या ट्रस्टचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.

सध्या अहिल्यानगरमधील मढी गाव चर्चेत आहे. मढी गावात कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. दरवर्षी या गावात कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. देशभरातून मोठ्या संख्येनं लोक इथं येतात.

यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावू न देण्याचा ठराव मढी गावच्या ग्रामसभेनं घेतला आहे.

मुस्लीम समाज यात्रेदरम्यान काही परंपरांचं पालन करत नसल्याचं ग्रामसभेनं पारित केलेल्या ठरावात नमूद करण्यात आलंय. मात्र आता गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचं म्हटल्यामुळे हा ठराव रद्दबातल झाला आहे.

"ग्रामसभेतला हा निर्णय काही अभ्यास करुन घेतलेला नाहीये. जुने पेपर्स, कागद यांचा अभ्यास करुनच असा निर्णय घेतला पाहिजे. तसं झालेलं नाहीये," असं डॉ. मरकड म्हणतात.

27 फेब्रुवारीच्या सकाळी आम्ही मढी गावात पोहचलो, तेव्हा मोठ्या संख्येनं लोक कानिफनाथांच्या दर्शनासाठी आल्याचं दिसलं. यात महिला-पुरुष दोन्हींचीही संख्या सारखीच दिसत होती.

या दिवशी अमावस्या असल्यानं गर्दी झाल्याचं स्थानिक लोक सांगत होते.

बंदी घालणारा ठराव रद्द

मढी येथील यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा मढी ग्रामसभेचा ठराव नियमानुसार नसल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

याबाबतचा तपासणी अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

ग्रामसभाच नियमबाह्य ठरल्याने त्यातले ठराव रद्द झाले आहेत. त्या ठरावांची अंमलबजावणी होणार नाही.

'एका समाजावर बहिष्कार घालणं चुकीचं'

गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात आमची भेट मढीचे सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांच्याशी झाली.

ग्रामसभेच्या ठरावाविषयी बोलताना म्हणाले, "कानिफनाथांची यात्रा मार्च महिन्यामध्ये 17 दिवस चालणार आहे. लाखो लोक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेमध्ये मुस्लीम समाजाला, मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घातली आहे. त्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव 22 फेब्रुवारीला पारित केलेला आहे."

पण, असा ठराव का घेतला, या प्रश्नावर ते म्हणाले, "या ठिकाणी येऊन दमदाटी करुन भाविकांची लूटमार करुन, दोन नंबरचे धंदे चालवून, याठिकाणी मांसाहार जर ते (मुसलमान) करत असतील, तर मग आम्ही किती दिवस शांत बसायचं?"

कानिफनाथ मंदिराच्या पायथ्यापाशीच जान मोहम्मद पटेल यांचं पूजेच्या साहित्याचं दुकान आहे. 'साईप्रसाद' असं त्याचं नाव.

ग्रामसभेच्या ठरावाविषयी विचारल्यावर जान पटेल म्हणाले, "पंचायतने जो ठराव घेतलाय तो घटनाबाह्य आहे. मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या पूर्ण समाजातल्या लोकांना तो मान्य नाहीये. एका समाजावर बहिष्कार घालणे किंवा त्यांना बंदी घालणे हा विषय मुळातच चुकीचा आहे."

सरपंचांच्या आक्षेपाविषयी विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, "मुस्लीम समाजाने दोन नंबरचे धंदे केले असते तर त्यांच्यावर पोलिसमध्ये एफआयआर दाखल झाली असती. गुन्हे दाखल झाले असते."

जान मोहम्मद पटेल यांच्या दुकानाशेजारी एक तरुण नारळ विकत होता. यात्रेच्या काळात दररोज 10 लाख लोक इथं येत असल्याचं तो सांगत होता, त्यामुळे इथं मोठा पोलीस बंदोबस्तही राहत असल्याचं तो म्हणाला.

'कानिफनाथ सगळ्यांचा देव'

मढी गावातील कानिफनाथ महाराजांची यात्रा मार्च महिन्यापासून सुरू होत आहे. जवळपास महिनाभर ही यात्रा चालते. देशभरात भटक्यांची पंढरी म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. मढी या गावात मुस्लीम समाजाची 60 ते 70 घरं असून मंदिर परिसरात त्यांनी 9 ते 10 दुकानं आहेत.

त्यापैकी एक दुकान आहे शेख चांद वजीर यांचं. मुस्लिमांना दुकानं लावू न देण्याच्या ग्रामसभेच्या निर्णयविषयी बोलताना ते म्हणाले, "आमच्या पोटापाण्याचा, लेकराबाळाचा प्रश्न आहे. इथं अठरापगड जातीचा धंदा आहे. अठरापगड जातीचे न्याय होतात इथं. ही भटक्याची पंढरी आहे. कानिफनाथ एका समाजाचा देव नाहीये. सगळ्या लोकांचा देव आहे हा. इथं कुणीच येत नाही, असं होत नाही."

आम्ही शेख वजीर यांच्याशी बोलत असतानाच एक तरुण तिथं आला. त्यानं त्याचं हेल्मेट वजीर यांच्या दुकानात ठेवलं होतं. त्यानं ते उचललं आणि निघू लागला.

कशाची गडबड आहे असं विचारल्यावर तो म्हणाला, "अहो मी मुंबईहून दर्शनासाठी आलोय. मोटारसायकलवर आलोय. परत जायचं आहे."

मुस्लिमांच्या दुकानांवर बंदी घालण्याच्या निर्णयाविषयी माहिती आहे का, असं विचारल्यावर तो म्हणाला, "हो मी ते इन्स्टाग्रामवर पाहिलं आहे. बरोबर निर्णय घेतला आहे."

पण, याला विरोधही होत आहे, असं म्हटल्यावर तो म्हणाला, "असं केलं तर काही दिवसांनी ते (मुसलमान) आपल्यावर कब्जा करतील." त्यानंतर तो तिथून तिघून गेला.

'नाथ कुणाशीही भेदभाव करत नाहीत'

मढी गावात पहिल्यांदाच अशाप्रकारचा वाद निर्माण झाला असं नाहीये. मूळात हे देवस्थान कुणाचं यावरुनही वाद झाल्याचं आणि तो न्यायालयात गेल्याचं असल्याचं अभ्यासक सांगतात.

कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. रमाकांत मरकड सांगतात, "पूर्वी मरकड आणि मुस्लीम हे दोन्ही पुजारी इथं होते. जे काही इन्कम येईल त्यातला अर्धा-अर्धा वाटा दोघांना पूर्वीपासून मिळत होता. मुस्लीम माणसं फार पूर्वीपासून याठिकाणी पुजेत आहेत आणि नाथांनी कधीही कुणाचाही भेदभाव केलेला नाही."

डॉ. मरकड पुढे सांगतात, "इथला वाद हाच आहे की ते देवस्थान कुणाचं आहे? हिंदूंचं आहे की मुसलमानांचं आहे? वास्तविक पाहिलं तर मुस्लीम पण त्याला देव म्हणतात. पण त्यांचं नाव वेगळं आहे. शाह रमजान शाह बाबा या नावानं ते ओळखतात. तर आपण हिंदू त्यांना कानिफनाथ महाराज असं म्हणतो."

"देवस्थानाकडे छत्रपतींनी दिलेली सनद आहे. त्या सनदीनुसार, हिंदूंचं देवस्थान असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. त्यानंतर त्या लोकांनी परत तिथं कधी हस्तक्षेप केला नाही," डॉ. मरकड पुढे सांगतात.

मढी गावात पूर्वी जातपंचायती भरवल्या जायच्या, त्यावेळेही वाद होत असतं. कालांतरानं त्यांच्यावर बंदी आली.

'राजकारणासाठी विरोध'

मंदिर परिसरातच एक तरुण दुकानात बसून प्रसाद विकत होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असल्याचं तो म्हणाला.

ग्रामसभेच्या निर्णयावर तो बोलू लागला, "आजूबाजूच्या 4-5 गावांचा पाठिंबा आहे या निर्णयाला. काही जण केवळ त्यांचं राजकारण करायचं म्हणून या निर्णयाला विरोध करत आहेत. 4-5 लाखांचा माल भरुन ठेवलेला असेल त्यांनी (मुस्लिमांनी). आता बरोबर शांत बसतील."

दरम्यान, सरपंच संजय मरकड यांनी हा ठराव मागे घेणार नसल्याचं म्हटलं तर आहे. यात्रेच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहिल, असं त्यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे, हा ठराव रद्द करण्यासाठी गावकऱ्यांसोबत मिळून स्थानिक प्रशासनाशी चर्चा करत असल्याचं आणि कायदेशीर पद्धतीनं याबाबतची लढाई लढणार असल्याचं जान पटेल यांचं म्हणणं आहे.

या ठरावाबाबत स्थानिक प्रशासन चौकशी करत आहे. पाथर्डीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या ठरावाबाबत मढी गावच्या ग्रामसेवकाला नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे. ग्रामसेवकाचा खुलासा प्राप्त झाला असून त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल."

ठरावाचं काय होणार?

मढी ग्रामसभेचा ठराव बेकायदेशीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

ग्रामविकासाचे अभ्यासक डॉ. अशोक सब्बन यांच्या मते, "या यात्रेमध्ये जर कुणी काही बेकायदेशीर कृत्य करत असतील किंवा समाजविघातक कृत्य करत असतील तर मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण कायदेशीर बाजूनं पाहिलं तर ग्रामसभेममध्ये अशाप्रकारचा ठराव होणं योग्य नाही."

मढीच्या यात्रेत मुस्लिमांना बंदी केल्यानंतर देशभरातून अभिनंदनाचे फोन येत असल्याचं सरपंच संजय मरकड म्हणाले. या निर्णयाला पाठिंबा देऊन इतर गावांनाही असाच निर्णय घ्यावा, असं मरकड यांचं मत आहे.

इतर गावांनी असा निर्णय घेतल्यास काय? यावर जान मोहम्मद पटेल म्हणतात, "असं कसं होईल? घटनाबाह्य निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला यांना? राज्यघटना बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे. त्या घटनेच्या आधारावर आपला भारत देश चालतो, महाराष्ट्र चालतो, मढी गाव चालतं, अहिल्यानगर चालतं.

"एका गावासाठी किंवा ठरावीक गावासाठी घटनेच्या बाह्य काम करणं चुकीचा निर्णय होईल, आमच्या दृष्टीनं आणि समाजाच्याही दृष्टीनं."

आता स्थानिक प्रशासन मढी ग्रामसभेच्या ठरावाबाबत काय निर्णय घेतं,ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)