NASA Europa Clipper: गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला निघालंय हे यान

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/SETI Institute
या विश्वामध्ये पृथ्वीबाहेर कुठे जीवसृष्टी आहे का... किंवा जीवसृष्टी तयार होण्याजोगी परिस्थिती तरी आहे का...
गेली अनेक दशकं मानवाला हा प्रश्न पडलाय आणि त्या शोधात काही अंतराळ मोहिमाही गेलेल्या आहेत.
गुरू ग्रहाच्या (Jupiter) युरोपा (Europa) नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर (Europa Clipper) हे अंतराळ यान झेपावलंय.
ही फक्त युरोपावर आयुष्याच्या खुणा शोधणारी ही मोहीम नाही. तर युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे याद्वारे शोधलं जाईल.
पृथ्वीपासून 1.8 अब्ज मैलांचं अंतर पार करत हे यान गुरूच्या युरोपा या चंद्रापर्यंत पोहोचेल. गुरू या ग्रहाला इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनने अधिकृत मान्यता दिलेले तब्बल 95 चंद्र आहेत.
या प्रचंड मोठ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये हजारो लहान गोष्टी आहेत. या 95 चंद्रांपैकी सगळ्यात मोठे 4 चंद्र हे आपल्या पृथ्वीच्या चंद्रानंतर शोध लागलेले दुसऱ्या ग्रहांचे चंद्र होते.
1610 मध्ये इटालियन खगोलज्ञ गॅलिलिओ गॅलिलीने यांचा पहिल्यांदा शोध लावल्याने त्यांना गॅलिलिअन सॅटेलाईट्स म्हटलं जातं.
गुरूच्या चार मोठ्या चंद्रांची नावं - गॅनिमिड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा. (Ganymede, Callisto, Io, and Europa)
नासाने लाँच केलेलं युरोपा क्लिपर यान 2030 साली तिथे पोहोचेल.
या युरोपाच्या पृष्ठभागाखाली प्रचंड मोठा समुद्र असून हे प्रमाण पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या दुप्पट असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
गुरूचा चंद्र असणारा युरोपा कसा आहे?
पृथ्वीपासून 62.8 कोटी किलोमीटर्सच्या अंतरावर असणारा हा युरोपा, आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडासाच मोठा आहे. पण जर हा युरोपा आपल्या आकाशात असता, तर आपल्या चंद्राच्या तुलनेत पाचपट अधिक मोठा दिसला असता. कारण त्यावर गोठलेल्या स्वरूपातलं इतकं पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक सूर्यप्रकाश परावर्तित झाला असता.
या युरोपाचं बर्फाळ कवच सुमारे 25 किलोमीटर जाडीचं आहे. आणि या कवचाखाली खाऱ्या पाण्याचा मोठा समुद्र असण्याचा अंदाज आहे. शिवाय इथे अशीही काही रसायनं असू शकतात जी जीवसृष्टी निपजण्यासाठी गरजेची असतात.

फोटो स्रोत, NASA
युरोपावर कदाचित जीवसृष्टीसाठी पोषक असू शकतो, हे संशोधकांच्या लक्षात आलं 1970च्या दशकात. अॅरिझोनातून या युरोपा चंद्रांचं निरीक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांना गोठलेलं पाणी दिसलं.
सौरमाला ओलांडून पलिकडे गेलेल्या नासाच्या मोहीमा - व्हॉएजर 1 आणि 2 यांनी या युरोपाचे अगदी जवळून फोटो काढले.
त्यानंतर 1995 मध्ये जेव्हा नासाचं गॅलिलिओ यान युरोपाच्या जवळून गेलं तेव्हा या यानाने क्लिक केलेले फोटो संशोधकांना बुचकळ्यात टाकणारे होते.
कारण या फोटोमध्ये दिसणाऱ्या पृष्ठभागावर गडद, लालसर - तपकिरी रंगाचे तडे होते. या भेगांमध्ये Salts म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी जीवसृष्टीसाठी पोषक ठरणारी रसायनं असण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, NASA/JPL/DLR
यानंतर हबल दुर्बिणीने युरोपाचे फोटो काढले आहेत. यामध्ये दिसणारा धूर म्हणजे या चंद्राच्या पृष्ठभागावरून साधारण 160 किलोमीटर पर्यंत वर गेलेला पाण्याचा फवारा असण्याची शक्यता आहे.
पण यापैकी कोणतीच मोहीम युरोपाच्या इतकी जवळ गेली नाही ज्याद्वारे या गोष्टींचा सखल अभ्यास करता येईल.
त्यामुळेच आता नासाच्या या क्लिपर यानावरच्या उपकरणांच्या मदतीने संपूर्ण युरोपा चंद्राची पाहणी करता येईल, इथल्या धुळीचे कण गोळा करता येतील आणि या पाण्याच्या तुषारांमधूनही जाता येईल अशी संशोधकांना आशा आहे.
युरोपा क्लिपर यान कसं आहे?
नासाने कोणत्याही प्लॅनेटरी मिशनसाठी उभारलेल्या आजवरच्या यानांच्या तुलनेत युरोपा क्लिपर हे सर्वात मोठं अंतराळयान आहे.

याचं वजन आहे 13,000 पाऊंड म्हणजे 6.5 टन. म्हणजे एखाद्या पूर्व वाढ झालेल्या आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढं. आणि यानाच्या सोलर पॅनलची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची लांबी आहे 30 मीटर्स...म्हणजे तुलना करायची झाल्यास मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया 26 मीटर उंच आहे... किंवा 10 मजली इमारती इतकी या सोलर पॅनल्सची उंची आहे.
लाँचपासून गुरूपर्यंतच पोहोचायला या यानाला साडेपाच वर्षं लागणार आहेत आणि इतकं इंधन सोबत घेऊन जाणं अर्थातच शक्य नाही. या प्रवासादरम्यान हे यान मंगळाजवळून जाईल आणि पृथ्वीलाही प्रदक्षिणा घालेल आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करत गुरूच्या दिशेने प्रवास सुरू करेल... म्हणजे गोफण फिरवून ज्या प्रमाणे दगड फेकला जातो, त्याप्रमाणे. याला म्हणतात Slingshot Process.

याच प्रक्रियेमुळे हे युरोपा क्लिपर यान वर्षभरापूर्वी लाँच झालेल्या याच दिशेने जाणाऱ्या युरोपियन मिशनलाही मागे टाकेल.
वर्षभरापूर्वी युरोपियन स्पेस एजन्सीने लाँच केलेलं JUICE मिशन हे गुरूचा दुसरा एक ग्रह - गॅनिमिडच्या दिशेने प्रवास करतंय.
2030 मध्ये युरोपा चंद्राच्या जवळ पोहोचल्यानंतर या क्लिपर यानाची इंजिन्स पुन्हा सुरू होतील आणि हे यान स्वतःला काळजीपूर्वकपणे योग्य कक्षेमध्ये नेईल.
या स्पेसक्राफ्टमध्ये 9 इन्स्ट्रुमेंट्स आणि ग्रॅव्हिटी सायन्स इन्व्हेस्टिगेशन आहे. यातल्या 5 उपकरणांना रिमोट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतात. कारण ती युरोपाच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेला प्रकाश शोधतील. एखाद्या कॅमेरा वा स्पेक्ट्रोमीटरप्रमाणे. इतर चार उपकरणं त्यांच्या भोवतीच्या वातावरणाचा अभ्यास आणि मोजमाप करतील. म्हणजे युरोपावरील गॅसेसचे वास नोंदणं किंवा धुळीची नोंद करणं.
पण उपकरणांच्या मदतीने अभ्यास करण्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान असेल तर किरणोत्सर्गाचं (Radiation).
गुरू ग्रहाभोवतीचं रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्गाचं प्रमाण भयानक आहे. आणि युरोपा याच पट्ट्यात आहे. याच रेडिएशनपासून सुरक्षित राहण्यासाठी हे यान गुरू ग्रहाला घिरट्या घालेल आणि त्या दरम्यान युरोपाचा अभ्यास करेल. शिवाय किरणोत्सर्गापासून उपकरणांचं नुकसान होऊ नये म्हणून कंम्प्युटर आणि इतर गोष्टी अॅल्युमिनियमच्या एका व्हॉल्टमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
हे यान युरोपाजवळून साधारण 50 वेळा जाईल, आणि प्रत्येक वेळी त्याला 10 लाख एक्स-रेंच्या तीव्रतेच्या रेडिएशनला सामोरं जावं लागेल.
हा शोध महत्त्वाचा का आहे?
ओपन युनिव्हर्सिटीमधले प्लॅनेटरी मायक्रोबायोलॉजिस्ट मार्क फॉक्स - पॉवेल सांगतात, "समजा सूर्यापासून इतकं दूर आपल्याला काही सापडलंच, तर त्याचा अर्थ पृथ्वीपेक्षा वेगळ्या अशा जीवसृष्टीचं अस्तित्त्वं आहे. आणि हे प्रचंड मोठं असेल कारण जर हे आपल्याच सौरमालेत दोन वेळा घडलं असेल, तर याचा अर्थ जीवसृष्टीचं इतरत्र अस्तित्वंही असण्याची शक्यता आहे."
युरोपावर आयुष्य तग धरण्याजोगी स्थिती आहे का, हे शोधण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ उत्सुक आहेत. पण तिथे माणसांसारखे प्राणी असण्याची शक्यता मात्र त्यांना वाटत नाही.
लंडनमधल्या इंपिरियल कॉलेजचे स्पेस फिजिक्सच्या प्राध्यापक मिशेल डॉगर्टी म्हणतात, "तिथे राहण्याजोगी परिस्थिती आहे का हे आम्ही शोधतोय. आणि यासाठी चार गोष्टी आवश्यक असतात - द्रव स्थितीतलं पाणी, उष्णतेचा स्त्रोत आणि काही नैसर्गिक गोष्टी (organic material). शेवटची गोष्ट म्हणजे या तीन गोष्टी या दीर्घ कालावधीसाठी अस्तित्त्वात असल्या तरच काही घडू शकतं."
सध्याच्या मोहीमेद्वारे युरोपाच्या बर्फाळ पृष्ठभागाचा नीट अभ्यास करता आला, तर भविष्यातल्या मोहीमा कुठे उतरवता येतील हे संशोधकांना ठरवता येईल.











