ओट्यावर बसण्याच्या वादातून डिझेल टाकून शेजाऱ्यांनी पेटवले; काय आहे प्रकरण?

(सूचना : या लेखातील काही माहिती विचलित करू शकते.)

गुजरातमध्ये दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाला आहे. या प्रकरणात कच्छच्या गांधीधाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

गांधीधाम शहरातील सेक्टर-14मध्ये असणाऱ्या रोटरी नगर परिसरात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 23 जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी या प्रकरणातील चार आरोपींचा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या करसन माहेश्वरी यांच्याशी वाद झाला. यापूर्वी घराबाहेरील ओट्यावर बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून या चौघांनी करसन माहेश्वरी यांना मारहाण केली आणि त्यांच्यावर डिझेल ओतून पेटवून दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, मृत करसन माहेश्वरी यांचे भाऊ हीरा माहेश्वरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गांधीधाम बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता–2023 अंतर्गत कलम 103 (1), 115 (2), 332 (A) आणि 54 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 जानेवारी रोजी 46 वर्षांचे करसन माहेश्वरी यांचा भूजच्या सार्वजनिक रुग्णालयात म्हणजेच जीके जनरल हॉस्पिटलमध्ये गंभीर भाजल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणात प्रेमिला नरेश मातंग आणि अजीबेन हरेश मातंग या दोन महिला आरोपींना, तसेच चिमणाराम गोमाराम मारवाडी नावाच्या एका पुरुष आरोपीला अटक केली आहे.

मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार, आणखी एक आरोपी मंजू लाहिरी माहेश्वरी हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

घटनेची माहिती देताना, अंजारचे पोलीस उपअधीक्षक मुकेश चौधरी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये याआधी घराबाहेरील ओट्यावर बसण्यावरून वाद झाला होता. तोच राग मनात ठेवून या चार आरोपींनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली.

पोलिसांनी पुढे सांगितले की, "करसनभाई बाथरूमला जात असताना त्यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्यात आलं."

या घटनेनंतर, करसनभाईंना ताबडतोब स्थानिक जी. के. जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत व्यक्तीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

या घटनेच्या साक्षीदार आणि करसनभाईंच्या शेजारी राहणाऱ्या चंदना यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, "अचानक आवाज ऐकू आल्याने मी बाहेर आले आणि बघितलं की एक महिला आणि दोन मुलं त्यांना (करसन यांना) मारहाण करत होते. मारहाण झाल्यानंतर ती मुलं लगेच घरी निघून गेली."

करसनभाईंचे भाऊ हीराभाई म्हणाले, "माझ्या भावाला मारहाण करण्यात आली. माझ्या आईला नीट दिसत नाही, तरीही तिला मारहाण करून ढकलण्यात आले, त्यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली. माझा भाऊ तर गेला, त्याला ठार मारण्यात आलं."

"माझ्या भावाला खूप मारहाण झाली आहे. त्याला मारहाण करणारे चार लोक आहेत. मी दुसरीकडे राहतो. मला बातमी मिळाली म्हणून मी इथे आलो."

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, आरोपीने करसन यांच्यावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिलं यामुळे ते गंभीररीत्या भाजले होते.

त्यांना उपचारांसाठी हलवण्यात आलं आणि तिथेच मृत्यूपूर्वी करसन माहेश्वरी यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला. त्याच जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील कारवाई दिला केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.