You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
करीम लाला: मुंबईचा पहिला डॉन ज्यानं दाऊद जन्मल्यावर दिली होती मेजवानी आणि नंतर झाला त्याचा हाडवैरी
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी न्यूज
करीम 1936 मध्ये अफगाणिस्तानातून मुंबईत आला होता. अर्थातच तो एक अफगाण होता. त्याच्या आयुष्याची कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेहूनही अधिक रंजक आहे. करीमनं मुंबईत आल्यावर गोदीवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
ही 1940 च्या दशकाच्या शेवटची घटना आहे. एक दिवस करीम त्यांच्या अफगाण मित्रांबरोबर बसलेला होता. त्यावेळेस मलाबारींच्या एका टोळीप्रमुखानं त्यांच्याकडे काम करण्याच्या बदल्यात हफ्त्याची मागणी केली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी 'व्हेन इट ऑल बिगॅन' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "करीम पुढे आला आणि मलाबारींना म्हणाला, आम्ही मेहनत करतो. तुम्ही मेहनत करता. आपल्यात काहीही फरक नाही. आम्ही पैसे देणार नाही. आतापासून ही वसूली बंद!"
मारिया यांनी या घटनेचा रंजक तपशील दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे, "मलाबारीनं करीमवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमध्ये कोणतीच बरोबरी नव्हती. करीमनं त्याची जोरदार धुलाई केली. तोपर्यंत करीमचे इतर पठाण मित्रदेखील तिथे आले. ते पाहताच मलाबारी कुलींची ती टोळी तिथून पळून गेली. तेव्हापासून करीम खान पठाणचा 'करीम लाला' झाला."
काही वर्षांमध्येच करीमनं गोदीतून सामान चोरून बाजारात विकण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे पैसे येऊ लागल्यानंतर त्यानं व्याजानं पैसे देण्यास सुरुवात केली.
व्याजानं पैसे देण्याच्या धंद्याचा विस्तार
जुगारात हारणारे लोक त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू विकत घेण्यासाठी करीमकडून व्याजानं पैसे घेत असत. करीमनं नियम बनवला होता की दर महिन्याच्या 10 तारखेला त्याच्याकडून घेण्यात आलेल्या पैशांचं व्याज देण्यात आलं पाहिजे.
त्याचा परिणाम असा झाला की दर महिन्याच्या 10 तारखेला त्याच्याकडे भरपूर पैसे जमा होऊ लागले. व्याजानं पैसे देण्याव्यतिरिक्त त्यानं लोकांची भांडणं सोडवणं आणि भाडेकरूंकडून जबरदस्तीनं खोली रिकामी करून देण्याचं कामदेखील सुरू केलं होतं.
करीम, 1950 च्या दशकात दर रविवारी त्याच्या घराच्या गच्चीत लोकांचे वाद मिटवण्यासाठी दरबार भरवायचा. लवकरच दक्षिण मुंबईतील घराघरांत करीम लालाचं नाव पोहोचलं होतं.
शीला रावल यांनी 'गॉडफादर्स ऑफ क्राईम' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "करीम लाला एका चांगल्या आयुष्याच्या शोधात मुंबईत आला होता. तो शिकलेला नव्हता. त्यामुळे त्यानं सुरुवातीला श्रीमंत व्यापारी आणि कापड उद्योगपतींसाठी काम करण्यास सुरुवात केली होती."
"हे व्यापारी, उद्योगपती पैशांची वसूली करण्यासाठी करीम लालाची मदत घेत असत. इथूनच पठाण गँगची सुरुवात झाली होती."
काळ आणि परिस्थितीनुसार, करीमनं बेकायदेशीर दारूचा धंदा, जुगार, वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये देखील हातपाय पसरवण्यास सुरुवात केली होती.
गरीब, बेरोजगार आणि मुस्लीम तरुणांसाठी तो हळूहळू गॉडफादर बनला.
वॉकिंग स्टिकची कमाल
तो हळूहळू इतका कुख्यात झाला की फक्त त्याचं नाव घेताच भाडेकरू घर रिकामं करून देत असत.
एस. हुसैन झैदी यांनी 'डोंगरी टू दुबई, सिक्स डेकेड्स ऑफ द मुंबई माफिया' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे,
"घरमालकानं फक्त असं म्हणताच की 'आता तर 'लाला'ला बोलवावं लागेल', भाडेकरू घर रिकामं करत असत. करीमनं पठाणी पोशाख घालणं सोडून पांढऱ्या रंगाचा सफारी सूट घालण्यास सुरुवात केली होती."
"त्याला काळ्या रंगाचा गॉगल घालायला आवडायचं. तसंच तो अनेकदा महागडे सिगार आणि पाईप पिताना दिसायचा."
त्याच्या 50 व्या वाढदिवशी कोणीतरी त्याला एक महागडी वॉकिंग स्टिक भेट म्हणून दिली होती. त्याला ही भेटवस्तू आवडली नव्हती. त्याचं म्हणणं होतं की तो अजूनही शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. त्याला चालण्यासाठी कोणत्याही काठीची आवश्यकता नाही.
मात्र त्याचे साथीदार त्याला म्हणाले की या स्टिकमुळे त्याचं व्यक्तिमत्व आणखी रुबाबदार दिसेल. त्यानंतर त्यानं ती स्टिक ठेवून घेतली होती. त्यानंतर तर ती स्टिक करीम लालासाठी पर्याय बनली होती.
झैदी लिहितात, "मशिदीत तो जर त्याची स्टिक सोडून वजू करण्यासाठी जरी गेला, तरीदेखील मशिदीत गर्दी असूनदेखील कोणाची त्याच्या जागी बसण्याची हिंमत होत नसे."
करीम बनला पठाणांचा नेता
हळूहळू त्याचे साथीदार त्याच्या छडीचा इतरही वापर करू लागले होते. करीम लालाच्या मागे जेव्हा पोलीस आणि सीआयडीचा ससेमिरा वाढू लागला, तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्याला सल्ला दिला की घर रिकामं करवून घेण्यासाठी त्यानं स्वत: जाऊ नये आणि त्याच्या माणसांनादेखील पाठवू नये.
हुसैन झैदी यांनी लिहिलं आहे, "तो सल्ला ऐकून करीम लाला म्हणाला, मग घर रिकामं कोण करवून घेणार? त्यावर त्याचे साथीदार म्हणाले, 'आमच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आहे. यामुळे आपलं कामही होईल आणि आपण अडचणीतही येणार नाही'."
"त्यानंतर जेव्हा कोणतंही घर रिकामं करवून घ्यायचं असायचं, तेव्हा लालाची माणसं त्या जागी करीम लालाची छडी सोडून यायचे. भाडेकरू ती छडी पाहताच, लगेचच घर रिकामं करत असत. त्यापूर्वी मुंबईत कोणत्याही गँगस्टरचा इतका दबदबा आणि प्रभाव नव्हता."
घर किंवा जमीन रिकामी करवून घेण्याचे करीम लालाचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक किस्सा प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांचं घर रिकामं करून घेण्याचाही आहे.
गफ्फार खान यांचा प्रभाव
अब्दुल करीम खान उर्फ करीम लालाचा जन्म 1911 मध्ये अफगाणिस्तानातील कुनड प्रांतात झाला होता. तो जवळपास 7 फूट उंच होता.
त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यावर सरहद्द गांधी म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान यांचा खूप प्रभाव होता.
पेशावरमधील किस्साख्वानी बाजारात 23 एप्रिल 1930 ला जेव्हा सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गफ्फार खान यांच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तेव्हा करीम तिथे होता.
तो 1936 साली कोलकात्याहून (तेव्हाचं कलकत्ता) मुंबईला इंपीरियल इंडियन मेल या ट्रेननं आला होता. देशाची फाळणी झाल्यानंतर अनेक पठाणांनी भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. अशाच लोकांमध्ये करीमदेखील होता.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परदेशी लोकांची नोंदणी आणि त्यांच्या परमिटचं नूतनीकरण करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक कार्यालय असायचं. या कार्यालयात एक पठाण शाखादेखील होती.
करीम लाला 1950 च्या दशकात अनेकदा या शाखेत जाऊ लागला. पठाणांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात तो मदत करू लागला.
लवकरच मुंबईत राहणारे पठाण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करीम लालाकडे येऊ लागले. करीम, बेरोजगारीपासून ते त्यांच्या आर्थिक बाबींपर्यंत आणि इतकंच त्यांच्या कौटुंबिक बाबींमध्येही हस्तक्षेप करू लागला.
करीम लाला आणि हाजी मस्तान यांची भागीदारी
हळूहळू करीम लालाचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डचा आणखी एक कुख्यात व्यक्ती, हाजी मस्तानपर्यंत पोहोचू लागलं होतं.
हाजी मस्तानला अशा एका माणसाची गरज होती, जो त्याची गुंतागुंतीची काम पार पाडेल. ते 1970 चं दशक होतं. हाजी मस्ताननं करीम लालाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
हुसैन झैदी लिहितात, "ग्रँट रोड मशिदीत शुक्रवारची नमाज झाल्यानंतर या दोघांची भेट झाली. त्यानंतर करीम, हाजी मस्तानला त्याच्या (करीमच्या) ताहेर मंजिल या घरी घेऊन गेला. मस्तान करीमला म्हणाला, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या गोदीवर माझा बराच माल उतरतो."
"मला तो उतरवून घेऊन गोदामात ठेवायचा असतो. त्यानंतर तो माल बाहेर पाठवायचा असतो. माझी इच्छा आहे की जोपर्यंत माझा माल बाजारात विकला जात नाही, तोपर्यंत तुझ्या माणसांनी त्याचं रक्षण करावं."
करीम लालानं हाजी मस्तानला विचारलं, 'या सर्व प्रकारात काही हिंसा होण्याची शक्यता आहे का?' त्यावर मस्तान हसून म्हणाला, "खानसाहेब, जर तुमची माणसं आजूबाजूला असतील तर आपल्या जवळपास येण्याची कोणाची हिंमत होणार नाही."
अशाप्रकारे मुंबईच्या अंडरवर्ल्डची एक खूप मोठी डील झाली. त्याचबरोबर करीम लालाचा समावेश मुंबईतील मोठ्या डॉन्सच्या गटामध्ये झाला.
पठाण गँगची सुरुवात
करीम लाला मुंबईचा डॉन होण्याच्या दिशेनं पाऊल टाकत होता. त्यावेळेस त्याच्या गँगमधील लोकांची संख्या वाढत चालली होती.
त्याच्या गँगमध्ये होता माजिद दिवाना. त्याचा आणखी एक साथीदार होता, नवाब खान. तो आधी गोदीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.
नंतर करीमनं त्याला इस्रायली मोहल्ल्यातील दारूच्या अड्ड्यांची जबाबदारी दिली होती. करीम लालाचा आणखी एक विश्वासू साथीदार होता, नासिर खान. त्याला 'सफेद हाथी' म्हटलं जायचं. कारण तो रंगानं गोरा होता आणि त्याचं शरीर हत्तीसारखं भरभक्कम होतं.
करीमच्या गँगमध्ये हीरो लाला, बशरीन मामा, करम खान आणि लाल खान हेदेखील होते. हे सर्वजण कसलाही विचार न करता करीम लालासाठी त्यांचा जीव देण्यासाठी देखील तयार असायचे.
या लोकांनी मिळूनच मुंबईतील कुख्यात पठाण गँगचा पाया घातला होता. अशाप्रकारे, कुनड या अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागातील हा तरुण हजारो मैल दूर अंतरावर असलेल्या मुंबईत स्थिरावलाच नाही तर, तो या महानगराचा एकप्रकारे पहिला 'डॉन'देखील बनला होता.
करीम आणि इंदिरा गांधींची भेट
करीम लालाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी एक फोटो खूप व्हायरल झाला. त्यात करीम इंदिरा गांधींशी बोलताना दिसतो आहे.
या फोटोमध्ये त्याच्यासोबत पद्मभूषण पुरस्कारविजेते कलाकार हरींद्रनाथ चट्टोपाध्यायसुद्धा दिसतात. चट्टोपाध्याय स्वांतत्र्यसैनिक सरोजिनी नायडूंचे भाऊ होते.
नंतर बलजीत परमार या पत्रकारानं लिहिलं होतं, "करीम लालानंच त्यांना (चट्टोपाध्याय यांना) सांगितलं होतं की तो कधीही राष्ट्रपती भवनात गेलेला नाही. त्यामुळे 1973 मध्ये जेव्हा हरींद्रनाथ यांना पद्म पुरस्कार मिळाला, तेव्हा करीमनं त्यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात जाण्याची इच्छा व्यक्त केली."
"तिथे हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी तो मुंबईतील पठाणांचा नेता असल्याचं सांगून इंदिरा गांधींशी त्याची भेट घालून दिली होती."
करीम लाला आणि इंदिरा गांधींची ती पहिली आणि शेवटची भेट होती.
दाऊदचे वडील इब्राहिम यांच्याशी करीम लालाची मैत्री
आणीबाणीच्या काळात, 1975 ते 1977 दरम्यान, हाजी मस्तान, युसूफ पटेल आणि सुकुर नारायण बखिया यांना तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळेस करीम लालाला मात्र हात लावण्यात आला नव्हता.
मात्र नंतर इतर काही प्रकरणांमध्ये त्याला अटक झाली होती.
मुंबईत फक्त एकाच पोलीस कर्मचाऱ्याबद्दल करीम लालाच्या मनात आदर होता. ते होते हवालदार इब्राहिम कासकर. ते माफिया डॉन दाऊद इब्राहिमचे वडील होते.
इब्राहिम कासकर यांनी करीमकडे कधीही पैसे मागितले नाहीत आणि कधी त्याची खुशामतदेखील केली नाही. इब्राहिम कासकर यांनी त्यांच्या 75 रुपयांच्या पगारातच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांनी करीमकडून कधीही एक पैसाही घेतला नाही. वास्तविक करीम लाला मुंबई पोलीस दलातील अनेकजणांचे खिसे भरत होता.
करीम, इब्राहिम यांना नेहमीच 'इब्राहिम भाई' म्हणायचा. वास्तविक इब्राहिम त्याच्यापेक्षा 10 वर्षे लहान होते.
राकेश मारिया यांनी लिहिलं आहे, "करीमच्या मनात इब्राहिम यांच्याबद्दल आदर होता. कारण ते भ्रष्ट नव्हते. दाऊदचा जन्म झाला तेव्हा इब्राहिम यांच्याकडे मेजवानी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस करीम लालानं इब्राहिमच्या वतीनं मुलगा होण्याच्या आनंदात मेजवानी दिली होती. त्यासाठी इब्राहिम करीम लालाला नकार देऊ शकले नव्हते."
दाऊदच्या जन्माच्या मेजवानी 1955 च्या डिसेंबर महिन्यात झाली होती. मात्र 1980 येईपर्यंत मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊद इब्राहिमचे हातपाय पसरत गेले. करीम लाला आणि त्याच्यातील अंतरदेखील वाढत गेलं. दोघेही एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांचे शत्रू झाले.
दाऊद आणि पठाण गँगमध्ये 1980 च्या दशकाच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये हत्यांचं जे सत्र सुरू झालं, ते थांबायचं नावच घेत नव्हतं. दाऊदनं त्याचा भाऊ शब्बीरला गमावलं. तर करीम लालानं देखील त्याचा भाऊ रहीम लाला गमावला होता.
या गँगवॉरनंतर दाऊद इब्राहिमनं मुंबई सोडली आणि दुबईत त्याचा अड्डा बनवला.
कमी झाला करीम लालाचा प्रभाव
करीम लालाचा मुंबईतील दबदबा 1980 च्या दशकाचा मध्य येईपर्यंत कमी होऊ लागला होता. करीम लाला असं म्हणू लागला होता की तो आता निवृत्त झाला आहे. तो आता एक सामाजिक कार्यकर्ता आणि मुंबईत राहणाऱ्या अफगाण लोकांचा नेता राहिला आहे.
ही बाब वेगळी आहे की त्याची माणसं नेहमीच दावा करत राहिले की डोंगरीमध्ये एक खिसादेखील करीम लालाच्या माहितीशिवाय कापला जात नाही.
पठाण गँगच्या तरुण लोकांना हिंसा करण्यापासून आणि हिंसेचे उत्तर देण्यापासून रोखण्यात अपयशी ठरल्यावर करीम लालाला बाजूला होणं अधिक योग्य वाटलं. त्यानंतर पठाण गँगचं नेतृत्व त्याचा पुतण्या समद खान याच्याकडे गेलं.
राकेश मारिया लिहितात, "करीम लालानं स्वत:च्या भूतकाळापासून वेगळं होण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तो एका अशा संस्कृतीमधून आला होता, जिथे विरोधकासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवणं, सन्मानाच्या विरोधातील मानलं जात असे."
"मात्र असं असूनही त्यानं दाऊद इब्राहिमबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सप्टेंबर 1987 मध्ये खास मक्का इथं जाऊन दाऊदची भेट घेतली. करीमनं डोळ्यातील अश्रूंसह दाऊदची गळाभेट घेतली. त्यानं दोन्ही बाजूंना समजावलं की खूप रक्त सांडलं आहे. आता मला शांततेनं मरू द्या."
वयाच्या 90 व्या वर्षी मृत्यू
जस जसं वय वाढत गेलं, तसतशा करीम लालाच्या वैयक्तिक गरजा कमी होऊ लागल्या. एकेकाळी रस्त्यावर खाटीवर बसून लोकांचे वाद सोडवणाऱ्या करीमचा साधं जीवन जगण्यावर विश्वास होता.
त्याच्याकडे पैसा येत गेल्यावर त्यानं देशी दारूच्या ऐवजी महागडी स्कॉच व्हिस्की पिण्यास सुरुवात केली. मात्र शेवटच्या काळात त्यानं मद्यपान देखील बंद केलं होतं.
करीमप्रमाणे कमाई असलेले इतर डॉन अलिशान घरांमध्ये राहत असत. मात्र करीम लाला शेवटपर्यंत नॉव्हेल्टी सिनेमाच्या मागे असलेल्या त्याच्या जुन्या घरातच राहिला.
मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या या पहिल्या डॉननं 18 फेब्रुवारी 2002 ला वयाच्या 90 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
कोणताही चाकू, गोळी, सूड किंवा कारस्थानातून त्याचा शेवटचा झाला नाही. त्याच्या छातीत अचानक कळ आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.