You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्रिप्टो गुन्हेगारांनी जुन्याच युक्त्या वापरून अंदाजे 65 हजार कोटी रुपये कसे लुटले?
- Author, जो टायडी,
- Role, वर्ल्ड सर्व्हिस सायबर करस्पाँडंट, बीबीसी
एकूण क्रिप्टो करन्सीच्या चोरींपैकी 20 टक्के मुल्यांचे टोकन्स म्हणजे तब्बल 713 दशलक्ष डॉलर्स ( अंदाजे 65 हजार कोटी रुपये) हे हॅकिंग किंवा डिजिटल स्कॅमिंगमधून झाले आहेत. हे स्कॅम कसे झाले?
क्रिप्टोकरन्सी चोरी ही फक्त आर्थिक फसवणूक नाही, ते तर ती मानसिक वेदनाही देते. सर्व व्यवहार 'ब्लॉकचेन' नावाच्या डिजिटल लेजरवर रेकॉर्ड केले जातात, त्यामुळे जरी एखाद्याने तुमचे पैसे चोरून स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये ठेवले, तरी ते ऑनलाईन कोणालाही दिसू शकतात.
क्रिप्टोकरन्सी लुटारुंमुळे सुमारे 3 लाख 15 हजार डॉलर्स (अंदाजे 2.8 कोटी रुपये) गमवावे लागलेल्या हेलनने सांगितलं, "तुम्हाला तुमचे पैसे तिथे सार्वजनिक ब्लॉकचेनवर दिसू शकतात, पण ते परत मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही."
ती या प्रसंगाची तुलना एका अशा घटनेशी करते, जणू एखादा चोर एका पार करता न येणाऱ्या दरीच्या पलीकडे तुमच्या मौल्यवान वस्तूंचा ढीग लावून बसला आहे आणि तुम्ही फक्त ते पाहत आहात.
गेल्या 7 वर्षांपासून ब्रिटनचे रहिवासी असलेले हेलन आणि तिचे पती रिचर्ड (हे त्यांचे खरे नाव नाही), 'कार्डानो' नावाचे क्रिप्टो कॉइन्स विकत घेऊन साठवत होते.
त्यांना अशा डिजिटल मालमत्तेत गुंतवणूक करण्याची कल्पना आवडली होती ज्याची किंमत इतर पारंपारिक बचत मार्गांच्या तुलनेत वेगानं वाढण्याची शक्यता होती. हे अधिक जोखमीचे आहे हे त्यांना माहीत होते, परंतु त्यांनी त्यांच्या डिजिटल कीज सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतली होती.
परंतु तरीही हॅकर्सनी त्यांच्या क्लाउड स्टोरेज अकाउंटमध्ये प्रवेश मिळवला, जिथे त्यांनी त्यांच्या क्रिप्टो वॉलेट्सची माहिती आणि त्यात प्रवेश कसा करायचा याची माहिती ठेवली होती.
फेब्रुवारी 2024 मध्ये, एका छोट्या टेस्ट ट्रान्सफरनंतर गुन्हेगारांनी एका वेगवान आणि गुप्त सायबर हल्ल्यात या जोडप्याचे सर्व कॉइन्स त्यांच्या स्वतःच्या डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले.
त्यानंतर अनेक महिने हे जोडपे आपले पैसे एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये हलवले जात असल्याचे हताशपणे पाहत राहिले, पण ते काहीही करू शकले नाहीत. (क्रिप्टोकरन्सीमधील एक अंगभूत विरोधाभास असा आहे की, सर्व व्यवहार सार्वजनिकरीत्या ट्रॅक करता येतात, परंतु वापरकर्त्यांनी तसे निवडल्यास त्यांची ओळख मात्र पूर्णपणे गुप्त राहू शकते.)
हेलन आणि रिचर्ड श्रीमंत नाहीत. ती एक पर्सनल असिस्टंट आहे, तर तो एक संगीतकार आहे आणि त्यांच्या 'कार्डानो' गुंतवणुकीकडून त्यांना खूप आशा होत्या.
आम्ही खूप काळापासून हे कॉइन्स विकत घेत होतो. आम्हाला जिथून शक्य होईल तिथून पैसे वाचवून आम्ही गुंतवणूक करत होतो, माझ्या आई-वडिलांच्या निधनानंतर, ही चोरी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना आहे." असं रिचर्ड सांगतात.
तेव्हापासून हेलन त्यांचे पैसे परत मिळवण्याच्या मोहिमेवर आहे. तिने विविध पोलीस दलांकडून आणि कार्डानो डेव्हलपर्सकडून सविस्तर अहवाल मिळवले आहेत. आता, तिच्याकडे गुन्हेगारांच्या वॉलेटचा पत्ता असूनही त्यांची ओळख पटवण्यासाठी कोणीही काहीही करू शकत नाही.
हॅकर्सचा शोध घेण्यासाठी खासगी इन्व्हेस्टिगेटर्सची मदत घेता येईल, इतके पैसे साठवण्याचा त्यांचा विचार आहे.
"यामुळे तुमच्या मनात हतबलतेची भावना निर्माण होते," ती म्हणते, "पण मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे."
क्रिप्टो गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ
ऑगस्ट 2024 मध्ये फायनान्शियल कंडक्ट अथॉरिटीसाठी (FCA) केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अंदाजे 12 टक्के ब्रिटिश प्रौढ व्यक्तींकडे (अंदाजे 70 लाख लोक) क्रिप्टो-मालमत्ता आहे.
"जागतिक स्तरावर, आता 56 कोटी लोक क्रिप्टोचे मालक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु, जशी मालकी वाढली, तशीच चोरीही वाढली. कोरोना महामारीच्या काळानंतर क्रिप्टो कॉइन्सच्या मूल्यात मोठी वाढ झाली आणि त्यासोबतच या उद्योगावरील सायबर हल्ल्यांचाही प्रचंड उद्रेक झाला."
"ब्लॉकचेन विश्लेषण संस्था 'चेनालिसिस'मधील इन्व्हेस्टिगेटर्सच्यामते, 2025 हे वर्ष क्रिप्टो गुन्हेगारांसाठी पुन्हा एकदा मोठे फायद्याचे ठरले असून एकूण चोरी 3.4 बिलियन डॉलर्सपेक्षा (जवळपास 31 हजार 187 कोटीपेक्षा) जास्त झाली आहे. 2020 पासून ही वार्षिक आकडेवारी साधारणपणे याच स्तरावर राहिली आहे."
बहुतेक पैसे क्रिप्टो कंपन्यांवरील मोठ्या सायबर हल्ल्यांमधून चोरले जात आहेत. उदाहरणार्थ, उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी फेब्रुवारी 2025 मध्ये 'बायबिट' या क्रिप्टो एक्सचेंजमधून 1.5 बिलियन डॉलर्स (सुमारे 13 हजार 758 कोटी) लंपास केले.
"या प्रकरणात आणि इतर बहुतांश प्रकरणांमध्ये झालेले नुकसान श्रीमंत क्रिप्टो कंपन्यांकडून भरून काढले जाते, ज्यामुळे वैयक्तिक गुंतवणूकदारांवर फारसा परिणाम होत नाही. परंतु, 2025 मध्ये वैयक्तिक क्रिप्टो गुंतवणूकदारांवरील हल्ल्यांच्या संख्येतही वाढ झालेली पाहायला मिळाली.
चेनालिसिसच्या संशोधनानुसार, वैयक्तिक हल्ल्यांची ही संख्या 2022 मधील 40 हजारवरून गेल्या वर्षी 80 हजारपर्यंत वाढली आहे.
व्यक्तींचे अकाऊंट हॅक करणे, त्यांची फसवणूक करणे किंवा त्यांना धमकावून पैसे उकळणे, या गोष्टींचा एकूण चोरी झालेल्या क्रिप्टो मूल्यामध्ये अंदाजे 20 टक्के वाटा आहे. त्याची किंमत 7 हजार 130 लाख डॉलर्स (सुमारे 6 हजार 539 कोटी) इतकी आहे.
परंतु कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, ही संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते कारण सर्वच पीडित व्यक्ती चोरीची जाहीरपणे तक्रार करत नाहीत जेव्हा असे घडते, तेव्हा तुम्हाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागू शकते.
साधारणपणे आर्थिक व्यवहारांमधील अनेक चोऱ्या किंवा फसवणुकीची भरपाई बँका किंवा कार्ड कंपन्यांकडून केली जाते. ब्रिटनमध्ये (यूके) तुम्ही 'फायनान्शिअल ओम्बुड्समन' (आर्थिक लोकपाल) सेवेकडे तक्रार करू शकता आणि 'फायनान्शिअल सर्व्हिसेस कॉम्पेन्सेशन स्कीम'द्वारे तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकते.
परंतु एफसीएच्या मते, 'ब्रिटनमध्ये क्रिप्टो अजूनही मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित आणि अत्यंत जोखमीचे आहे. जर काही अघटित घडले, तर तुम्हाला संरक्षण मिळण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे तुमचे सर्व पैसे गमावण्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी.
"याची प्रखर जाणीव तेव्हा होते जेव्हा तुम्ही ऑनलाइन 'Binance अकाऊंट हॅक' असे सर्च करता - Binance हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज आहे ज्याचे ब्रिटनमध्ये 14 लाख वापरकर्ते असल्याचे सांगितले जाते परंतु चोरीला बळी पडलेल्यांना सल्ला देणारे त्यांच्या वेबसाइटवरील पेज ब्रिटनमध्ये ब्लॉक केलेले आहे.
2023 पासून ही कंपनी ब्रिटनमध्ये नवीन ग्राहक स्वीकारत नाहीये, कारण त्यांना FCA कडून काम करण्याची परवानगी मिळालेली नाही. असे असूनही, तरीही गुन्हेगारांना पीडित व्यक्ती कुठे आहेत याची पर्वा नसते आणि जगभरातील लोकांना सर्रास लक्ष्य केले जात आहे.
चेनालिसिसने व्यक्तींवरील या हल्ल्यांचे वर्णन 'क्रिप्टो गुन्ह्यांची नोंद न झालेली सीमा' ( अंडर डॉक्युमेंटेड फ्रंटियर ) असे केले आहे.
क्रिप्टो कॉइन्सचे मूल्य वाढल्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकदार म्हणून प्रवेश करणाऱ्या लोकांची मोठी संख्या, हेच या वाढत्या गुन्ह्यांचे मुख्य कारण असल्याचे ते मानतात. तसेच, मोठ्या सेवांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक झाल्यामुळे, गुन्हेगार आता अशा व्यक्तींकडे वळले आहेत जे त्यांना 'सोपे लक्ष्य' वाटतात."
वस्तुस्थिती अशी आहे की, तुमच्याकडे जितके जास्त क्रिप्टो असेल आणि तुम्ही त्याबद्दल सार्वजनिकरित्या जितकी जास्त चर्चा कराल, तितकी तुम्हाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता जास्त असते . याउलट, लहान गुंतवणूकदार (ज्यांना क्रिप्टो समुदायात 'hodlers' म्हटले जाते) यापासून प्रभावित होण्याची शक्यता फारच कमी असते.
चोऱ्या, लूटमार आणि 'रेंच अटॅक्स'
चोरांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ते जगात कुठेही असू शकतात. ऑक्टोबरमध्ये 'एलिप्टिक' या क्रिप्टो विश्लेषण कंपनीच्या संशोधकांनी असा इशारा दिला की, उत्तर कोरियाचे सरकार-पुरस्कृत हॅकर्स आता श्रीमंत क्रिप्टोकरन्सी मालकांना वाढत्या प्रमाणात लक्ष्य करत आहेत. तसेच इतर देशांमधील तरुण स्कॅमर्स आणि हॅकर्सची संख्याही मोठी आहे.
डिसेंबरमध्ये मध्ये अमेरिकेत, 22 वर्षांच्या इव्हान टांगेमनने 'सोशल इंजिनिअरिंग एंटरप्राइझ' नावाच्या क्रिप्टो चोरांच्या टोळीचा भाग असल्याचा गुन्हा कबूल केला. या टोळीवर ऑक्टोबर 2023 ते मे 2025 दरम्यान 260 मिलियन डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम चोरल्याचा आरोप आहे.
फिर्यादी पक्षाचा असा आरोप आहे की, त्यांनी हॅक केलेल्या डेटाबेसचा वापर करून क्रिप्टो-श्रीमंत लोकांना लक्ष्य केले. त्यांनी बळी पडलेल्या लोकांची अशी दिशाभूल केली की, त्यांना ते स्वतः एखादे 'क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज' वाटले आणि त्यांना त्यांचे कॉइन्स ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले.
या टोळीचे सदस्य (जे सर्व तरुण होते आणि मुख्यतः अमेरिकेतील होते) चोरलेले पैसे खासगी विमाने, महागड्या गाड्या आणि आलिशान हँडबॅग्सवर खर्च करत असत, ज्या ते नाईट क्लबमध्ये वाटून टाकत.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये या टोळीने क्रिप्टो मालमत्तेच्या 'चाव्या' असलेली हार्डवेअर साधने चोरण्यासाठी लोकांच्या घरांमध्ये शिरून चोऱ्यांचे नियोजन केले होते.
चोऱ्या आणि लूटमारीच्या घटना आता इतक्या सामान्य झाल्या आहेत की, क्रिप्टो समुदायामध्ये त्यासाठी एक विशेष संज्ञा रूढ झाली आहे ती म्हणजे 'रेंच अटॅक्स'. याला हे नाव पडले कारण गुन्हेगार बळी पडलेल्या व्यक्तींना 'स्पॅनर' (पाना) दाखवून धमकावत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या एप्रिल मध्ये स्पेनमधील क्रिप्टो गुन्हेगारांनी एका स्त्री आणि पुरुषाला त्यांची क्रिप्टोकरन्सी सोडून देण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
स्पॅनिश पोलिसांनी सांगितले की, त्या पुरुषाच्या पायात गोळी झाडण्यात आली होती आणि गुन्हेगार त्यांचे क्रिप्टो वॉलेट उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्या दोघांनाही अनेक तास ओलीस ठेवण्यात आले होते. अखेर त्या महिलेची सुटका झाली, पण तिचा जोडीदार बेपत्ताच राहिला नंतर त्याचा मृतदेह एका जंगलात आढळून आला.
या प्रकरणाशी संबंधित 5 जणांना स्पेनमध्ये अटक करण्यात आली, तर डेन्मार्क मधील इतर चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फ्रान्समध्येही अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये एका अपहरणाचा प्रयत्न चक्क व्हीडिओमध्ये कैद झाला होता.
2025 च्या सुरुवातीस आणखी एका प्रकरणात 'लेजर' या क्रिप्टोकरन्सी सुरक्षा कंपनीचे सह-संस्थापक डेव्हिड बॅलँड आणि त्यांच्या पत्नीचे मध्य फ्रान्समधील राहत्या घरातून अपहरण करण्यात आले.
काही दिवसांनंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली परंतु खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नादरम्यान गुन्हेगारांनी बॅलँड यांचे एक बोट कापले होते.
त्यानंतर गेल्या महिन्यात मास्क घातलेल्या व्यक्तींनी ऑक्सफर्ड आणि लंडन दरम्यान प्रवास करणारी एक कार अडवून त्यातील एका प्रवाशाला 1.5 मिलियन डॉलर्स (अंदाजे 13 कोटी 75 लाख रुपये) किमतीची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी यूके पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.
टीआरएम लॅब्स या ब्लॉकचेन इंटेलिजन्स फर्मचे संचालक फिल एरिस यांनी पूर्वीच म्हटले होते की, जे गुन्हेगारी गट आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करण्यास सरावलेले आहेत, ते क्रिप्टो गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नेहमीच होती.
जोपर्यंत चोरलेली मालमत्ता वैध करुन ती रोखीत रूपांतरित करण्याचा मार्ग उपलब्ध आहे तोपर्यंत चोरासाठी क्रिप्टोकरन्सी आणि घड्याळ हे दोन्ही सारखेच आहे.
क्रिप्टोकरन्सी आता पूर्णपणे मुख्य प्रवाहात आली आहे आणि परिणामी, शारीरिक धोका आणि दरोड्याबद्दलची आपली पारंपारिक समज आता त्यानुसार बदलण्याची गरज आहे.
अशा 'रेंच अटॅक्स'चे प्रमाण नेमके किती आहे हे ठरवणे कठीण आहे, कारण अशा घटनांची फार कमी प्रमाणात सार्वजनिक नोंद होते. परंतु, वैयक्तिक क्रिप्टो चोऱ्यांच्या वाढत्या समस्येमध्ये या प्रकारच्या चोऱ्यांचा वाटा हा एक छोटा भाग असल्याचे दिसून येते.
तसेच, अनेक गुन्हेगार हॅकिंग किंवा फसवणुकीच्या जुन्या आणि खात्रीशीर तंत्रांवर अवलंबून आहेत. कंपन्यांवरील मोठ्या सायबर हल्ल्यांमधून चोरलेल्या अफाट डेटाच्या उपलब्धतेमुळे आता हे गुन्हे करणे गुन्हेगारांना अधिक सोपे झाले आहे.
बिटकॉइन करोडपतींची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. डेटा ही एक सामान्य समस्या बनली आहे कारण 'बिटकॉइन करोडपती' आता सर्रास पाहायला मिळत आहेत. त्यातच हॅक झालेल्या डेटाबेसेसमुळे गुन्हेगारांच्या टार्गेट लिस्टमध्ये सतत भर पडत आहे,' असे 'हेवन' या क्रिप्टो सुरक्षा कंपनीचे संस्थापक मॅथ्यू जोन्स सांगतात.
बीबीसीने मुलाखत घेतलेल्या एका हॅकरच्या मते, गुची (Gucci) आणि बालेन्सियागा सारख्या लक्झरी ब्रँड्सची मूळ कंपनी 'केरिंग' मधील डेटा चोरी हे याचे उत्तम उदाहरण आहे.
या डेटाबेसमध्ये लाखो ग्राहकांची नावे आणि संपर्क तपशीलांशिवाय, त्या लोकांनी स्टोअर्समध्ये किती पैसे खर्च केले होते याचीही माहिती उपलब्ध आहे.
ज्या हॅकरशी बीबीसीने संवाद साधला, त्याने सांगितले की त्याने सर्वात जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी ही माहिती असलेली स्प्रेडशीट्स 3 लाख डॉलर्समध्ये (अंदाजे 2 कोटी 75 लाख रुपये) विकत घेतली होती.
त्याचा असा दावा आहे की, त्याने या माहितीचा आणि दुसऱ्या एका चोरीच्या डेटाबेसचा वापर करून 'कॉइनबेस' च्या अनेक वापरकर्त्यांना किमान 1.5 मिलियन डॉलर्सच्या (अंदाजे 13 कोटी 75 लाख रुपये) क्रिप्टो लुटले.
त्या गुन्हेगाराने चोरीचा डेटा त्याच्या ताब्यात असल्याची पुष्टी दिली आणि त्याने 7 लाख डॉलर्स (अंदाजे 6 कोटी 41 लाख रुपये) किमतीचे बिटकॉइन आपल्या मालकीचे असल्याचे बीबीसीला सिद्ध करून दाखवले, जे त्याच्या मते त्याने एकाच बळीकडून मिळवले होते.
तो म्हणाला, 'मी हॅक केलेले डेटाबेस विकत घेतो आणि श्रीमंत लोक, त्यांचे अपडेटेड फोन नंबर आणि ईमेल्स तपासण्यासाठी त्यांची इतर डेटाशी तुलना करतो. मी अजूनही त्या यादीतील नावांवर काम करत आहे आणि मी माझे पैसे खूप वेगाने तिप्पट केले आहेत.
त्या हॅकरने तो अमेरिकेतील एका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, याशिवाय स्वतःबद्दल कोणताही तपशील दिला नाही.
जेव्हा त्याला विचारले गेले की, तो स्वतःला हॅकर मानतो की स्कॅमर, तेव्हा तो म्हणाला, 'दोन्हीपैकी काहीही नाही, मला फक्त पैसे कमावण्यात रस आहे.
या प्रकरणावर 'केरिंग' कंपनीने प्रतिक्रियेसाठी विचारलेल्या विनंतीला उत्तर दिले नाही, परंतु त्यांनी पूर्वी बीबीसीला सांगितले होते की, डेटा चोरीनंतर त्यांची आयटी सिस्टीम सुरक्षित करण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावर भर दिला की, या हल्ल्यात कोणत्याही बँक खात्याचे नंबर, क्रेडिट कार्डची माहिती किंवा सरकारी ओळखपत्रांचे नंबर चोरीला गेलेले नाहीत.
माझ्या आईचे पैसे आता गेले आहेत," रिचर्ड सांगतात. "माझ्या भविष्यासाठी तिने जेवढी काही अपार मेहनत केली होती, ती सर्व लुटली गेली. आम्हाला आमची वाद्ये आणि आमची कार विकावी लागली, आणि आम्ही काही काळासाठी बेघरही झालो होतो.
असे असूनही, त्यांनी क्रिप्टोकरन्सीवरील आपली आशा पूर्णपणे सोडलेली नाही. जर त्यांना त्यांचे हरवलेले पैसे परत मिळाले किंवा त्यांनी पुरेसा पैसा साठवला, तर ते पुन्हा एकदा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.
स्वतःची बँक स्वतःच होणे
मॅथ्यू जोन्सचे क्रिप्टो वॉलेट 'सेल्फ कस्टडी' या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याचा या उद्योगात नेहमीच पुरस्कार केला जातो. हॅवनचे ॲप मेटामास्क आणि ट्रस्टवॉलेट सारखेच आहे. ट्रेझर आणि लेजर सारख्या इतर कंपन्या USB मेमरी स्टिकसारखी प्रत्यक्ष साधने देतात, पण त्यामागील संकल्पना एकच आहे: तुम्ही तुमची स्वतःची बँक होऊ शकता."
"परंतु, या वाढत्या स्वातंत्र्यासोबतच अधिक जोखीमही येते, कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारचे (कायदेशीर किंवा बँकिंग) संरक्षण मिळत नाही.
जर तुमचे कॉइन्स तुमच्या 'सेल्फ कस्टडी' वॉलेटमधून चोरीला गेले, तर तुम्ही तक्रार करण्यासाठी कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंजकडे देखील जाऊ शकत नाही.
स्वतःची बँक असण्याचे स्वातंत्र्य वाढत्या जोखमीपेक्षा मोठे आहे का, असे विचारले असता जोन्स यांनी 'हो, नक्कीच' असा आग्रह धरला.
बँका खऱ्या अर्थाने त्यांच्या ग्राहकांना उत्तरदायी नसतात आणि त्यांच्याकडे तुमची खाती बंद करण्याचे अधिकार असतात ज्यासाठी अनेकदा कारणे दिली जातात असा युक्तिवाद जोन्स करतात.
पारंपारिक वित्तीय संस्था जेव्हा 'तुम्ही खात्यातून पैसे बाहेर का हलवत आहात?' असे प्रश्न विचारतात, तेव्हा त्यालाही माझा विरोध असतो," असेही ते म्हणाले.
स्वतःची बँक स्वतःच होण्याचा पर्याय निवडल्यानंतर हेलन आणि रिचर्ड यांनी त्यांचे सर्व कॉइन्स गमावले. ही घटना विशेषतः वेदनादायी ठरण्याचे कारण म्हणजे, त्यातील बहुतांश पैसे रिचर्डच्या आईच्या निधनानंतर तिचे घर विकून आले होते.
"माझ्या आईचे पैसे आता गेले आहेत," रिचर्ड सांगतात. "माझ्या भविष्यासाठी तिने जेवढी काही अपार मेहनत केली होती, ती सर्व लुटली गेली. आम्हाला आमची वाद्ये आणि आमची कार विकावी लागली आणि आम्ही काही काळासाठी बेघरही झालो होतो.
असे असूनही त्यांनी क्रिप्टोकरन्सीवरील आपली आशा पूर्णपणे सोडलेली नाही. जर त्यांना त्यांचे हरवलेले पैसे परत मिळाले किंवा त्यांनी पुरेसा पैसा साठवला, तर ते पुन्हा एकदा थेट क्रिप्टो गुंतवणुकीकडे वळण्याचा विचार करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)