कथा दोन एनफ्लुएन्सर्सची, त्यापैकी एक खरी आणि दुसरी AI जनरेटेड; पण तिची कमाई ऐकून व्हाल थक्क

    • Author, साक्षी वेंकटरामन
    • Role, यूएस रिपोर्टर

काही बाबतींत गिगी ही इतर कोणत्याही तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसारखीच आहे.

परफेक्ट केस आणि मेकअपसह ती ऑनलाइन येते आणि चाहत्यांशी बोलते. खाणे, मेकअप, स्किनकेअर असे व्हीडिओ ती शेअर करते. काही व्हीडिओंमध्ये तिचं गोंडस बाळसुद्धा दिसतं.

पण हे व्हीडिओ पाहताना काही सेकंदांनंतर काहीतरी विचित्र वाटू शकतं.

ती वितळलेल्या लाव्ह्यापासून बनवलेला पिझ्झा खाताना दिसू शकते किंवा बर्फ आणि कॉटन कँडी ओढांवर लावताना दिसू शकते. कधी कधी तिचे हात तिने हातात धरलेल्या वस्तूमधून आरपार जातात. कारण गिगी खरी नाही.

ती युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयची विद्यार्थिनी सिमोन मॅकेंझी हिचं एक 'एआय क्रिएशन' आहे. सिमोनला उन्हाळ्याच्या सुट्टीत थोडे पैसे कमवायचे होते म्हणून तिने ही एआय मुलगी बनवली.

21 वर्षांची सिमोन मॅकेंझी ही डिजिटल क्रिएटर्सच्या ग्रुपचा भाग आहे. हे अशा वेगाने वाढणारे ग्रुप्स Google Veo 3 सारख्या एआय चॅटबॉटमध्ये साधे प्रॉम्प्ट टाकून मोठ्या प्रमाणात व्हीडिओ तयार करत आहेत. काही समीक्षक आणि नाराज दर्शक याला 'एआय स्लॉप' म्हणत आहेत.

म्हणजे कृत्रिम बुद्धमत्तेचा वापर करून बनवलेला कमी दर्जाचा कंटेंट. तज्ज्ञांचे मते, हा प्रकार सोशल मीडिया फीडवर ताबा मिळवत आहे.

असं असलं तरी, या क्रिएटर्सला मोठे यशही मिळत आहे.

मॅकेंझी म्हणाली, "मला एका व्हीडिओमधून अवघ्या 4 दिवसांमध्ये 1,600 डॉलर (सुमारे 1 लाख 43 हजार 688 रुपये) मिळाले. तेव्हा मला वाटलं की, ठीक आहे, हेच करत राहूया."

दोन महिन्यांतच गिगीच्या व्हीडिओंना लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आणि टिकटॉकच्या क्रिएटर फंडमधून मॅकेंझीने हजारो डॉलर कमावले. या फंडमधून क्रिएटर्सला किती व्ह्यूज आहेत त्यानुसार पैसे दिले जातात. मात्र एआयच्या मदतीने सहज व्हायरल होणारी ती एकटीच नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

"हा प्रकार सध्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि कदाचित पुढेही वाढतच राहील," असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील डिजिटल कल्चरच्या तज्ज्ञ प्राध्यापक जेसा लिंगेल म्हणाल्या.

अवघ्या काही मिनिटांत कोणताही व्हीडिओ तयार करू शकणारे हे क्रिएटर्स अब्जावधींच्या इन्फ्लुएन्सर अर्थव्यवस्थेला हादरवू शकतात.

काही जण म्हणतात की, एआय सोशल मीडिया खराब करत आहे; तर काहींच्या मते यामुळे ऑनलाइन प्रसिद्धी मिळवण्याची संधी अधिक लोकशाही स्वरूपाची होत आहे. ज्यांच्याकडे महागडा सेटअप, कॅमेरा किंवा एडिटिंग टूल्ससाठी वेळ-पैसे नाहीत, त्यांनाही आता व्हायरल होता येत आहे, असे लिंगेल सांगतात.

पारंपरिक इन्फ्लुएन्सर्स बाजूला पडत आहेत का?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग हा अलीकडे एक मान्यताप्राप्त करिअर पर्याय झाला आहे. गोल्डमन सॅक या गुंतवणूक संस्थेनुसार अवघ्या काही वर्षांतच या उद्योगाचे मूल्य 250 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. अनेक ऑनलाइन क्रिएटर्स आपले वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या सुट्ट्या, त्यांचे पाळीव प्राणी, त्यांचे मेकअप रुटीन यांचा वापर करून कंटेंट तयार करतात.

एआय क्रिएटर्स मात्र तेच सगळं अधिक वेगाने, स्वस्तात आणि वास्तवातील मर्यादेशिवाय करू शकतात.

"यामुळे क्रिएटर स्पेस ढवळून निघण्याची पूर्ण शक्यता आहे," असे कॉर्नेल विद्यापीठातील डिजिटल मीडिया अभ्यासक ब्रुक डफी म्हणाल्या.

गिगीची निर्माती मॅकेंझी सांगते की, तिला एक व्हीडिओ तयार करायला फक्त काही मिनिटे लागतात आणि कधी कधी ती दिवसाला 3 व्हीडिओ पोस्ट करते.

हे मानवी इन्फ्लुएन्सर्ससाठी शक्य नाही. उदाहरणार्थ, 26 वर्षांची काव्या संबसीवमचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सुमारे 13 लाख फॉलोअर्स आहेत.

तिला रेसिपी, 'डे इन माय लाईफ' व्लॉग किंवा मेकअप ट्युटोरियल अशा व्हीडिओच्या प्रकारानुसार काही तासांपासून काही दिवसांपर्यंत वेळ लागतो. त्यासाठी खरेदी करणे, नियोजन करणे, सेटअप करणे, लाईटिंग तपासणे, शूटिंग करणे आणि एडिटिंग करणे असं सगळं करावं लागतं.

एआय क्रिएटर्स हे सगळं न करता व्हीडिओ तयार करू शकतात.

नॉर्थ कॅरोलिनामधील काव्या संबसीवम म्हणाली, "प्रश्न असा आहे की आपण यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कारण मी माणूस आहे. माझी क्षमता मर्यादित आहे. काही महिने असे येतात की, मी खूप निराश असते आणि कमी व्हीडिओ पोस्ट करते. मी रोबोट्सशी स्पर्धा करू शकत नाही."

तिने कोविड काळात आई-वडिलांसोबत राहत असताना तिचा चॅनल सुरू केला. सेटअप नसल्याने तिने सुरुवातीला भिंतीला फोन चिकटवून शूटिंग केलं. हळूहळू इन्फ्लुएन्सर म्हणून मिळालेल्या पैशांतून तिने ट्रायपॉड, लाईटिंग, मेकअप आणि व्हीडिओसाठी लागणारे साहित्य घेतले. फॉलोअर्स वाढायला तिला अनेक वर्षे लागली.

मॅकेंझी म्हणाली की, तिनेही पारंपरिक इन्फ्लुएन्सर होण्याचा विचार केला होता, पण तिच्याकडे पैसे, वेळ आणि सेटअप नव्हता. म्हणूनच तिने गिगी (एआय गर्ल) तयार केली.

"माझ्या घरच्या टेबलावर खूप पुस्तकं आणि वस्तू आहेत. ते फार लक्षवेधक दिसत नाही. एआयमुळे हवे ते बॅकग्राऊंड निवडता येते, हे खूप सोयीचं आहे," असं मॅकेंझी नमूद करते.

एआय व्हीडिओंमधील 'खरं' आयुष्य

सुरुवातीला मॅकेंझीने Google Veo 3 या चॅटबॉटला एक महिला तयार करायला सांगितली.

गिगी (एआय गर्ल) 21 वर्षांची आहे. ती सावळी आहे, तिचे डोळे हिरवे आहेत, तिच्या चेहऱ्यावर काही डाग (वांग) असून विंग्ड आयलाइनर आणि लांब काळे केस आहेत.

गिगीचं रूप तयार झाल्यावर मॅकेंझीनं चॅटबॉटला या गिगीला बोलतं करायला सांगितलं. आता गिगी प्रत्येक व्हीडिओच्या सुरुवातीला 'तू एआय आहेस' असा आरोप करणाऱ्यांशी वाद घालते. मग त्यांचं म्हणणं खरं ठरवत अ‍ॅव्होकॅडो किंवा 'स्लाइम कुकी' खाते.

डफी म्हणाल्या की, डिजिटल बदल नवीन नाहीत. आधी फोटोशॉप, मग फेस ट्युनसारखी अ‍ॅप्स आली. पण आजच्या अतिशय वास्तववादी एआय व्हीडिओंच्या आधीचं रूप म्हणजे 2010 च्या दशकाच्या शेवटी आलेले सेलिब्रिटी डीपफेक्स.

आता हे व्हीडिओ खूपच खरे वाटतात आणि वेगाने व्हायरल होतात.

मॅकडोनाल्ड्समध्ये काम करणारी मांजर, डोअरबेल कॅमेरा फुटेज, अशा सगळ्या प्रकारचे एआय व्हीडिओ तयार होत आहेत. त्यात हॉरर, कॉमेडी, कुकिंग असे सगळे प्रकार आहेत. पण हे काहीच खरं नाही.

"एआय व्हीडिओ म्हणजे काही प्रमाणात मीम कल्चरचं रूप बनलं आहे," असंही डफी म्हणतात.

दक्षिण कोरियात राहणाऱ्या 31 वर्षांच्या एका अमेरिकन महिलेचं टिकटॉक अकाऊंट आहे. ते 'गमजा' नावाच्या एआय कुत्र्याच्या पिल्लाचं आहे. हे पिल्लू हेडफोन घालून स्वयंपाक करतं, त्याचे केस कुरळे करतं. या अकाऊंटवर या महिलेला लाखो व्ह्यूज मिळाले. इतकंच नाही, तर त्या एआय कुत्र्याच्या व्हीडिओत दिसण्यासाठी ब्रँड पार्टनरशिप्सही मिळाल्या आहेत.

या एआय पिल्लााबत ही महिला म्हणते, "मी लोकांना आवडणाऱ्या अन्न आणि पिल्लं यो दोन गोष्टी एकत्र आणल्या."

टिकटॉकवरील मोठ्या एआय क्रिएटर्सपैकी एक म्हणजे 27 वर्षांचा डॅनियल राइली. त्याच्या 'टाइम ट्रॅव्हल' व्हीडिओंचे 6 लाख सबस्क्राईबर्स आहेत आणि लाखो व्ह्यूज मिळतात, पण या प्रेक्षकांनी त्या क्रिएटरचा चेहराही पाहिलेला नाही.

" POV: ज्वालामुखी फुटण्याच्या दिवशी तुम्ही पोम्पई या प्राचीन शहरात आहात " किंवा " POV : तुम्ही राणी क्लिओपात्रा आहात" असे त्याचे व्हीडिओ प्राचीन इतिहासातील 30 सेकंदांची काल्पनिक सफर घडवतात.

"जे व्हीडिओ बनवायला कोट्यवधी खर्च झाले असते, ते मी लोकांच्या फोनवर दाखवू शकतो," असं तो सांगतो.

त्याने आता एआय व्हीडिओ बनवण्याचे प्रशिक्षण देणारा मासिक फी असलेला बूटकॅम्पही सुरू केला आहे.

बघणाऱ्यांना खरे व्हीडिओ आणि एआय व्हीडिओ यातील फरक कळेल का?

"मला एआय म्हणणं थांबवा," गिगी प्रत्येक टिकटॉक व्हीडिओच्या सुरुवातीला म्हणते. ती संशय घेणाऱ्यांशी वाद घालत असते, पण काही प्रेक्षकांना ती खरीच वाटते.

अतिशय खरे वाटणारे एआय व्हीडिओ मोठी समस्या ठरू शकतात. विशेषतः माध्यम साक्षरता नसलेल्या लहान मुलांसाठी हे व्हीडिओ जास्त अडचणीचे ठरू शकतात, असे लिंगेल म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, "लवकरच सामान्य माणसाला खरे व्हीडिओ आणि एआय व्हीडिओ यातील फरक ओळखणं जवळजवळ अशक्य होईल. तसेच खोटी माहिती, फसवणूक आणि निकृष्ट कंटेंट वाढताना दिसेल."

दुसरीकडे, एआय व्हीडिओ दर्शकांना भुरळ घालतात, अतिशयोक्ती, कार्टूनसारखा कंटेट दाखवला जातो.

"वास्तव आणि फसवणूक यांच्या सीमारेषेवर असलेले व्हीडिओ आपलं लक्ष वेधून घेतात आणि हे व्हीडिओ शेअर करण्यासाठी दर्शकाला प्रवृत्त करतात," असं डफी म्हणाल्या.

हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, 14 ते 22 वयोगटातील अनेक एआय युजर्स फोटो आणि म्युझिक तयार करण्यासाठी एआयचा वापर करतात.

पण प्रश्न असा आहे की, मानवी समज-शक्ती इतक्या वेगाने सुधारत असलेल्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकेल का?

गमजा या एआय कुत्र्याच्या पिल्लाची निर्मिती करणारी महिला सांगते की, तिला जवळजवळ रोजच लोक मेसेज पाठवतात आणि तिच्या एआय पिल्लाबद्दल चिंता व्यक्त करतात.

हे पिल्लू आरोग्याला चांगला नसलेलं अन्न खात आहे, असं त्यांना वाटतं. कारण त्यांना तो खरा कुत्राच वाटतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)