जेवणानंतर काही मिनिटांतच शौचास जावं लागणं, हे आजाराचं लक्षण आहे का?

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तमिळ

जेवण झाल्यानंतर काही मिनिटांतच शौचास जाण्याची इच्छा होणे ही दैनंदिन आयुष्यात अनेकांना भेडसावणारी अडचण वाटते.

यामुळे मनात अशी शंकाही निर्माण होते की, आपण खाल्लेले अन्न खरोखरच शरीरात शोषले जात आहे की त्याचे लगेच मलामध्ये रूपांतर होत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ऑफिसच्या वेळेत कमी किंवा मध्यम प्रमाणात जेवणे आणि आठवड्याच्या शेवटी वीकेंडला घरी असताना आवडते पदार्थ भरपेट खाणे या मानसिकतेमागेही हेच कारण आहे.

पण, इथे प्रश्न असा उद्भवतो की, अशा प्रकारे खाल्ल्यानंतर शौचास लागणे सामान्य आहे की हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे? दिवसातून अनेकदा शौचास जाणे ही समस्या आहे का? या लेखात आपण वैद्यकीय तज्ज्ञ आणि अभ्यासांच्या मदतीने या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

आपण खाल्लेल्या अन्नाचे लगेच मलात रूपांतर होते का?

चेन्नईचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. महादेवन सांगतात, "जेवल्यानंतर थोड्याच वेळात शौचास जाण्याची इच्छा होणे याला 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स' म्हणतात. मात्र, अनेक लोकांचा असा समज असतो की, त्यावेळी खाल्लेल्या अन्नाचे लगेच मलात रूपांतर होते, पण तसे नसते."

एका अभ्यासानुसार, सर्वसाधारणपणे आपण खाल्लेल्या अन्नाचे मलात रूपांतर होऊन ते शरीरातून बाहेर पडण्यासाठी 10 ते 73 तास लागू शकतात. याला 'गट ट्रांझिट टाईम' म्हणतात.

असं असलं तरी हा कालावधी त्या व्यक्तीचं वय, लिंग आणि शरीराचे वजन यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.

जेव्हा आपण खाल्लेले अन्न पोटात जाते, तेव्हा मज्जातंतू मोठ्या आतड्यातील स्नायुंना संकेत पाठवतात. त्या संकेतांमुळे मोठ्या आतड्याचे आकुंचन होते आणि तिथे आधीच असलेला मल गुदाशयाकडे सरकवला जातो. यामुळे तो शरीराबाहेर टाकण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

जेव्हा मोठ्या आतड्यातील मल गुदाशयात जातो, तेव्हा मोठे आतडे आणखी अन्नाचे शोषण करण्यासाठी जागा रिकामी करते. यालाच 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स' म्हणतात.

डॉ. महादेवन म्हणतात, "ही शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. म्हणूनच दूध प्यायल्यानंतर बाळ लगेच शी करते."

ही भावना जेवल्यानंतर काही मिनिटांपासून ते एक तासाच्या आत निर्माण होऊ शकते. एका अभ्यासानुसार, लहान मुलांमध्ये हे वेगाने घडते, तर मोठ्या माणसांमध्ये ही प्रक्रिया संथ असते.

हे सामान्य असले तरी, ही भावना रोखून धरता येत नसेल किंवा खूप तीव्र असेल, तर ते पोटाशी संबंधित विकार किंवा आतड्यांच्या आजारांचे एक लक्षण असू शकते, असेही डॉ. महादेवन नमूद करतात.

ते पुढे म्हणतात की, पोटाच्या विकारांमध्ये 'इरिटेबल बोवेल सिंड्रोम' हा प्रमुख आहे, परंतु ही एक आटोक्यात आणता येण्यासारखी समस्या आहे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार इरिटेबल बोवेल सिंड्रोम (आयबीएस) ही पचनसंस्थेवर परिणाम करणारी एक स्थिती आहे आणि त्यांनी याची लक्षणे देखील नमूद केली आहेत:

• पोटदुखी किंवा पेटके येणे, हे सहसा शौचास जाण्याच्या इच्छेशी संबंधित असते.

• अति प्रमाणात गॅस आणि पोट फुगणे.

• जुलाब (अतिसार), बद्धकोष्ठता किंवा दोन्ही आलटून पालटून होणे.

• शौचास जाऊन आल्यानंतरही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे (गुदाशय रिकामे झाले नाही अशी भावना).

जर ही लक्षणे 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी शिफारस नॅशनल हेल्थ सर्व्हिस करते.

या समस्येमागे कोणतेही स्पष्ट कारण नसले तरीही, अल्कोहोल, कॅफिन, तिखट किंवा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, मानसिक ताण आणि चिंता, तसेच प्रतिजैविकांचा नियमित वापर यामुळे आयबीएसचा त्रास उद्भवू शकतो.

आयबीएसमुळे केवळ जेवल्यानंतर शौचास जाण्याची इच्छाच होत नाही, तर खालील त्रासही होऊ शकतात:

• गॅसचा त्रास

• थकवा आणि ऊर्जेचा अभाव

• मळमळ

• पाठदुखी

• वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे

• लघवी पूर्ण न झाल्याची भावना होणे

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार (एनएचएस) ही लक्षणे देखील दिसू शकतात.

एका अभ्यासानुसार, जगातील 5 ते 10 टक्के लोकांमध्ये इरिटेबल बोवेल सिंड्रोम आहे. आयबीएस असणाऱ्या 3 पैकी एका व्यक्तीला चिंता किंवा नैराश्याचा सामना करावा लागतो.

ईरोडमधील डॉक्टर आणि आहार सल्लागार अरुणकुमार म्हणतात, "इरिटेबल बोवेल सिंड्रोम ही अनेकांना असणारी समस्या आहे. शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही, पोटात अशी अस्वस्थता जाणवते. याचे 2 प्रकार आहेत: आयबीएस-सी म्हणजे बद्धकोष्ठतेसह होणारी पोटदुखी आणि आयबीएस-डी म्हणजे जुलाबासह होणारा त्रास."

डॉ. महादेवन म्हणतात, "आहार आणि जीवनशैलीतील बदल, मानसिक तणावावर उपाय शोधणे यांसारख्या मार्गांनी इरिटेबल बोवेल सिंड्रोमची लक्षणे नियंत्रित करता येतात. जर लक्षणे खूप तीव्र असतील, तर वैद्यकीय सल्ला किंवा उपचार घेणे उत्तम."

हे आतड्यांच्या आजारांचे लक्षण असू शकते का?

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सर्जन डॉ. रवींद्रन कुमारन सांगतात, "काही लोकांना अनेक वर्षांपासून जेवल्यानंतर थोड्याच वेळात शौचास जाण्याची सवय असते. जर यामुळे त्यांना शारीरिक किंवा मानसिकरीत्या कोणताही त्रास होत नसेल, तर ही समस्या नाही. परंतु, जर एखाद्याला अशी तीव्र इच्छा अचानक आणि सतत होऊ लागली, तर मात्र त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे."

"जे लोक दररोज ऑफिस किंवा शाळा-कॉलेजला जातात, त्यांना अशा प्रकारे वारंवार शौचास जाणे गैरसोयीचे वाटू शकते. त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही काही जीवनशैलीतील बदलांची शिफारस करतो. बाकी, दिवसातून इतक्या वेळाच शौचास गेले पाहिजे असे कोणतेही नियम नाहीत. जर सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब होत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा," असंही ते नमूद करतात.

याच मुद्द्यावर भर देत डॉ. महादेवन म्हणतात, "जेव्हा तुम्हाला तुमच्या नेहमीच्या शौचाच्या प्रक्रियेत सातत्याने बदल जाणवतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ, रात्री झोपेतून शौचास जाण्याच्या इच्छेने वारंवार जाग येणे हा एक धोकादायक बदल आहे. हे इतर कोणत्याही आजाराचे लक्षण असू शकते."

"तुमच्या मलातून चिकट पदार्थ (कफ - जो पांढरा दिसू शकतो) किंवा रक्त पडणे, शरीराचे वजन कमी होणे, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे ही आतड्यांच्या आजारांची लक्षणे असू शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम," असंही ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)