जेवणानंतर पोटातला गॅस बाहेर काढण्यासाठी 'फार्ट वॉक' ; याने खरंच पचन सुरळीत होतं का?

    • Author, सारा बेल
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

जेवणानंतरचा छोटासा फेरफटका, ज्याला 'फार्ट वॉक' म्हटलं जातं. ते फक्त मनोरंजक नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे पचन सुधारतं, गॅस कमी होतो, हृदय आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते, आणि मानसिक आरोग्यही सुधारतं.

'फार्ट वॉक' म्हणजे जेवणानंतर हलका व्यायाम करून शरीरातील अतिरिक्त गॅस बाहेर काढणं. सोशल मीडियावर हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. पण हा सर्वांनी करावा असा उपाय आहे का? हा साधा ट्रेंड कसा आपल्या जीवनात बदल घडवू शकतो?

'फार्ट वॉक' लोकप्रिय करणाऱ्यांपैकी एक म्हणजे मॅरलिन स्मिथ. त्या व्यावसायिक होम इकोनॉमिस्ट आणि अभिनेत्री आहेत.

त्यांनी आपल्या पतीसोबत फिरताना केलेल्या रील्सना इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

त्या सांगतात, "अनेक वर्षांपासून आपण रात्रीचं जेवण झाल्यावर कुत्र्याला फिरवायला घेऊन जातो. तेव्हापासून आपण त्या फेरफटक्याला 'फार्ट वॉक' म्हणू लागलो- कारण आपण बाहेर जाऊन गॅस सोडायचो आणि त्याचा दोष कुत्र्याला द्यायचो."

ही कल्पना आणि नाव मजेशीर वाटत असलं तरी 'फार्ट वॉक' खरं तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण जेवणानंतर तयार होणारा गॅस किंवा वायू बाहेर काढायला ती मदत करते.

'फार्ट वॉक' तुमच्यासाठी फायदेशीर का?

खरंतर, आपण जेव्हा अन्न खातो, पाणी किंवा लाळ गिळतो तेव्हा थोडीशी हवादेखील गिळत असतो. ही हवा पोटात म्हणजेच पचनसंस्थेत जमा होते आणि गॅस तयार होतो.

काही अन्नपदार्थ पचायला कठीण असतात, त्यामुळे ते पोटात गेल्यानंतरही गॅस तयार होतो. काही औषधं किंवा काही अन्न सहन न होणं (फूड इन्टॉलरन्स) यामुळेही गॅस जास्त होऊ शकतो.

कॅनडातील टोरांटो येथील आठ बेस्टसेलिंग कुकबुक्सच्या लेखिका मॅरलिन म्हणतात, "जेव्हा तुम्ही चालता, तेव्हा तुमच्या पचनसंस्थेला हलकासा मसाज मिळतो. त्यामुळे गॅस बाहेर पडायला मदत होते आणि हे शरीरासाठी खूप चांगलं असतं."

व्यायाम केल्याने आपल्या मोठ्या आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या (मायक्रोब्स) संख्येत सकारात्मक बदल होतात. विशेषतः असे सूक्ष्मजीव वाढतात जे 'शॉर्ट-चेन फॅटी अ‍ॅसिड्स' तयार करतात. हे पदार्थ आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

'गट्स यूके' या पचनासंबंधी आजारांवर काम करणाऱ्या संस्थेच्या माहिती व्यवस्थापक ज्युली थॉम्पसन सांगतात, "आतड्यांमधील सूक्ष्मजीव काही नैसर्गिक पदार्थांमध्ये बदल करतात, ज्यांना पित्त आम्ल (बाइल अ‍ॅसिड) म्हणतात. या बदलांमुळे आतड्यांची हालचाल वाढते, बद्धकोष्ठता सुधारते आणि गॅस बाहेर पडायला मदत होते."

आपल्याला माहीत आहे की, चालण्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि टाइप-2 डायबिटीस म्हणजे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. कारण चालल्याने रक्तातील साखर स्थिर राहते आणि ती अचानक वाढणं टाळता येते.

मॅरलिन सांगतात, "जेवणानंतर बसून न राहता तुम्ही हालचाल करत असाल तर तुमच्या स्नायूंचं काम स्पंजसारखं होतं. ते जेवणानंतर वाढलेली रक्तातील साखर शोषून घेतं."

"ही जोखीम कमी करण्याची एकमेव पद्धत नाही, पण अशा छोट्या-छोट्या सवयी आहेत. ज्या अंगिकारल्यास आरोग्य लवकर सुधारू शकतं."

'फार्ट वॉक' आणि फायबर

यूकेतील नोंदणीकृत पोषणतज्ज्ञ एमा बार्डवेल यांनी फायबरवर एक पुस्तक लिहिलं आहे. त्या सांगतात की, 'फार्ट वॉक' लोकांना जास्त फायबर खाण्याचं लक्ष्य सहज साधण्यास मदत करू शकतात.

त्या म्हणतात, "आपल्याला माहीत आहे की, जगभरात सुमारे 90 टक्के लोक दररोज सुचवलेल्या 30 ग्रॅम फायबरच्या मात्रेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. काही लोकांना याचा त्रास होतो, कारण फायबर खाल्ल्यानंतर पोट फुगतं आणि गॅस तयार होतो. अशावेळी 'फार्ट वॉक' अगदी योग्य उपाय ठरू शकतो."

त्या म्हणतात, हे महत्त्वाचं आहे कारण फायबर खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदे होतात.

एमा म्हणतात, "हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतं, रक्तातील साखर नियंत्रित करतं, बद्धकोष्ठता टाळतं आणि हृदयाच्या आजारांपासून, टाइप-2 मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर, विशेषतः कोलोरॅक्टल कॅन्सरपासून संरक्षण करतं."

फायबर तुमच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांना जे आतड्याचं आरोग्य सुधारतात, त्यांना पोषण पुरवतो.

त्या म्हणतात, "फायबर खाल्ल्यानंतर ते पचून काही पदार्थ तयार होतात जे संपूर्ण शरीरात पोहोचतात आणि अनेक फायदे करतात.

उदाहरणार्थ, ते व्हिटॅमिन बी12 तयार करण्यास मदत करतात किंवा सेरोटोनिनसारखी मेंदूतील रसायनं तयार करतात, हे मूड सुधारण्यासाठीही मदत करतात."

मानसिक आरोग्यासाठी फायदे

बाहेर जाणं आणि पायी चालणं मानसिक आरोग्य सुधारू शकतं. कारण व्यायाम 'फील-गुड' रसायनं जसं की एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन तयार करतो. हे तुम्हाला ताण कमी करायला आणि चांगली झोप मिळवायला मदत करू शकतं.

चालणं तुमच्या नातेसंबंधांनाही मजबूत बनवू शकतं. मॅरलिन सांगतात की, जेव्हा त्या आणि त्यांचे पती करिअर आणि कुटुंबात व्यस्त होते, तेव्हा चालणं त्यांना एकत्र वेळ घालवण्याचा चांगला मार्ग होता.

त्या म्हणतात, "आता जेव्हा माझे पती सोबत नसतात, तेव्हा मी एखादा मित्र किंवा शेजाऱ्यांसोबत जाते. संपर्कात राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे."

मॅरलिन यांनी कोविडच्या काळात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पतीसोबत 'फार्ट वॉक' इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली. नंतर, 2023 मध्ये त्या बर्फावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हा रील्स रेकॉर्ड करणं हा त्यांच्या उपचाराचा भाग बनला.

त्या म्हणतात, "मी फक्त माझा फोन उचलला आणि याबद्दल बोलायला सुरुवात केली. मी ठरवलं, 'जर लोक मला फक्त यासाठीच लक्षात ठेवणार असतील, तर ते खूप मजेशीर ठरेल'."

'फार्ट वॉक' कसा करतात?

जेवणानंतर नेहमी चालायला हवं. पण सर्वात योग्य वेळ मुख्य जेवणानंतर असते, जे बहुतेक लोकांसाठी रात्रीचं जेवण असतं.

याबाबत काही कठोर नियम नाहीत, पण एमा सांगतात की जेवणानंतर साधारण 30 मिनिट ते 1 तास थांबा, जेणेकरून अन्न पचायला सुरूवात होईल. चालणं फार लांब किंवा कठीण नसावं.

"आपण फक्त दहा मिनिटांबाबत बोलत आहोत. आपल्याला कठीण गोष्ट करण्याची गरज नाही."

तुम्हाला फक्त एक जोडी आरामदायक बूट आणि हवामानानुसार योग्य कपडे लागतील.

एमा म्हणतात की, सोशल मीडियावर महागडे आणि खास उपाय दाखवून आरोग्याची गोष्ट जास्तच गुंतागुंतीची असल्याचं दाखवलं जातं.

"जेवणानंतर चालणं खूप सोपं आणि ताजेतवाने वाटण्यासारखं आहे. कारण बहुतेक लोकांसाठी हे सहज करता येतं आणि यासाठी काही खर्चही नाही," असं त्या म्हणाल्या.

आपल्या दैनंदिन जीवनात 'फार्ट वॉक' करणं ही एक छोटीशी, छान सवय आहे जी आरोग्यदायी आयुष्याला मदत करते, असं मॅरलिन पुढे सांगतात.

त्या म्हणतात, "या छोट्या-छोट्या टिप्स तुम्हाला योग्य मार्गावर राहायला आणि चांगलं वाटायला मदत करतात."

"मी फक्त यासाठी आनंदी आहे की, हे लोकप्रिय कसं झालं. कारण माझं एकच ध्येय होतं, लोकांना सोफ्यावरून बाहेर पडायला प्रोत्साहित करणं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)