आजकाल तरूणांमध्येही वाढतेय गुडघेदुखीचं प्रमाण, गुडघे दुखू नयेत म्हणून तरुणांनी काय केलं पाहिजे?

जेव्हा तुम्ही चालता... पायऱ्या उतरता... तेव्हा गुडघ्यांवर तुमच्या वजनाच्या दीडपट ताण येतो याची कल्पना आहे का?... हो, म्हणूनच पायऱ्या उतरताना किंवा एखाद्या चढावरुन खाली येताना जास्त त्रास जाणवतो.

आपल्या शरीरातले सर्वच सांधे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यातही गुडघ्याचे सांधे हे अधिक महत्त्वाचं काम करत असतात. ज्या सांध्यांवर आपलं संपूर्ण शरीर उभं असतं त्याकडे तितकसं लक्ष दिलं जात नाही.

गुडघेदुखी झाल्याशिवाय, चमक आल्याशिवाय शक्यतो गुडघ्यांकडे लक्ष दिलं जात नाही. मात्र गुडघ्यांची काळजी ही त्यांना त्रास होण्याआधीच घेणं आवश्यक आहे. आजकाल वयाच्या तिशीमध्येही तरुणांना गुडघेदुखी किंवा गुडघ्यासंदर्भातील त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

मांडी घालून बसणं, खाली वाकणं किंवा वेगानं चालून बस पकडणं अशा गोष्टी करताना तुमचे गुडघे योग्य ती साथ देत नसतील तर आताच त्यांची काळजी घेतली पाहिजे.

बहुतेकवेळा गुडघे नीट नसल्यामुळे या क्रिया टाळल्याच जातात. काही लोकांना तिथं कडकपणा जाणवतो, सौम्य वेदना होतात. त्यावेळेस आपलं शरीर 'तुमचे गुडघे पुर्वीसारखे राहिलेले नाहीत' हेच ओरडून सांगत असतं.

उभ्यानं काम करणारे, धावपळीचं काम करणारे, सतत हालचाल करणाऱ्या तसेच खेळाडूंना-ॲथलिट्सना गुडघ्यांचा जास्त वापर करावा लागतो, त्यामुळे त्यांना गुडघ्यांचा त्रास संभवतो. मात्र लठ्ठपणा, बैठं काम करणाऱ्या हालचाल कमी करणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होतो. त्यातही वजन वाढल्यामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो. काही ऑटोइम्युन आजार तसेच जनुकीयकारणांमुळेही गुडघे दुखण्याचा त्रास सुरू होतो.

सांधे आणि स्नायूंचं नातं

आता कोणत्याही सांध्यांचं आरोग्य पाहायला गेलं तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या स्नायूंचाही विचार केला पाहिजे. सांध्यांना आधार देणारे जे त्यांच्या जवळचे जे स्नायू असतात त्यांची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. जसं की गुडघ्याच्या जवळ क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग तसेच काफ (पिंडरी)चे स्नायू असतात.

हे स्नायू गुडघ्याला आधार देत असतात. गुडघ्यावर येणारा ताण कमी करत असतात. हे स्नायू लवचिक असले तर गुडघे किंवा संबंधित सांध्यांची हालचाल सोपी होते. तसेच दुखापतीचा धोका कमी करण्यासाठीही हे स्नायू लवचिक असणं आवश्यक आहे.

यामुळेच गुडघ्यांच्या स्नायूंचं आरोग्य भविष्यात चांगलं राहावं असं वाटत असेल तर या आजूबाजूच्या स्नायूंचे व्यायाम करणं आवश्यक आहे. या स्नायूंचा व्यायाम केल्यास ते लवचिक राहातात, त्यांची ताकद वाढते आणि ते गुडघ्याला योग्य तो आधार देतात.

स्ट्रेचिंग आणि हलक्या व्यायामांनी ते गुडघ्यांची हालचाल सुरळीत होण्यासाठी मदत करतात. तसेच रक्तपुरवठाही चांगला होतो. यामुळेच गुडघ्यांची काळजी घेण्यासाठी सुरुवातीपासूनच तिथल्या स्नायूंचा व्यायाम आवश्यक आहे.

तरुणांमध्ये गुडघेदुखीचं मुख्य कारण काय असतं?

वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुणांमधील गुडघ्यांचे त्रास वेगळ्या पद्धतीचे असल्याचं दिसून येतं. नवी मुंबईतल्या अपोलो हॉस्पिटल्स येथे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. समीर चौधरी यांनी बीबीसी मराठीला याबद्दल अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "अतिरिक्त वापरामुळे होणारी गुडघ्यांची धती, पॅटेलोफेमोरल पेन सिंड्रोम, टेंडिनिटिस असे प्रकार तरुणांमध्ये दिसून येतात. तसेच खेळताना होणारे मेनिस्कल टिअर्स, एसीएल स्प्रेन्स असे त्रास दिसून येतात."

डॉ. समीर चौधरी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, "या आजारांबरोबर मला सर्वात जास्त काळजीची गोष्ट पायाचे तळवे सपाट असणं, दोन्ही पायात समतोल नसणं, स्नायूंमध्ये असमतोल असणं तसेच बैठ्या कामांमुळे या स्नायूंकडे दुर्लक्ष होणं याची वाटते. या स्नायूंकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते दुर्बल होत जातात."

जीवनशैलीचा गुडघ्यांवर काय परिणाम होतो?

आजकाल बैठं जीवन, बैठं काम, यंत्रांवर अधिक भिस्त यामुळे शारीरिक हालचाल अतिशय कमी झाली आहे. त्यातही अतिसाखर असलेले पदार्थ, पेयं यांचं सेवन, धूम्रपान-मद्यपान याचेही शरीरावर वाईट परिणाम होतात. वाढलेलं वजन शरीरावर सर्वदूर परिणाम करतं हे आता अनेकदा दिसून आलेलं आहे.

डोंबिवलीत कार्यरत असणारे डॉ. सोहन बारहाते याबद्दल अधिक माहिती देतात. ते म्हणतात "तरुणांमधील गुडघेदुखी ही जीवनशैलीसंदर्भात असल्याचं अनेकदा दिसतं. अचानक अवघड खेळांमध्ये सहभाग घेणं, अचानक हालचालीत बदल होणं, शरीराचा फिटनेस कमी असणं, लठ्ठपणा, हालचाल कमी असणं असे अनेक घटक यासाठी कारणीभूत ठरतात. चुकीच्या चप्पल बुटांचा वापर, खेळताना होणाऱ्या चुकांमुळे या लक्षणांत वाढ होते."

डॉ. बारहाते पुढे सांगतात, "वाढलेलं वजन आणि बैठी जीवनशैली हे मुख्य त्रासदायक घटक असतात. या कारणांमुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर आणि त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंवर ताण येतो."

पण तरुणांमधील गुडघेदुखीसाठी जीवनशैली की जनुकीय कारणं जास्त कारणीभूत ठरतात यावरही विचार करायला हवा.

डॉ. समीर चौधरी सांगतात, "ही दोन्ही कारणं गुडघ्यांच्या त्रासासाठी कारणीभूत होतात. मात्र सध्याच्या काळात चुकीची जीवनशैली हे कारण वेगानं वाढत असल्याचं दिसतं. अर्थात संधिवात कमी वयात होणं किंवा सांध्यांसंबंधी आजार हे जनुकीय कारणांमुळेही होतात. त्यासाठी तुमच्या कुटुंबाचा इतिहास कारणीभूत असतोच. पण जनुकीय कारणं म्हणजे बंदुकीत भरलेली गोळी आहे असं मी म्हणतो. तुम्ही चुकीची जीवनशैली अंगिकारली तर ती गोळी सुटेल. त्यामुळे जनुकीय कारणांबरोबर जीवनशैलीही तितकीच कारणीभूत आहे."

डॉ. समीर चौधरी सांगतात, "आता आमच्या तपासणीत सर्वात जास्त प्रकर्षाने दिसतं ती चुकीची जीवनशैली अंगिकारणं. सतत आठ ते दहा तास बसून राहाणं, चुकीचा आहार घेणं, लठ्ठपणा आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीविना केलेला अतिताणाचा व्यायाम ही कारणं जास्त दिसून येतात."

ते पुढं सांगतात, "एकेकाळी शस्त्रक्रीया करावी लागेपर्यंत गुडघे त्रास देत नाहीत तोपर्यंत वाट पाहिली जात असे. सुदैवानं आता त्यात बदल झालं आहे. योग्यवेळी उपचार सुरू केले तर तरुणांमधील गुडघ्यांचे त्रास नीट बरे करणं अगदीच शक्य आहे."

तात्पुरता त्रास आणि जुनाट त्रास यातला फरक कसा ओळखायचा?

बहुतांशवेळा गुडघेदुखी साधी असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. घरच्याघरी साधे उपाय केले जातात किंवा पूर्णपणे उपचार टाळले जातात. पण आपल्याला होत असलेला त्रास हा काही काळापुरता आहे की काही गंभीर घडलं आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. तसं केल्यामुळे उपचार वेळीच सुरू होऊन त्यातून बरं होता येतं.

गुडघ्याजवळ वेदना होणं, सूज येणं, वजन वाहणं अशक्य होणं, दीर्घकाळ वेदना जाणवणं, सतत ती जागा लाल होणं, गरम झाल्यासारखी वाटणं, आवाज येणं अशी लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.

मुंबईतल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असणारे डॉ. संदीप वासनिक यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "तरुणांमध्ये वेदना किती काळ जाणवत आहेत, कशामुळे वेदना होत आहेत आणि त्याची लक्षणं कोणती आहेत… यावरुन त्या तात्पुरत्या आहेत की जुनाट आहेत हे पाहिलं जातं. जर एखाद्या विशिष्ट घटनेमुळे वेदना होत असतील तर त्या तात्पुरत्या असतात. मात्र वारंवार तिच लक्षणं त्याचप्रकारे आणि दीर्घकाळ असतील तर मात्र मोठे त्रास संभवतात."

डॉ. समीर चौधरी याबद्दल एक उदाहरण देतात. ते सांगतात, "समजा तुम्ही रविवारी एखाद्या फुटबॉलसारख्या खेळात अचानक भाग घेतला तर आणि सोमवारी तुमचा गुडघा दुखत असेल तर आराम करुन, त्यावर बर्फाचा शेक देऊन, पाय उंचावर ठेवून पाच ते सात दिवसात ते कमी झालं तर ते तात्पुरतं समजता येईल. मात्र जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त आणि सतत वेदना होत असतील, सूज असेल, वेदनेबरोबर कटकट आवाज येत असेल, वजन सहन होत नसेल, रात्री त्रास वाढत असेल तर मात्र त्याकडे तातडीने आवश्यक ते लक्ष दिलं पाहिजे."

गुडघे दुखू नयेत म्हणून तरुणांनी काय केलं पाहिजे?

तरुण वयात गुडघ्यांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर काही आहारात बदलही सुचवतात. अँटिइन्फ्लमेटरी घटक असलेला आहार म्हणजे क जीवनसत्व, कॅल्शियम, ड जीवनसत्व, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कोलॅजन अशा घटकांचा समावेश करण्यास सांगतात.

डॉ. वासनिक सांगतात, "आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर असलेले पदार्थ तसेच तळलेले मांस यांचं प्रमाण कमी असावं."

"ज्या घटकांनी शरीरात दाह (इन्फ्लमेशन) वाढतं ते टाळावेत", असं ते सांगतात.

डॉ. वासनिक सांगतात, "स्ट्रेंग्थ ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, कमी ताण येणारे कार्डिओ व्यायाम तरुणांनी केले पाहिजेत. नितंब, मांडी, पायाचे स्नायू चांगले राहाण्यासाठी व्यायाम केले पाहिजेत."

डॉ. समीर चौधरीही योग्य आहारावर भर देतात. ते सांगतात, "20 ते 35 वयोगटातले लोक नेमकं आहाराकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या कार्टिलेजची झीज भरुन काढण्यासाठी विशिष्ट प्रथिनांची गरज असते. तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिडस्, ड जीवनसत्व आणि कॅल्शियम यांची गरज असते. तसेच कार्टिलेजमध्ये 80 टक्के पाणी असल्यामुळे योग्य प्रमाणात पाणीही पिणं गरजेचं आहे."

डॉ. चौधरी व्यायामाबरोबर काही इतर गोष्टी आवर्जून सांगतात. ते म्हणाले, "आवश्यकतेपेक्षा अतिरिक्त असलेल्या प्रत्येक 1 किलो वजनामागे तुमच्या गुडघ्यांवर चार ते सहापट जास्त ताण येत असतो. चांगले चप्पल, बूट वापरणे गरजेचं आहे. बैठं काम करत असाल तर प्रत्येक 45 मिनिटांनंतर तुम्ही उठून बाजूला गेला पाहिजे. केवळ भविष्यात कधीतरी शस्त्रक्रीया करावी लागू नये म्हणून आताच प्रयत्न करणे असा भाव मनात असू नये. तर आयुष्यभर चांगलं आरोग्यदायी राहाता यावं, नीट हालचाल करता यावी, आत्मविश्वास राहावा असा हेतू असला पाहिजे."

फिजिओथेरपी आणि योगासनांचा गुडघेदुखी कमी करण्यासाठी काय फायदा होतो?

"गुडघ्यांसंदर्भातले आजार कमी करण्यासाठी फिजिओथेरपीचा चांगला उपाय होतो तसेच त्याचा परिणाम डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोजलाही जातो", असं डॉ. संदीप वासनिक सांगतात.

"तसेच योगासनांमुळे एक पूरक उपचार म्हणून मदत होते. तरुणांमध्ये या दोहोंचा मेळ घालता आला तर ताकद वाढणे, लवचिकता वाढणे, एकूणच आरोग्य चांगलं राहाणं असे फायदे दिसतात", असं ते सांगतात.

दीर्घकाळ स्क्रीनसमोर किंवा मोबाईल वापरत एकाच जागी बसण्याने आपल्या एकूणच जीवनशैलीवर परिणाम होतो. या बैठ्या जीवनामुळे नितंब, मांडी अशा अनेक स्नांयूची ताकद कमी होते. साहजिकच गुडघ्यासारख्या सांध्यांना आधार कमी मिळतो.

बैठं काम करणाऱ्यांना काय करता येईल?

  • प्रत्येक पाऊण तासानंतर स्क्रीनसमोरुन उठून चालून येणं
  • फोनकॉल, मीटिंग उभं राहून करणं
  • हालचाल करणं
  • पाणी पिण्यासाठी, डबा खाण्यासाठी उठून दुसरीकडे जाणं
  • शक्य असेल तेव्हा लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणं
  • स्ट्रेचिंगचे व्यायाम कसे करायचे हे शिकून घेणं.

जीममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी आणि ॲथलिटसनी काय काळजी घेतली पाहिजे?

जीममध्ये स्ट्रेंग्थ ट्रेनिंग, क्रॉसफिट व्यायाम तसेच खेळाडूंना करावे लागणारे रोजचे व्यायाम हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मात्र ते करताना योग्य प्रशिक्षणाची आणि योग्य तंत्राची गरज आहे. व्यायामाचं तंत्र आत्मसात केलं नाही तर दुखापत होण्याची शक्यता आसते.

डॉ. समीर चौधरी सांगतात, "सध्या व्यायामाकडे तरुण लक्ष देत आहेत मात्र अतिताण देणाऱ्या व्यायामांमध्ये चुकीची पद्धत वापरल्यास त्रास होतो. योग्य ताकद, लवचिकता, योग्य तंत्र याचा अभ्यास करुनच व्यायाम केला पाहिजे. अनेक लोक बैठी जीवनशैलीतून उठून अचानक झटका आल्यासारखे व्यायाम करू लागतात. यामुळे सांध्यांवर ताण येऊ शकतो."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)