टॉयलेटमध्येही फोन घेऊन जाताय? मग हे नक्की वाचा

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोन हातातून बाजूलाच ठेवावासा वाटत नाहीये? जेवताना, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर ताबडतोब फोन हातात घेतल्याशिवाय करमत नाहीये का? इतकंच नाही तर टॉयलेटमध्येही जाताना मोबाईल घेऊन जात असाल तर ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे.

सोशल मीडियाचा फोनवर वापर, फोन कॉल्स, इमेल, मेसेज, रील्स अशा सतत उड्या मारत बसल्यामुळे शौचालयातही फोन घेऊन जावासा वाटतो. तिथला थोडासावेळही फोन पाहाण्यातच घालवल्यामुळे आपल्याला अनेक धोकादायक गोष्टींचा सामना करावा लागत आहे याची जाणिवही अनेकांना नसते.

त्यामुळेच मोबाईल फोन शौचालयात घेऊन जाणाऱ्यांना काय त्रास होतो याची माहिती येथे घेऊ.

नक्की त्रास काय होतो?

आपल्यापैकी अनेकजण विशेषतः तरुणांमध्ये फोन शौचालयातही घेऊन जाण्याची सवय दिसते. शौचालयात अर्धा तासापेक्षाही जास्त वेळ काढणारे लोक अनेक आजार ओढावून घेतात.

मोबाईल पाहात राहिल्यामुळे हे लोक बराचवेळ एकाच जागी बसून राहातात. यामुळे शौचासाठी मदत करणाऱ्या गुदद्वाराजवळील स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो.

जोर लावून मलत्याग करावा लागल्यामुळे या सर्व अवयवांचे विविध आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये मूळव्याध, बद्धकोष्ठ, फिश्चुला, फिशर अशा विविध आजारांचा समावेश आहे.

दीर्घकाळ एकाजागी बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरणामध्येही अडथळे येतात. या एकाच जागी बसून मलत्यागासाठी जोर लावल्यामुळे बद्धकोष्ठ आणि शौच अधिक घट्ट होण्याची प्रवृत्ती वाढते.

या जोर लावल्यामुळे गुदद्वाराजवळील वाहिन्यांवर ताण येतो, त्या सुजतात आणि विविध प्रकारचा संसर्ग तेथे होण्याची शक्यता बळावते. अशा लोकांना मग पुढे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

वास्तविक कमोड प्रकारच्या शौचालयामध्ये मूळातच आपल्या गुदद्वाराच्या जागेवर आणि तिथल्या स्नायूंवर ताण येतो.

त्यातही आपण दीर्घकाळ तेथेच बसून राहिलो तर आणखी ताण येण्याची शक्यता असते. मलत्यागाला उशीर होणं, त्रास होणं असं सुरू झालं की लोक आणखी जोर लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते समस्याचक्रात अडकतात.

त्यामुळेच कमीतकमी वेळात मलत्याग करण्याचा प्रयत्न करणे, तेथे फोन न वापरणे या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

शौचालयात फारवेळ बसून राहिल्यामुळे तसेच फोन पाहात राहिल्यामुळे आपल्या इतर अवयवांवरही ताण येतो. जसं की मान, पाठ दुखणे.

हात एकाच अवस्थेत ठेवल्यामुळे हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, पाय जड होणं किंवा काही काळासाठी हातपायच हलवता न येणं.

वाकून मोबाईल पाहात बसल्यामुळे मानेवर ताण येणं, कंबरेवर दीर्घकाळ ताण आल्याने अवघडणं असे त्रास होतात.

कोव्हिडच्या काळापासून गेल्या पाच वर्षांमध्ये बैठ्या जीवनशैलीचे परिणाम अधिक ठळक दिसू लागले आहेत. सतत बसून राहाणं, बसूनच काम करणं, घराबाहेर न पडणं, व्यायाम किंवा योगासनांचा अभाव, फास्टफूड आणि पाकिटबंद पदार्थांचं खाणं वाढलं आहे.

तसेच बहुतांश व्यवहार मोबाईलवर आल्यामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातच सतत फोन वापरण्याची जोड मिळाल्यामुळे तो शौचालयातही नेण्याची सवय अनेकांना लागली आहे.

एका जागी बसून राहिल्यामुळे हृदयासंबंधीचे आजार, मधुमेह, लठ्ठपणा, मान-पाठ दुखणे, स्नायू कमकुवत होणे, व्हेरिकोज व्हेन्स, स्ट्रोक, स्नायू आणि सांधे दुखणे असे त्रास होतातच. पण, त्याहून पोट सुटणे, अनावश्यक वजन वाढणे, चयापचय म्हणजे मेटॅबोलिजम मंदावणे अशा त्रासांमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

या बैठ्या जीवनशैलीमुळे चिंतारोग म्हणजे अँक्झायटी, नैराश्य म्हणजे डिप्रेशन, ताण म्हणजे स्ट्रेस किंवा इटिंग डिसॉर्डर्सचा त्रास संभवतो.

बसून राहिल्यामुळे काय होतं?

बैठी जीवनशैली असल्यास आणि कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यास तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो तसेच अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

दीर्घकाळ एकाच जागी बसल्याने रक्तातील साखरेचे आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राखण्याच्या शारीरीक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह, चिंता वाटणे आणि नैराश्य येणे, लठ्ठपणा, सांधे आणि स्नायूंमधील, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे तसेच स्ट्रोक आणि हृदयविकाराचा त्रास होतो.

दीर्घकाळ एका जागी बसल्याने पाठीच्या स्नायुंवरही ताण येतो आणि मणक्याच्या समस्या निर्माण होतात. बैठी जीवनशैली पाठदुखी, मानदुखी, ऑस्टिओपोरोसिस आणि व्हेरिकोज व्हेन्स सारख्या आजारांना आमंत्रण देते.

शौचालयात मोबाईल वापरण्याची सवय कशी मोडायची?

आता ही मोबाईल सगळीकडे वापरण्याची सवय कशी थांबवायची याकडे आपण जाऊ. आम्ही हा प्रश्न मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील जनरल सर्जन डॉ. नरेंद्र निकम यांना विचारला. ते म्हणाले, "शौचालयात असं फारवेळ बसून राहिल्यामुळे आपल्या पेल्विक मसल्स म्हणजे ओटीपोटाचे (नाभीपासून नितंबापर्यंतचे) स्नायू दुर्बल होतात. तसेच मूत्र आणि मलत्यागावरील नियंत्रणासंदर्भातले त्रास होतात. त्यामुळेच शौचालयात पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ वेळ घालवू नये. या भागावर अतिताण देऊ नये. ही परिस्थिती येई नये म्हणून दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यायलं पाहिजे, व्यायाम नियमित केला पाहिजे. आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्सचं प्रमाण जास्त असलं पाहिजे."

दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पोट बिघडलेलं असणं किंवा पोटात दुखणं अशी लक्षणं दिसत असली तर डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे, असंही डॉ. निकम सांगतात.

फोन फ्री झोन

डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात कार्यरत असणारे जनरल सर्जन डॉ. शाहिद परवेझही अनेक गोष्टींकडे लक्ष वेधतात.

ते सांगतात, "मूळव्याध किंवा त्यासंदर्भातील आजारांचे मूळ फक्त तंतुमय पदार्थ कमी खाण्यात नसून जास्त काळ शौचालयात बसणे, तेथे फोन वापरणे या सवयींमध्येही आहे. गुदद्वाराजवळील वाहिन्यांवर ताण आल्याने अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं. मूळव्याधामुळे रक्त येऊ लागल्यास अतिशय त्रास होतो. तसेच मोबाईल फोनवरील जंतूंचा तुमच्या चेहऱ्याशी, हाताशी जास्त संपर्क आल्यास तो संसर्ग पोटापर्यंत जाण्याची शक्यता असते."

डॉ. शाहिद परवेझ सांगतात तुम्ही तुमच्या घरात एक फोन फ्री झोन तयार केला पाहिजे. या भागात फोन वापरायचा नाही. झोपण्याची, खाण्याची जागा यामध्ये असावी तसेच शौचालयातही फोन वापरू नये अशी शिस्त घालून घेता येईल.

ते सांगतात, फोनच्या वापरावर थोडी मर्यादा आणता येईल. तसेच सतत बसून राहाण्याची सवय मोडता येईल. अध्येमध्ये विश्रांतीसाठी खुर्चीतून उठणं, हातापायाची थोजी हालचाल करणं, स्क्रीनचा वापर करत असू तर डोळ्यांना विश्रांती देणं असे उपाय करू शकतो.

बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध आणि फिशरचा त्रास

बद्धकोष्ठ किंवा मलत्यागाच्या एकूणच प्रक्रियेत अडथळे येणं पुढील अनेक समस्यांचं कारण ठरत.

एकदा पचनक्रिया बिघडली की गुदाशयावर ताण येतो त्यामुळे मुळव्याध आणि फिशर अशा समसन्या येतात. विशेषतः 45 वयाच्या पुढील लोकांमध्ये हा त्रास होतो.

या रुग्णांनाा मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिशर सारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा गंभीर प्रकरणांमध्ये बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयावर जास्त ताण आल्याने रक्त गोठू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशा स्थितीत भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

दीर्घकालीन बद्धकोष्ठता म्हणजे आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ पोट साफ न होणे. त्याच्या लक्षणांमध्ये पोट फुगणे, पोटदुखी, आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान ताण येणे आणि अपूर्ण मल बाहेर पडल्याची समस्या सतावणे. जर वेळीच उपचार केले नाहीत तर जास्त दाब आल्याने गुदाशयातील ऊतींचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे मूळव्याध आणि फिशर सारखी समस्या उद्भवते ज्यामुळे वेदना आणि रक्तस्त्राव होतो.

याबद्दल आम्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती घेतली

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील जनरल सर्जन डॉ. लकिन वीरा म्हणाले की, "दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची कारणे म्हणजे आहारात फायबरची कमतरता, व्यायामाचा अभाव, प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन, काही ठराविक औषधे, इरिटेबल बाऊल सिंड्रोम(आयबीएस) या सारख्या समस्या, गर्भधारणा तसेच वृद्धापकाळातील आतड्याच्या कार्यात येणारे अडथळे. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे गुदाशयातील नसांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे सूज येते आणि मूळव्याधाची समस्या उद्भवते. सतत ताण आल्याने रुग्णाच्या गुदद्वारात फोड किंवा जखमा होऊ शकतात. हे फोड गुदद्वाराच्या आत आणि बाहेर असे दोन्ही बाजूंना येऊ शकतात. ही स्थिती अधिक गंभीर झाल्यास त्यातून रक्तस्त्राव आणि वेदना देखील होऊ शकतात."

डॉ. वीरा सांगतात, "45-65 वयोगटातील अंदाजे 20% लोकांना पोट साफ होत नसल्याच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. दररोज, 10 पैकी 2 व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि त्यामुळे गुदाशयावर ताण पडल्याने त्यांना मूळव्याध आणि फिशरचा धोका उद्भवतो. रुग्णांना बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशर यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल जागरुक करुन त्यांना स्टूल सॉफ्टनर घेण्याचा सल्ला देखील दिला जातो."

यानंतर मुंबईतल्या झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, सध्या आमच्याकडे येणाऱ्या बहुतांश रुग्णांना बद्धकोष्ठतेची समस्या सतावतेय. 45 ते 65 वयोगटातील सुमारे 15% लोकांना दररोज शौचास न होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन येतात.

बद्धकोष्ठतेचे वेळीच व्यवस्थापन केल्यास मूळव्याध आणि फिशरसारख्या गुंतागुंत टाळता येते. जांभूळ, सफरचंद, चिया सीड्स, गाजर आणि बीट यांसह फायबरयुक्त आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि पुरेसे पाणी पिणे हे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते. मल विसर्जन करताना जास्त ताण देणे टाळा आणि प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. वेळेवर उपचार केल्याने दीर्घकालीन समस्या टाळता येते आणि मूळव्याध आणि गुदाशय आणि गुदद्वाराला भेगा पडणे यासारख्या गुंतागुंतीचा धोका कमी होतो."

अर्थात जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.