You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मूळव्याध म्हणजे काय, त्यातून कसं बरं व्हायचं? 10 प्रश्नं आणि त्यांची उत्तरं
मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे. बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणं आहेत.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी 50 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी याचा त्रास होतो. यातील 5 टक्के लोकांना याचा त्रास कायमस्वरुपी राहातो.
बीबीसीने मूळव्याध निवारणतज्ज्ञ डॉ. वाणी विजय यांच्याशी या आजारावर चर्चा केली आणि उपचारांबद्दल जाणून घेतलं. डॉ. वाणी विजय यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
1. मूळव्याध काय असतो आणि त्याची कारणं काय असतातं?
गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत.
शौचाच्यावेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं, बराच काळ शौचालयात बसणं, बद्धकोष्ठ अशी काही याची कारणं आहेचय तसेच सतत अतिसार होणं, वजन वाढलेलं असणं, आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स कमी असणं, पाणी कमी पिणं, व्यायाम करताना अतिश. जड वजनं उचलणं यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो.
या अशा गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठ आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.
2. मूळव्याधाचे प्रकार किती आहेत आणि कोणते?
मूळव्याध हा गुदद्वाराच्या बाहेर असलेला आणि गुदद्वाराच्या आतला. आत असलेला मुळव्याधाचा त्रास कधीतरीच होतो. मात्र या भागावर ताण आल्यास त्रास होतो.
सतत ताण वाढत गेल्यास आत असलेले मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात. बाहेर असलेल्या मुळव्याधामुळे तेथे खाज येणे, रक्त येणे असे त्रास सुरू होतात.
काही रुग्णांच्या तेथिल रक्तवाहिन्या फुगून फुटू शकतात आणि रक्ताची गाठही तयार होते.
3. हा आजार कोणत्या वयोगटातील लोकांना होतो?
हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.
साठी आणि सत्तरीमधील लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळव्याधाचा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढते.
लहान मुलांमध्ये हा आजार फारसा आढळत नाही. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मल साठून राहाणं, शौचाला बराच वेळ लागणं असा त्रास होऊ शकतो.
4. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मूळव्याध होतो का?
अर्थात होतो. आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली, सवयींमुळे असे आजार होत आहेत. लोक भरपूर पिझ्झा, चिझ, बर्गरसारखं फास्टफूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
तसंच लोक आजकाल भाज्या, फळं कमी खातात, पाणी कमी पितात त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा यात मोठी भूमिका आहे.
5. मूळव्याध झालेल्यांनी आहारातील बदलांबद्दल कोणती काळजी घ्यावी?
मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच लोकांनी आहारात बदल करावा. मैदा तसेच फास्ट फूड खाणं टाळावं. तसेच मूळव्याध कोणत्याही प्रकारचा असो सकस आहार घेतला पाहिजे.
6. मांसाहार करणाऱ्यांना याबाबतीत कोणता त्रास होतो?
आपण जेव्हा चिकन, मटण, बिफ, पोर्क करी सारखे मांसाहारी पदार्थ खातो तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या आतड्यांना जास्त पाण्याची गरज लागते.
जर अधिक प्रमाणात पाणी प्यायले नाही तर मग पचनासंदर्भातील त्रास होऊ शकतो आणि हीच स्थिती कायम राहिली तर मूळव्याध होऊ शकतो.
त्यामुळे मांसाहारी लोक असा त्रास असेल तर मासे- अंडी खाऊ शकतात. ते पचवायला तुलनेत सोपं आहे.
7. घरगुती उपायांनी मूळव्याध बरा होतो का?
मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच घरगुती उपायांचा उपयोग होतो. फळं, भाज्या खाणं, जिरं घातलेलं पाणी पिणं याचा लाभ होऊ शकतो.
8. ऑपरेशनची गरज कधी लागते?
खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली बदलूनही तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर ऑपरेशन करावं लागतं.
9. मूळव्याधावर उपचार काय आहेत?
सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधं घेऊन आणि आहार-जीवनशैलीत बदल करुन उपचार करता येतात.
पण काहीवेळेस पुढील टप्प्यांतील मुळव्याधावर ऑपरेशन हा एकमेव उपाय उरतो. दीर्घकाळ मूळव्याध असेल तर दररोज शौचाला, खुर्चीत बसण्याला त्रास होतो.
रक्तस्राव तसेच मांसल गाठ तयार होणं याचा त्रास होतो. अशा स्थितीत शस्त्रक्रियेमुळे योग्य परिणाम होऊ शकेल. ऑपरेशननंतरही योग्य आहार आणि जीवनशैलीची सवय कायम ठेवावी लागते.
10. मूळव्याधावर कायमचा उपाय काय आहे?
आरोग्यदायी जीवनशैली हाच मूळव्याधावर कायमचा उपाय आहे.
काही लोकांना ऑपरेशननंतरही मूळव्याध परतपरत येण्याची शक्याात असते. त्यांनी चांगला आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)