'मी त्यांच्यासाठी मांसाचा तुकडा होते', स्मार्ट ग्लासेसद्वारे महिलांचं चित्रीकरण अन् छळाचं प्रकरण नेमकं काय?

    • Author, मॉली स्टॅझिकर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिलारा या लंडनच्या एका स्टोअरमध्ये काम करतात. एक दिवस दुपारच्या जेवणाची सुटीत एक एक उंच माणूस त्यांच्याकडं आला. "लाल केसांवरून तुम्हाला काहीतरी धक्का बसला असावा असं वाटतं," असं तो म्हणाला.

दोघेही लिफ्टपर्यंत आले तरी त्यानं बोलणं सुरू ठेवलं. नंतर त्यानं दिलारा यांना त्यांचा फोन नंबरही मागितला.

या सर्व संभाषणात तो माणूस स्मार्ट ग्लासेस (गॉगल किंवा चष्मा)द्वारे गुप्तपणे त्यांचं चित्रीकरण करत होता., हे दिलारा यांच्या लक्षातच आलं नाही. हे गॉगल किंवा चष्मे सामान्य चष्म्यांसारखेच दिसतात. मात्र त्यांच्यावर एक अतिशय छोटा कॅमेरा असतो. या कॅमेऱ्यात व्हीडिओ रेकॉर्ड होऊ शकतो.

त्या माणसानं दिलारा यांचं हे चित्रीकरण नंतर टिकटॉकवर पोस्ट केलं. या व्हीडिओला 13 लाख व्ह्यूज मिळाले.

दिलारा 21 वर्षांच्या आहेत. त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या की, "ते पाहून मला फक्त रडावंसं वाटत होतं."

ज्या माणसानं दिलारा यांचं चित्रीकरण केलं, नंतर असं दिसून आलं की, त्यानं पुरुषांनी महिलांशी कसं बोलावं, त्यांच्याशी कसा संवाद करावा यासंदर्भात टिप्स देत, गुप्तपणे चित्रित केलेले अनेक व्हीडिओ टिकटॉकवर पोस्ट केले होते.

दिलारा यांना असंही दिसून आलं की त्यांचा फोन नंबर त्या व्हीडिओमध्ये दिसत होता. त्यामुळे त्यांच्यावर फोन कॉल्स आणि संदेशांचा भडीमार झाला.

किम यांचंही केलं चित्रीकरण

किम या अशाच आणखी एक महिला आहेत. गेल्या उन्हाळ्यात पश्चिम ससेक्समधील एका समुद्रकिनाऱ्यावर दुसऱ्या एका पुरुषानं त्यांचं चित्रीकरण केलं होतं.

या पुरुषानं स्मार्ट ग्लासेस घातले होते. त्यानं किम यांच्या बिकिनीची प्रशंसा करत त्यांच्याशी संभाषण सुरू केलं होतं.

त्यानंतर त्या पुरुषानं किम यांना विचारलं की, त्या कुठे राहतात. तसंच त्यानं किम यांच्याशी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला होता.

किम (56 वर्षे) यांना त्यांचं गुप्तपणे चित्रीकरण होतं आहे याची कल्पना नव्हती. त्या दोघांमध्ये गप्पा सुरू असताना किम यांनी त्यांच्या कंपनीबद्दल आणि कुटुंबाबद्दलची माहिती त्या व्यक्तीला दिली.

नंतर त्या व्यक्तीनं डेटिंगच्या सल्ल्याच्या नावाखाली 2 व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट केले. या व्हीडिओंना टिकटॉकवर लगेचच 69 लाख व्ह्यूज मिळाले. तर इन्स्टाग्रामवर त्यांना 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

बीबीसीनं टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर असे शेकडो शॉर्ट व्हीडिओ पाहिले आहेत. वेगवेगळ्या अनेक पुरुष इन्फ्लुएन्सर्सनी ते पोस्ट केलेले आहेत. हे इन्फ्लुएन्सर्स महिलांना कसं पटवायचं, त्यांच्याशी फ्लर्ट कसा करायचा, याबद्दल सल्ला देत असल्याचा दावा करतात. अनेक प्रकरणांमध्ये या व्हीडिओंचं मेटा स्मार्ट ग्लासेस वापरून गुप्तपणे चित्रीकरण केल्याचं दिसून येतं.

किम यांचा व्हीडिओ ज्या व्यक्तीनं पोस्ट केला होता, त्याच्यासह अनेक इन्फ्लुएन्सर त्यांच्या ग्राहकांना देत असलेल्या या सल्ल्यांमधून कमाई करतात.

"लेस्टर स्क्वेअरमध्ये सोनेरी केस असलेल्या एका गोंडस महिलेला पटवताना" असं शीर्षक असलेला आणि माझ्याशी संभाषण करून माझं गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आलेला माझा एक व्हीडिओ युट्यूबवर पाहिल्यावर मी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली.

मी या प्रकरणात तपास करत केल्यावर, माझ्या लक्षात आलं की असा प्रकार घडणारी मी काही एकटीच नाही.

कायद्याच्या मर्यादा

दिलारा आणि किम या युके, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील 7 अशा महिलांपैकी होत्या, ज्यांनी बीबीसीला त्यांचं याप्रकारे गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आल्याचं सांगितलं.

या सर्वांनी आम्हाला सांगितलं की, हे व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आल्याचं माहीत झाल्यानंतर त्यांना शोषण झाल्यासारखं वाटलं आणि त्या दु:खी झाल्या.

जेमी हर्वर्थ प्रायव्हसी प्रकरणांचे वकील आहेत. ते म्हणाले की, युकेमध्ये सध्या, एखाद्याचं सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास त्याविरोधात कोणताही विशिष्ट कायदा नाही.

मात्र "सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्याचा अर्थ असा नाही की त्याप्रकारे चित्रीकरण करणं आणि तो व्हीडिओ ऑनलाइन अपलोड करणं 'योग्य' आहे."

दिलारा यांनी या व्हीडिओची टिकटॉककडे सुरुवातीला तक्रार केल्यानंतर, कंपनीनं त्यांना सांगितलं की त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कोणतंही उल्लंघन करण्यात आल्याचं आढळलं नाही. मात्र, बीबीसीनं संपर्क साधल्यानंतर, टिकटॉकनं नंतर तो व्हीडिओ काढून टाकला.

तसंच कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी त्यांच्या 'दमदाटी करणं आणि छळ करणं' यासंदर्भातील समुदायाशी निगडीत मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणारे व्हीडिओ काढून टाकेल.

ज्या व्यक्तीनं किमचा व्हीडिओ तयार केला होता, त्या व्यक्तीला किमनं त्या व्हीडिओमधून त्यांच्या कामाबद्दलची आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती काढून टाकण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानं तसं केलं नाही.

एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन कोएलिशनच्या रेबेका हिचेन म्हणतात की, स्मार्ट ग्लासेसचे उत्पादक "महिलांची सुरक्षितता आणि कल्याण यापेक्षा नफ्याला प्राधान्य देत आहेत आणि त्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना लागू केल्या पाहिजेत."

मात्र समाजसेवी संस्था आणि तज्ज्ञ इशारा देतात की, हे व्हीडिओ युकेच्या ऑनलाइन सेफ्टी ॲक्टनं बेकायदेशीर ठरवलेल्या कॉन्टेंटच्या कोणत्याही विशिष्ट श्रेणीत बसणार नाहीत.

'मन खचून जातं'

दिलारा यांच्या एका मैत्रिणीनं दुसऱ्या दिवशी तो व्हीडिओ पाठवल्यानंतर त्यांनी पाहिला. त्या म्हणतात, "तुम्ही खचून जाता आणि काहीही करू शकत नाही."

किम आणि दिलारा या दोघी म्हणतात की, अशाप्रकारे चित्रित केलं जणं हा एक 'उल्लंघन' वाटलं आणि त्यांना वाटतं की यासंदर्भात काहीतरी बदल होण्याची आवश्यकता आहे.

किम यांना वाटतं की, लोकांच्या संमतीशिवाय त्यांचं चित्रीकरण होऊ नये यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी कायदे आणले पाहिजेत.

"इतरांचं चित्रीकरण करण्याचा आणि त्यांचं शोषण करण्याचा आणि त्यांना एक लैंगिक वस्तू म्हणून सादर करण्याचा, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर करून पैसे कमावण्याचा अधिकार कोणालाही नाही," असं त्या म्हणतात.

किम आणि दिलारा यांचं चित्रीकरण करणाऱ्या त्या दोन पुरुषांशी बीबीसीनं संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. चित्रीकरणासाठी या दोघांनी रे-बॅन मेटा एआय ग्लासेसचा वापर केला होता.

जो माणूस दिलारा यांच्याशी बोलला होता, त्यानं पारदर्शक चष्मा घातला होता. तर जो माणूस किमशी बोलला होता, त्यानं सनग्लासेस घातले होते.

अशा गॉगल्सच्या विक्रीतील वाढ आणि सक्षम उपाययोजनांची आवश्यकता

असे चष्मे किंवा गॉगल्सची लोकप्रियता वाढते आहे. एसिलॉरलक्सोटिका या आयवेअर उत्पादक कंपनीच्या मते, ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान अशा 20 लाख चष्मे किंवा गॉगल्सची विक्री झाली.

मेटानं बीबीसीला सांगितलं की त्यांच्या चष्म्यामध्ये एलईडी लाईट आहे. जेव्हा कोणीही त्याचा वापर करून व्हीडिओ किंवा फोटो काढतो, तेव्हा तो लाईट सक्रिय होतो.

या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीचं म्हणणं आहे की, या लाईटमुळे या चष्म्यांद्वारे जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते इतरांना समजतं. तसंच वापरणाऱ्यानं हा लाईट झाकू नये, यासाठी त्यात टेंपर डिटेक्शन म्हणजे उपकरणाशी छेडछाड शोधणारं तंत्रज्ञान आहे.

मात्र बीबीसीनं ऑनलाइन असे असंख्य व्हीडिओ पाहिले आहेत, ज्यातून दाखवण्यात आलं आहे की, हा लाईट झाकला जाऊ शकतो किंवा पूर्णपणे बंद केला जाऊ शकतो.

चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चष्म्यांमध्ये रेकॉर्डिंग सुरू असल्याचा संकेत देणारा कोणताही लाईट दिसल्याचं किम, दिलारा किंवा बीबीसीशी बोललेल्या इतर कोणत्याही महिलेनं सांगितलं नाही.

जेमी हर्वर्थ म्हणतात, "जर मेटा एआय ग्लासेस वापरून हे व्हीडिओ चित्रित करण्यात आले असतील, ज्यात सामान्यपणे रेकॉर्डिंग होत असताना पांढरा लाईट दिसतो, तर यामुळे हे प्रायव्हसीशी संबंधित वैशिष्ट्य पुरेसं आहे की नाही आणि अशा तंत्रज्ञानासाठी अधिक मजबूत उपाययोजनांची आवश्यकता आहे का, याविषयीची चिंता निर्माण होते."

जेस फिलिप्स, महिला आणि मुलींवरील हिंसाचारापासून संरक्षण (मिनिस्टर फॉर सेफगार्डिंग अँड व्हायोलन्स अगेंस्ट वीमेन अँड गर्ल्स) मंत्री आहेत.

जेस फिलिप्स यांनी बीबीसीला दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे, "महिला आणि मुलींचं गुप्तपणे चित्रीकरण करणं हे अतिशय वाईट कृत्य आहे. आम्ही कोणालाही अशा कृत्यांमधून फायदा मिळवू देणार नाही."

दिलारा यांच्यावर फोन कॉल्सचा भडिमार

दिलारा यांचा फोन नंबर त्यांच्या व्हीडिओमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे दिलारा म्हणतात की काही आठवडे त्यांच्यावर फोन कॉल्स, मेसेजचा 'सतत' भडिमार होत होता. काहीवेळा तर मध्यरात्रीच्या सुमारासदेखील फोन, मेसेज येत होते.

दिलारा म्हणतात की एकदा फोनवर एका व्यक्तीनं त्यांना म्हटलं होतं, "तू किती मूर्ख आहेस हे तुला माहिती आहे का? तुला याचा पश्चाताप होतो का? तुझा गैरफायदा घेणं किती सोपं आहे, तुला माहिती आहे का?"

त्या म्हणतात, काही पुरुष त्यांच्या कामाच्या ठिकाणी आले आणि व्हायरल झालेल्या व्हीडिओमधील पहिलीच ओळ त्यांनी वापरली किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती विचारली.

ज्या व्यक्तीनं त्यांचा व्हीडिओ बनवला होता, तो व्यक्ती टिकटॉकवर असे अनेक गुप्तपणे चित्रित केलेले व्हीडिओ पोस्ट करतो. त्याचबरोबर त्याचा डिस्कॉर्डवर एक समुदाय आहे. डिस्कॉर्ड हा एक मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून तो गेमर्समध्ये लोकप्रिय आहे. डिस्कॉर्डवर तो व्यक्ती सल्ला आणि इतर व्हीडिओदेखील पोस्ट करतो.

टिकटॉकनं दिलारा यांचा व्हीडिओ काढून टाकल्यानंतर, त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "दमदाटी करणं आणि छळ करणं यासंदर्भातील आमच्या समुदायाविषयीच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याबद्दल आम्ही ते कॉन्टेंट काढून टाकलं आहे. तसंच 'फॉर यू फीड'साठी इतर कॉन्टेंट अपात्र ठरवलं आहे."

या सोशल मीडिया कंपनीनं बीबीसीला सांगितलं की ते अशा कॉन्टेंटला परवानगी देत नाहीत, ज्यात वैयक्तिक माहिती असेल आणि "त्याचा वापर पाठलाग करणं, ओळख चोरणं, फसवणूक करणं किंवा इतर अपाय करण्यासाठी केला जाईल."

त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरील एका पोर्टलकडे लक्ष वेधलं, त्यात प्रायव्हसीबद्दलची चिंता, समस्येची तक्रार केली जाऊ शकते.

'तुझी आई व्हायरल झाली आहे'

किम म्हणतात की, मुलानं त्यांना पहाटे 5 वाजता फोन करून सांगितल्यावर त्यांना त्यांच्या व्हीडिओबद्दल समजलं. त्यांच्या मुलाला मित्रांकडून मेसेज आले होते. त्यात "तुझी आई व्हायरल झाली आहे" असं म्हटलं होतं.

किम म्हणतात गेल्या उन्हाळ्यात पश्चिम विटरिंग समुद्र किनाऱ्यावर त्यांना चित्रीत करण्यात आल्यानंतर, त्यांना पुरुषांकडून हजारो मेसेज आले. त्यातील काही मेसेज लैंगिक स्वरुपाचे अत्यंत आक्षेपार्ह असे होते.

त्या म्हणतात की 6 महिन्यांनंतर अजूनही त्यांच्यावर मेसेजेसचा भडिमार होतो आहे.

किम यांच्या मते, ज्या व्यक्तीनं त्यांचा व्हीडिओ तयार केला, त्याला तो काढून टाकण्यास सांगण्यात काहीही अर्थ नव्हता. कारण "त्या व्हीडिओला खूप जास्त व्ह्यूज मिळाले होते".

त्या म्हणतात की, या व्हीडिओत त्यांच्या नोकरीबद्दल बोलल्या होत्या. तो भाग काढून टाकण्यास त्या व्यक्तीनं जेव्हा नकार दिला, तेव्हा त्यांना "पूर्णपणे अपमानित झाल्यासारखं वाटलं".

"मी फक्त एक वस्तू होते. मासांचा एक तुकडा."

याप्रकारचे व्हीडिओ बनवणारे काही इन्फ्लुएन्सर्स, अशा ग्राहकांकडूनही पैसे कमावतात, जे महिलांशी संपर्क कसा करावा, कसं बोलावं याबद्दलच्या कोचिंगसाठी आणि सल्ल्यासाठी पैसे देतात.

जर या इन्फ्लुएन्सर्सचं कॉन्टेंट पुरेसं लोकप्रिय असेल, तर ते टिकटॉकच्या क्रिएटर रिवार्ड प्रोग्रॅममधून पेमेंट मिळण्यासाठी पात्र ठरतात.

कायदेशीर अडचणी

प्रायव्हसीसाठी काम करणारे वकील जेमी हर्वर्थ म्हणतात की, एखाद्याचं सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करणं, हा कोणताही विशिष्ट गुन्हा नाही. तरीही याप्रकारचं कृत्य करणं, हे एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीच्या अधिकारांचं उल्लंघन असू शकतं.

"कायदा व्यक्तीच्या खासगी आयुष्याच्या अधिकाराचं रक्षण करतो. कायदा, सार्वजनिक ठिकाणी त्याचबरोबर खासगी ठिकाणी व्यक्तींचं रक्षण करू शकतो," असं ते म्हणतात.

बीट्रिझ किरा ससेक्स विद्यापीठात कायद्याच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या मात्र म्हणतात की "महिलांना त्रास देण्यासाठीच्या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक वापराची" दखल घेणं किंवा त्याचा अंतर्भाव करणं कायद्यासाठी कठीण आहे.

त्या सुचवतात की नवीन तंत्रज्ञानाला हाताळण्यासाठी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या नियमनासाठी यूकेमध्ये अधिक लवचिक दृष्टीकोन असावा.

'एंड व्हायलन्स अगेंस्ट वुमेन कोएलिशन'च्या रेबेका हिचेन म्हणतात की, टिकटॉकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांना "वाट न पाहता सक्रियपणे प्रतिबंधात्मक कारवाई करणं बंधनकारक करण्यात आलं पाहिजे".

त्या पुढे म्हणतात, 'ऑफकॉम' या मीडिया नियामकानं, महिला आणि मुलींवरील हिंसेबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. "यासाठी एक बंधनकारक आचारसंहिता बनवली पाहिजे आणि त्याचं पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांचाही त्यात समावेश असला पाहिजे".

आम्ही ज्या महिलांशी बोललो, त्या म्हणतात की गुप्तपणे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे आणि ते व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आल्यामुळे त्या नेमक्या कोणावर विश्वास ठेवू शकतात, याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

किम म्हणतात, "मी फक्त खेळीमेळीनं वागत होते. मात्र आता माझ्या विश्वासाला तडा गेला आहे, ही खूप दु:खाची बाब आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)