पूर्व प्रियकराच्या पत्नीला महिलेनी दिले HIV इंजेक्शन, काय आहे नेमकं प्रकरण?

    • Author, तुलसी प्रसाद रेड्डी
    • Role, बीबीसीसाठी

ज्या पुरुषावर प्रेम होते त्याने आपल्याशी लग्न न करता इतर दुसऱ्या महिलेशी लग्न केले या रागातून एका महिलेनी त्या पुरुषाच्या पत्नीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचले. आंध्रप्रदेशातील कर्नूलमध्ये ही घटना घडली आहे. संबंधित महिलेला आणि तिच्या साथीदारांना या प्रकरणात कर्नुल पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित महिलेनी काही काळ नर्स म्हणून देखील काम केले आहे.

ज्या महिलेला इंजेक्शन देण्यात आलं ती महिला डॉक्टर आहे. कर्नूल थ्री टाऊन पोलीस ठाण्यात या महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून ही घटना 9 जानेवारीला घडल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की कर्नूलच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या एका महिला डॉक्टर हॉस्पिटलमधून स्कूटीवरून घरी जात होत्या. त्यावेळेस केसी कालव्याच्या काठाजवळ काही अज्ञात पुरुषांनी या महिलेला धडक दिली. त्यावेळेस खाली पडलेल्या या महिला डॉक्टरला मदत करण्याच्या बहाण्यानं तिला एचआयव्ही संक्रमित रक्ताचं इंजेक्शन दिलं.

कर्नूलचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) बाबू प्रसाद यांनी या प्रकरणाची माहिती बीबीसीला दिली.

कर्नूलचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) बाबू प्रसाद यांनी सांगितलं की, "एक महिला डॉक्टर स्कूटीवरून केसी कालव्याच्या रस्त्यानं जात होत्या. त्यावेळेस दुसऱ्या एका वाहनानं त्यांच्या स्कुटीला धडक दिली. त्यामुळे त्या महिला डॉक्टरची स्कूटी घसरली आणि त्या खाली पडल्या. त्यातून त्यांना किरकोळ दुखापत झाली."

"त्यानंतर, लगेचच तिथे असलेल्या दोन महिलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचं सांगून एका ऑटोरिक्षामध्ये बसवलं. त्यावेळेस त्या महिला डॉक्टरच्या लक्षात आलं की त्यांनी तिला इंजेक्शन दिलं आहे. नंतर या महिला डॉक्टरच्या पतीनं यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे."

"आरोपींपैकी एक महिला नर्स आहे. आरोपी नर्सनं त्या महिला डॉक्टरला इंजेक्शन देण्याचा कट रचला, कारण तिचं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं, त्यानं तिच्याऐवजी दुसऱ्या महिलेशी म्हणजे त्या डॉक्टरशी लग्न केलं होतं. त्यामुळे ती रागावलेली होती."

पोलिसांनी सांगितलं की आरोपी महिलेनं दुसऱ्या एका नर्सच्या मदतीनं सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एचआयव्ही रुग्णांचं एचआयव्ही संक्रमित रक्त घेतलं होतं.

पोलीस उपअधीक्षक म्हणाले, "आरोपी महिलेनं तिच्या मैत्रिणीच्या आणि तिच्या दोन मुलांच्या मदतीनं हे इंजेक्शन दिलं आणि ते पळून गेले. पोलीस तपासातून सर्व प्रकार समोर आल्यानंतर आम्ही त्या चौघांना अटक केली आहे."

"आम्ही त्यांचा खरा हेतू काय होता आणि त्या इंजेक्शनमध्ये कोणत्या प्रकारचा विषाणू होता, याचाही तपास करणार आहोत. तसंच या प्रकरणात इतर कोणाचा समावेश आहे का याचाही आम्ही तपास करणार आहोत आणि त्यांच्याविरुद्धदेखील आरोपपत्र दाखल करू."

ते पुढे म्हणाले, "या प्रकरणात तांत्रिक पुराव्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही सीसीटीव्हीमधून काळजीपूर्वक फुटेज गोळा केलं आहे."

'मत्सरातून आखला इंजेक्शन देण्याचा कट'

पोलिसांनी सांगितलं की आरोपी महिलेनं तिच्यापासून दुरावलेल्या प्रियकराच्या बाबतीतील मत्सरापोटी हे कृत्य केलं आहे.

"शिकत असताना आरोपी महिला आणि पीडित महिलेचा पती, जो डॉक्टर आहे, तो वर्गमित्र होते. त्यांची मैत्री झाली. त्यातून हे दोघं प्रेमात पडले. नंतर ते दोघंही विभक्त झाले. त्या पुरुष डॉक्टरचं लग्न एका महिला डॉक्टरशी झालं. तर आरोपी महिला, जी नर्स होती, ती अविवाहित राहिली."

आरोपी महिलेला तिच्या प्रियकराच्या म्हणजे डॉक्टरच्या पत्नीबद्दल मत्सर वाटत होता. डॉक्टरच्या पत्नीला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी आरोपीनं पीडित महिलेच्या नकळत तिला इंजेक्शन द्यायचं होतं. त्यामुळे आरोपीनं हॉस्पिटलमधील तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडून एचआयव्ही विषाणुचा नमुना मिळवला. मग घटनेच्या दिवशी आरोपी महिलेनं तिला त्या विषाणूचं इंजेक्शन टोचलं.

"हे कृत्य करण्यासाठी आरोपीनं आवश्यक काम करून देण्याचं आश्वासन देत तिच्या मैत्रिणीची आणि तिच्या मुलांची मदत घेतली. त्यांनाही या गुन्ह्यात सामील करून घेण्यात आलं," असं पोलीस उपअधीक्षक म्हणाले.

आरोपीला अटक कशी झाली?

कर्नूल थ्री टाऊनचे सर्कल इन्स्पेक्टर (सी आय) शेषय्या यांनी बीबीसीला सांगितलं की आरोपीनं तिच्या मैत्रिणीच्या आणि अदोनीमध्ये राहणाऱ्या तिच्या मुलांच्या मदतीनं हा कट आखला होता.

सर्कल इन्स्पेक्टरनं सांगितलं की, आरोपीची मैत्रीण आणि तिचा मुलगा, जो अदोनीहून आला होता, ते आधी मोटरसायकलवरून आले. त्यांनी पीडित महिलेच्या स्कूटीला धडक दिली. त्यामुळे ती महिला डॉक्टर खाली पडली. त्यानंतर आरोपीच्या मैत्रिणीची मुलगी आणि आरोपी तिच्या मागे आल्या आणि त्यांनी इंजेक्शन दिलं.

सर्कल इन्स्पेक्टर शेषय्या म्हणाले, "महिला डॉक्टरला जेव्हा संशय आला की तिला इंजेक्शन देण्यात आलं आहे, तेव्हा तिनं या सर्वांचे चेहरे दिसतील असे फोटो मोबाईलमध्ये काढले. या फोटोंच्या, आरोपींच्या कपड्यांच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही तपास केला."

"ज्या वाहनानं महिला डॉक्टरला धडक दिली होती, त्या वाहनाचा नंबर आम्ही शोधून काढला. ते वाहन आरोपीच्या नावावर होतं. मात्र आम्ही आरोपीची कसून चौकशी केल्यावरही तिनं गुन्ह्याची कबुली दिली नाही."

नंतर आरोपीनं तिचा गुन्हा कसा कबूल केला, हेदेखील शेषय्या यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "आम्ही तिच्या फोन कॉल्सची लिस्ट तपासली. त्यात जी 17 जणांशी बोलली होती, त्यापैकी 15 जण आमच्या संपर्कात आले. फक्त 2 जण आले नाहीत. सर्वजण आमच्याशी सामान्यपणे बोलले. मात्र फक्त एकजण खोटं बोलला. आम्ही त्याची चौकशी केली. तसंच जे 2 जण संपर्कात आले नव्हते, त्यांनादेखील पकडलं."

"आरोपीनं स्वत:ची मोटरसायकल दुसऱ्या कोणाला तरी दिली होती. ही मोटरसायकल कोणाला देण्यात आली होती, याचा आम्ही तपास केल्यावर, आम्हाला आणखी एक नंबर मिळाला. हा नंबरदेखील आरोपीच्या कॉल लिस्टमध्ये होता. जे लोक आमच्या संपर्कात आले नव्हते, त्यांच्याशी हा नंबर जुळला. आम्ही त्या सर्वांचा शोध घेतला आणि हे सर्वजण गुन्ह्याच्या ठिकाणी असल्याचं आढळून आलं."

"त्यानंतर जेव्हा त्या सर्वांना आरोपीसमोर उभं करण्यात आलं, तेव्हा आरोपी महिलेनं तिचा गुन्हा कबूल केला," असं ते म्हणाले.

एचआयव्हीचे सॅम्पल कसे मिळवण्यात आले?

कर्नूलच्या सरकारी हॉस्पिटलचे अधीक्षक व्यंकटेश्वरलू यांनी बीबीसीला सांगितलं की आरोपी नर्सनं कर्नूलच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या आणखी एका नर्सच्या मदतीनं एचआयव्हीचे सॅम्पल मिळवण्यात आले.

कर्नूलच्या सरकारी हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, "सरकारी हॉस्टिपलमध्ये काम करत असलेल्या एका नर्सनं एचआयव्हीचे सॅम्पल घेतले. या दोघांची पूर्वी प्रशिक्षणाच्या वेळेस कुठेतरी भेट झाली होती."

"ही नर्स रात्रपाळीवर असताना तिनं आरोपीला एचआयव्हीचा नमुना दिला होता. आम्ही तिलादेखील नोटीस बजावली आहे. या नर्सला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतं. ज्या महिलेला इंजेक्शन देण्यात आले ती महिलादेखील आमच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. सध्या ती सुट्टीवर आहे."

जर मी मागितला तर मला विषाणूचा नमुना द्याल का?

सर्कल इन्स्पेक्टर शेषय्या म्हणाले की तपासातून हे समोर येईल की आरोपीला तिची मैत्रिणी असलेल्या दुसऱ्या नर्सनं एचआयव्ही विषाणूचा नमुना का दिला. त्याच्या आधारे तिच्या कारवाई केली जाईल.

"आरोपी महिलेचं डॉक्टरवर प्रेम आहे. मात्र डॉक्टरनं तिच्याऐवजी दुसऱ्या महिला डॉक्टरशी लग्न केल्यामुळे तिला मत्सर वाटत होता. ते दोघेही शाळेपासूनचे वर्गमित्र आहेत. आरोपी महिलेनं नर्सिंगमध्ये एम.एससी. केलेलं आहे. आधी ती नर्स म्हणून काम करत होती. मात्र आता ती बेरोजगार आहे."

"सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सनं आरोपीला एचआयव्हीचा नमुना का दिला, हे तपासातून समोर येईल," असं सर्कल इन्स्पेक्टर म्हणाले.

ज्या महिलेला इंजेक्शन देण्यात आले त्या महिलेच्या पतीशी बीबीसीने फोनवरून बोलण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन घेतला नाही.

आम्ही आरोपीच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यापैकी कोणीही उपलब्ध झालं नाही.

(गोपनीयतेच्या कारणास्तव, या प्रकरणातील पुढील तपशील, संस्था, व्यक्ती आणि त्यांची पदं यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.