'माझ्या मुलीला थॅलेसेमिया होता, आता HIV ही झाला, इथली आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त झालीय'

    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"माझी मुलगी आधीपासूनच थॅलेसेमियाग्रस्त होती. आता तिला एचआयव्ही झाला आहे. इथली वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे."

मध्य प्रदेशातील सतनामध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांमध्ये ज्यांची मुलगीदेखील आहे, त्या व्यक्तीचं हे म्हणणं आहे.

त्यांची मुलगी त्या पाच मुलांपैकी एक आहे, ज्यांना नियमित ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच रक्त चढवण्याच्या प्रक्रियेदरम्यान एचआयव्हीचं संक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात थॅलेसेमिया या आजाराशी लढत असलेली पाच मुलं एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची आढळून आल्यानंतर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधील ब्लड ट्रान्सफ्युजनच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

यापूर्वी झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात थॅलेसेमिया असलेल्या मुलांना एचआयव्ही संक्रमित रक्त चढवल्याची घटना समोर आली होती.

पश्चिम सिंहभूमचे जिल्हा दंडाधिकारी चंदन कुमार यांनी बीबीसीशी बोलताना, थॅलेसेमिया असलेल्या आठ वर्षांखालील पाच मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचं स्पष्ट केलं होतं.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं वेगवेगळ्या स्तरांवर समित्या स्थापन केल्या आहेत.

जानेवारी ते मे 2025 दरम्यान नियमित तपासणीच्या वेळी ही प्रकरणं उघडकीस आली होती. मात्र, हा अहवाल स्थानिक माध्यमांमध्ये आल्यानंतर आता हा विषय चर्चेत आला आहे.

सतना जिल्हाधिकारी सतीश कुमार एस यांनी बीबीसीला दुजोरा देत म्हटलं आहे की, "एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांची संख्या पाच आहे."

यापूर्वी वेगवेगळे आकडे समोर आले होते.

ते म्हणाले, "या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणांहून रक्त चढवण्यात आलं आहे. यात वेगवेगळ्या डोनर्सचा म्हणजे रक्तदान करणाऱ्यांचा समावेश आहे. ज्या रक्तपेढ्यांमधून हे रक्त घेतलं गेलंय, तिथली टेस्टिंग व्यवस्था, प्रयोगशाळेची व्यवस्था आणि एसओपी यांचं पालन झालं आहे की नाही याची तपासणी केली जात आहे."

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुलांवर सध्या अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी अंतर्गत उपचार सुरू आहेत.

थॅलेसेमिया असलेल्या मुलांना जास्त धोका

मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या मुलांनी सतना जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयं आणि जबलपूरसह इतर ठिकाणी देखील ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच रक्त चढवलं होतं.

सतनाचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. मनोज शुक्ला यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, ज्या मुलांना वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज भासते ती एचआयव्हीच्या हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात आणि त्यामुळे त्यांची नियमित तपासणी केली जाते.

ते म्हणाले, "एचआयव्हीची पुष्टी होताच मुलांवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे."

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच प्रकरणांपैकी एका तीन वर्षाच्या मुलाची आई आणि वडील दोघेही एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, इतर चार मुलांच्या पालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्हाधिकारी सतीश कुमार एस म्हणाले, "चार मुलांचे पालक एचआयव्ही पॉझिटिव्ह नाहीत, यावरून हे स्पष्ट होतं की या चारही मुलांना आईकडून संसर्ग होण्याची शक्यता नाही. आपण असं स्पष्टपणे म्हणू शकतो की या चार मुलांना ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे एचआयव्हीची लागण झाली आहे. नेमकी चूक कुठे झाली त्याचा तपास केला जात आहे."

मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. शुक्ला म्हणाले, "जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील प्रत्येक युनिट रक्ताची तपासणी शासनाच्या प्रोटोकॉलनुसार केली जाते. मात्र, काही क्वचित प्रसंगी रक्तदान करणाऱ्याच्या शरीरातील संसर्ग प्रारंभिक टप्प्यात असल्यानं तो तपासणीवेळी आढळून येत नाही, त्याला विंडो पिरियड असं म्हणतात."

ते म्हणाले, "आरोग्य विभाग आता त्या सर्व डोनर्सचा म्हणजे रक्तदात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे ज्यांचं रक्त या मुलांना देण्यात आलं होतं. काही डोनर्स तपासणीसाठी पुढे आले आहेत आणि त्यांचे अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे."

या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा रुग्णालय स्तरावर तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

त्याचबरोबर एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या नोडल अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

राज्य सरकारनंही सहा सदस्यांची समिती स्थापन केली असून तिला सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या समितीत ब्लड ट्रान्सफ्युजन तज्ज्ञ, औषध निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

'आम्हाला न्याय मिळेल की नाही हे आम्हाला माहित नाही'

मात्र, या अधिकृत तपासणीमुळे सध्या पीडित कुटुंबांना फारसा दिलासा मिळू शकलेला नाही.

वरील ज्या कुटुंबाशी आम्ही बोललो त्यापैकी एका कुटुंबानं सांगितलं की त्यांच्या मुलीची तब्येत वयाच्या नवव्या वर्षापासून बिघडायला लागली होती.

ते म्हणाले, "डॉक्टरांनी थॅलेसेमियाची झाल्याचं निदान केलं आणि सांगितलं की तिला आयुष्यभर नियमित ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज भासणार आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी आम्हाला सांगण्यात आलं की आमची मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे."

"ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला. सुरुवातीला आम्हाला स्पष्ट उत्तर मिळालं नाही. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की ब्लड ट्रान्सफ्युजनदरम्यान तिला एचआयव्हीची लागण झाली आहे", असं ते सांगतात.

कोणाकडे तक्रार करावी हे आपल्याला समजत नाही, असं तक्रार दाखल करण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले.

ते म्हणाले, "आम्ही कोणाकडे तक्रार करावी? सरकारकडे की रक्तपेढीकडे? ज्यांची जबाबदारी होती त्यांनी त्यांचं काम योग्यरित्या केलं नाही. त्यांच्या निष्काळजीपणानं माझ्या मुलीचं आयुष्य आणखी कठीण केलं आहे."

या प्रकरणातील आणखी एका पालकानं सांगितलं की त्यांच्या मुलाला उलट्या आणि सततचा थकवा यांसारख्या एचआयव्हीच्या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे.

ते म्हणाले, "एक वडील म्हणून आपल्या मुलाला अशा स्थितीत पाहणं खूप वेदनादायी आहे. आम्ही पूर्णपणे असहाय्य आहोत. आम्ही आमच्या मुलाला मदत करू शकत नाही."

पुढे ते म्हणाले, "आपल्याला कधी न्याय मिळेल की नाही हे आम्हाला माहित नाही. पण त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही दिलेल्या उपचारांमुळे त्याचं आयुष्य आणखी कठीण झालं आहे हे आम्हाला नेहमीच सतावत राहील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)