थॅलेसेमियाशी झगडणाऱ्या मुलांना संक्रमित रक्त चढवल्याने HIV संसर्ग; नर्सच्या वागणुकीने आईला आला संशय

    • Author, मोहम्मद सरताज आलम
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमियाने पीडित असलेल्या मुलांना HIV संक्रमित रक्त चढवण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

पश्चिम सिंहभूमचे जिल्हाधिकारी चंदन कुमार यांनी बीबीसीशी बोलताना, आठ वर्षांहून कमी वय असलेली आणि थॅलेसेमियाने पीडित असलेली पाच मुले HIV संक्रमित झाली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

या प्रकरणी, चाईबासाचे सिव्हील सर्जन, HIV युनिटचे प्रभारी डॉक्टर आणि संबंधित टेक्निशियन यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पीडित मुलांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

बीबीसीने संक्रमित रक्त चढवण्यात आल्याने HIV ग्रस्त झालेल्या तीन मुलांची सध्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही तिन्ही मुलं थॅलेसेमियाने पीडित आहेत.

पहिलं प्रकरण मंझारी ब्लॉकमधील सात वर्षांच्या शशांकचं (नाव बदललं आहे) आहे. संक्रमित रक्त चढवल्यामुळे तो HIV पॉझिटीव्ह झाला आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरमालकाने चाईबासामध्ये भाड्याने दिलेलं घर रिकामं करून घेतलं.

याच घरात राहून शशांक उपचारासह इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणही घेत होता.

सोडावं लागलं भाड्याचं घर

शशांकचे वडिल दशरथ (नाव बदललेलं आहे) सांगतात, "घरमालकानं म्हटलं की, तुमचा मुलगा HIV ने संक्रमित आहे, त्यामुळं घर रिकामं करा."

ते पुढे सांगतात की, "मी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र, ते घर रिकामं करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. अशा परिस्थितीत मला जवळपास 27 किलोमीटर दूर असलेल्या मंझारी ब्लॉकमधील आपल्या गावी परतावं लागलं."

थॅलेसेमिया असल्यामुळे त्यांच्या मुलाला महिन्यातून दोनवेळा रक्त चढवलं जातं. त्यामुळे, त्यांना महिन्यातून दोनवेळा सदर हॉस्पिटलला यावं लागेल.

ते सांगतात की, "गावी परतल्यानंतर मुलाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळणं हे एक आव्हानचं आहे. आता तो चांगल्या शिक्षणापासूनही वंचित होईल."

केवळ भातशेतीवर अवलंबून असलेल्या दशरथ यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.

ते सांगतात की, "अशा परिस्थितीत माझ्यासमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आधी थॅलेसेमियासारखा आजार आणि आता मुलाला HIV शी लढतानाही पहावं लागेल."

मुला-मुलीला केलं वेगळं

शशांकप्रमाणेच हाटगम्हरिया ब्लॉकमधील थॅलेसेमियाची रुग्ण असलेली दिव्या (नाव बदललं आहे) ही आता वयाच्या सातव्या वर्षीच HIV ग्रस्त झाली आहे.

दिव्याच्या मोठ्या भावाला आणि बहिणीला त्यांची आई सुनीता (नाव बदललं आहे) यांनी पुढील संगोपनासाठी त्यांच्या माहेरी पाठवलं आहे, जेणेकरून त्यांना संसर्गाचा धोका राहणार नाही.

सुनीता सांगतात की, जेव्हापासून दिव्याला थॅलेसेमिया झाला आहे, तेव्हापासून त्या महिन्यातून दोनवेळा जवळपास चाळीस किलोमीटर दूर सदर हॉस्पिटलमध्ये मुलीला रक्त चढवण्यासाठी घेऊन जातात.

त्या सांगतात की, "प्रत्येक महिन्याला गाडीभाड्याची व्यवस्था करणं, हेच मोठं आव्हान आहे."

यासंदर्भात जेव्हा जिल्हाधिकारी चंदन कुमार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, "आम्ही आमचा संपर्क सर्व कुटुंबीयांना दिला आहे. जेव्हा केव्हा त्यांना यायचं असेल, तेव्हा त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल."

सुनीता असा आरोप करतात की, सप्टेंबरमध्ये जेव्हा सदर हॉस्पिटलमध्ये दिव्याला रक्त चढवलं जात होतं, तेव्हा डॉक्टर हातमोजे घालूनच तिला स्पर्श करत होत्या. तर नर्स तिला स्पर्श करण्यास टाळत होत्या.

पुढे त्या रडत रडत सांगतात की, "मुलीसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचं असं वर्तन पाहून मी अस्वस्थ झाले आणि मला शंका आली की माझ्या मुलीला काहीतरी झालं आहे."

जेव्हा सुनीतानं कारण विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे उत्तर देण्याऐवजी म्हटलं की, रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत काहीतरी सांगता येऊ शकेल.

पुढे त्या सांगतात की, "चार ऑक्टोबर रोजी एका आरोग्य कर्मचाऱ्यानं सांगितलं की, तुमच्या मुलीला चुकीचं रक्त चढवण्यात आलंय, त्यामुळे ती HIV पॉझिटीव्ह झाली आहे."

HIV ग्रस्त झाल्याने दिव्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतील?

सुनीता सांगतात की, "सुरुवातीला मला याचं गांभीर्य माहिती नव्हतं. मात्र, आता हळूहळू मला एड्सचं गांभीर्य काय असतं, ते लक्षात येत आहे."

आईची एकमेव आशा

झीकपानी ब्लॉकमधील एका गावात तलावाच्या काठावर खेळणारी निष्पाप श्रेया (नाव बदललं आहे) तिच्या आई श्रद्धा (नाव बदललं आहे) यांच्यासोबत मातीच्या भिंतीनी लिंपलेल्या आणि गवताच्या छप्पराने शाकारलेल्या घरात राहते.

पतीच्या निधनानंतर श्रद्धा यांच्या आयुष्यातील जगण्यासाठीची एकमेव आशा म्हणजे त्यांची ही सहा वर्षांची मुलगी श्रेया आहे.

श्रेयाला रक्त चढवण्यासाठी श्रद्धा या प्रत्येक महिन्याला 25 किलोमीटर दूरवर चाईबासा सदर हॉस्पिटलमध्ये येतात.

यासाठी त्यांना प्रत्येक वेळी गाडी बुक करावी लागते. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता या सगळ्याचा खर्च करणं हे त्यांच्यासाठी फारच जिकरीचं आहे.

आता त्यांच्यासमोर थॅलेसेमियासोबतच एड्सशी दोन हात करण्याचंही आव्हान आहे. श्रद्धा यांना एड्ससारखा एखादा रोग किती गंभीर असू शकतो, याची काहीही कल्पना नाही.

त्या सांगतात की, "HIV नक्कीच एखादा गंभीर आजार असावा. म्हणूनच मला हॉस्पिटलने चुकी केल्याबद्दल दोन लाखाचा चेक मिळाला आहे."

प्रकरण कसं उघडकीस आलं?

या प्रकरणातील मुलांच्या आई म्हणजेच श्रद्धा आणि सुनीता यांना HIV संक्रमणाबाबत आधी काहीच माहिती नव्हती.

मात्र, डॉक्टर्स आणि नर्स यांचं बदललेलं वागणं पाहून त्यांना शंका आली की, त्यांच्या मुलांना काहीतरी गंभीर आजार झालेला आहे.

ऑक्टोबरच्या अखेरीस शशांकचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर स्थानिक माध्यमांनी दशरथ यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हा संशय खरा ठरला.

त्या सांगतात की, "18 ऑक्टोबर रोजी, सदर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या मुलाला रक्त देण्यापूर्वी एचआयव्ही टेस्ट केली. त्यानंतर, 20 ऑक्टोबर रोजी, त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.

त्यानंतर, माझ्या पत्नीची आणि माझी एचआयव्ही टेस्ट झाली. या टेस्ट्स निगेटिव्ह आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, माझ्या मुलाला संक्रमित रक्त चढवल्यामुळं त्याची एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे."

दशरथ यांनी या प्रकरणाची तक्रार चंदना कुमार यांच्याकडे केली. त्यानंतर हे प्रकरण स्थानिक माध्यमांमध्ये आलं. त्यानंतर झारखंड हायकोर्टानं या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत आदेश दिले.

या दरम्यानच त्यांना अशी माहिती मिळाली की, मुलगा HIV पॉझिटीव्ह असल्याकारणाने जिल्हाधिकारी, आमदार आणि खासदार त्यांची भेट घ्यायला येणार आहेत.

चंदन कुमार सांगतात की, अभुवा गृहनिर्माण, रेशन, शौचालय इत्यादी सर्व सरकारी योजनांचे लाभ बाधित कुटुंबांना दिले जाणार आहेत.

ते म्हणतात, "एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेल्या थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या पाचही मुलांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे."

सरकारकडून काय अपेक्षा?

या प्रश्नावर दशरथ म्हणतात, "जर सरकारला सेवा करायचीच असेल तर त्यांनी आम्हाला प्रत्येकी 1 कोटी रुपये भरपाई द्यावी आणि मुलांवर मोठ्या रुग्णालयात उपचार करावेत. जर चूक सरकारी रुग्णालयाची असेल तर त्याची जबाबदारीही सरकारचीच आहे."

आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी म्हणतात, "पश्चिम सिंहभूम जिल्हा हा थॅलेसेमियाचा झोन आहे. सध्या येथे 59 थॅलेसेमिया रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

यापैकी मोठ्या संख्येने रुग्णांना महिन्यातून दोनदा रक्ताची आवश्यकता असते, ज्याचा पुरवठा रक्तदात्यांच्या रक्तावर अवलंबून असतो.

HIV संक्रमित रक्त आलं कुठून?

चंदन कुमार याबाबत म्हणाले की, "2023 ते 2025 दरम्यान जिल्ह्यात एकूण 259 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यापैकी 44 रक्तदात्यांना शोधण्यात आलं आहे. त्यापैकी चार रक्तदाते एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत."

ते पुढे सांगतात, "उर्वरित रक्तदात्यांची चौकशी सुरू आहे जेणेकरून जर दुसरा कुणी रक्तदाता एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याची ओळख पटवता येईल."

याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता, झारखंडचे माजी आरोग्यमंत्री रामचंद्र चंद्रवंशी म्हणाले की, "या प्रकरणात सिव्हिल सर्जन आणि इतर अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, म्हणून तेच दोषी आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)