50 तोळ्यांची मागणी, 'मुलगा का होत नाही' असा हट्ट; दीप्ती मगर-चौधरी आत्महत्या प्रकरणात काय माहिती आली समोर

( या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतील.)

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी-कांचन जवळच्या सोरतापवाडीमध्ये एका तरुण इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. हुंडा आणि कौटुंबिक छळाला कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर आणखी एका उच्चशिक्षित महिलेने आत्महत्या केल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

29 वर्षांच्या दीप्ती मगर-चौधरी यांनी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना 24 जानेवारीच्या संध्याकाळी घडली.

दीप्ती चौधरी यांच्या आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 80 (हुंडाबळी) , 108 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 85 (सासरच्या लोकांकडून छळ) , 89 ( इच्छेविरुद्ध महिलेचा गर्भपात), 352 (अपमान करणे) , 351(3) (धमकावणे) , 115(2),3(5) (ठरवून इजा करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दीप्ती यांचे पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी (सरपंच), सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपी पती आणि सासू यांना अटक केली आहे.

या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या दीप्ती चौधरी यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 रोजी सोरतापवाडी येथे राहणाऱ्या रोहन चौधरी यांच्याशी झाला होता.

लग्नानंतर एकाच महिन्यात चारित्र्यावर संशय आणि छळाला सुरुवात

दीप्ती यांच्या आई हेमलता मगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर एकाच महिन्यात रोहन चौधरी यांनी दीप्ती चौधरी यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. दीप्ती चौधरी यांच्या दिसण्यावरून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. दीप्ती चौधरी यांच्या सासू, सासरे आणि दिराने देखील अशा प्रकारचा छळ केल्याचा आरोप हेमलता मगर यांनी केला आहे.

त्यानंतर 4 मे 2023 रोजी दीप्ती चौधरी यांना मुलगी झाल्यामुळे सासरचे लोक त्यांच्यावर नाराज होते.

यानंतर वेळोवेळी दीप्ती चौधरी यांच्या पतीकडून पैशांची मागणी झाल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला आहे.

लग्नात 50 तोळे सोनं, नंतर 10 लाख आणि 25 लाख दिल्याचा आरोप

हवेली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

ते म्हणाले, "आई हेमलता मगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीप्ती आणि रोहन यांच्या लग्नात स्त्रीधन म्हणून 50 तोळे सोनं दिलं होतं. दीप्ती आणि रोहन यांना मुलगी झाल्यानंतर काही दिवसांनी 'आम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असून तू माहेरहून 10 लाख घेऊन ये' अशी मागणी दीप्ती यांच्याकडे करण्यात आली."

"माहेरच्या मंडळींनी दीप्ती यांना त्रास होऊ नये म्हणून रोख 10 लाख रुपये चौधरी कुटुंबीयांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी चार चाकी गाडी घेण्यासाठी आणखीन 25 लाख रुपये दिल्याचा आरोप हेमलता मगर यांनी केला आहे. एवढे पैसे देऊनही दीप्ती यांचा मानसिक छळ सुरू होता आणि याचा दरम्यान दीप्ती यांना गर्भधारणा झाली होती त्यानंतर त्यांची बळजबरीने गर्भचाचणी करून त्यांना गर्भपात करायला लावल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.

ऑक्टोबर 2025 मध्ये दीप्ती यांच्या सासू सुनीता चौधरी या सरपंच झाल्या. त्यानंतरही सासरच्या मंडळींनी दीप्ती चौधरी यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि सततच्या मागण्यांमुळे दीप्ती प्रचंड तणावाखाली होत्या.

हेमलता मगर यांनी तक्रारी म्हटलंय की, नोव्हेंबर 2025 मध्ये दीप्ती चौधरी यांनी सासरी होणाऱ्या छळाची, मनाविरुद्ध झालेल्या गर्भपाताची माहिती आई हेमलता यांना दिली. मात्र त्यानंतरही हा छळ सुरूच राहिला आणि अखेर 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास दीप्ती चौधरी यांनी गळफास लावून आत्महत्या केली. हेमलता मगर यांनी सासरच्या मंडळींनी माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे.

चौधरी कुटुंबीयांची बाजू घेण्याचा बीबीसी मराठी प्रयत्न करत आहे. त्यांची बाजू आल्यावर अपडेट करण्यात येईल.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुणे परिसरात कौटुंबिक छळ आणि हुंडा प्रथा यामुळे आणखीन एका महिलेचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेची चर्चा सुरू झाली आहे.

'आमच्या मुली स्वस्त झाल्या आहेत का?' कुटुंबीयांचा सवाल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी 27 जानेवारी रोजी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं आहे. यावेळी उपस्थित महिलांनी रुपाली चाकणकर यांना सदरील घटनेचा जाब देखील विचारला.

दीप्तीच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जाब विचारला.

"वैष्णवी हगवणे प्रकरणाला सात महिने झाले आहेत आणि असं असताना आमच्या दुसऱ्या मुलीचा बळी कसा गेला? वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तुम्ही कायद्यात काय बदल केला? गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही म्हणून मुलींना असा छळ केला जातो. आमच्या मुली स्वस्त झाल्या आहेत का? याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे ना?" असं म्हणत महिलांनी चाकणकर यांना जाब विचारला.

कायदा अस्तित्वात येऊन हुंडाबळी थांबत का नाही?

हुंडाबंदी कायदा येऊनही असे प्रकार का होतात यावर बीबीसी मराठीने सविस्तर बातमी केली होती.

हुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्ष हुंड्याची मागणी करत होते. पण, काळानुसार हुंड्याचं स्वरुप बदलत चाललंय. अनेक भागात वेगवेगळ्या पद्धतीनं हुंडा मागितला जातो, काहीजण छुप्या पद्धतीनं हा हुंडा मागतात. लग्नानंतरही हुंड्यासाठी छळ होत असल्याचे प्रकारही समोर येतात.

कायदा अस्तित्वात येऊनही हुंडाबळी का थांबत नाही? याबद्दल स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती म्हापसेकर या तीन महत्वाची कारणं सांगतात.

त्या म्हणतात, यामागचं पहिलं कारण म्हणजे अजूनही महिलेला समाजात असलेला दुय्यम दर्जा जबाबदार आहे. महिलेचा दर्जा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार घडतच राहतील.

याचीच काही उदाहरणं म्हापसेकर देतात. मुलगी अजून आई-वडिलांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेत हक्क मागत नाही. स्त्रीनं वारसाहक्क मिळवायला पाहिजे, मग या घटना कमी होतील.

दुसरं म्हणजे आपल्याच जातीत, आपल्याच गावाजवळ श्रेष्ठ असलेला मुलगा लग्नासाठी मिळावा अशा अपेक्षा असतात. मग तो मुलगा त्याची किंमत मागतो आणि मुलीचे आई-वडील ती द्यायला तयारही होतात. पण, त्याऐवजी मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र दिलं, तर अशा घटना कमी होतील. पण, दुर्दैवानं मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही.

पैशांची हाव आणि झटपट मिळणारा पैसा हे या गोष्टीला कारणीभूत आहे. बायकोच्या माहेरहून मागितला की झटपट पैसा मिळतो आणि तो नाही मिळाला की अशा घटना घडतात.

तिसरं म्हणजे 'चांगला' मुलगा हातातून जाईल अशी भीती असते. कोणी हुंडा घेत असेल तर सर्वात आधी मुलींनी विरोध करायला पाहिजे. 'चांगला' मुलगा गेला, तर गेला. हुंडा दिला तर मी लग्नच करणार नाही अशी भूमिका मुलींनी घ्यायला हवी.

हुंड्याचं बदलतं स्वरुप

लग्नात दोन पक्षांत होणारी देवाण-घेवाण ती पैशांच्या स्वरुपात असो की वस्तूंच्या, तो हुंडा असतो. पण, या हुंड्याचं स्वरुप काळानुसार बदलत चाललंय.

हल्ली "तुम्ही तुमच्या मुलींचा खर्च बघा, तुम्ही तुमच्या मुलीला सजवा" असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो. तर काही ठिकाणी "आम्हाला काहीच नको, तुमच्या मुलीला सहखुशीनं जे द्यायचं ते द्या" अशा छुप्या पद्धतीनं हुंडा घेतला जातो.

लग्न ग्रँड व्हावं आणि त्याचा खर्च फक्त मुलींच्या आई-वडिलांनी करावा अशी काहींची मागणी असते. हे सर्व प्रकार हुंडा प्रकारात मोडतात. सध्याच्या काळात ग्रँड लग्न करून आपल्या मुलीच्या सासरच्यांना महागड्या भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू झाली आहे.

याबद्दल ज्योती म्हापसेकर म्हणतात, "आता दोन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला की तो यामध्ये खर्च करतात. मेहंदी, हळदी, संगीत असले कार्यक्रम करून लग्न 5-5 दिवसांचं होतं."

"मुलींना सुद्धा पैशांची पर्वा न करता मौजमजा करायची असते. ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे ते लोक गाजावाजा करत लग्न करतात आणि त्याच श्रीमंत लोकांचं अनुकरण इतर लोक करतात."

"लग्नासाठी सांगितलेली प्रत्येक पूर्वअट ही हुंडा असते हे मुलींना आणि तिच्या घरच्यांना सुद्धा समजायला पाहिजे. तसेच मुलांनी सुद्धा मी हुंडा घेणार नाही असं सांगायला पाहिजे. निम्मा निम्मा खर्च करून लग्न करण्याची पद्धतच योग्य आहे."

तर रुपा कुलकर्णी असे ग्रँड लग्न आणि भेटवस्तू देणाऱ्या मुलींच्या आई-वडिलांनाच जबाबदार धरतात.

त्या म्हणतात, "मुलीचं लग्न असलं की तिला काय काय गिफ्ट द्यायचं आहे ते एक एक जण वाटून घेतात. एकजण म्हणतो फ्रीज देतो, दुसरा म्हणतो स्कूटर देतो. पण, या सगळ्यांमध्ये दोष मुलीवाल्यांचा आहे."

"त्यांनी या सवयी बिघडवल्या आहेत. त्यांनी वस्तूस्वरुपात मुलीच्या सासऱ्यांना गिफ्ट देऊन या परंपरा निर्माण केल्या आहेत."

थाटामाटात लग्न करण्याचा समाजाचा दबाव जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत असल्या गोष्टी होतील, असं नीलम गोरे यांना वाटतं.

त्या म्हणतात, "पीडितेला सोडून या गोष्टीची खंत कोणालाच वाटत नाही. कायद्याची पायमल्ली करणे, लग्नात एका पक्षानं दुसऱ्या पक्षाकडून पैसे, भेटवस्तू घेणे आणि संपत्तीचं प्रदर्शन करणे यात लोकांना गर्व वाटतो. मुलींच्या मनात देखील प्रचंड उद्दातीकरण झालेलं आहे की आपलं लग्न थाटामाटात व्हावं."

"पण, प्रत्येकच मुलगी अशी नसते. काही आई-वडिलांचा विचार करणाऱ्या पण असतात. लग्न हे साध्या पद्धतीनं झालं आणि समाजातून देखील थाटामाटात लग्न करायचं आहे हा दबाव कमी झाला, तर आई-वडिलांच्या निम्म्या समस्या सहज सुटतील."

महिला हिंसाचाराविरोधात तक्रार कुठे करावी

महिलांवरील हिंसाचाराविरोधातील तक्रारींची नोंद घेण्यासाठी महिला आयोगाचीही एक हेल्पलाईन आहे.

राष्ट्रीय महिला आयोग – 7827-170-170

राष्ट्रीय महिला आयोगाचे संकेतस्थळ: https://www.ncwwomenhelpline.in/

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.