You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
200 वर्षं जुनी बाटली सापडली अन् त्यात असलेल्या द्रवपदार्थाचं रहस्य अखेर उलगडलं
- Author, सायमन स्पार्क आणि स्टुअर्ट हॅरॅट
- Role, बीबीसी न्यूज
गेल्या वर्षी इंग्लंडमधील क्लीथॉर्प्समध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू होते, त्यावेळी कामगारांना काचेची बाटली सापडली होती.
ही जवळपास 200 वर्षांपूर्वीची बाटली आहे. त्यातील द्रवपदार्थावरून बरंच कुतूहल निर्माण झालं होतं. या बाटलीचं रहस्य अखेर उलगडलं आहे.
गेल्या वर्षी सी व्ह्यू स्ट्रीट परिसरात खड्डे खोदताना कामगारांना ही बाटली सापडली. बाटलीतील द्रवपदार्थ दारू आहे, असं समजून ती पिण्याचाही या कामगारांचा विचार होता, पण आधी खात्री करुन घ्यावी असं त्यांना वाटलं अन् पुढील अनर्थ टळला.
परंतु, बांधकाम व्यवस्थापकाने त्यांना थांबवले. त्यांना त्या बाटलीचं कुतूहल वाटलं. आणि यात नेमकं काय घटकपदार्थ आहे? हे जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी ती बाटली लिंकन विद्यापीठात पाठवली.
लिंकन विद्यापीठातील विद्यार्थिनी झारा येट्स यांनी स्कॅनर्सचा वापर करुन या बाटलीचा अभ्यास केला. गुन्हा घडलेल्या ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी हे स्कॅनर वापरले जातात. त्यांचाच वापर येट्स यांनी या बाटलीचा अभ्यास करण्यासाठी केला.
झारा येट्स म्हणाल्या की, त्या कामगारांना ती दारुची बाटली वाटली, आणि ते ती पिण्याचा विचार करत होते.
सुदैवाने प्रकल्प व्यवस्थापक त्यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांनी या बाटलीचे महत्त्व ओळखून ती आमच्यापर्यंत पोहोचवली.
या बाटलीचा अभ्यास करताना त्यातील द्रवपदार्थ मुळात दारू नसून ती लघवी असल्याचं आम्हाला आढळून आल्याचं झारा यांनी सांगितलं.
झारा येट्स यांनी बीबीसीला सांगितले की, त्यांनी बाटली किती वर्ष जुनी आहे आणि त्यात नेमका कोणता घटक आहे हे समजून घेण्यासाठी विविध तंत्राचा वापर केला होता.
ही बाटली 1790 मध्ये बनवण्यात आली होती, तिचा आकार आणि रचना पाहता ती हाताने तयार करण्यात आली असल्याचं दिसून आलं.
साच्याचा वापर करून बाटली बनवण्याची प्रक्रिया 1840 पासून वापरात आली. त्यामुळे ही बाटली हाताने बनवण्यात आली असावी, म्हणूनच तिच्या आकारात विसंगती आहे, असंही त्या म्हणाल्या.
झारा यांनी मल्टी-स्पेक्ट्रल इमेजरसारख्या (ज्या पदार्थाचे निरीक्षण करायचे आहे त्यावर वेगवेगळ्या तरंगलांबींचा प्रकाश टाकण्यात येतो) तंत्राच्या मदतीनं बाटलीचा अभ्यास केला.
निरीक्षणाअंती बाटलीत असलेला घटकपदार्थ शरीरातील द्रव असून तो मुख्यत: लघवी असल्याचं स्पष्ट झालं, असं झारा यांनी सांगितलं.
त्या काळाच्या मान्यतेनुसार कदाचित ही 'जादूटोण्याची बाटली' असू शकते. अशा प्रकारच्या प्राचीन काळी या बाटल्या 'दुष्ट आत्म्यां'पासून बचाव करण्यासाठी किंवा वाईट शक्तींना दूर सारण्यासाठी घरांमध्ये पुरल्या जात होत्या, असं लिंकन विद्यापीठाचं म्हणणं आहे.
एखाद्या खलाशाने सुरक्षित प्रवासाच्या इच्छेने ही बाटली तेथे ठेवली असावी असाही एक अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
या बातम्याही वाचा -
लिंकन विद्यापीठाच्या सांस्कृतिक वारसा संवर्धन विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ जोसेफीन मॅकेंझी म्हणाल्या की, इतकी जुनी आणि पूर्णपणे शाबूत असलेली बाटली सापडणं हे अतिशय दुर्मिळ आहे.
"आम्हाला बर्याचदा मातीच्या भांड्यांचे किंवा कापडांचे अवशेष सापडतात, पण काचेची एखादी वस्तू सापडणं ते ही अशा प्रकारे काहीतरी सापडणं हे खूपच दुर्मिळ आहे. झाराने सदर बाटली आणि त्यातील घटकपदार्थ नेमकं काय, हे शोधून काढण्यात अप्रतिम कामगिरी केली आहे आणि आमच्या अपेक्षांपेक्षा अधिक चांगलं काम करून दाखवलं आहे", असंही त्या म्हणाल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)