You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
250 वर्षांपूर्वीच्या तांब्याची 'ही' वस्तू नेमकी काय आहे, जिची किंमत कोटींच्या घरात आहे
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहारची राजधानी पाटण्यातून 250 वर्षांपूर्वी जगातील पहिलं तांब्याचं (ताम्र) तिकीट जारी करण्यात आलं होतं. त्याची किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
31 मार्च 1774 ला आलेले एक आणे आणि दोन आण्याचं हे तिकीट म्हणजे एक प्रकारचं 'प्रीपेड टोकन' होतं.
भारताचे गव्हर्नर जनरल वॉरेंन हेस्टिंग्स यांच्या ईस्ट इंडिया बंगाल प्रेसिडेन्सीनं हे तिकीट जारी केलं होतं. दोन आण्याच्या तिकिटाचा व्यास 26.4 मिलीमीटर आणि वजन 8.95 ग्रॅम होतं.
गोल आकाराच्या या तिकीटावर एका बाजूला इंग्रजीत 'पाटणा पोस्ट दो आना' असं लिहिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला फारसीत 'अजीमाबाद डाक दो आना' असं लिहिलेलं आहे.
या दोन्ही तिकिटांना 'अजीमाबाद एकन्नी' आणि 'अजीमाबाद दुअन्नी' या नावानंही ओळखलं जातं.
पोस्टाची तिकीटं भारताची संस्कृती आणि इतिहास दाखवतात.
ही तांब्याची तिकीटं 250 वर्षांची झाल्यानिमित्ताने बिहारची राजधानी पाटणात 'पोस्ट तिकीट प्रदर्शन' भरवण्यात आलं होतं. यात भारतासह जगभरातील 20,000 हून अधिक तिकिटं पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.
यात ब्रिटिश गुयाना वन सेंट मॅजेंटा या दुर्मिळ तिकिटाचाही समावेश होता. हे तिकीट 1856 मध्ये वापरात आलं. तेव्हा ब्रिटिश कॉलोनी असलेल्या गुयानात तिकिटांची खेप येण्यास उशीर झाला होता.
त्यामुळे गुयानाचे तत्कालीन पोस्ट मास्टरांनी ती तिकिटं येईपर्यंत तात्पुरते तीन प्रकारचे तिकीट छापली. मात्र, मूळ तिकिटांची खेप आल्यानंतर ही तात्पुरती तिकिटं वापरातून बाहेर गेली; मात्र एक तिकीट वाचलं.
वन सेंट मजेंटा गुनायामधील 12 वर्षाच्या एका मुलाला 1873 रोजी आपल्यात घरातील कागदपत्रांमध्ये सापडलं होतं.
या मुलाने हे तिकीट तिथल्या एका स्थानिकाला म्हणजेच नील आर मॅककिनॉक यांना 6 शिलींगला विकून टाकलं होतं.
त्यानंतर हे तिकीट अनेकांना विकलं गेलं आणि एप्रिल 1922 मध्ये एका अमेरिकन उद्योजकांना हे तिकीट 7343 पाऊंड्सना विकत घेतलं. त्या काळात एखाद्या स्टॅम्पसाठी दिलेली ही सर्वाधिक रक्कम होती.
रोमन संस्कृतीशी संबंधित तिकीट
पोस्टाची अनेक तिकीटे अशी असतात, ज्यांमधून आपल्याला अनेक प्रकारच्या कथा पहायला मिळतात. या प्रदर्शनामध्येही रोमन संस्कृतीशी संबंधित अनेक तिकीटे दिसून आली.
रोमन संस्कृतीमध्ये 'क्यूपिड'ला अगदी देवाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आकांक्षा आणि प्रेमाची देवता म्हणून त्यांस ओळखलं जातं.
युवा प्रेमी युगुलांमध्ये क्यूपिड आणि त्यांच्याशी निगडीत प्रेम नेहमीच लोकप्रिय राहिलेलं आहे.
या प्रदर्शनामध्ये क्यूपिड आणि सफरचंदाला प्रेमाचं प्राचीन प्रतिक म्हणून दाखवणारी अनेक तिकीटे समाविष्ट होती. ही तिकीट वेगवेगळ्या देशांमध्ये जारी करण्यात आलेली तिकीटे होती.
'मल्लिका-ए-गजल' बेगम अख्तरवरही पोस्टाचं तिकीट
भारताच्या सुप्रसिद्ध गझल गायिका बेगम अख्तर यांच्यावरचंही एक तिकीट इथे प्रदर्शित करण्यात आलं होतं.
या पोस्टाच्या तिकीटाचीही आपली अशी एक कहानी आहे.
1994 मध्ये जारी करण्यात आलेल्या या तिकीटाला चलनातून हटवण्यात आलं होतं. कारण, या तिकिटासाठी वापरण्यात आलेली शाई पाण्यात मिसळली जायची.
तिकीटांचा संग्रह करण्याची आवड
तिकीट संग्रहाची आवड ही 'किंग ऑफ हॉबीज'सारखीच आहे.
बिहार सर्कलचे चीफ पोस्ट जनरल अनिल कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "ही एक अशी आवड आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे, त्याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता."
"संपूर्ण जगभरात 20 कोटींहून अधिक लोक तिकीट जमा करतात. अनेक देशांमध्ये तर 'नॉलेज थ्रू स्टॅम्प' अशी मोहिमच चालवली जाते."
भारतात पत्र येण्याची सुरुवातीची पद्धत विस्ताराने विशद करणारी तिकीटेही या प्रदर्शनात आहेत.
पोस्टमन, पॅराशूट मेल, मोटर मेल यांसोबतच वाळवंटी भागासाठी उंट देखील टपाल तिकिटावर आहे.
या तिकीट प्रदर्शनामध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्यावर जारी करण्यात आलेल्या तिकीटाचाही समावेश होता. त्यांच्याच नावाने 1934 मध्ये रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती.
याशिवाय, बीसीसीआयचे फाऊंडर पी. सुब्रमण्यम यांच्यापासून ते 1932 मध्ये इंग्लंडचे पहिले टेस्ट टूर कॅप्टर सर नटवर सिंह बहादूर यांच्यापर्यंतचे तिकीट या प्रदर्शनात आहेत.
ही तिकीटे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
एअर इंडियाने बॉम्बेहून (आता मुंबई) लंडनसाठीचे पहिले उड्डाण 8 जून 1948 रोजी घेतले होते.
या उड्डाणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ काढण्यात आलेल्या स्मरणिका आणि तिकीट यांनाही या प्रदर्शनात स्थान देण्यात आलं होतं.
11 मे 1940 रोजी बीबीसी हिंदीची सुरुवात रेडिओद्वारे झाली होती. बीबीसीच्या हिंदी सेवेवर प्रसिद्ध झालेले मेघदूत पोस्टकार्डही येथे दाखवण्यात आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)