माणसाने पहिल्यांदा शेती कुठे केली? मानवी संस्कृतीचा उदय कुठे झाला?

    • Author, लिओन मॅक्रॉन
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

जिथे हजारो वर्षांपूर्वी मानवी संस्कृतीचा उदय झाला, जिथे मानवाने शेती आणि पशुधन विकसित केलं अशा ठिकाणची ही गोष्ट आहे.

तो कच्चा रस्ता संपला की त्याच्या पुढे एक पायवाट सुरू होते. ही पायवाट दातेरी शिखरे असलेल्या डोंगर माथ्यावर जाऊन पोहोचते.

या पायवाटेने एखादी शेळी चालेल इतका हा अरुंद रस्ता डोंगराला वळसा घालून वाटेत एका झऱ्याजवळ थांबतो. त्यातून एक विस्तृत प्रवाह वाहत असतो, जो एका रुंद कमानीच्या गुहेत अदृश्य होतो.

दीड किलोमीटर चालत गेलं की तुम्हाला नदीचा उगम दिसतो. तिथल्या गुहेच्या आत जे काही दिसतं ते पाहून तुम्ही अगदी भारावून जाता.

ॲसिरिया मधील जुन्या लोकांच्या मते, या ठिकाणी भौतिक आणि आध्यात्मिक जग एकत्र येतं. 3,000 वर्षांपूर्वी त्यांचे सैनिक या नदीतून प्रवास करत आले होते.

गुहेच्या प्रवेशद्वारावर इ. स. पूर्व 1146 ते 1076 या काळातील ॲसिरियाचा राजा टिग्लथ पिलेसर याचं शिल्प आहे. काळाच्या ओघात ते नष्ट झालंय, मात्र त्याचे अवशेष आजही त्यांच्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देतात.

टायग्रिस नदीचा उगम सध्याच्या तुर्कस्तानमध्ये होतो. तिथून ती टॉरेस पर्वताच्या दिशेने दक्षिण-पूर्व अशी वाहत जाते. उत्तर-पूर्व सीरियाच्या एका छोट्या कोपऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आणि इराकची राजधानी बगदादला पोहोचण्यापूर्वी ती मोसुल, तिक्रिट आणि समरा या शहरांमधून पुढे वाहते.

बगदादनंतर टायग्रिसच्या काठी पूरतट निर्माण झाले आहेत. बसरा येथे सुरू झालेल्या विस्तीर्ण त्रिभुज प्रदेशात टायग्रिस, युफ्रेटीस व त्यांचे फाटे कालव्यांनी एकमेकांस जोडलेले आहेत. पुढे पर्शियन गल्फमध्ये या नद्या एकमेकींमध्ये विलीन होतात.

सुमारे 8,000 वर्षांपूर्वी आपल्या शिकारी पूर्वजांनी दोन नद्यांमधील विस्तीर्ण मैदाने व्यापली होती. या ठिकाणी त्यांनी शेती आणि पशुधन विकसित केले. त्यामुळे अनेक लोक या प्रदेशाला मानवी संस्कृतीचा उगम असल्याचं म्हणतात.

एरिडू, उर आणि उरुक सारख्या शहरांमध्ये चाकाचा आणि लेखनाचा शोध लागला. त्यानंतर कायदेशीर प्रणाली, जहाजं आणि मद्यनिर्मितीच्या पद्धती अस्तित्वात आल्या.

इराकचा इतिहास इतका प्रगतशील असतानाही, मागील अनेक दशकांचा संघर्ष बघून असा प्रश्न पडतो की, खरंच टायग्रिस नदीच्या या खोऱ्यात मानवी संस्कृतीने आकार घेतला होता का?

2011 साली मी आणि संशोधकांच्या एका चमूने टायग्रिस नदीच्या उगमापासून पर्शियन गल्फपर्यंत बोटीने आणि जमिनीवरचा असा सुमारे 2,000 किलोमीटरचा प्रवास केला. ही मोहीम 10 आठवड्यांची होती. एका तज्ञाने मला सांगितलं होतं की, पहिल्या महायुद्धानंतर ऑट्टोमन साम्राज्य कोसळलं आणि त्यानंतर कोणीच असा प्रवास केलेला नाही.

या नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांकडून तिचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणं, तिचा इतिहास समजून घेणं आणि भविष्यात येणाऱ्या धोक्यांचं परीक्षण करणं हा माझा प्रवासाचा उद्देश होता.

भू-राजकीय अस्थिरता, पाण्याचं अयोग्य व्यवस्थापन आणि हवामान बदलामुळे एकेकाळची बलाढ्य टायग्रिस आज मरणपंथाला लागल्याचं काही लोक सांगतात.

मला आशा होती की आमच्या प्रवासात ती आम्हाला अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण करून देईल. मानवी संस्कृतीचा उगम म्हटल्या जाणार्‍या या नदीचं अस्तित्व संपुष्टात आलं तर एक समाज म्हणून आपण बरंच काही गमावू.

तुर्कीमधील कुर्द

टायग्रिस नदीच्या उगमापासून 80 किलोमीटर अंतरावर तुर्कीमध्ये ॲसिरियन किल्ल्याच्या भिंती आहेत.

नदीकाठी स्थायिक झालेल्या ग्रीक, आर्मेनियन, बायझेंटाईन्स, रोमन आणि ओटोमन यांनी त्यात अनुक्रमे बदल केले.

तिथूनच पुढे दियारबाकीर मध्ये आणखी एक ताम्रपाषाण कालीन किल्ला आहे. कालांतराने यात अ‍ॅसिरियन किल्ल्यासारखे विविध बदल होत गेले.

सध्या तुर्कीच्या या दियारबाकीर शहरात मोठ्या प्रमाणावर कुर्द लोकसंख्या वास्तव्यास आहे. आम्ही तिथल्या वळणावळणाच्या गल्ल्यांमध्ये फिरलो. नंतर तुतीच्या झाडांची सावली असलेल्या बेसाल्ट खडकाच्या अंगणात विसावलो.

तिथेच एका बाकावर लोकरीचं जाकीट घातलेली एक बाई बसली होती. तिने उजव्या हाताने एक कान झाकला होता. तिचं नाव होतं फालेकनाझ अस्लान. तिचा आवाज ऐकत आम्ही जवळपास 30 मिनिटं तिथेच थांबलो.

अस्लन एक कुर्दिश गायक आणि कथाकार आहे. त्यांना डेंगबेज म्हणतात. तिच्या पूर्वजांच्या पिढ्यांनी त्यांच्या लोकसंगीत आणि लोककथा ऐकवत आपल्या आयुष्याची गुजराण केली. अस्लन जे गाणं गात होती त्यात टायग्रिसच्या किनाऱ्यावर बहरलेल्या पण अयशस्वी ठरलेल्या प्रेम प्रकरणाचा संदर्भ होता.

अस्लान सांगते की, सहसा पुरुषच डेंगबेज असतात, मात्र आता महिलाही या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यांची संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा हा एक मार्ग आहे.

अस्लनच्या मते, त्यांच्या लोकगीतांमध्ये टायग्रिस नदी मुख्य आहे. कारण ती भूतकाळातील आणि वर्तमानातील कुर्दिश जीवनाचा एक मध्यवर्ती घटक मानली जाते.

टायग्रिस नदी पुढे दियारबाकीरच्या आग्नेयेला असलेल्या तूर अब्दिन प्रदेशातील टॉरस पर्वतातील खोल दरीतून पुढे जाते. याठिकाणी सिरीयक ऑर्थोडॉक्स चर्चचं केंद्र आहे. ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळापासून हे केंद्र अस्तित्वात आहे.

त्यानंतर आम्ही मोर एव्हगिन याठिकाणी पोहोचलो. हा एक चौथ्या शतकातील ख्रिश्चन मठ आहे, जो टेकडीच्या काठावर उभा आहे. जणू तो विश्वासाचा आधारस्तंभ आहे असंच वाटतं.

या मठात जगातील पहिल्या काही ख्रिश्चनांचे पुतळे आहेत. त्यात सिरीयक लिपीमध्ये लिहिलेले प्रार्थना ग्रंथ आहेत.

मी मेणबत्ती पेटवून त्यांना वंदन केलं. टायग्रिसच्या किनाऱ्यावर असलेल्या या सुपीक प्रदेशात ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामचा झालेला मुक्त विकास, लोकांनी जपलेला त्यांचा वारसा, विस्तारलेल्या श्रद्धा आणि कल्पना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा झालेला प्रसार... इथे आल्यावर या सगळ्याची जाणीव होते.

विनाश आणि पुनर्रचना

शक्य असेल त्या त्या वेळी आम्ही लहान बोटीने प्रवास केला. पण टायग्रिस नदीमध्ये प्रवेश करणं बऱ्याचदा कठीण असतं.

तुर्कस्तानमधील धरण प्रकल्पांच्या संख्येमुळे, नदीच्या प्रवाहात मार्गक्रमण करणं कठीण होऊन बसतं. या धरण प्रकल्पांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टायग्रिस नदी सीरियाची आंतरराष्ट्रीय सीमा चिन्हांकित करते. नदीमुळे दोन भागात विभागलेल्या मोसूल या इराकी शहरात मुक्तपणे प्रवास करणं शक्य झालं.

2014 आणि 2017 च्या दरम्यान इस्लामिक स्टेट या संघटनेने मोसूलवर ताबा मिळवला तेव्हा स्थानिक रहिवाशांना टायग्रिस नदीतून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. नदीच्या पश्चिमेकडील जुनं शहर या संघटनेचं आश्रयस्थान आहे.

मोसूलमधील नदीवर बांधण्यात आलेले सर्व पुल युद्धादरम्यान नष्ट झाले. शेवटच्या युद्धातून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिहादींनी टायग्रिस नदीत उडी मारल्याचंही सांगण्यात येतं.

ऐतिहासिकदृष्ट्या नदी ही लोकांना एकत्र आणते, पण आता ती संघर्षाचा मुद्दा बनली आहे.

अरबी भाषेत मोसूलला अल-मावसिल असं नाव आहे. याचा अर्थ आहे जोडणारा घटक. टायग्रिस नदीच्या काठावरील दियारबाकीर, तुर्कस्तान आणि बसरा दरम्यान असलेलं हे शहर एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं, त्यामुळेच त्याला हे नाव पडलेलं असावं.

इसवी सन पूर्व सातव्या शतकात स्थापन झालेलं हे मोसूल शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. बाराव्या शतकात हे वांशिक आणि धार्मिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असं शहर बनलं होतं.

या संगमामुळे समृद्ध असा सांस्कृतिक प्रदेश निर्माण झाला. इस्लामिक स्टेटविरुद्धच्या संघर्षात जुन्या शहराचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला असला तरी शहराचा आत्मा अजूनही जिवंत आहे.

टायग्रिस रिव्हर प्रोटेक्टर्स असोसिएशनचे संस्थापक आणि आमचे प्रवासी सहकारी सलमान खैराल्ला सांगतात की, "टायग्रिस नदीच्या आसपास जे काही होतं ते बऱ्यापैकी वाचवण्यात यश आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, आम्ही इराकी नेहमीच पुनर्बांधणी करतो. आम्ही विनाश कधीच स्वीकारत नाही."

मोसूलमधील बाराव्या शतकातील अल-नुरीची ही जुनी मशीद युद्धात नष्ट झाली. पण युनेस्को आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या मोठ्या देणग्यांमुळे या मशिदीची पुनर्बांधणी सुरू आहे.

या मशिदीसमोर बायतना आहे. बायतना म्हणजे आपलं घर. तरुण मोस्लाव्हियन अरब कलाकारांनी जुन्या ऑट्टोमन घराचं नूतनीकरण

करून याठिकाणी संग्रहालय, कॅफे आणि सांस्कृतिक केंद्राची सुरुवात केली.

सारा सालेम अल-दबाग हे या केंद्राच्या संस्थापकांपैकी एक आहेत. ते सांगतात, "इथे जे घडलं ते लोकांनी विसरावं असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला कुशल लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत."

आदरातिथ्य

मोसूलहून टायग्रिस नदी आशुरकडे वाहते. ॲसिरियन साम्राज्याची ही पहिली राजधानी होती. नदीच्या काठावर 4,000 वर्षे जुनी झिग्गुरत आहे. झिग्गुरत म्हणजे मोठी विशाल अशी इमारत म्हणता येईल.

त्याच्या पलीकडे वाळवंटी प्रदेशात निमरुद आणि अ‍ॅसिरियन लोकांची दुसरी राजधानी हत्रा ही दोन शहरं आहेत. 2,000 वर्षांपूर्वी प्रवासी या भागात आपल्या रात्रीच्या मुक्कामासाठी थांबायचे.

आयसिसने या तिन्ही शहरांचं नुकसान केलं. पण पुरातत्वशास्त्रज्ञांची एक टीम मर्यादित संसाधनांसह आजही ही ठिकाणं सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या प्रदेशातील लोकांनी माझं ज्या पद्धतीने आदरातिथ्य केलं, जो प्रामाणिकपणा दाखवला त्याची माझ्या मनावर अजूनही छाप आहे. आणि हेच लोक बऱ्याचदा युद्ध आणि शत्रुत्व यासाठी आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकत असतात.

मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात त्यांचा उपवास असूनही त्यांनी माझ्यासाठी चहा बनवला. त्यांनी आम्हाला बकरीच्या मांसाचे पदार्थ खायला घातले.

त्यांनी आम्हाला सांगितलं की, किफ्रिझ या इराकी गावातील दोन मेंढपाळ तरुणांनी रात्री टायग्रिस नदी ओलांडलेल्या दोन लोकांना आयसीसच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातून सुरक्षितपणे परत आणलं होतं.

थोडक्यात मला जाणवलं की, अलीकडच्या काळात हिंसाचार वाढला असला तरी इथल्या स्थानिक लोकांची उदारता आणि परदेशी लोकांना मदत करण्याची भावना संपलेली नाही.

पुढील विश्वाचं पाणी

आम्ही आमचा एक रविवार इराकमधील सर्वात लहान आणि कदाचित सर्वात जुना वांशिक-धार्मिक गट असलेल्या मँडेअन्ससोबत घालवला.

मँडेअन्स लोक मानतात की रोज उपासना केल्याने आध्यात्मिक पोषण होतं आणि आपल्याला पापापासून मुक्ती मिळते. ही उपासना वाहत्या पाण्यात केली जाते आणि टायग्रिस नदी आजही त्यांच्यासाठी या उपासनेचं मुख्य केंद्र आहे.

एक पुजारी आठ बायकांना एकामागून एक टायग्रिस नदीत घेऊन जात होता. तो हळुवारपणे त्यांचं डोकं पाण्यात बुडवायचा आणि अरामी भाषेतील मांडे या प्राचीन बोलीत प्रार्थना करायचा. त्यांनी आजही त्यांची बोलीभाषा जिवंत ठेवली आहे.

पुजाऱ्याचा सहाय्यक म्हणतो, "येथील पाणी पुढच्या विश्वासारखं आहे."

मँडेअन्स लोकांचा आणि इतर अनेक समुदायांचा कणा असलेली ही नदीच आता धोक्यात आहे.

पण सलमान खैराल्ला, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मोसलवी कलाकारांच्या मते, टायग्रिसच्या काठावरील लोक हार मानायला तयार नाहीत. ते पुनर्बांधणीसाठी तयार आहेत.

जेव्हा मी खैराल्लाला नदीच्या भविष्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "इराकींनी आशावादी राहिलं पाहिजे. मागील पिढ्यांनी केलेल्या सर्व गोष्टी आपण बदलू शकतो."

टायग्रिस नदीकाठी भेट देता येतील अशी पाच ठिकाणं

दियारबाकीर शहराच्या भिंती

या प्राचीन वास्तूभोवती फेरफटका मारल्याने परिसराच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची कल्पना येते आणि शहराचे विहंगम दृश्य दिसते.

मोसूल हेरिटेज हाऊस - हे सांस्कृतिक केंद्र आहे. इस्लामिक राज्य अस्तित्वात आल्यानंतर मोसूलचा पुनर्जन्म झाला. आणि याची साक्ष या संग्रहालयात मिळते.

ग्रेट मशीद ऑफ समरा - या मशिदीत असलेला सर्पिल आकाराचा मिनार इराकची एक प्रतिष्ठित वास्तू आहे. हा मिनार नवव्या शतकापासून उभा आहे.

इराक संग्रहालय - या संग्रहालयाचा विशाल आकार आणि संग्रह देशाची गोष्ट सांगतो.

मेसोपोटेमियन दलदल - हजारो वर्षांपासून अरबांच्या अद्वितीय संस्कृतीचं पालनपोषण करणाऱ्या या पाणथळ भागात मुबलक जैवविविधता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)