You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अवाढव्य डायनासोरच्या पायांचे 200 ठसे सापडले, उंची-लांबीबद्दल काय माहिती समोर आली?
- Author, रिबेका मोरेल, एलिसन फ्रान्सिस
- Role, विज्ञान प्रतिनिधी, वरिष्ठ विज्ञान पत्रकार
ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायर येथील खाणीमध्ये आजतागायत देशाच्या इतिहासातील डायनासोरच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा नुकताच आढळून आला आहे.
या खाणीमधील चुनखडीच्या पृष्ठभागावर तब्बल 1660 लाख वर्षांपूर्वीचे अवाढव्य अशा डायनासोरचे 200 पायांचे ठसे दिसून आले.
नुकत्याच हाती आलेल्या या जीवशास्त्रीय पुराव्यांनुसार या भागात लांब गळ्याच्या अवाढव्य अशा सोरोपॉड (शास्त्रीय नाव - सेटिओसॉरस) आणि तुलनेनं लहान असलेल्या मेगलोसॉरस अशा डायनासोरच्या दोन प्रजातींचा वावर होता, हे सिद्ध होतं. सोरोपॉड (सेटिओसॉरस) हे शाकाहारी, तर मेगलोसॉरस हे मांसाहारी डायनासोर होते.
खाणीतील 150 मीटर लांबीच्या एका पट्ट्यावर हे पावलांचे ठसे सापडले आहेत. सुरुवातीच्या या शोधानंतर आता खाणीतील इतर भागांमध्ये देखील उत्खनन सुरू झालं असून आणखी जास्त पावलांचे ठसे सापडण्याची शक्यता आहे.
या नव्या शोधामुळे जीवाश्म शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. "हा मी पाहिलेला आजतागायतचा सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक जीवशास्त्रीय शोध आहे."
इतके जुने पावलांचे ठसे एवढे स्पष्ट आणि मोठे आहेत की, या भागात कधीकाळी डायनासोरचा वावर कसा होत असेल आणि त्यांचं राहणीमान कसं असेल, याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतंय," अशा शब्दात बर्मिंगहॅम विद्यापीठातील जीवाश्मशास्त्राच्या प्राध्यापिका क्रिस्टी एडगर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
डायनासोरच्या पावलांचे ठसे उमटलेला हा चुनखडीचा पट्टा पहिल्यांदा गॅरी जॉन्सन इथल्या खाणीतील स्थानिक कामगाराला आढळून आला. या खाणीत खोदकाम करणारं यंत्र चालवत असताना त्याला हा ऐतिहासिक पुरावा गवसला.
बीबीसीसोबत बोलताना गॅरी जॉन्सन म्हणाला, "मी तर नेहमीप्रमाणे खाणी भोवती जमा झालेली माती वेगळी करत होतो. तेव्हा मला एक उंचवटा लागला. मला सुरुवातीला वाटलं की जमिनीचा एखादा भाग त्या कड्यांमुळे असाच वर आलेला असेल."
"मी त्यावरील माती आणि वर बसलेला चिखल बाजूला करून आत पाहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण अजून आत खोदताना आणखी वर आलेल्या कडा लागत होत्या आणि या उंचवट्यांदरम्यान खड्डेदेखील मध्येच लागत होते."
"1990 च्या दशकात इथून जवळच असलेल्या खाणीत अशाच प्रकारच्या रचनेत डायनासोरच्या अस्तित्वाचे ठसे दडलेले होते, हे मला आठवलं. त्यामुळे मी आणखी जास्त खोदत राहिलो. तेव्हा कुठे जाऊन हा जीवशास्त्रीय खजिना माझ्या हाती लागला. इथल्या डायनासोरचे ठसे पाहणारा मी पहिला माणूस आहे, याची जाणीव मला झाली."
सुरुवातीला तर माझ्या पोटात गोळाच आला. हा सगळा अनुभव अगदी अविश्वसनीय आणि अभूतपूर्व असा होता." हे सांगताना गॅरी यांना आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवता आला नाही.
याच वर्षी ब्रिटनमधील एका नवीन उत्खनन प्रकल्पाअंतर्गत या भागातील खाणींमधील जीवशास्त्रीय पुरावे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. या मोहीमेत 100 शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यांना आतापर्यंत 5 वेगवेगळ्या ठिकाणी जीवाश्मांचे पुरावे आढळून आले आहेत.
यापैकी 4 ठिकाणांवर सोरोपॉड्स जमातीच्या डायनासोरच्या पावलांचे ठसे सापडले. सोरोपॉड्स हे चार पायांवर चालणारे अवाढव्य शाकाहारी डायनासोर होते. त्यांच्या पायांचे ठसे रचनेत काहीसे हत्तीच्या पायांप्रमाणेच आहेत. पण त्यांचा आकार बराच मोठा आहे. या महाकाय डायनासोची उंची तब्बल 18 मीटरपर्यंत असायची.
आणखी एका खाणीत मेगालोसॉरस प्रजातीच्या डायनासोरच्या पावलांचे ठसे सापडले आहेत. हे डायनासोर दोन पायांवर चालणारे आणि शिकार करणारे म्हणजेच मासांहारी होते. सोरोपॉड्सच्या तुलनेत हे आकाराने बरेच लहान होते.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेतील जीवाश्म शास्त्रज्ञ डॉक्टर एमा निकोलस यांनीसुद्धा या पुराव्यांचा पडताळा केला.
"प्रथमदर्शनी पावलांच्या ठशांचं चित्रच रेखाटलंय की काय असं वाटावं इतके ते स्पष्ट आहेत. याला आम्ही 'ट्रायडक्टिल प्रिंट' असं म्हणतो. कारण त्यांना असलेल्या पायांच्या तिन्ही बोटांचे ठसे यात स्पष्ट दिसत आहेत. या डायनोसॉरची लांबी साधारण 6 ते 9 मीटर दरम्यान असावी.
शिकार करून खाणारे हे मासांहारी मेगालोसॉरस ब्रिटनमधील ज्युरासिक काळातील आकाराने सर्वात मोठे असलेले डायनासोर होते. समुद्राला लागून असलेल्या खाजण अथवा खारभूमीवर उष्ण वातावरणात ते राहायचे. तिथून जवळपासच्या भागात ते घौडदौड करत असताना त्यांच्या पावलांचे उमटलेले हे ठसे आहेत," अशी माहिती बीबीसीशी बोलताना एमा निकोलस यांनी दिली.
हे पावलांचे ठसे इतकी वर्ष टिकून राहिल्याबद्दल बर्मिंगहॅम विद्यापीठातील जीवाश्म शास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड बटलर यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं.
"कदाचित त्या दरम्यान एखादं वादळ आलं असावं आणि हे ठसे या वादळाने आणलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली नंतर दबून राहिले असावेत. त्यामुळे नंतर ते कुठे वाहून न जाता अथवा नष्ट न होता आहे तसेच टिकून राहिले," असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
उत्खनना दरम्यान या शास्त्रज्ञांच्या चमूने पावलांच्या ठशांचा खोलात जाऊन अभ्यास केला. या मार्गाचे आणि प्रत्येक पावलाच्या ठशांचे हजारो फोटो काढून त्याचं एक मोठं थ्री डी मॉडेल देखील उभारण्यात आलंय. जेणेकरून वास्तववादी पद्धतीनं त्यांचा अभ्यास करता येईल.
"पावलांच्या ठशांचे हे पुरावे इतके ठोस आहेत की, त्यावरून हे डायनासोर कसे जगत होते, कुठल्या वातावरणात राहत होते, हालचाल कसे करत होते याचा सगळा अंदाज व्यवस्थित बांधता येतो."
"एका अर्थाने या पुराव्यांवरून या डायनासोरचं आयुष्यच डोळ्यासमोर उभं राहतं. इतकी ठोस आणि महत्वाची माहिती तर हाडांच्या अवशेषांमधूनही मिळत नाही. त्यामुळे हा पावलांच्या ठशांचा शोध आम्हा शास्त्रज्ञांसाठी अतिशय महत्वाचा आहे," असं प्राध्यापक बटलर सांगतात.
या खोदकामादरम्यान एक अशीही जागा मिळाली जिथे सोरोपॉड आणि मेगालोसॉरस या दोन्ही प्रजातींच्या डायनासोरच्या पावलांचे ठसे आढळून आले.
नैसर्गिकरित्याच या पावलांच्या ठशांचं इतकं सुंदर जतन झालेलं आहे की, कोणता डायनासोर इथून आधी गेला होता आणि कोणता नंतर आला, याचाही व्यवस्थित अंदाज बांधता येतो.
सोरोपॉडच्या पावलांचे गोल ठसे थोडे विस्कळीत झालेले आहेत. कारण नंतर त्यावर मेगालोसॉरसच्या तीन बोटांच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत. त्यामुळे आधी इथे सोरोपॉड राहत होते आणि नंतर इथे मेगालोसॉरसचा वावर राहिला, हे स्पष्ट होतं.
"तो डायनासोर इथून कसा चालत गेला असेल, याचं चित्रच माझ्या डोळ्यासमोर उभं राहतंय. चिखलांमधून मार्ग काढत एक एक पाऊल पुढे टाकताना त्यानं मागे ठेवलेली ही निशाणी जशास तशी अजूनही आपल्या नजरेसमोर असलेली बघणं खरंच विस्मयकारक आहे," अशा शब्दात ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डंकन मरडॉक यांनी आपली उत्सुकता आणि आनंद व्यक्त केला.
आता या पुराव्यांचं पुढे काय करायचं, याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. पण ही महत्त्वपूर्ण खाण इतर खोदकामासाठी बंद करून तिचं जशास तसं जतन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी संबंधित सरकारी विभागासोबत चर्चा सुरू केली आहे.
स्मिथ ब्लेचिनटन हे सरकारानं इथे नेमलेले खाण अधिकारी आहे. त्यांच्यासोबत शास्त्रज्ञांची चर्चा सुरू आहे. सोबत इंग्लंडमधील नैसर्गिक अधिवासांचं रक्षण करणाऱ्या 'नॅचरल इंग्लंड' या सरकारी संस्थेसोबत काम करत या ऐतिहासिक पुरातत्व जीवाश्म पुराव्यांचं आहे तसं जतन करण्यासाठीची योजना बनवायला शास्त्रज्ञांनी सुरुवात देखील केलेली आहे.
खाणीतील फक्त एक पट्टा आता खोदून झालेला आहे. या ठिकाणी आणखी बरेच पावलांचे ठसे अजून मिळतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. प्रागैतिहासिक काळाचा नव्यानं उलगडा करण्यासाठी हा शोध अनेक अर्थानं उपयुक्त ठरणार असल्यामुळं शास्त्रज्ञांमध्ये आणि पुरातत्व इतिहास अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)