AI कडून प्रेमाचा सल्ला घेणं कितपत योग्य? मानसोपचार तज्ज्ञ सांगतात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा व्ही
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अन्विताचा (नाव बदलले आहे) त्या दिवशी 22 वा वाढदिवस होता. परंतु, काही कारणांनी ती दिवसभर फक्त रडतच होती. तिचा गोंधळलेला प्रियकर अनिलकुमार (नाव बदलले आहे), तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
पण ती का रडत आहे हे त्याला काही कळत नव्हतं. तिला शांत करण्याच्या नादात दोघांमध्ये वाद होईल, अशीही त्याला भीती वाटत होती.
त्याचं प्रेमप्रकरण घरात कुणालाही माहिती नव्हतं आणि मित्रपरिवारातही फक्त एका जवळच्या मित्राला याची माहिती होती.
अशाप्रसंगी काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं. त्यामुळे, अनिलकुमारने सरळ आपल्या मोबाईलमधील एआय अॅप उघडलं.
"माझ्या प्रेयसीचा आज 22 वा वाढदिवस आहे, पण ती रडत आहे. मला तिला कसं शांत करावं हे समजत नाही. तिच्या रडण्याचं कारण मीच आहे का, हे देखील माहीत नाही. तिला काय आणि कसं बोलून शांत करता येईल यासाठी काही कल्पना दे," असं त्यानं त्यानं अॅपमध्ये लिहिलं.
त्यावर एआय अॅपने असं उत्तर दिलं की, "वाढदिवसाच्या दिवशी एखाद्यानं रडणं सामान्य गोष्ट आहे, पण आधी तिला दाखवा की, तुम्हाला तिच्या भावना समजतात. खालील संदेश तुम्ही तिला पाठवू शकता."
"हाय, अन्विता. मला समजतं की आजचा दिवस तुला जसा हवा होता तसं गेलेला नाही. पण मला तुला सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस. तुझ्या आनंदातसुद्धा आणि दुःखातसुद्धा मी तुझ्यासोबत आहे. तुझी इच्छा असेल तर आज आपण भेटू शकतो", असा तो संदेश होता.
अनिलकुमारने हाच संदेश अन्विताला पाठवला. त्यानंतर त्याच्या दिवसाचा शेवट आनंदात झाला, असं त्यानं सांगितलं.
बीबीसी तमिळशी बोलताना त्यानं सांगितलं की, "मी हा प्रश्न कुणालाही विचारला नाही. कदाचित मी माझ्या मित्राला विचारला असता, पण तो त्या दिवशी कामानिमित्त बाहेर होता.
"हा माझा वैयक्तिक विषय आहे. जर मी कोणाकडे मदत मागितली असती, तर त्यांनी माझ्या प्रेमाबद्दल मला आणखी दोन जास्तीचे प्रश्न विचारले असते आणि दोन दिवसांनी सगळं नीट झालं आहे का, त्याचाही फॉलोअप घेतला असता.
"परंतु, एआयशी बोलताना मला अशी काही काळजी नाही, कोणता संकोचही नाही. मला जे हवं आहे, तेच मला मिळू शकतं," असं त्याने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
32 वर्षांची शालिनी (नाव बदललेलं आहे) खूप तणावात आणि मानसिक दडपणाखाली आहे. ती दोन वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत आहे. त्या दिवशी सकाळी तिच्या ऑफिसमध्ये घडलेल्या एका घटनेचा विचार तिच्या मनातून जात नव्हता.
शालिनी म्हणते, "मी एका प्रोजेक्टवर एक आठवडाभर मेहनत करून काम केलं, पण क्लायंटकडून माझ्या सहकाऱ्याचं कौतुक करणारा इ-मेल आला.
आम्ही सगळ्यांनी टीम म्हणून काम केलं असलं तरी, माझं योगदान जास्त होतं आणि सर्वांना याची माहिती होती. परंतु, मॅनेजरने माझ्या योगदानाची योग्य दखलच घेतली नाही." या विचारांमुळे ती पहाटे 2.30 वाजेपर्यंत झोप शकली नव्हती.
कितीही विचार केला तरी, तिला समजत नव्हतं की, तिचं काम इतरांनी का मान्य केलं नाही. त्यामुळे तिने लगेचच एका एआय अॅपमध्ये आपला अनुभव लिहिला आणि रात्री झोप येत नसल्याचंही सांगितलं.
त्याला एआयने उत्तर दिलं की, "मी तुझ्या भावना समजू शकतो. खूप मेहनत करून केलेल्या कामाला मान्यता न मिळाल्यामुळे निराशा येते. पण ऑफिसमध्ये जिथे अनेक लोक एकत्र काम करतात, अशा घटना होणं सामान्य आहे.
"जेव्हा एखाद्याचं कौतुक होतं, तेव्हा प्रत्येकजण यासाठी पात्र आहे की नाही याचा विचार करत नाहीत, हे देखील सामान्य आहे. तरीसुद्धा, तुला तुझ्या कामासाठी मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.
तू या प्रोजेक्टसाठी केलेल्या कामाबद्दल 300 शब्दांत, सहकाऱ्यांवर टीका न करता, एक इ-मेल तुझ्या टीम लीडर आणि मॅनेजरला पाठवू शकतेस. तो इ-मेल नम्र, पण ठाम असावा.
"या नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी, रात्री शांत झोपेसाठी सोप्या श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करू शकतेस किंवा रात्री शांत झोपण्यासाठी वाहत्या पाण्याचे संगीत ऐकू शकतेस."
मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी एआयचा वापर करणारे तरुण
बरेच लोक, विशेषतः तरुण, आपल्या मानसिक समस्या सोडवण्यासाठी एआयची मदत घेत आहेत.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तरुण लोक बहुधा झटपट उत्तर शोधण्यासाठी एआय अॅप्सचा वापर करतात. बंगळुरूच्या मानसिक आरोग्य सल्लागार आर. अर्चना यांनी सांगितलं की, "बऱ्याच तरुणांना जेव्हा मी भेटते, तेव्हा ते म्हणतात की, त्यांना अडचण काय आहे हे माहीत आहे आणि जे मी सांगते तेच एआयनं त्यांना सांगितलं आहे.
"ते बहुतेक वेळा वेळेचं व्यवस्थापन, प्रेमाचे प्रश्न, कामात लक्ष न लागणं यांसारख्या कारणांसाठी एआय अॅप्स वापरतात. काही वेळा हे त्यांच्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरतं, हे नाकारता येत नाही," अर्चना सांगतात.
चेन्नईतील एका नामवंत खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ नित्या यांचं म्हणणं आहे की, "जसं एखाद्या रुग्णाला विचारलं जातं की, तुम्हाला धूम्रपानाची सवय आहे का, तसंच आता रुग्णाला तुम्ही एआयकडून मदत घेता का, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
"फक्त तरुणच नाही तर, बरेच लोक याचा वापर करतात. हे खूप सोपं आहे, जसं व्हॉट्सअॅपवर मित्राला मेसेज पाठवणं. मित्र कामात व्यग्र असेल, तर लगेच उत्तर देत नाही. पण एआय मात्र काही सेकंदातच उत्तर देतो," नित्या सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
इंटरनेटच्या मदतीने जग कितीही जोडलेलं असलं तरी, आजकाल एकटेपणा मोठी समस्या बनली आहे. पण तरुण लोक आपल्या भावना एआय अॅप्सशी शेअर करतात, त्यामागे केवळ एकटेपणाच हे एकमेव कारण नाही.
अनिलकुमारच्या म्हणण्यानुसार, तरुण लोकांसाठी महत्वाचं कारण म्हणजे त्यांना आणि त्यांच्या भावनांना कुणीही महत्त्व देत नाहीत, असं वाटणं.
मानसोपचार तज्ज्ञ अर्चना म्हणतात, "त्यांना जे विचारायचं असतं ते कोणत्याही संकोचाशिवाय एआयकडे विचारू शकतात. त्यांच्या भावनांची कदर केली जाते आणि तिथे त्यांना सुरक्षित असल्यासारखं वाटतं."
शालिनी म्हणते, "मी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन योग्य औषधं आणि उपचार घेत आहे. परंतु रात्री अडीच वाजता मी माझं दुःख कोणाला सांगू शकते? माझं कोण ऐकेल? कोण मला त्या वेळी धीर देईल?"
आर. अर्चना म्हणतात, "मानसोपचार तज्ज्ञाकडे थेरपी घेणं अनेकांना कंटाळवाणं वाटू शकतं. आठवड्याला किंवा महिन्याला सतत भेटायला जावं लागतं, आणि त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडणाराही नसतो."
मानसोपचार समुपदेशन आणि एआय समुपदेशन यात फरक काय?
एआयची मदत घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे, आपल्या भावना योग्य आहेत असं कुणीतरी लगेच सांगावं किंवा मान्य करावं अशी त्यांची अपेक्षा.
अर्चना सांगतात, "एआय अॅप्स तुम्ही चुकत आहात असं कधीच सांगणार नाहीत. कारण ते तसंच बनवलं गेलं आहे. पण थेरपीमध्ये, मानसोपचार तज्ज्ञ तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे एवढंच फक्त सांगणार नाहीत, तर गोष्टी कशा हाताळायच्या हेही शिकवतील. ते तुमच्या भूतकाळाची आठवण करून देऊन त्यामागची कारणं शोधून काढतील."
मानसोपचार तज्ज्ञ नित्या म्हणतात, "डॉक्टर तुमच्या आतापर्यंतच्या विचारांवर प्रश्न उपस्थित करतील, पण एआय तसं करणार नाही. एआय तुमचं बोलणं आणि वागणं बरोबर आहे असं सांगेल. थेरपी लगेच उत्तर देत नाही, पण एआय त्वरित उत्तर देतं."

फोटो स्रोत, R Archana
डॉ. नित्या सांगतात की, याचे काही धोकादायक परिणामही होऊ शकतात.
बायपोलर डिसऑर्डरने (ज्यात एखाद्या व्यक्तीची मन:स्थिती, उर्जा आणि वागण्यात मोठे बदल होतात) त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने, आपल्या उर्जेच्या आणि उत्साहाच्या टप्प्यात (मॅनिया) मोठा व्यवसाय सुरू करावा असं ठरवलं आणि एआयकडे मदत मागितली. पण शेवटी त्याला 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
डॉ. नित्या सांगतात, असंच एक प्रकरण डिल्यूजन (कल्पना करून घेण्याची मानसिक अवस्था) असलेल्या रुग्णाबाबत घडलं. त्याने 'माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवतंय' ही आपली कल्पना एआयला सांगितली. शेवटी त्यानं स्वतःच्या आईची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली.
एआयची मदत घेण्यात गैर काय आहे?
डॉ. नित्या म्हणतात, "एआय तात्काळ उपाय देऊ शकतं, पण फक्त त्यावरच दीर्घकाळ अवलंबून राहणं आरोग्यासाठी ठीक नाही. एआय माणूस नाही हे सर्वांना माहीत आहे. पण जर सतत एआयशीच समस्या शेअर करून, त्याच्याकडूनच उत्तरं घेत राहिलो, तर हळूहळू आपलं मन तेच खरं आहे असं नकळत मानायला लागेल."
डॉ. नित्या सांगतात, "आत्महत्येचे विचार असलेल्या व्यक्तीला एआय नेमकी कशी किंवा कोणत्या प्रकारची मदत करेल हे सांगता येत नाही. एआय कधीही मानवी सहानुभूती देऊ शकत नाही. कितीही उपाय सुचवले तरी, एआय आधी दिलेल्या माहितीच्या आधारावरच उत्तर देऊ शकतं."
"एक आयटी कर्मचारी त्याच्या डोकेदुखीबद्दल चिंतेत होता. त्याने एआयला विचारलं, आणि एआयनं साध्या डोकेदुखीपासून ते मेंदूत गाठ (ब्रेन ट्यूमर) असण्यापर्यंतच्या सगळ्या शक्यता त्याला सांगितल्या. त्यामुळे त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेक तपासण्या करून घेतल्या."

फोटो स्रोत, Dr.Nithya
नित्या म्हणाल्या की, "तो सर्व चाचण्यांचे रिपोर्ट्स घेऊन वेगवेगळ्या तज्ज्ञांना दाखवत फिरला आणि नंतर माझ्याकडे आला. प्रत्यक्षात त्याला मानसिक उपचारांची गरज होती. एआयचा वापर वाढल्यामुळे, रुग्ण आता डॉक्टरांवर आणि आम्ही देणाऱ्या औषधांवर सहज विश्वास ठेवत नाहीत. हे आमच्यासाठी एक नवीन आव्हान बनलं आहे."
मानसोपचार तज्ज्ञ अर्चना म्हणतात की, "यात गोपनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एआयसाठी अजून स्पष्ट नियम किंवा धोरण आलेलं नाही. त्यात दिलेली माहिती जमा केली जाते का, ती न्यायालयात वापरली जाऊ शकते का, याबद्दल अद्याप काहीही स्पष्टता नाही."
तरुणच नाही तर सक्षम असलेले सर्वचजण मानसिक आरोग्यासाठी एआय वापरतात, आणि हे टाळता येणार नाही, असं तरुणांसाठी मानसिक आरोग्य जागरूकता उपक्रम राबवणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ पवित्रा सांगतात.
त्या म्हणतात, "हे पूर्णपणे टाळता येणार नाही. त्यामुळे याला कसं नियंत्रणात आणायचं याचा विचार करायला हवा. संबंधितांनी यासाठी नियम किंवा धोरणं ठरवायला हवेत. तसेच एआयची मदत घेणारे लोक एका विशिष्ट टप्प्यावर तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत कसं पोहोचतील, यासाठी मार्ग ठरवणं गरजेचं आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











