सकाळी आंघोळ करणं योग्य की रात्री? आरोग्यासाठी आंघोळीची कोणती वेळ चांगली?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जास्मिन फॉक्स-स्केली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही लोकांना सकाळी आंघोळ करणं आवडतं, तर काही लोकांना सायंकाळी. मात्र, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आंघोळ करण्यासाठी कोणती वेळ अधिक चांगली आहे?

यावर लोकांची मतं फार वेगवेगळी आहेत.

तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ करता की रात्री झोपण्याआधी करता? की तुम्ही त्या 34 टक्के अमेरिकन नागरिकांसारखे आहात, जे दररोज आंघोळच करत नाहीत?

या पार्श्वभूमीवर असा प्रश्न उपस्थित होतो की, सकाळी अथवा सायंकाळी आंघोळ करण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

अनेक लोकांना सकाळी उठल्यावरच आंघोळ करायची असते.त्यामुळे त्यांना तरतरीत वाटण्यास आणि दिवसाची फ्रेश आणि चांगली सुरुवात करण्यासाठी तयार होण्यात मदत होते, असं त्यांचं मत असतं.

तर दुसऱ्या बाजूला, रात्री आंघोळ करणारे म्हणतात की दिवसभराची शरीरावरची घाण धुवून झोपल्याने त्यांना गाढ आणि शांत झोप येते.

आंघोळ करण्याच्या वेळेबाबत विज्ञान काय सांगतं?

कोणत्यावेळी आंघोळ करणं आपल्यासाठी अधिक फायदेशीर आहे? आंघोळ करणं का गरजेचं आहे?

आंघोळ केल्याने आपल्या त्वचेवरील घाण आणि घाम स्वच्छ करण्यास मदत होते.

दिवसभर आपलं शरीर धुळीसारख्या अनेक प्रकारच्या घाणीच्या संपर्कात येत असतं.

जर तुम्ही झोपण्याआधी आंघोळ करत नसाल, तर ही सगळी घाण आपल्या उशीवर तसेच पांघरुणावर जमा होऊ शकते.

एवढंच नाही, तर आपल्या त्वचेवर अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात.

त्वचेच्या प्रत्येक घन सेंटीमीटरवर 10 हजारपासून 10 लाखांपर्यंत बॅक्टेरिया उपस्थित असतात.

या सूक्ष्मजीवांचं प्रमाण शरीरावरील घर्म ग्रंथींमधून निघणाऱ्या तेलाच्या प्रमाणावर अवलंबून असतं.

आंघोळ केल्याने आपल्या त्वचेवरील घाण आणि घाम स्वच्छ करण्यास मदत होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंघोळ केल्याने आपल्या त्वचेवरील घाण आणि घाम स्वच्छ करण्यास मदत होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

घामाला आपला स्वत:चा असा कोणताही गंध नसतो. मात्र, स्टॅफिलोकोकससारख्या बॅक्टेरियामुळे तयार होणाऱ्या सल्फर संयुगांमुळे त्याला दुर्गंध प्राप्त होतो. त्यामुळेच, झोपण्याआधी आंघोळ करणं हा अधिक चांगला पर्याय वाटणं स्वाभाविक आहे.

मात्र, याबाबतचं वास्तव अधिक जटिल स्वरुपाचं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टरच्या मायक्रोबायोलॉजिस्ट प्रिमरोज फ्रीस्टोन सांगतात की, "जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल, तर तुम्ही अंथरुणावर स्वच्छ होऊन जाता. मात्र, रात्रभर तुम्हाला घाम तर येतच राहतो."

फ्रीस्टोन यांच्या मते, थंडीच्या दिवसांमध्येही माणूस रात्रभर उशी आणि अंथरुणामध्ये 230 मिलीलीटरपर्यंत घाम सोडत असतो.

इतका घाम डस्ट माइट्ससाठी मोठी पर्वणीच ठरते. डस्ट माइट्स हे फारच लहान किडे असतात. हे किडे मृत त्वचेच्या कोशिकांना खातात आणि ते उबदार तसेच ओलसर वातावरणात आणखी वाढतात.

फ्रीस्टोन सांगतात की, "तुम्ही घामाचं एकप्रकारे सूक्ष्म वातावरण तयार करता जिथं तुमच्या त्वचेतील बॅक्टेरिया वाढतात आणि ते सौम्य असा दुर्गंध निर्माण करतात. म्हणून, जर तुम्ही रात्री आंघोळ करून झोपायला गेलात, तरी सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराचा थोडासा वास येतच राहील."

अंथरुणातील पांघरुणावरही लक्ष द्या

रात्री आंघोळ करण्याचे फायदे तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा तुम्ही तुमच्या अंथरुणातील पांघरुण नियमित पद्धतीने धुत असाल.

कारण, बॅक्टेरिया रजाई, गादी, चादर आणि उशीवर अनेक आठवडे राहू शकतात.

डस्ट माइट्सदेखील काळानुसार अधिक वाढत जातात आणि उशीसारख्या ओलसर ठिकाणी बुरशीदेखील जमा होऊ शकते.

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते या गोष्टींना तोंड देऊ शकतात, परंतु गंभीर दमा असलेल्या सुमारे 76% लोकांना किमान एका प्रकारच्या बुरशीची ऍलर्जी असते.

रात्री आंघोळ करण्याचे फायदे तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा तुम्ही तुमच्या अंथरुणातील पांघरुण नियमित पद्धतीने धुत असाल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रात्री आंघोळ करण्याचे फायदे तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा तुम्ही तुमच्या अंथरुणातील पांघरुण नियमित पद्धतीने धुत असाल.

दुसऱ्या बाजूला, ए. फ्युमिगॅटसच्या संपर्कात आल्याने होणारे क्षयरोग किंवा धूम्रपान-संबंधित फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांमध्ये दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो.

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ हलमध्ये वाउंड हीलिंग अँड द मायक्रोबायोममधील सिनियर लेक्चरर होली विल्किन्सन सांगतात की, "संध्याकाळी आंघोळ करण्यापेक्षा तुमची बेडशीट स्वच्छ करणं जास्त महत्वाचं आहे. कारण, जर तुम्ही आंघोळ करून झोपायला गेलात आणि महिनाभर बेडशीट अशाच प्रकारे ठेवली. तर त्यावर बॅक्टेरिया, घाण आणि धुळीचे कण जमा होतील."

ही एक समस्या नक्कीच आहे. कारण, मोठ्या कालावधीपर्यंत डस्ट माइस्टच्या संपर्कात राहण्याने ऍलर्जीचा धोका अधिक वाढू शकतो.

जर तुम्हाला आधीपासूनच ऍलर्जी असेल, तर तुमच्या अंथरुणातील पांघरुण न धुतल्यानेही तुमची ही लक्षणं आणखी वाढू शकतात.

हे खरंय की, अद्याप या गोष्टीची पुष्टी झालेली नाही पण नियमितपणे घाणेरड्या चादरीवर झोपल्याने त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो, अशीही शक्यता आहे.

झोपण्याआधी अथवा सकाळी-सकाळी आंघोळ करण्याचे फायदे

रात्री आंघोळ करणं पसंत करणारे काही लोक असा युक्तिवाद करतात की, त्यामुळे त्यांना चांगली झोप येते. याचे पुरावेदेखील आहेत.

उदाहरणार्थ, 13 अभ्यासांच्या निकालांची तुलना करणाऱ्या मेटा-विश्लेषणात असं आढळून आलं आहे की झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी 10 मिनिटे गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप येण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला.

आता प्रश्न असा आहे की, सकाळी वा रात्री, कोणत्या वेळी आंघोळ करणं चांगलं?

फ्रीस्टोन सकाळी आंघोळ करणं पसंत करतात. कारण त्यामुळे रात्रीच्या वेळी अंथरुणावर जमा झालेला बहुतांश घाम आणि जंतू काढून टाकण्यास मदत होते.

रात्री आंघोळ करणं पसंत करणारे काही लोक असा युक्तिवाद करतात की, त्यामुळे त्यांना चांगली झोप येते. याचे पुरावेदेखील आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रात्री आंघोळ करणं पसंत करणारे काही लोक असा युक्तिवाद करतात की, त्यामुळे त्यांना चांगली झोप येते. याचे पुरावेदेखील आहेत.

यामुळे, अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छ अशी दिवसाची सुरुवात करण्यात मदत होते.

मात्र, तुमच्या या निर्णयाचा तुमच्या आरोग्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

तुम्ही दिवसा ताजं आणि स्वच्छ राहणं पसंत करता की रात्री, यावर ते अवलंबून आहे.

विल्किन्सन सांगतात की, "जर तुम्ही दिवसभरात एकदाच आंघोळ करत असाल, तर तुम्ही दिवसभरात कोणत्या वेळेला आंघोळ करता यामुळे काही खास फरक पडत नाही."

खरं तर, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराचे महत्त्वाचे भाग दररोज धुत आहात, तोपर्यंत आठवड्यातून दोनदा आंघोळ करणं आरोग्य आणि स्वच्छता राखण्यासाठी पुरेसं आहे.

"मात्र, तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करता यावरही ही गोष्ट अवलंबून असते. म्हणून जर तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्हाला दिवसाच्या शेवटी घरी येऊन आंघोळ करावीशी वाटेल, परंतु मला वाटतं की एकंदरीत बेड स्वच्छ ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे," असंही त्या सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)