भात की चपाती, रात्री काय खाणं योग्य? आहारशास्त्राचा याबाबत दृष्टीकोन काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आरोग्यासाठी भात खाणं योग्य किंवा चपाती खाणं योग्य यावर अनेकदा चर्चा होत असते.
अनेकांच्या रात्रीच्या जेवणात भात आणि चपाती दोन्हींचाही समावेश असतो. यात एकप्रकारचा समतोलही दिसतो.
बिहार, पश्चिम बंगाल किंवा ओडिशा सारख्या राज्यांमध्ये भात हा लोकांचा प्रमुख आहार असतो.
तर पंजाब किंवा मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये चपाती किंवा रोटीला लोकांच्या आहारात प्राधान्य दिलं जातं.
मात्र, तज्ज्ञ याकडे फक्त भात आणि चपातीच्या आधारे पाहत नाहीत.
रात्रीच्या आहारात भात हवा किंवा चपाती ही बाब अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या प्रकारचा भात किंवा चपाती खात आहात यावरही ते अवलंबून असतं.
कशाप्रकारे खाता हे सर्वात महत्त्वाचं
आपल्या ताटातील भात आणि चपाती या दोन्हींमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात.
सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, भाताच्या तुलनेत चपातीमध्ये कमी कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे चपाती आरोग्यासाठी अधिक चांगली असते.
नाजनीन हुसैन मुंबईस्थित आहारतज्ज्ञ आहेत आणि 'डायटिक्स फॉर न्यूट्रिफाय टुडे'च्या प्रमुख आहेत.
त्या म्हणतात, "तुम्ही जाडसर पिठापासून बनलेली किंवा जास्त फायबर असणारी चपाती खात असाल तर ठीक आहे. मात्र जर तुम्ही अगदी बारीक दळलेल्या (कोंडाविरहित) पिठाची चपाती खात असाल तर कार्बोहायड्रेस्ट्सचा विचार करता ती भातासारखीच असते. त्यामुळे अशी चपाती खाल्ल्यानंही रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढते."
त्या म्हणतात की, पॉलिश केलेले, लांब आकाराचे तांदूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. मात्र पॉलिश न केलेले छोटे तांदूळ त्या तुलनेत चांगले असतात.

फोटो स्रोत, Getty Images
फायबरचा मुद्दा लक्षात घेऊन डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ अनेकदा लोकांना ब्राउन राईस किंवा पॉलिश न केलेले तांदूळ खाण्याचा सल्ला देतात.
आणखी एक सल्ला दिला जातो. तो म्हणजे भात हा डाळ, दही किंवा भाजीसोबत खावा. तांदळाची खिचडी किंवा पुलाव देखील आरोग्यासाठी चांगला असतो.
दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर एम. वली म्हणतात की, "सध्या आपण जे बारीक, गुळगुळीत (गव्हाचं आवरण नसलेलं) पीठ खात आहोत, ते साखर, मैदा आणि मीठाप्रमाणेच पांढरं विष होत चाललं आहे."
"आपल्या आहारातील एक चूक म्हणजे आपण चपाती जास्त खातो आणि भाजी कमी खातो. तुम्ही जर भाताबरोबर जास्त प्रमाणात भाजी खाल्ली, तर त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स चांगला होतो. म्हणजेच त्यातून निर्माण झालेली साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. अशाप्रकारे ते चपाती खाण्यापेक्षा अधिक चांगलं ठरतं."
डॉक्टर वली म्हणतात की, जर तुम्ही पीठ मळताना त्यात हिरवा भाजीपाला किंवा दुधी भोपळ्याचा समावेश केला, म्हणजे चपाती फक्त गव्हाच्या पिठाची राहणार नाही आणि ती आरोग्यासाठी चांगली ठरेल.
भात योग्य की चपाती
भात आणि चपातीमधील मूलभूत फरक म्हणजे ज्याला जास्त ऊर्जेची आवश्यकता असेल त्याच्यासाठी भात चांगला असतो. उदाहरणार्थ जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी भात योग्य असतो.
मात्र, जर तुम्हाला जास्त प्रमाणात आहार घ्यायचा नसेल किंवा जास्त वेळा खायचं नसेल, तर तुमच्यासाठी चपाती हा योग्य पर्याय आहे. कारण त्यात फायबर जास्त प्रमाणात असतं.
त्यामुळे चपाती खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
माला मनराल, दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)मध्ये आहारतज्ज्ञ आहेत.
माला म्हणतात की, "तुम्ही चपाती भरपूर प्रोटीनबरोबर खाल्ली तर ते योग्य ठरतं. जे लोक मांसाहार करतात, त्यांच्यासाठी तर अनेक पर्याय आहेत. मात्र, जे शाकाहारी आहेत, ते चपातीबरोबर भाजी किंवा डाळ इत्यादी खाऊ शकतात."
माला मनराल म्हणतात, "तुम्ही काय खाल्लं पाहिजे, ही गोष्ट तुमच्या कामाचं स्वरुप आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. जर तुमचं काम बैठ्या स्वरुपाचं असेल तर तुम्हाला कमी कॅलरींची आवश्यकता असते."
"अशा लोकांना आम्ही चपाती खाण्याचा सल्ला देतो. कारण जर अशा लोकांनी भात जास्त खाल्ला तर त्यात लठ्ठ होण्याचा धोका असतो."

फोटो स्रोत, Getty Images
माला मनराल म्हणतात, "प्रत्येक व्यक्तीला शारीरिक सक्रियता आणि वयानुसार एका ठराविक प्रमाणात कॅलरींची आवश्यकता असते.
समजा एखाद्याला 1600 किलो कॅलरीची आवश्यकता आहे, तर आम्ही काळजी घेतो की त्यातील 60 टक्के कार्बोहायड्रेटमधून मिळाव्यात, 20 टक्के प्रोटीनमधून आणि जवळपास 20 टक्के चरबीतून मिळाव्यात."
यात कार्बोहायड्रेट्ससाठी चपाती, भात, इडली, उपमा आणि प्रोटीनसाठी डाळ किंवा मांसाहारी लोकांसाठी अंड्यांचा समावेश असतो.
भात खावा की चपाती हे बऱ्याच अंशी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतं.
सर्वसाधारणपणे मधुमेहाच्या रुग्णांना भात टाळण्याचा आणि फायबर जास्त प्रमाणात असलेला आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेला भात फायबरच्या दृष्टीनं चांगला मानला जातो.
नाजनीन म्हणतात, "भात फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील रेझिस्टन्स स्टार्चचं रुपांतर फायबरमध्ये होतं. म्हणजेच असा भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही."
प्रदेशानुसार देखील लोकांचा आहार ठरतो का?
असं मानलं जातं की, आपण लहानपणापासून जी गोष्ट खात असतो, ती पचवणं आपल्याला सर्वात सोपं जातं. तसंच तो आहार घेतल्यानं आपल्याला अधिक समाधान देखील मिळतं.
नाजनीन हुसैन म्हणतात, "ज्या प्रदेशात जी गोष्ट पिकते, तो तिथला मुख्य आहार असतो. सर्वसाधारणपणे लोकांचा आहार असाच असला पाहिजे."
उदाहरणार्थ काश्मीरच्या लोकांचा मुख्य आहार भात असतो. त्यांच्यासाठी चपाती योग्य ठरू शकत नाही.
डॉक्टर वली म्हणतात, "अनेक भागात लोकांना चपाती बनवतादेखील येत नाही. भारतात बहुतांश लोक भात खातात. दक्षिण भारतात तर मधुमेहाचे रुग्णदेखील भात खातात, मात्र त्या भातात अनेक गोष्टींचा समावेश करून तो शिजवला जातो. त्यामुळे तो पचवण्यासाठी पॅनक्रियाजवर (स्वादुपिंड) ताण येत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











