आपल्या ताटातला भात जगाचे तापमान वाढवायला कारणीभूत तर ठरत नाहीये ना?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फूड चेन शो
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
तांदूळ किंवा भात आपल्या रोजच्या जेवणातला महत्त्वाचा भाग आहे. परंतु, त्याच्या उत्पादनासाठी लागणारं भरपूर पाणी आणि त्यामुळे होणारं प्रदूषण, हवामान बदलाच्या संकटात भर घालत आहे.
तांदूळ किंवा भात हा फक्त आहार नाही. जगाच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी तांदूळ हे फक्त रोजचं अन्न नाही, तर तो त्यांच्या संस्कृती, परंपरेचा आणि आर्थिक जगण्याचा एक भाग आहे.
फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या एक श्रोता अॅड्रियन बियांका विलानुएवा म्हणतात, "तांदूळ हे आमच्या खाद्यसंस्कृतीचं हृदय आहे. तांदळाचं महत्त्व फक्त मुख्य अन्नापुरतं मर्यादित नाही. तो आमच्या संस्कृतीचा पाया आहे."
त्या सांगतात, "फिलिपाईन्समधले बहुतेक लोक दिवसातून तीन वेळा तांदूळ खातात- नाश्त्याला, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात. अगदी गोड पदार्थांमध्येही तांदळाचा वापर होतो."
भारत देखील याला अपवाद नाहीये. भारतातही सामान्य माणसाच्या जेवणात भाताचा समावेश असतो. सण-वार असो की मेजवानी तांदळाच्या पदार्थांशिवाय त्याला पूर्णत्व येतच नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मला 'स्टिकी राइस' म्हणजेच चिकट भात खूप आवडतो, कारण आमच्या सगळ्या पारंपरिक मिठायांमध्ये तो असतोच."
परंतु, आता हवामान बदलाचा परिणाम वाढत चालला आहे.
आणि त्यासोबतच हा प्रश्नही निर्माण होत आहे की, आपल्याला तांदूळ खाणं कमी करायला हवं का?

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि शेती संघटनेनुसार, खाण्यायोग्य वनस्पतींची संख्या 50,000 पेक्षा जास्त आहे. तरीसुद्धा, जगाच्या अन्नाच्या 90 टक्के गरजा फक्त 15 पिकांमधूनच भागवल्या जातात. यामध्ये तांदूळ, गहू आणि मका ही सर्वात महत्त्वाची पिकं आहेत.
आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे (आयआरआरआय) महासंचालक डॉ. इवान पिंटो म्हणतात, "जगातील सुमारे 50 ते 56 टक्के लोकसंख्या ही मुख्य अन्न म्हणून तांदळावर अवलंबून आहे."

फोटो स्रोत, Getty Images
याचा अर्थ असा की, सुमारे चार अब्ज लोक दररोज तांदूळ हे मुख्य अन्न म्हणून खातात.
दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाचे उत्पादन घेतले जाते.
आफ्रिकेतही तांदळाची मागणी वाढत आहे, आणि त्याचे काही वाण युरोप व दक्षिण अमेरिकेतही पिकवले जातात.
परंतु, जागतिक आहारात तांदळाचं प्रमाण जास्त असण्याची निसर्गाला किंमतही मोजावी लागते.

स्पेनमधील एब्रो फूड्स या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मालकीची, ब्रिटनमधील टिल्डा ही तांदूळ कंपनी आहे. तिचे व्यवस्थापकीय संचालक जीन-फिलिप लाबोर्दे स्पष्ट करतात की, "भाताच्या रोपांना भरपूर पाण्याची गरज असते."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "एक किलो तांदूळ पिकवण्यासाठी सुमारे 3,000 ते 5,000 लिटर पाणी लागतं. हे खूपच जास्त आहे."
बहुतांश भाताची शेती पूर येणाऱ्या भागात होते, विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात. ही पद्धत भातासाठी योग्य मानली जाते, पण त्यामुळे कमी ऑक्सिजन असलेलं वातावरण तयार होतं, ज्याला 'अॅनारोबिक परिस्थिती' असं म्हणतात.

डॉ. इवान पिंटो यांच्या मते, "शेतात पाणी साचलं की, तिथे असलेले सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार करतात."
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनुसार, मिथेन हा एक शक्तिशाली हरितगृह वायू आहे, जो एकूण जागतिक तापमान वाढीच्या सुमारे 30 टक्के वाढीसाठी कारणीभूत आहे.
आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या अंदाजानुसार, जगभरातून शेती क्षेत्रातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात तांदूळ उत्पादनाचा वाटा सुमारे 10 टक्के इतका आहे.

टिल्डा कंपनी कमी पाण्यात भात पिकवण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे, ज्याला 'अल्टरनेट वेटिंग अॅन्ड ड्रायिंग' (एडब्ल्यूडी) म्हणजेच 'पाणी साचवणं आणि नंतर वाळवणं' असं म्हणतात.
या तंत्रात शेताच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 सेंटीमीटर खाली एक पाइप बसवला जातो. संपूर्ण शेतात सतत पाणी भरून ठेवण्या ऐवजी, शेतकरी तेव्हाच पाणी देतात जेव्हा त्या पाइपमधलं पाणी पूर्णपणे आटतं किंवा संपतं.
'टिल्डा'चे व्यवस्थापकीय संचालक जीन-फिलिप लाबोर्दे सांगतात, "साधारणतः एक पीक हंगामात 25 वेळा पाणी द्यावं लागतं, पण एडब्ल्यूडी तंत्रज्ञानामुळे हे 20 वेळांवर आणता येतं. पाच वेळा सिंचन वाचवल्यानं फक्त पाण्याची बचत होत नाही, तर मिथेन वायूचं उत्सर्जनही कमी होतं."

फोटो स्रोत, Getty Images
2024 साली टिल्डा कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर 50 शेतकऱ्यांऐवजी 1,268 शेतकऱ्यांसोबत केला. आणि त्याचे परिणाम खूपच सकारात्मक आणि उत्साहवर्धक दिसून आले.
लाबोर्दे सांगतात, "आम्ही 27 टक्के पाणी, 28 टक्के वीज आणि 25 टक्के खतांचा वापर कमी केला. तरीसुद्धा पिकाचं उत्पादन 7 टक्क्यांनी वाढलं."
ते हेही सांगतात, "हे फक्त जास्त गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवण्याचं नाही, तर कमी खर्चात जास्त कमाई करण्याचा एक मार्ग आहे."
लाबोर्दे यांच्या मते, मिथेन वायूच्या उत्सर्जनात 45 टक्के घट झाली आहे. त्यांचा विश्वास आहे की जर पाण्याचं सिंचन आणखी कमी करता आलं, तर मिथेन उत्सर्जन 70 टक्क्यांपर्यंत कमी करणं शक्य आहे.

तांदळाने अब्जावधी लोकांना अन्न पुरवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, विशेषतः हरित क्रांतीच्या काळात विकसित झालेल्या आयआर-8 सारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींमुळे. पण आता हवामान बदल हे तांदळाच्या उत्पादनासाठी एक मोठं संकट बनत चाललं आहे.
याचं मुख्य कारण असं आहे की, ज्या भागांमध्ये या तांदळाच्या जाती घेतल्या जातात, तिथं उष्णता, दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या घटना सातत्यानं वाढताना दिसत आहेत.
भारतात 2024 च्या धान (भात) हंगामात तापमान थेट 53 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं, तर बांगलादेशमध्ये वारंवार येणाऱ्या मोठ्या पुरांमुळे पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या आव्हानाचा सामना करण्यासाठी आयआरआरआय आपल्या जनुक बँकेत जतन केलेल्या 1,32,000 धानाच्या जातींचा अभ्यास करत आहे, जेणेकरून त्यातून योग्य तोडगा मिळवता येईल.
एक महत्त्वाचं यश मिळालं आहे, शास्त्रज्ञांना असा एक जीन किंवा जनुक सापडला आहे जो रोपाला पाण्याखाली 21 दिवसांपर्यंत जिवंत ठेवू शकतो.
डॉ. पिंटो सांगतात, "या नवीन वाणांमुळे पूरस्थितीतही पिकं जास्त काळ टिकून राहतात आणि उत्पादनावर काहीही परिणाम होत नाही."
ते म्हणतात, बांगलादेशातील पूरग्रस्त भागांमध्ये असे वाण आता हळूहळू लोकप्रिय होत आहेत.

काही देशांनी आपल्या देशात तांदळाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये जेव्हा तांदळाच्या किंमती झपाट्याने वाढल्या, तेव्हा सरकारनं बटाट्याला पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली.
ढाका येथे राहणारे शरीफ शबीर आठवून सांगतात, "आम्हाला बटाटा आवडतो... पण पूर्ण जेवणात भाताऐवजी फक्त बटाटा खाणं मी कल्पनाही करू शकत नाही."
चीननेही 2015 मध्ये असाच एक उपक्रम सुरू केला होता, ज्यामध्ये बटाट्याला पोषणमूल्यांनी भरलेला 'सुपरफूड' म्हणून त्यांनी प्रसिद्धी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर 1990 च्या दशकात चीन जगातला सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनला होता आणि देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांनी बटाट्याला मुख्य अन्न म्हणून स्वीकारायला सुरुवात केली होती. तरीसुद्धा हा उपक्रम फारसा यशस्वी झाला नाही.
लंडनमधील एसओएएस विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ जेकब क्लेन सांगतात, "दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम चीनमध्ये कधी कधी बटाट्यालाही मुख्य अन्न म्हणून खाल्लं जातं."
पण ते असंही म्हणतात, "खूप ठिकाणी बटाट्याला गरिबीशी जोडलं जातं."
क्लेन यांच्या मते, "चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातल्या अनेक लोकांनी मला सांगितलं की, त्यांचं बालपण बटाट्यावरच गेलं. त्यामुळे आजही काही लोकांना वाटतं की बटाटा खाणं म्हणजे गरीबपणाचं लक्षण आहे."

जगभरात भात हा सामान्य लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. तो चविष्ट असतो, सहज बनतो, आणि साठवायला व ने-आण करायला सोपा असतो.
अंदाजे जगभरात दरवर्षी सुमारे 52 कोटी टन भात खाल्ला जातो.
फिलिपाईन्समधील अॅड्रियन बियांका विलानुएवा मान्य करतात की, त्या भात खाणं कमी करू शकतात, पण तो पूर्णपणे सोडू शकणार नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, "मी जरी भात खायचं टाळण्याचा विचार केला, तरी जेव्हा मी कुणाच्या घरी किंवा एखाद्या पार्टीला जाते, तेव्हा तिथं भाताचेच पदार्थ दिले जातात."
"मला असं वाटतं की, मी भात खाणं कमी करेन, पण तो पूर्णपणे सोडणं कठीण आहे, कारण तो आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











