‘मासिक पाळी तर निसर्गानेच दिली आहे त्याचा विटाळ काय आणि सगळं पांडुरंगाच्या चरणी लीन आहे’

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

यंदाच्या वर्षी पंढरीची वारी 29 जून ते 17 जुलै या काळात होत आहे. वारीचा परतीचा प्रवास पंढरपूरहून 21 जुलैला सुरू होईल.

वारीत सर्व जाती-धर्माचे, वयोगटाचे लोक सहभागी होतात. महिलांचाही वारीत मोठ्या संख्येने सहभाग असतो. अनेकदा महिलांना वारीच्या काळात मासिक पाळी येते. अशावेळी या महिला काय करतात? त्यांना काही अडचणी येतात का?

दोन वर्षांपूर्वी वारीमध्ये सहभागी झालेल्या महिलांसोबत बीबीसी मराठीने संवाद साधला होता. आता वारी सुरू असताना हा रिपोर्ट पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मासिक पाळी आणि देवधर्म हा मुद्दा वेगवेगळ्या समाजांमध्ये, जातींमध्ये आणि देवस्थानांमध्ये वादग्रस्त राहिलेला आहे. देशातल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यापर्यंत हा वाद पेटलेला दिसतो.

पण पंढरपूरच्या वारीचा साधारण 21 दिवसांचा प्रवास या वादाला अपवाद ठरतो. पायी चालणाऱ्या वारकरी महिलांना पाळीविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.

गावात, घरांमध्ये पाळला जाणारी मासिक पाळी वारीच्या प्रवासात विटाळ राहात नाही. तो निसर्गाचाच एक भाग असल्याचं वारकरी महिला सांगतात. महाराष्ट्रात वारकरी भक्ती संप्रदायाला दहा शतकांचा म्हणजेच एक हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यात वारकरी महिलांच्या सहभागासोबतच महिला संतांचंही योगदान मोठं आहे.

भक्तांसाठी विठ्ठल म्हणजे कैवळ दैवतच नाही तर माय-बाप-बहिण सर्वकाही आहे. ही गोष्ट तर आपल्याला वारीत दिसतेच पण त्याचबरोबर दैनंदिन जगण्यातला संघर्ष आणि विठ्ठल भक्ती याची सांगड घालत स्वतःला, समाजाला प्रश्न विचारण्याचं धाडस या आध्यात्मिक परंपरेनं केलेलं दिसतं.

वारीवरील विशेष लेखांसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

संतांनी केलेल्या या रचना विठ्ठल-रखुमाई भक्तीची रसाळ आणि लडिवाळ वर्णनं नाहीत. तर या संतांनी स्पृश्य-अस्पृश्य, सोवळं, जाचक रूढी, परंपरांचं जोखड, जातीभेद, वर्णभेद याविषयी अभंग रचले आहेत.

'अवघा रंग एक झाला' हा अभंग रचणाऱ्या संत सोयराबाई दुसऱ्या एका अभंगात म्हणतात-

विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।।

म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।।

देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।।

मासिक पाळीच्या विटाळाविषयीचं हे संतांचं चिंतन वारकरी संप्रदायात कसं झिरपलं आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला.

सकाळी बीबीसी मराठीची टीम सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या जवळ पोहोचली. संत तुकारामांच्या पालखीत काही वारकरी टाळ वाजवत पुढे चालले होते. काही डोक्यावरच्या पिशवीचा तोल सावरत पटापट पावलं टाकत होती. काही मंडळी मोकळ्या शेतांमध्ये विखूरलेली होती. यातच अजून एक चित्र पाहायला मिळालं.

अकलूजच्या अलीकडे एक टँकर उभा होता. काही वारकरी महिला तिथे कपडे धूत होत्या. तर काही वयस्क वारकरी महिला अंगावरची साडी तशीच ठेवून अंगावर पाणी घेत होत्या आणि टँकरच्या आडोशाने कपडे बदलत होत्या.

जिथे जसं जमेल तसे आपली ही कामं उरकून घेण्याची वारकऱ्यांना सवय झालेली असते. काही प्रश्न मनात आले. पण जितक्या सहजतेनं पुरुष वारकरी हे करू शकत असतील तितकीच ही गोष्ट महिला वारकऱ्यांसाठी सोपी असेल का? आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे जर या दरम्यान मासिक पाळी आली तर महिला काय करत असतील?

आंघोळच पटकन उरकून घ्यावी लागते तर सॅनिटरी पॅड कुठे बदलत असतील? पाळीत जी स्वच्छता ठेवावी लागते, ती महिलांना पाळणं शक्य होत असेल का? वारीमध्ये आल्यावर जर पाळी आली तर त्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असेल? इथेही मासिक पाळीकडे 'विटाळ' म्हणून बघितलं जात असेल का?

पंढरपूरपर्यंत वारीचं रिपोर्टिंग करताना या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायचं असं मी ठरवलं. मासिक पाळीवर महिला बोलताना लाजत होत्या. काही जणी पाळी गेल्यावर म्हणजे मेनोपॉजनंतर वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

देहूमधून तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी झालेल्या मुळच्या पुणे जिल्हातल्या जयमाला बच्चे या मात्र वारीतल्या पाळीच्या अनुभवावर स्पष्ट बोलल्या. त्यांनी सांगितलं, "महिला पॅड वापरतात. ते कपड्यात किंवा कागदात गुंडाळून टाकून देतात. वारीमध्ये चालताना, वावरताना शारीरिक त्रास काही जाणवत नाही. पंढरपूरला जाण्याचा उत्साह आणि आनंदच खूप असतो. नाचू गाऊ आनंदे असंच वाटतं."

त्यांना विचारलं की बऱ्याचशा घरांमध्ये पाळी दरम्यान स्त्रियांवर बंधन असतात. घरात त्या वेगळं बसतात किंवा त्यांचा घरातला वावर मर्यादित असतो.

तर मग वारीमध्ये काय चित्र असतं? यावर जयमाला बच्चे म्हणाल्या की, "पांडुरंगाच्या चरणी सगळं लीन आहे. दिंडीमध्ये पाळीला असं काही मानलं जात नाही. पूर्वीपासून त्या प्रथा चालत आलेल्या आहेत. काही देवदेवतांना चालत नाही, पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या आहेत. आधी लोकांना खूप कष्ट होते. त्यामुळे ती 4 दिवसांची विश्रांती असायची. या प्रथा आता काही लोक मानतात आणि काही लोक मानत नाहीत.

"तसं पाहायला गेलं तर हा विटाळ पवित्र आहे. पण रूढी परंपरानुसार घरी ते पाळावं लागतं. पण वारीमध्ये असं काही मानलं जात नाही. पांडुरंगाच्या चरणाशी सुद्धा लीन होतात. त्यावेळेस विटाळ मानला जात नाही."

यवतमाळ जिल्हातल्या एका दिंडीत सहभागी झालेल्या पन्नाशीतल्या शोभाताईंना हेच विचारलं. त्या म्हणाल्या की, "काही दिंड्या त्यांच्या गावातून महिनाभर आधी निघतात. त्यामुळे महिलांची पाळी येणारच. पण अशा परिस्थितीत एखादा धार्मिक कार्यक्रम होत असेल तर थेट तिथे जायला नको."

पण यावर त्यांच्याच दिंडीतल्या अर्चना कदम यांनी वेगळं मत व्यक्त केलं.

अर्चना कदम म्हणाल्या की, "जर पाळी निसर्गानेच दिली आहे तर त्याला वाईट का मानायचं?"

त्यांनी सांगितलं की, "वारीमध्ये पिरियड यायच्या आधी आमचे देव सगळे झाले होते. त्यामुळे मला प्रॉब्लेम आला नाही. पिरियड आला तरी दुरूनच दर्शन घ्यायचं असतं. याला तर बायका देवघरचं फुल म्हणतात. संसारात विटाळ म्हणतात. पण इकडे असं काही नाही. हे निसर्गातूनच तर आलेलं आहे. देवानेच दिलेलं आहे. स्त्रियांसाठी ते आवश्यक आहे. त्याच्यापासूनच तर सगळं आहे."

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की, पाळी दरम्यान काही महिलांना शारिरिक त्रास होतो. तो व्यक्तीनुसार बदलूही शकतो. पण साधारणपणे, अंगदुखी, पोटदुखी, पायदुखी हे त्रास महिलांना जाणवतात. मग अशा परिस्थितीमध्ये महिला त्यांचा पायी प्रवास सुरुच ठेवतात का?

यावर अर्चना कदम म्हणतात, "मला काही तसा त्रास नाही. पण पाय तर चालण्यामुळे दुखतातच. त्यासाठी आताच गोळ्या घेऊन आलीये मी. जेवण जात नाही. कधी अॅसिडीटी होते. पुन्हा गोळी घ्यायची. चालत राहतो. ही सगळी मनाची तयारी ठेऊनच आलो ना. पोट थोडं दुखत होतं. पण घरी हवं सगळं कसं पाहायला मिळणार? चालण्यामुळे जास्त ब्लिडिंग झालं. पण त्यातही आनंद वाटतो. माऊलीचं नाव घायचं आणि चालत रहायचं."

"माझा पिरियड 4 तारखेला होता. चालण्यामुळे 28 तारखेलाच येऊन गेला. पॅड मी सोबतच आणलं होतं. त्यामुळे मला काही अडचण झाली नाही. रस्त्याला लागल्यामुळे जशी जशी परिस्थिती तशी त्याला तोंड दिलं. आता कसं घरी कपडा वापरला तर तो धुवू शकतो. आताच्या मुली पॅडच वापरतात. ते बदलता येतं. पॅड बदलायचं.

"एखादी जागा पाहून टाकून द्यायचं. दुसरं घ्यायचं. नंतर अंघोळीला जागा मिळाली की आंघोळ करायची. घरच्या सारखं इथे नसतं. हे पुरुषांना काही सांगू शकत नाही. आम्ही बायकाच एकमेकींना मदत करतो," अर्चना पुढे सांगतात.

मासिक पाळीला जोडलेली सामाजिक आणि धार्मिक बंधनं वारीमध्ये थोडी सैल होत असल्याची भावना या महिलांकडून जाणवली.

अकलूजमध्ये ग्रामपंचायती आणि बचत गटाच्या माध्यमातून मोफत सॅनिटरी पॅड वाटपही केलं जात होतं. तिथे मासिक पाळीच्या स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली जात होती.

पण जेव्हा सॅनिटरी पॅड प्रचलित नव्हते तेव्हा महिला वारीत यायच्या का?

हा प्रश्न मी विचारला नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यांतील एका दिंडीसोबत आलेल्या आणि साठी उलटलेल्या कमलबाई झगडे यांना. त्यांनी सांगतिलं की, तेव्हापण महिला यायच्या आणि पाळी आली तर तशा परिस्थितीला तोंड द्यायच्या.

"तेव्हा कपडा वापरायचो. काहीही झालं तरीही चालत राहायचं. तो कपडा धुवायचा आणि जिथे जेवणाची विश्रांती असेल तिथे वाळवायचा. जेवणाची विश्रांती म्हणजे 3 तास असतातच. यादरम्यान तो कपडा वाळेल याची तजवीज करायची. पाळीत वापरायचे जास्तीते कोरडे कपडे सोबत ठेवायचो. म्हणजे धुतलेले लवकर वाळले नाही किंवा जास्त अंगावर गेलं तर ते वापरता यायचे.

"आता मुली पॅड वापरतात. आता पण पाळी असलेल्या बऱ्याच महिला दिंडीत आहेत. पाळी सुरू असताना पाऊस लागला तर पंचाईत व्हायची. मग ओलं होई नये म्हणून काळजी घ्यावी लागायची. गोणपाटाचं पावसातलं पांघरुण करायचो. नंतर ते पण वाळवावं लागायचं," कमलबाई यांनी सांगतिलं.

वारीमध्ये पाळी आली तर ती स्त्री दिंडीच्या जवळ जात नाही, असं नाशिक जिल्हातल्या सत्तरीतल्या सिंधूताई शेडगे यांनी सांगितलं.

"पाळी आली तर त्या पादुकांच्या जवळ येत नाही. थोड्या वेगळ्या थांबतात. आम्ही पण असंच करायचो. घराच्या सारखं पूर्ण वेगळं तर बसता येत नाही. पण आम्ही बाहेर बाहेर थांबायचो. आमच्या घरी पाळीत महिला वेगळ्या बसतात. पोरी, सुना, नाती पाळीच लागत नाही सगळीकडे," असं सिंधूताईंनी सांगितलं.

याच दिंडीतल्या एका वयस्कर आजींनी सांगितलं की, पाळी गेल्यावर त्यांनी वारीत यायला सुरुवात केली.

पण एकंदरीत पाळीमुळे वारीमध्ये कुठलिही बाधा येऊ नये याची खबरदारी वारकरी महिला घेतात असं दिसलं. पाळी आल्यामुळे थांबावं किंवा पुढचा प्रवास चालत करू नये, असा विचार त्या सहसा करत नाहीत.

सणावाराला पाळी येऊ नये म्हणून अनेकदा महिला गोळ्या खाताना दिसतात. पण तुम्ही तसं करत असाल तर पूजेसाठी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय, मग हे वाचाच!