बीबीसीचे सर्वाधिक वाचक-प्रेक्षक भारतात, नव्या आकडेवारीतून स्पष्ट

बीबीसी

फोटो स्रोत, JORDAN PETTITT/PA WIRE

प्रेक्षक आणि वाचक संख्येच्या बाबतीत भारत बीबीसीसाठी पहिल्या क्रमांकावर असल्याचं ताज्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

बीबीसी निर्मित कंटेट भारतात 8 कोटी लोकांपर्यंत पोहोचत आहे.

यामध्ये आठवड्यातून किमान एकदा बीबीसीचा कंटेट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहतात, वाचतात किंवा ऐकतात अशा प्रेक्षक, वाचक आणि श्रोत्यांचा समावेश आहे.

बुधवारी (12 जुलै) प्रसिद्ध झालेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांप्रमाणेच यंदाही भारत बीबीसी न्यूजसाठी सर्वाधिक प्रेक्षक असलेला देश ठरला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात बीबीसी कंटेंट पाहणाऱ्या आणि वाचणाऱ्यांच्या संख्येत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात बीबीसी कंटेंट पाहणाऱ्या, वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांच्या संख्येत 52 लाखांहून अधिक नवीन लोकांची भर पडली आहे.

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, बीबीसीचा कंटेट तामिळ, गुजराती, पंजाबी, मराठी, तेलुगू, उर्दू आणि बंगाली सारख्या भारतीय भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.

ताज्या आकडेवारीवरून असंही दिसून आलं की, बीबीसीसाठी भारतानंतर दर्शकांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर नायजेरिया आहे.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ज्या ज्या भाषांमध्ये बातम्या प्रसारित करतं, त्या भाषांमध्ये दर्शकांच्या संख्येचा विचार केल्यास बीबीसी न्यूज हिंदी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीबीसी हिंदी पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

बीबीसी

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या ग्लोबल ऑडियंस मेजर (GAM) आकडेवारीनुसार, बीबीसी न्यूज हिंदीच्या दर्शकांच्या संख्येत 27% वाढ झाली आहे.

हिंदीशिवाय तेलगू आणि गुजराती सारख्या भारतीय भाषांमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढली आहे.

या आकडेवारीवर भाष्य करताना बीबीसीचे महासंचालक टीम डेव्ही म्हणाले की, "बीबीसीचे ध्येय अतिशय स्पष्ट आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल आणि प्रत्येकासाठी चांगलं काहीतरी देईल, अशी सार्वजनिक सेवा सामग्री प्रदान करणं. आम्ही जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी हाच उद्देश असतो की, आम्ही पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवत राहू."

जगभरातील लोकांना बातम्या समजण्यास मदत करणं, विविधतेनं नटलेल्या जगामध्ये सर्व लोकांसाठी निःपक्षपाती बातम्या प्रदान करणं, निर्भय पत्रकारिता करणं यांचा BBC च्या प्राधान्यक्रमांमध्ये समावेश आहे. सर्जनशीलता आणि त्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणं, हे बीबीसी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे.

जगभरात वेगवेगळ्या 42 भाषांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सेवांमधून कोट्यवधी लोक बीबीसीच्या संपर्कात येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)