गोड खाऊन आनंद साजरा करा पण सांभाळून; साखरेमुळे आनंदावर विरजणसुद्धा पडू शकतं

    • Author, सुशीला सिंग आणि पायल भुयन
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

दिल्लीत राहणाऱ्या 15 वर्षांच्या रियाला (नाव बदलले आहे) मान, काखेच्या आणि बोटांच्या सांध्याच्या त्वचेवरील पिगमेंटेशन म्हणजेच त्वचा अतिरिक्त काळी पडण्याने ग्रासलं आहे.

त्वचारोगतज्ज्ञ (डर्मॅटोलॉजिस्ट) किंवा त्वचेच्या डॉक्टरांनी तिला एंडोक्राइनोलॉजिस्टकडे (पौगंडावस्थेतील अंतःस्रावी प्रणालीशी संबंधित परिस्थितीतील हार्मोनल विकारांचे निदान आणि उपचार) जाण्यास सांगितलं.

रियाची तपासणी केली असता, रिकाम्या पोटी तिच्या रक्तातील साखर 115 आणि नाश्ता केल्यानंतर 180 असल्याचं आढळून आलं.

डॉक्टरांच्या मते, "उपाशी पोटी रक्तातील साखरेचं प्रमाण 100 पर्यंत आणि नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर 140पर्यंत असणं हे सामान्य मानलं जातं."

रियावर उपचार करणारे डॉ. सुरेंद्र कुमार म्हणतात, "रिया जंक फूड खायची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये पिढ्यानपिढ्या मधुमेहाची समस्या आहे. ती व्यायामसुद्धा करत नसे. आई-वडिलांना जर मधुमेह असेल, तर हा आजार मुलांना होण्याची शक्यता 50 टक्के असते.

डॉक्टर सांगतात की रियामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक यंत्रणा निर्माण झाली आहे. म्हणजे शरीर इन्सुलिन तयार करत असलं तरी त्याची शरीरातली साखर कमी करण्याची क्षमता कमी होते. याला इन्सुलिन रेझिस्टन्स असंही म्हणतात. ही डायबिटीजच्या आधीची पायरी असते.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील बालरोगतज्ञ एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि 'शुगर, द बिटर ट्रूथ'चे प्रख्यात लेखक अमेरिकन डॉक्टर रॉबर्ट लस्टिग सांगतात की, 'प्रौढांमधला हा आजार आता मुलांमध्येही दिसू लागला आहे.'

"आजकाल लहान मुलांनाही प्रौढांसारखेच आजार होत असल्याचं निदर्शनास येत आहे. उदा. टाइप 2 मधुमेह आणि फॅटी लिव्हर,” असंही ते म्हणाले.

त्यांच्या मते, 1980 मध्ये हे आजार प्रौढांमध्ये आढळून येत असत. सामान्यतः दारूचं सेवन करणाऱ्यांना फॅटी लिव्हर हा आजार व्हायचा. पण अलीकडे मुलं दारूचं सेवन करत नसतानाही अमेरिकेतील 25 टक्के मुलांना यकृतामध्ये फॅटची समस्या आहे.

डॉ. रॉबर्ट लस्टिग सांगतात की, 'आधीच्या मुलांना कँडी आणि चॉकलेट इत्यादी साखरेचे पदार्थ सहज मिळायचे नाहीत, पण आता त्यांना हे सर्व सहजपणे मिळत असल्याचं दिसतंय.

अन्नपदार्थांमध्ये तीन घटक असतात - कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), चरबी आणि प्रथिने. मानवी शरीराला उर्जेसाठी कर्बोदकांची आवश्यकता असते.

नैसर्गिकरित्या कर्बोदके ही अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आढळतात. फळांमधून ती सर्वात जास्त प्रमाणात मिळतात. साखर हे एक कर्बोदक आहे.

साखरेव्यतिरिक्त जेव्हा तांदूळ किंवा पीठासारख्या इतर गोष्टी जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपलं आतडं त्यांना तोडून त्यातून ग्लुकोज काढून घेतात.

ग्लुकोज हे शरीरासाठी इंधनाचं काम करतं आणि त्यातून ऊर्जा प्राप्त होते.

मुंबईतील डायबिटीस केअर सेंटरमधील डॉ. राजीव कोविल आणि डॉ. सुरेंद्र कुमार इन्सुलिन रेझिस्टन्सबद्दल माहिती देताना सांगतात की, 'इन्सुलिन हार्मोन आपल्या शरीरात चालकाचं काम करतात. ते ग्लुकोजला मूत्रपिंड आणि हृदयायाबरोबरंच इतर अवयवांच्या पेशींमध्ये पोहचवण्याचं काम करतं.'

ते सांगतात, "जेव्हा इन्सुलिनचं प्रमाण वाढतं तेव्हा ते काम करणं थांबवतं,” अशा परिस्थितीत ग्लुकोज इतर मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतं, ज्यामुळे पेशींमध्ये समस्या निर्माण होतात. अशावेळी ग्लुकोज शरीरात चरबीच्या स्वरूपात जमा होण्यास सुरुवात होते आणि मग त्रास व्हायला लागतो.

डॉक्टरांच्या मते, यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू लागते आणि अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.

त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अगदी कॅन्सर होण्याचा धोका देखील संभवतो.

साखर म्हणजे काय?

सर गंगाराम हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी आणि मेटाबॉलिझम विभागाचे डॉ. सुरेंद्र कुमार सांगतात की साखरेचे अनेक प्रकार आहेत.

ऊसावर प्रक्रिया करून साखर बनवली जाते. त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि गोडपणा असतो. त्याला सुक्रोज असंही म्हणतात.

ग्लुकोज, लॅक्टोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज हे साखरेचे इतर काही प्रकार आहेत.

डॉ सुरेंद्र कुमार म्हणतात, "फळांमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज अधिक प्रमाणात असतं,” दूध आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज आढळतं. त्याचप्रमाणे मध आणि फळांमध्ये ग्लुकोज आढळून येतं आणि ते हानिकारक नसतं.

त्याचवेळी ज्या गोष्टींमध्ये प्रक्रिया केलेली साखर म्हणजेच सुक्रोज टाकली जाते, ती मोठ्या प्रमाणात घेतल्यास त्याने नुकसान होऊ शकतं.

डॉक्टर म्हणतात की नैसर्गिकरित्या साखर असलेल्या पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण त्यापासून आपल्याला अधिक पोषक तत्वं मिळतात. फळं आणि भाज्यांमध्ये फायबर, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट असतात, तर दुग्धजन्य पदार्थांमधून आपल्याला प्रथिनं आणि कॅल्शियम मिळतात.

डॉ. राजीव कोविल म्हणतात की, "भारताच्या कोणत्याही प्रदेशात लोकं 75 ते 80 टक्के कर्बोदकं घेतात. हे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. येथील लोकांचं साखर खाण्याचं प्रमाणही जास्त आहे.

उदाहरणांच्या माध्यमांतून समजावून सांगताना ते म्हणतात की, जर तुम्ही बाजरी, ज्वारी ही धान्ये खाल्ली तर त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. शरीरात त्याचं विघटन हळूहळू होतं, ज्यामुळे साखर योग्यरित्या शोषण्यास मदत होते. अशा स्थितीत शरीरातील साखर अचानक वाढत नाही. याउलट, गव्हापासून बनवलेलं पीठ किंवा मैदा लगेच तुटतो आणि त्याचं साखरेत रूपांतर होतं, म्हणून ते खाण्यास मनाई केली आहे.

एकाचवेळी अधिक प्रमाणात साखरेचं सेवन केल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार होऊ लागतं. त्यामुळे भूक वाढते आणि त्याचं एक चक्र तयार होतं. यानंतर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

डॉ. राजीव कोविल सांगतात, “साखर खाल्ल्याने शरीराला इतर कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत झटपट आणि मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात. यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आनंदही मिळतो.

साखरेने आनंद मिळतो

आनंदाच्या प्रसंगी 'काहीतरी गोड खायला हवं’ असा विचार येणं स्वाभाविकच आहे. पूजा किंवा सणांच्यावेळी मिळणारा प्रसाद देखील बहुतेक वेळा गोडच असतो.

साखर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली असते. साखर ग्लुकोजच्या स्वरूपात घेतल्यास आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते आणि आनंदाची भावनाही निर्माण होते.

डॉ. राजीव कोविल यांच्या मते, "आपल्या मेंदूचं ऐंशी टक्के काम ग्लुकोजवर अवलंबून असतं. जर शरीराला ते योग्य प्रमाणात मिळालं नाही तर चक्कर येण्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात."

त्याचवेळी डॉ सुरेंद्र कुमार म्हणतात, "साखर खाल्ल्यानेही एक प्रकारचा आनंद मिळतो. जेव्हा आपण ती खातो आणि ती शोषली जाऊन आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा एंन्डॉर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे आपल्यात आनंदाची भावना निर्माण होते. पण याचा अर्थ असा नाही की आपण नियमितपणे मिठाई खायला सुरूवात केली पाहिजे.”

आपण जेव्हा पुरेसे शारीरिक श्रम किंवा व्यायाम करत नाही तेव्हा साखरेच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम दिसू लागतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मग त्यातून समस्या निर्माण होऊ लागतात.

किती प्रमाणात गोड खावं?

वर्ल्ड ओबेसिटी अॅटलसच्या 2023 च्या अहवालानुसार, 2035 पर्यंत जगातील 51 टक्के किंवा चार अब्ज लोकं अतिलठ्ठ किंवा लठ्ठ असतील.

त्याचवेळी, मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त दराने वाढेल. अहवालानुसार मुलींमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण मुलांपेक्षा दुप्पटीने अधिक असेल.

भारताचाच विचार केला तर 2035 पर्यंत 11 टक्के प्रौढ लोक लठ्ठपणाचा बळी ठरतील आणि यामुळे अर्थव्यवस्थेवर सुमारे 13,000 कोटी रुपयांचा भार पडेल.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एखाद्या व्यक्तीने दररोज 36 ग्रॅम किंवा 150 कॅलरीपेक्षा जास्त साखर खाऊ नये.

त्याचवेळी, महिलांनी 25 ग्रॅम किंवा 100 कॅलरीजपेक्षा जास्त साखरेचं सेवन करता कामा नये.

डॉ. राजीव कोविल सांगतात की, 'साधारणपणे विकसित देशांमध्ये साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु भारतातही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.'

ते सांगतात की, "1980 किंवा 1990 च्या दशकाच्या मध्यात श्रीमंत कुटुंबातील लोकांमध्ये वजन वाढण्याची किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलेलं. कारण त्यांच्यासाठी अन्न ही चैन किंवा आनंद घेण्याचं साधन होतं. पण आता गेल्या 15 वर्षांपासून मुलांनाही अशाच समस्यांना तोंड द्यावं लागतंय, कारण खाद्यपदार्थांचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत."

'थ्रिफ्टी जिनोटाइप' गृहितक

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अनेक दशकांपूर्वी लोकांच्या शरीरात चरबी साठवणारी जनुकं विकसित झाली.

या दोन्ही डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ज्यावेळी लोकांना अन्न मिळण्यास अडचण येत होती त्यावेळी ही जनुकं मानवी शरीरात विकसित झाली.

अशावेळी थ्रिफ्टी (काटकसर) जनुकं असलेल्या लोकांमध्ये चरबीच्या स्वरूपात अन्न साठवलं जातं. दुष्काळ आणि अन्नाची कमतरता असल्यास शरीर उर्जेची गरज भागवण्यासाठी या चरबीचा वापर करू शकतं.

डॉ. सुरेंद्र कुमार सांगतात की उत्तर अमेरिकन उंदीर हे याचं एक उत्तम उदाहरण आहे, जो वर्षातील सहा महिने खातो आणि उर्वरित सहा महिने काहीही न खाता जिवंत राहतो.

पण दोन्ही डॉक्टरांचे म्हणणं आहे की, या जनुकाच्या ज्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळत होता, त्यापासून आता नुकसान होतंय. आता लोकांना फक्त खायला मिळत नाही तर त्यांच्याकडे खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

तरीही हे जनुक पूर्वीप्रमाणेच चरबी साठवून ठेवतं. आणि आता असं झालंय की, लोक जितकं अन्न खातात त्या तुलनेत खूप कमी शारीरिक हालचाली आणि व्यायाम करतात.

अतिरिक्त साखर खाण्याचे तोटे

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्लाने शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

सर्वप्रथम लठ्ठपणाची समस्या आणि त्यानंतर इतर समस्या देखील उद्भवतात. उदा. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, ह्रदयाशी निगडीत उतर अनेक समस्यांचा सामान करावा लागतो.

पण डॉक्टर हेदेखील स्पष्ट करतात की खूप गोड खाल्ल्याने लठ्ठपणा येतोच असंही नाही, तर त्याआधी इतर समस्या देखील उद्भवू शकतात.

उदाहरणार्थ, स्त्रियांना ‘पीसीओडी’ची समस्या असू शकते, त्यांची त्वचा काळपट पडू शकते किंवा पिगमेंटेशनचा त्रास होऊ शकतो.

साखर आणि कर्करोगाचा संबंध

डॉ. राजीव कोविल म्हणतात की, "कर्करोग झालेल्या रुग्णांनी साखर सोडावी, अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. पण हेदेखील खरं आहे की, शरीरात साखरेचं प्रमाण जास्त असेल तर कर्करोगाला पोषक वातावरण मिळतं."

त्यांच्या मते, "लठ्ठपणा आणि मधुमेहाशी कर्करोगाचा संबंध आहे, कारण अशा रुग्णांमध्ये कर्करोगाचं प्रमाण 20 टक्के जास्त आहे."

डॉ.सुरेंद्र कुमार म्हणतात की, जर कर्करोगाच्या रुग्णाला मधुमेह असेल किंवा ग्लुकोज सहन न झाल्याने रक्तातील साखर वाढू लागली तर गोड पदार्थ खाता कामा नये. परंतु अशी कोणतीही समस्या नसल्यास रुग्ण मर्यादित प्रमाणात गोड पदार्थ खाऊ शकतो.

एका उदाहरणाच्या माध्यमातून ते स्पष्ट करतात की, "जर एखाद्याला आईस्क्रीम खायचं असेल तर त्याने संपूर्ण स्कूप एकाच वेळी खाऊ नये. त्याने दिवसभरात वेगवेगळ्या वेळी स्कूपमधून एक-एक चमचा आईस्क्रीम खावं. मधुमेह असलेल्या रुग्णांनीदेखील असंच करायला हवं.”

यामागचं कारण स्पष्ट करताना डॉ. सुरेंद्र कुमार सांगतात, "कर्करोग किंवा मधुमेहाच्या रुग्णाने दिवसात वेगवेगळ्या वेळी थोडं-थोडं आईस्क्रीम खाल्लं तर त्याच्या शरीरात असलेलं इन्सुलिन ते सहन करतं. परंतु एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साखर शरीरात गेल्यास ते हाताळणं शक्य होणार नाही.

कृत्रिम साखर किंवा नैसर्गिक साखर… यापैकी चांगलं काय आहे?

जॅम, ब्रेड अशा अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केल्याचं दिसतं.

जॅममध्ये फक्त फ्रुक्टोज असेल आणि ते नैसर्गिक असेल तर ते हानिकारक ठरणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण जर बाहेरून अधिकची साखर त्यात घातली गेली तर ती जास्त काळ खाल्ल्याने नुकसान होऊ शकतं.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, "अशा गोष्टी खाल्ल्याने मन तृप्त होत नाही आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते. मग ते असं चक्र होऊन जातं ज्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ लागतात."

डॉक्टर म्हणतात की, शुगर फ्री गोष्टी म्हणजे ज्यामध्ये कृत्रिम साखर टाकली जाते त्यासुद्धा शक्यतो टाळल्या पाहिजेत. जर तुम्हाला मधुमेह असेल तर शुगर फ्रीचा पर्याय अवलंबता येऊ शकतो.

डॉ. राजीव कोविल यांचं म्हणणं आहे की, त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिलाय की, ज्याप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांवर हिरवं आणि लाल रंगाचं वर्तुळाकार चिन्ह असतं, त्याच धर्तीवर मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित असलेल्या अन्नपदार्थांसाठी निळ्या रंगाची खूण छापण्यात यावी.

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, "भारतातील लोकांमध्ये खाद्यपदार्थांच्या लेबलबद्दल जागरूकतेचा अभाव आहे, शिवाय आरोग्य साक्षरतेबाबतही मूलभूत गोष्टींचा अभाव असल्याचं दिसून येतं. ते खाद्यपदार्थ कधी खराब होणार (एक्स्पायरी) याची तारीख वाचतात, पण त्यात काय आहे ते वाचण्याची तसदी घेत नाहीत. खरंतर ते अतिशय महत्त्वाचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)