पाकिटबंद स्नॅक्स, पदार्थ खरेदी करताना त्यावरच्या सूचना वाचणं का गरजेचं आहे?

    • Author, पायल भुयन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तुम्ही एखाद्या पाकिटातले चिप्स खाल्ले तर त्यात किती फॅट आणि किती कार्बोहायड्रेट होते, याचा तुम्हाला काही अंदाज असतो का?

या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुमच्याकडं नसेल.

बाजारातील प्रोसेस्ड आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पॅकेटमधील खाद्य पदार्थांचं प्रमाण मोठं आहे. अशा परिस्थितीत कुणासाठीही एवढ्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडणं सोपं नाही.

प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटच्या एका रिपोर्टनुसार, देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागात सेवन केल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीजपैकी सरासरी 10 टक्के अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या माध्यमातून मिळत आहे.

आर्थिकदृषट्या सधन असलेल्या कुटुंबांमध्ये तर हे प्रमाण वाढून 30 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार भारतात प्रोसेस्ड फूडची किरकोळ बाजारपेठ 2021 मध्ये 2535 अब्ज रुपयांवर पोहोचली होती.

दुसरीकडं, युरोमॉनिटर या मार्केट रिसर्च कंपनीच्या आकडेवारीनुसार भारतात अल्ट्रा प्रोसेस्ड फूडची विक्री करण्यात छोटे किराणा दुकानदार अग्रेसर आहेत.

2021 च्या आकड्यांचा विचार करता, नमकीन किंवा स्नॅक्सची सर्वाधिक विक्री स्वतंत्र लहान किराणा विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मधील कम्युनिटी अँड फॅमिली हेल्थ विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अग्रवाल यांनी सांगितलं की, गेल्या दोन दशकांपासून भारतात लठ्ठपणा, हायपरटेंशन, मधुमेह अशा असंसर्गजन्य ग्रस्त असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्याचं कारण पाकिटबंद प्रोसेस्ड फूड असून शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही या खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

"गेल्या अनेक वर्षांमध्ये लोकांच्या राहणीमानात बदल झाला आहे. या वर्षांमध्ये पाकिटबंद प्रोसेस्ड अन्न आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलं आहे. या पदार्थांमुळं लगेचच ऊर्जा मिळते, पण त्यात पुरेशी पोषक तत्वे नसतात. यात साखर, मीठ आणि एम्पटी कॅलरीचं प्रमाण अधिक असतं," असं ते म्हणाले.

ज्या पदार्थांमध्ये पोषक तत्वे अगदी नसल्यासारखीच असतात त्यातून 'एम्पटी कॅलरी' मिळत असतात.

पाकिटांवर लिहिलेली माहिती वाचणे गरजेचे का?

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (पॅकेजिंग आणि लेबलिंग) रेग्युलेशन, 2011 नुसार भारतात विक्री केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्री-पॅक्ड प्रोसेस्ड फूडच्या पॅकेटवर त्याच्या पौष्टिक तत्वाची माहिती द्यायला हवी.

एफएसएएआयच्या मते, ही माहिती ग्राहकाला कोणतही खाद्य पदार्थाचं पाकिट खरेदी करण्यापूर्वी जागरूकपणे निर्णय घेण्यास मदत करते.

पॅकेज्ड फूड इंडस्ट्रीवर ते साखर, मीठ, फॅट मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या पदार्थांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होतो. त्यामुळं हे गरजेचं आहे.

मग खाद्य पदार्थांची माहिती मागे दिलेली असेल तर ती समोर लिहिण्याची गरज काय?

भारतातील खूप मोठी लोकसंख्या अशी आहे जी हिंदी किंवा इंग्रजीत लिहिलेलं वाचू शकत नाही.

तसंच पाकिटावर जे लिहिलेलं असतं त्याचा आकार फारच छोटा असतो, अशीही अनेकांची तक्रार असते.

त्यामुळं ते दिसत नाही. त्यामुळं एका अशा पद्धतीची गरज असते जी कोणत्याही व्यक्तीच्या लक्षात येईल. मग त्याला वाचता येवो अथवा न येवो.

फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग म्हणजे काय?

ग्राहकाला पौष्टिक खाद्य पदार्थांचे पर्याय निवडता यावे म्हणून दीर्घकाळापासून फ्रंट ऑफ लेबलिंग सिस्टीमला प्रोत्सहन देण्याबाबत चर्चा होत आहे.

समजा, तुम्ही सिगारेटचं पाकिट पाहिलं तर त्यावर असे फोटो आणि इशारा असतो, ज्यामुळं ग्राहकानं त्याची खरेदी करण्यापूर्वी एकदा विचार करावा. नंतर खरेदी करायचं की नाही हा सर्वस्वी त्याचा विचार असेल.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, "फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग अशी असावी की ती ग्राहकाला एका नजरेत दिसेल. ती समजायला सोपी असावी आणि ती ग्राफिकसारखी असावी. या पॅकेजिंगमध्ये अशी माहिती असावी जी पॅकेटच्या मागे दिलेल्या माहितीशी सुसंगत असेल."

एफएसएएआयनं 2014 मध्ये खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर लेबलिंगचा एक प्रस्ताव दिला होता. त्यामुळं सध्याचा नियम अधिक योग्य बनला असता. ही सूचना एफएसएएआयनं तयार केलेल्या तज्ज्ञांच्या एका समितीनं केली होती.

या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पातळीवर विचार विनिमय सुरू आहे. एकीकडे पाकिटबंद फूड इंडस्ट्री याला होकार देत नाहीये, तर आरोग्यतज्ज्ञ याबाबत अधिक कठोर मापदंड असावे अशी मागणी करत आहेत.

इंडियन न्यूट्रिशन रेटिंग मॉडेल काय आहे?

सप्टेंबर 2022 मध्ये एफएसएएआयनं 'फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग'चा एक मसुदा सादर केला होता.

या मसुद्यात इंडियन न्यूट्रिशन रेटिंग मॉडेल आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एखाद्या पदार्थांत पोषक मूल्यं अधिक असतील तर त्याला 5 रेटिंग मिळेल. एखाद्या पदार्थात कमी असतील तर त्याची रेटिंग कमी केली जाईल. पण कुणालाही अर्ध्यापेक्षा कमी स्टार दिला जाणार नाही. हा मसुदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित होता.

ग्राहक हक्क कार्यकर्ते आणि सिटिझन कन्झ्युमर अँड सिव्हिक अॅक्शन ग्रुपच्या कार्यकारी संचालक एस सरोजा म्हणाल्या की, "स्टार रेटिंग ऐवजी स्पष्ट वॉर्निंग लेबल्सची आमची मागणी आहे."

"पाकिटांवर असे लेबल असावे जे कोणालाही सहजपणे समजू शकतील. मग त्याला वाचता येत असेल किंवा नसेल. ते इंग्रजी बोलत असतील किंवा हिंदी. ते अगदी सोपं असावं असं आम्हाला वाटतं."

"फ्रंट ऑफ पॅक लेबलिंगवर एफएसएएआयची जी बैठक झाली होती, त्यात एफएसएएआयनं स्टार रेटिंगची चर्चा केली होती. म्हणजे अर्ध्या स्टार पासून ते 5 स्टार. म्हणजे एखाद्याला 5 स्टार मिळाले तर ते खूप पौष्टिक आहे आणि कुणाला अर्धा स्टार मिळाला तर ते कमी पौष्टिक आहे.

पण या रेटिंग सिस्टीममध्ये आम्हाला वाटलेली कमतरचा म्हणजे तुम्हाला कुणालाही अर्ध्यापेक्षा कमी स्टार देता येत नाही. स्टार म्हणजे सगळ्यांमध्ये काहीतरी चांगलं आहेच. पण हे खरं नसतं," असं त्या म्हणाल्या.

सरकारसमोर मसुदा सादर करण्यापूर्वी एफएसएएआयनं जनतेची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 2022 नोव्हेंबरमध्ये हा मसुदा सार्वजनिक केला. त्यावर खूप चर्चाही झाली.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील लोकांनी यावर खूप टीका केली. त्यांनी आयएनआर सिस्टीममध्ये एज्युकेशनल कंपोनेंट जोडण्याचा आग्रह केला.

डॉक्टर प्रदीप अग्रवाल म्हणाले की, "एखाद्या व्यक्तीला एखादं पाकिट खरेदी करण्यासाठी सरासरी 7-8 सेकंद लागतात. आपल्याला या 7-8 सेकंदामध्ये वाचता येईल असं फ्रंट ऑफ पॅक लेबल दाखवावं लागेल. ते पाकिट खरेदी करावं की नाही, हे त्यातून स्पष्टपणे समजायला हवं.

यात दोन बाबी आहेत, पहिली - ते सहजपणे समजायला हवं, दुसरी म्हणजे त्यात साइन लँग्वेज असावी. आपल्या देशातील वैविध्य पाहता फ्रंट ऑफ पॅक लेबलिंगची निवड करावी लागेल."

पण अनेक तज्ज्ञ समितीच्या शिफारसी आणि मसुद्यातील नियमांनंतरही भारतात अद्याप पाकिटाच्या समोरच्या बाजूला एक स्पष्ट लेबलिंग किंवा फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग प्रणालीवर सहमती झालेली नाही.

कोणत्या देशांमध्ये आहे फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग सिस्टीम?

लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका लेखानुसार, फ्रंट ऑफ पॅक लेबल्सची विभागणी तीन श्रेणींमध्ये केली जाऊ शकते.

  • 'नॉर्डिक चा होल लोगो' आणि 'हेल्दीअर चॉइस लोगो'
  • वॉर्निंग लेबल्स
  • स्पेक्ट्रम लोगो

'नॉर्डिकचा होल लोगो' उत्तरी युरोपिय देशांमध्ये लागू आहे. 'हेल्थकेअर चॉइस लोगो' सिंगापूरमध्ये लागू आहे. ते दोन्ही प्रकार फूड इंडस्ट्रीला अधिक स्वीकार्य आहेत. कारण ते पॅक्ड फूडला सकारात्मक पद्धतीनं सादर करतात.

या पॅकेट्समधील पदार्थ पौष्टिक आहेत की नाही, हे ग्राहकांना या लेबलिंगवरून स्पष्टपणे कळत नाही.

एफओपीएलची दुसरी श्रेणी वॉर्निंग लेबल्सची आहे. ही लेबलिंग सिस्टीम चिली आणि मेक्सिकोमध्ये लागू आहे. वॉर्निंग लेबल्समध्ये पॅकेटमध्ये असलेल्या खाद्य पदार्थातील अशा गोष्टींचा स्पष्ट उल्लेख असतो, ज्याचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि त्याचं नियमितपणे सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं.

तिसरी श्रेणी स्पेक्ट्रम लेबलिंगची आहे. त्यात न्यूट्री स्कोर आणि ट्राफिक लाइट सिग्नलसारखी वॉर्निंग आणि हेल्थ स्टार रेटिंग असते. न्यूट्री स्कोर यूरोपिय देशांमध्ये मल्टीपल ट्राफिक लाइट्स युनायटेड किंगडममध्ये आणि हेल्थ स्टार रेटिंग न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात लागू होते.

पण अनेक लेबलिंग सिस्टीममध्ये इतरांपेक्षा चांगलं पॅकेज लेबलिंग आहे का?

याबाबत एस सरोजा म्हणतात की, "चिली आणि इस्रायलमध्ये वॉर्निंग लेबलचा वापर केला जातो. अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे की, लोकांनी मीठ, साखर किंवा फॅटचं प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचं सेवन हळूहळू कमी केलं आहे. तसंच ज्या कंपन्या याचं उत्पादन करतात त्यांनाही पदार्थ तयार करण्याची पद्धत बदलावी लागली आहे. "

योग्य पदार्थ कसे निवडावे?

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये पीडियाट्रिक अँडोक्रोनोलॉजिस्ट आणि 'शुगर द बिटर ट्रूथ' चे लेखक आणि अमेरिकेचे प्रसिद्ध डॉक्टर रॉबर्ट लस्टिग यांच्या मते, 'पॅकेटच्या मागे केलेल्या लेबलिंगचा काही अर्थ नाही. तसंच जी फ्रंट ऑफ पॅक लेबल सिस्टीम आहे, तोदेखील पर्याय नाही.'

"त्यांच्या मते, मागचं लेबलिंग खूप कमी लोक वाचतात. दुसरं म्हणजे कंपनी तुम्हाला खरी माहिती देत नाही. ते अशा शब्दांचा वापर करतात ते सर्वसामान्यांना समजत नाहीत. त्याला आम्ही 'हायडिंग इन प्लेन साइट' म्हणजे सरळ सरळ गोष्टी लपवणं म्हणतात."

"पदार्थांमध्ये काय आहे यानं लोकांना अडचण नाही तर पदार्थांबरोबर नेमकं काय केलं आहे, याबाबत लोकांना अडचण आहे. माझ्या मते, सध्या जगात जी फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग उपलब्ध आहे, तोही समस्येवरील तोडगा नाही."

खाद्य पदार्थांची पाकिटं खरेदी करताना काय लक्षात ठेवावं? या प्रश्नावर डॉक्टर रॉबर्ट लस्टिग म्हणतात की, कोणतंही पॅकेट खरेदी करताना किंवा निवडताना तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

  • खाद्यपदार्थ असे असावे जे तुमच्या आतड्यांची काळजी घेतील. तुमच्या यकृताचं रक्षण करतील आणि मेंदूला शक्ती देतील.
  • आतडे कार्यक्षम ठेवण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्यावा.
  • यकृताला साखर किंवा कॅडमियमपासून वाचवावं. ज्या गोष्टींमध्ये साखर असते त्यांचा यकृतावर परिणाम होतो. त्यामुळं अनेक लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या असलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
  • मेंदूसाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिडची खूप गरज असते, हे त्या पदार्थांत असायला हवे.

डॉ. रॉबर्ट सांगतात की, "ज्यात या तीनपैकी काहीही नसेल, ते खरेदीच करू नये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)