You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रक्ताच्या चाचणीवरून कळेल तुमच्या शरीरातील कोणता अवयव म्हातारा होतोय
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
रक्ताची एक चाचणी करून आपल्या शरीरातील नेमके कोणते अवयव वेगानं वृद्ध होत आहेत, हे समजू शकतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. त्यावरून भविष्यात कोणते अवयव निकामी होऊ शकतात, याचा अंदाजही लावता येऊ शकतो.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनं अशाप्रकारे हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसारख्या शरीरातील जवळपास 11 महत्वाच्या अवयवांवर देखरेख ठेवणं शक्य असल्याचा दावा केला आहे.
हजारो प्रौढांवर त्यांनी ही चाचणी केली आहे. त्यातील बहुतांश मध्यमवयीन आणि वृद्ध आहेत.
या चाचणीतून असं समोर आलं की, सर्वसाधारणपणे निरोगी, मात्र 50 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढांचा विचार करता त्यांच्या शरीरात किमान एक असा अवयव असतो, ज्याचं वय वेगानं वाढत असतं.
तर दर 100 जणांपैकी एक किंवा दोन जण असे असतात, ज्यांचे काही अवयव हे वयापेक्षा जास्त वयस्कर असल्याचं चाचणीतून समोर आलंय.
खरंतर अशी चाचणी करून घेणं हेच मुळात भीतीदायक असू शकतं. पण त्यामुळं आरोग्याबाबत हस्तक्षेप करून भविष्यातील काही गोष्टी बदलण्याची संधी मिळू शकते.
कोणत्या अवयवांची कार्यक्षमता वेगानं कमी होत आहे हे समजल्यास आरोग्यासंबंधी कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याची माहिती मिळू शकते. नेचर या नियतकालिकात शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.
अवयवांच्या वयातील फरक
उदाहरण द्यायचं झाल्यास अपेक्षेपेक्षा जास्त वय असलेल्या हृदयामुळं हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो. तर मेंदूचं वय अधिक वेगानं वाढत असल्यासं स्मृतीभ्रंशासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अभ्यासानुसार, एक किंवा त्यापेक्षा जास्त अवयवांचं वय जर अधिक वेगानं वाढत असेल, तर त्यानंतरच्या 15 वर्षांमध्ये काही आजार आणि त्याचबरोबर मृत्यूचा धोका याच्याशी त्याचा संबंध असू शकतो.
या अभ्यासात त्यांनी शरीराच्या मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुस, आतडे, मुत्रपिंड, चरबी, रक्तवाहिन्या (धमन्या), रोगप्रतिकारक पेशी, स्नायू, स्वादुपिंड या अवयवांचा अभ्यास केला.
शरीरातील कोणकोणत्या अवयवांचं वय विविध स्तरावर वाढत आहे, हे समजण्यासाठी या चाचणीमध्ये प्रोटीन्सच्या हजारो स्तरांची तपासणी केली जाते.
या प्रोटीनचा पॅटर्न प्रत्येक अवयवानुसार एका विशिष्ट प्रकारचा असतो, हे यावरून समोर आलं आहे.
संशोधकांनी अनेक रक्ताच्या चाचण्यांचे निष्कर्ष आणि रुग्णांच्या डेटाचा वापर करून काही अंदाज बांधण्यासाठी एक मशीन लर्निंग अल्गोरिदमची निर्मिती केली आहे.
या संशोधकांपैकी एक असलेले डॉ. टोनी विस-कोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "आम्ही या प्रत्येक व्यक्तीच्या अवयवाच्या जैविक वयाची तुलना, फारसे गंभीर आजार नसलेल्या त्याच वयोगटातील लोकांशी केली. त्यातून आम्हाला आढळलं की, 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या 18.4% लोकांमध्ये किमान एका अवयवाचे वय हे सरासरीपेक्षा अधिक वेगानं वाढत असतं.
"तसंच या व्यक्तींना पुढच्या 15 वर्षांमध्ये त्या अवयवाशी संबंधित गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो, हेही आम्हाला आढळलं."
युनिव्हर्सिटीनं या चाचणीचं पेटंट मिळवण्यासाठीची कागदोपत्री कारवाई पूर्ण केली आहे. म्हणजे भविष्यात त्याचा वापर किंवा विक्री करता येऊ शकते.
पण अशा प्रकारे अवयवांचे वय आणि आरोग्य याबाबत अंदाज वर्तवणं हे खरंच किती योग्य आहे, हे तपासण्यासाठी आणखी अभ्यास होणं गरजेचं आहे.
डॉ. विस-कोरे यांच्या यापूर्वीच्या काही अभ्यासांवरून लक्षात येतं की, जैविक वय वाढण्याची प्रक्रिया ही स्थिर नसते. ती वेगानं होत असते. त्यात व्यक्तींच्या वयाच्या तिशीच्या मध्यापासून ते साठीच्या सुरुवातीपर्यंत आणि सत्तरीच्या शेवटादरम्यान त्याचा वेग अधिक वाढत असतो.
लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतील वयासंबंधी आरोग्य आणि रोगांचे अभ्यासक प्राध्यापक जेम्स टिमन्स हेदेखील जैविक वयाच्या ब्लड मार्करचा अभ्यास करत आहेत. पण त्यांच्या अभ्यासाचे केंद्र प्रोटिन नसून लक्षात येणारा जनुकीय बदल हे आहे.
डॉ. विस-कोरे यांच्या अभ्यासातील ताजे निष्कर्ष हे प्रभावी आहेत. पण त्यासाठी आणखी लोकांवर आणि प्रामुख्यानं विविध मानववंशीय पार्श्वभूमी असलेल्या तरुणांच्या चाचणीवरून त्याचा अभ्यास करायला हवा असं टिमन्स म्हणाले.
"हा वृद्धत्व किंवा-वयानुसार येणाऱ्या आजारांची लवकर माहिती मिळवण्याचा मार्ग आहे का? लेखक आधीच्या मुद्द्याबाबत अनुकुल आहेत. नंतर ते नाकारलं जाईल असं मला वाटत नाही," असं ते म्हणाले.
डॉ. विस-कोरी म्हणाले की, "आम्ही जर 50,000 किंवा 1,00,000 लोकांवर ही चाचणी यशस्वी करून निष्कर्ष मिळवू शकलो तर, वरवर निरोगी दिसणाऱ्या लोकांच्या शरिरांतर्गत अवयवांची निगराणी करून आम्ही वेगानं वय वाढणाऱ्या अवयवांचा शोध लावू शकतो. म्हणजे लोक आजारी पडण्यापूर्वी आम्हाला त्यांच्यावर उपचार करता येऊ शकतील. "
ग्लासगो विद्यापीठातील वृद्धत्व जीवशास्त्राचे तज्ज्ञ प्राध्यापक पॉल शील्स म्हणाले की, व्यक्तीच्या आरोग्याच्या अचूक माहितीसाठी त्यांच्या वैयक्तिक अवयवांची नव्हे तर संपूर्ण शरिराची माहिती असणं म्हत्त्वाचं आहे.
एज युके या सामाजिक संस्थेच्या कॅरोलिन अब्राहम म्हणाल्या की, विज्ञानाच्या माध्यमातून वृद्धत्वासंबंधीच्या आजारांचं निदान लवकर होऊ शकतं हे अत्यंत चांगलं आहे. पण, लोकांचा या माहितीसह जीवन जगण्याचा अनुभव कसा असेल, याचा विचार होणंही गरजेचं आहे.
हे वास्तवात उतरायला हवं का? याबाबत त्या म्हणाल्या की, लोकांना या चाचणीच्या निष्कर्षांबरोबरच भावनिक आणि वैद्यकीय मदतही हवी असेल. त्यासाठी NHS नं तयार असायला हवं. तसंच त्यासाठी त्यांच्याकडं निधीही असणं गरजेचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)