You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
HIV-AIDS : जेव्हा दूषित रक्त दिल्यामुळे हजारो जणांना HIVची लागण झाली होती
दूषित रक्त दिल्यामुळे ब्रिटनमधल्या हजारो रुग्णांना HIV आणि हेपेटायटिसची बाधा झाली होती. त्यांची काही चुकी नसताना त्यांच्यावर तसंच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सुमारे 70-80च्या दशकात रुग्णांना दूषित रक्त देण्यात आलं होतं. त्यातून अनेकांना विषाणूची लागण झाली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना खूप काही सहन करावं लागलं. आता या प्रकरणाची चौकशी होत आहे.
काही लोक सध्या जिवंत आहेत. त्यापैकी काहींनी लोकांच्या अनुभवाचे व्हीडिओ चौकशी समितीला दाखवण्यात आले होते.
दूषित रक्त घोटाळा प्रकरणासंदर्भातील चौकशीच्या सुरुवातीला HIV आणि हेपेटायटिसनं संक्रमित झालेल्या व्यक्तींचं भावनिक अनुभव कथन ऐकून घेतलं.
70-80 च्या दशकात हजारो NHS रुग्णांना दूषित रक्त पुरवठा कसा करण्यात आला. याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाला राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (NHS) इतिहासातली सर्वांत मोठी 'उपचारांची आपत्ती' म्हटलं जात आहे.
चौकशी समितीसमोर एक व्हिडिओ सादर करण्यात आला. त्यामध्ये एकानं असं सांगितलं की लहानपणी घेतलेल्या दूषित रक्तामुळे 43व्या वर्षी जेव्हा त्यांना हेपेटायटिस 'सी' ची बाधा झाला तेव्हा त्यांना कसं वाटलं.
आठ वर्षांचा असताना त्या व्यक्तीचे गुडघे सुजले होते. डॉक्टरांनी चुकीचं निदान केलं. त्यांना हेमोफेलिया आहे असं समजून त्यांनी त्याला दूषित रक्तघटक असलेलं इंजेक्शन दिलं.
"ज्या दिवशी मला हे कळलं तेव्हा असं वाटलं मी सर्वस्व गमावलं आहे. आता सगळं संपलं," ते सांगतात.
आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर एका महिलेनं सांगितलं की त्यांचे पती हे हिमोफिलिक होते. त्यांना दूषित रक्त देण्यात आलं. त्यांच्यापासून त्या महिलेला HIVची बाधा झाली.
त्या सांगतात जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं.
"ते 80चं दशक होतं. त्यावेळी या आजाराबाबत भीतीचं वातावरण होतं, भेदभाव होते आणि HIVची लागण झालेल्या लोकांसदर्भात समाजात खूप समजगैरसमज होते. त्या काळात जसं जगणं शक्य होईल तसं आम्ही जगलो. आमचा आवाज दाबला गेला आणि आम्ही ते सर्वकाही शांतपणे सहन केलं," त्या पुढे सांगतात.
आणखी एका महिलेनं सांगितलं त्यांच्या पतींना AIDS आणि हेपेटायटिस 'सी' ची बाधा झाली. 1994मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्या सांगतात, "आम्हाला खूप खराब वागणूक देण्यात आली. गेल्या काही वर्षांत आमचं कुणी काही ऐकलं नाही असंच मला वाटतं."
याआधी देखील UKमध्ये या प्रकरणाची चौकशी झाली आहे. पण यावेळी पूर्ण देशात ही चौकशी होत आहे आणि त्याअंतर्गत साक्षीदारांना जबाब नोंदवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
पीडितांनी अनेक वर्षं मोहीम चालवल्यानंतर ही चौकशी सुरू झाली. ते सांगतात रक्त देताना आम्हाला हे सांगण्यात आलं नव्हतं की याचे संभाव्य धोके काय असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न देखील झाला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी
हिमोफिलिया आणि रक्तासंबंधित आजार झालेल्या किमान हजारो लोकांना HIV आणि Hepatitis ची लागण झाली असावी असा अंदाज आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये किमान 3,000 लोक त्यात दगावले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्या रुग्णांचा रक्तस्राव थांबावा म्हणून त्या काळात इंजेक्शनच्या साहाय्याने रक्तघटक दिले जात असत.
1970च्या सुरुवातीला नवी उपचार पद्धत सुरू झाली. त्याआधी रुग्णांना रक्त हवं असल्यास खूप किचकिट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जावं लागत असे. या रुग्णांना छोटी जखम जरी झाली तरी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव व्हायचा.
उपचाराची गरज भागवण्यासाठी ब्रिटनमध्ये धडपड सुरू होती. Factor VIII हा रक्तघटक त्यांना देण्यात येत असत. या रक्तघटकांची अमेरिकेहून आयात केली जात असे.
त्या ठिकाणी ज्यांच्या रक्तातून हे रक्तघटक बनवले जात होते त्यातील बहुतांश लोक स्वतःच्या रक्ताची विक्री करणारे आणि तुरुंगातील कैदी असत. अंदाजे 40,000 रक्तदात्यांच्या रक्तातून प्लाजमा काढून त्यांच्यावर प्रक्रिया केली गेली होती.
हे रक्तघटक हजारो लोकांना देण्यात आले होते. त्या लोकांपैकी 30,000 जणांना संक्रमण झालं होतं. विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून रक्तघटकाच्या निर्जंतुकीकरणाला 1980पासून सुरुवात झाली.
पण तरी प्रश्न राहतोच की हे रक्तघटक कुणी दूषित केले आणि दूषित रक्तघटक पुन्हा पुन्हा का वापरण्यात आले.
रक्तघटकांच्या चाचणीस 1990नंतर सुरुवात झाली. हिमोफिलियाच्या कृत्रिम उपचाराला सुरुवात झाली होती. तेव्हापासून दूषित रक्तघटकाचा धोका काही प्रमाणात कमी झाला होता.
स्टीव्ह डेमंड आता साठीच्या आसपास आहेत. त्यांना सुरुवातीला हिमोफिलियाची लक्षणं दिसत होती, पण त्यांचं आयुष्य सुरळीत होतं. 1980च्या दशकात त्यांची तब्येत खालावली. स्नायू कमकुवत होणं, सांधे दुखी, धाप लागणे असे त्रास त्यांना होत होते. 1980च्या मध्यंतरी त्यांनी किरकोळ जखम झाली म्हणून दवाखान्यात जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी Factor VIII हा रक्तघटक देण्यात आले. पण या रक्तघटकावर प्रक्रिया करण्यात आलेली नव्हती.
यातून त्यांच्या शरीरात HIVचा प्रवेश झाला असावा. हे निदान होण्यासाठी त्यांना 18 महिने वाट पाहावी लागली. 1990ला त्यांना Hepatitis C झाल्याचं लक्षात आलं. त्यातून ते बरे झाले असले तरी त्यांची प्रकृती सारखी बिघडलेली असते. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या जठरात रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्या यकृतातही बिघाड झाला आहे. त्यांना कॅन्सर होण्याचा धोका आहे.
सरकार, आरोग्य क्षेत्रातील संबंधित व्यावसायिक, औषध कंपन्या त्यांची जबाबदारी झटकत आहेत, लोकांशी खोट बोलण्यात आलं आहे, त्यांचा विश्वासघात झाला आहे, असं ते सांगतात.
डेमंड म्हणतात चौकशी झाली तरी त्यातून काय निष्पन्न होईल याबद्दल शंकाच आहे, असं ते म्हणतात.
का होत आहे चौकशी?
या प्रकरणात चालढकल केल्याची टीका सरकारवर होत आहे. यापूर्वीही या प्रकरणात चौकशी झाली आहे. यापूर्वी खासगी निधीवर एक चौकशी झालेली आहे.
पेनरोज चौकशी समितीने यावर 2015ला अहवाल सादर केला आहे. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची टीका झाली होती.
माजी आरोग्यमंत्री अँडी बर्नहॅम यांनी याचा तपास करण्याची मागणी वारंवार केली होती. गेल्या वर्षी संसदेत हा प्रकार म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेला फौजदारी गुन्हा आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यावर मतदान झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले.
पुढं काय होणार?
ही चौकशी 2 वर्षं चालेल, अशी शक्यता आहे. संसर्ग झालेल्यांपैकी काही जणांना भरपाई दिली आहे. त्यासाठी पहिला निधी 1989ला स्थापन झाला होता.
नव्या चौकशीतून दोषारोप सिद्ध झाले तर यातील पीडित मोठ्या भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाऊ शकतात.
निवृत्त न्यायाधीश सर ब्रायन लँगस्टाफ यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. या प्रकरणात 1 लाख कागदपत्र आधीच जमा झाली असून अजून कागदपत्रं येतील, असं म्हटलं आहे.
या प्रकरणात पीडितांची संख्या वाढूही शकेल, असं ते म्हणाले आहेत.
हीमोफिलिया सोसायटीच्या प्रमुख लिझ कॅरोल यांनी या प्रकरणात सत्य पुढं येऊन पीडितांना न्याय मिळावा, असं म्हटलं आहे. हीमोफिलिया आणि इतर रक्ताच्या आजांरानी ग्रस्त लोकांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे, असं त्या म्हणाल्या.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)