You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पण बाई तू आत्महत्या का करत आहेस?
- Author, दिव्या आर्य आणि पूजा छाब्रिया
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगात आत्महत्यांच्या अनुषंगाने काही धक्कादायक वास्तव पुढं आलं आहे. जागतिक पातळीवर महिलांच्या आत्महत्येमध्ये जवळपास 40 टक्के महिला या भारतीय आहेत, असं नुकत्याच प्रकाशित झालेल्या लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. म्हणजेच जगात आत्महत्या करणाऱ्या 10पैकी 4 महिला या भारतीय आहेत. आपण या मागं नेमकी काय कारणं काय आहेत?
या अहवालात दिलेला नेमका आकडा आहे 36.6 टक्के. पण भारतातल्या महिलांनी हे असा स्वत:चा जीव द्यावेत, असं काय घडंतय, काय आहेत त्यामागची कारणं?
'आरोग्य संकंटाचा इशारा'
खरंतर, गेल्या दशकभरात भारतातलं महिलांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे.
"महिलांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश आलं आहे, पण त्याची गती पुरशी नाही," असं या अहवालाच्या प्रमुख लेखिका राखी दंडोना यांनी स्पष्ट केलं.
भारतात प्रत्येक एक लाख महिलांमध्ये 15 जणी आत्महत्या करतात. जगात हेच प्रमाण सरासरी 7 महिला एवढं आहे. म्हणजे भारतात ही सरासरी दुप्पट आहे.
जगातल्या पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये भारतीय पुरुषांचं प्रमाण 24 टक्के आहे.
लॅन्सेटच्या या अभ्यासात एक प्रकारे देशातील सार्वजनिक आरोग्य संकंटाचं सूतोवाच करण्यात आलं आहे.
ठरवून झालेले विवाह
आत्महत्या केलेल्या महिलांमध्ये 71.2 टक्के महिला या 15 ते 39 या वयोगटातल्या आहेत. त्यापैकी बहुतांश महिला या विवाहित आहेत.
आत्महत्यांची कारणं मांडताना 'लग्न हाही बचाव ठरू शकलेला नाही,' असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
ठरवून झालेली लग्नं, कमी वयातलं मातृत्व, सामाजिक दर्जा, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक परावलंबित्व या कारणांमुळे लग्न हाही आत्महत्यांना प्रतिबंधक उपाय ठरू शकलेला नाही, असं हा अहवाल सांगतो.
ताणतणाव
बीबीसीशी बोलताना राखी म्हणाल्या, "या वयोगटातल्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं."
त्या पुढे म्हणाल्या, " या वयोगटातील महिलांना तणावांचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे मानसिक आरोग्य सेवा सगळ्यांनाच उपलब्ध होत नाहीत."
तर दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय महिलांच्या आत्महत्येची कारणं शोधण्यासाठी पुरेसं संशोधनही झालेलं नाही.
'स्नेह' या आत्महत्या प्रतिबंधक केंद्राच्या संस्थापक डॉ. लक्ष्मी विजयाकुमार यांनी युवतींमधील आत्महत्यांचं कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
त्या म्हणतात की, "विशेषत: ज्याचं ठरवून लग्न झालं आहे अशा नवविवाहित महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना तर नोकरीही सोडण्यास सांगितलं जातं."
समाजातली पत
"कालांतरानं, जसं वय वाढतं, तशी महिलांची कुटुंबातली पत वाढते आणि मग त्यांना अधिक सुरक्षित वाटू लागतं."
या अहवालातून आणखी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे, आत्महत्यांमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक वरचा आहे.
या राज्यांमध्ये महिलांचं सामाजिक आणि आर्थिक स्थान हे तुलनेनं चांगलं आहे. असं असतानाही अशी स्थिती का निर्माण झाली आहे?
सामाजिक आणि आर्थिक स्थान तसंच आत्महत्या यांचं प्रमाण यात काय संबंध आहे, हे पुरेसं स्पष्ट होत नाही.
'मोठ्या अपेक्षा....मोठी निराशा'
डॉ. लक्ष्मी विजयाकुमार यांच्या मते, "ज्या महिलांना खूप अपेक्षा असतात, त्यांना निराशा येण्याची शक्यताही जास्त असते. अमेरिकेतही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या राज्यांत असाच कल दिसला आहे."
भारतात जगाची 18 टक्के लोकसंख्या नांदते. त्यामुळेच महिलांचं आत्महत्येचं प्रमाण अधिक का आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
काही गोष्टी चीनकडून समजणे आणि शिकणे आवश्यक आहे.
काय करता येईल?
चीनमध्ये 1990मध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक होतं. ते त्यांनी 2016पर्यंत 70 टक्क्यांपर्यंत कमी आणलं.
त्याचं सगळं यश ग्रामीण भागातल्या महिलांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी होण्यात आहे.
डॉ. लक्ष्मी विजयाकुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, "चीनच्या सरकारचा असा दावा आहे की, नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्यानं ग्रामीण भागातून शहरी भागातलं स्थलांतर 25टक्क्यांनी वाढलं."
मानसिक आरोग्यसेवांची उपलब्धता
"त्यांनी मानसिक आरोग्यसेवांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याशिवाय, बांगलादेश, श्रीलंका या देशांतही महिला आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे."
तरुणांमधलं आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे, पण याकडे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचं म्हणावं तसं लक्ष नाही," असं डॉ. विजयाकुमार म्हणतात.
"पूर्वी सुमारे वयाची 80 वर्षें ओलांडलेले लोक आत्महत्या करत असत, आता हे तरुणांच्या दिशेनं सरकलं आहे," असं त्या सांगतात.
आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाय आपल्याला करता येण्यासारखे आहेत.
आत्महत्येच्या साधनांची, प्रकारांची 'उपब्धता' कमी करणे हाही एक चांगला उपया आहे.
आत्महत्यांची वर्णनं
म्हणजे असं की, काही अहवालात असं दिसलं की, जगातल्या 30 टक्के आत्महत्या या कीटकनाशक पिऊन होतात.
त्यामुळे किटकनाशक चटकन हाताशी लागणार नाहीत, सहज मिळणार नाहीत, अशी व्यवस्था करायला हवी, असं डॉ. विजयाकुमार म्हणतात.
तसंच, आत्महत्या आणि दारू यांचंही नातं आहे. "बऱ्याच आत्महत्या या दारूच्या अमलाखाली होतात."
माध्यमांमध्ये आत्महत्यांच्या बातम्या देतानाही तारतम्य बाळगलं तर त्याच प्रकारच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल, हे जगभरात करता येईल.
भारतातल्या तरुणांच्या आत्महत्यांकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. विशेषत: महिलांच्या आत्महत्यांकडे, असं त्या सांगतात.
घरगुती हिंसाचार
घरगुती हिंसाचाराविषयी महिलांनी न बोलण्याचा आपल्याकडे कल असतो.
समाजाच्या काही घटकांमध्ये तर लग्नाचा पर्याय, अभ्यासातल्या अपेक्षा यांचाही दबाव असतो.
डॉ. विजयाकुमार म्हणतात, "आत्महत्या रोखण्यासाठी काही एक धोरण आखण्याची आपल्याकडे आवश्यकता आहे. अस्वस्थ व्यक्तींची काळजी तत्काळ घेतली जायला हवी."
हे साध्य होण्यापूर्वी मानसिक आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढवणं, याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल, असं राखी दंडोना यांचं मत आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)