'लोक मला चेटकीण म्हणायचे!' 9 आठवड्यांच्या मुलीच्या हत्येसाठी आईलाच दोषी ठरवलं, पण...

आई
    • Author, माइल्स बर्क
    • Role, बीबीसी कल्चर

लिंडी चेम्बरलेन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन महिलेची नऊ आठवड्यांची मुलगी उलुरू येथील एका तंबूतून अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर माध्यमांनी आईवरच शंका व्यक्त केली. लोकांनीही त्यांच्यावर अनेक आरोप केले.

त्याचं प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि लोकांमध्ये दोन गट निर्माण करणारं ठरलं. 41 वर्षांपूर्वी दोषी ठरवण्यात आलेल्या लिंडी यांनी त्या निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला.

बीबीसी अर्काइव्हमधील 'इन हिस्ट्री' नावाच्या मालिकेतील एका भागात, लिंडी यांनी चुकीच्या पद्धतीनं दोषी ठरवल्यानंतर काय-काय भोगावं लागतं हे सांगितलं आहे.

बीबीसीचे टेरी वॉन यांनी 1991 मध्ये शोमध्ये लिंडी चेम्बरलेन यांना याबाबत प्रश्न विचारले होते. त्यावेळी त्या अगदी सावधपणे बसलेल्या होत्या. त्यांच्याकडं तसं बसण्याचं कारणही होतं.

मुलीचा धक्कादायक मृत्यू आणि त्यानंतर माध्यमांच्या बातम्यांमधून होणारे हल्ले आणि हत्येच्या आरोपात चुकीची शिक्षा यामुळं त्यांच्या सपूर्ण जीवनातच उलटफेर झाला होता.

नऊ आठवड्यांची चिमुकली अजारिया बेपत्ता झाल्यानंतर, लिंडी यांना नकोशा आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामीचा सामना करावा लागला.

17 ऑगस्ट 1980 ला लिंडी आणि त्यांचे पती मायकल कुटुंबासह उलुरूच्या आयर्स रॉक मध्ये कॅम्पिंग ट्रिपवर गेले होते. त्यावेळी अजारिया तंबूतून बेपत्ता झाली होती.

लिंडी यांनी सांगितलं की, त्यांनी एका जंगली श्वानाला तंबूतून बाहेर येताना पाहिलं होतं. त्याला 'डिंगो' नावानं ओळखलं जातं. त्यानंच अजारियाला नेलं असं लिंडी यांना समजून चुकलं होतं.

कॅम्पिंगसाठी आलेले लोक आणि स्थानिकांनी खूप शोधाशोध केली, पण अजारियाचा मृतदेह कधीही सापडला नाही. प्राथमिक तपासणीमध्ये चेम्बरलेन यांचं म्हणणं मान्य करण्यात आलं. पण ऑस्ट्रेलियातील सरकारी पक्षानं आणि माध्यमांच्या एका गटानं हे सत्य नाहीच, असं ठरवून टाकलेलं होतं.

जनआक्रोशाचा सामना

या प्रकरणाला मिळालेल्या प्रचंड माध्यम प्रसिद्धीमुळं चेम्बरलेन दाम्पत्याला जनतेच्या प्रचंड आक्रोशाचा सामना करावा लागला. लोक त्यांच्यावर थुंकत होते, अनेकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्या.

बीबीसीच्या एका विशेष क्लिपमध्ये लिंडी यांनी सांगितलं की, "पहिल्या चौकशीनंतर मला एवढ्या धमक्या मिळाल्या की, मला पोलिस बॉडीगार्डची व्यवस्था करावी लागली होती.

इतर पालकांना सावध करता यावं म्हणून सुरुवातीला माध्यमांशी बोलायला तयार झाल्याचंही लिंडी म्हणाल्या. पण त्यांचं वेगळ्या प्रकारे चित्रण करण्यात आलं, आणि याबाबत त्यांच्या हाती काहीही नव्हतं."

''ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी माध्यमांनी मांडलेली माझी प्रतिमा पाहिली आहे. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी पूर्णपणे मोडकळीस आले होते. माध्यमांचे प्रतिनिधी यायचे आणि म्हणायचे, की तुमच्या मुलीबरोबर जे काही घडलं, त्याचं आम्हाला दुखः आहे. लोकांना सावध करण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही, म्हणून आम्हाला चिंता वाटत आहे. तुम्ही आमची मदत कराल का? मी म्हटलं मी नक्की मदत करेल."

आई

"आम्ही खरंच मदद केली. पहिल्या रिपोर्टरनं येऊन म्हटलं की, इंटरव्ह्यू अगदी सहज झाला. पण त्यानं माझ्या सगळ्या भावना योग्य प्रकारे दाखवल्याच नाहीत. कारण इंटरव्ह्यूच्या मध्येच मला रडू कोसळलं होतं. ते दाखवलंच नव्हतं. त्यामुळं काहीतरी नक्कीच चुकीचं होत होतं.

पोलीस त्यांच्या शंका आणि काही माहिती पत्रकारांना सांगत आहेत, असं लिंडी यांना वाटत होतं. परिस्थिती त्यांच्यासाठी प्रतिकूल होती.

''पोलीस सातत्यानं माध्यमांना माहिती देत होते. आमच्याकडे ते रोखण्याचा काहीही मार्ग नव्हता. त्यामुळं लोकांमध्ये मी एक भयावह महिला असल्याचं चित्र निर्माण झालं. त्यात इंटरव्ह्यूमध्ये भावना अनावर होऊन मी रडायचे तेव्हा तेही पत्रकार इंटरव्ह्यूमधून एडिट करून काढून टाकायचे. लोक रडणं पाहून नाराज होतील अशी भीती माध्यमांना असायची. त्यामुळंच मी एखाद्या जोकवर हसले तरी मला बेजबाबदार ठरवलं जात होतं. रडल्यावरही मी अॅक्टिंग करत आहे, असं म्हटलं जात होतं. मला दोन्हीकडून अडचणींचा सामना करावा लागत होता. सगळे मला 'चेटकीण' समजत होते."

आई

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लिंडी यांचा न्यायालयात चाललेला खटला माध्यमांचं आकर्षण बनला. माध्यमांनी आक्रमकपणे त्याला कव्हर केलं. पण त्यामुळं लोक दोन भागांत विभागले गेले- समर्थक आणि विरोधक.

बाळ बेपत्ता होण्यात 'डिंगो' श्वानाच्या भूमिकेवरही चर्चा झाली. पण त्याकाळी डिंगो श्वानांना तेवढ्या प्रमाणात धोकायदायक समजलं जात नव्हतं.

चेम्बरलेन कुटुंब हे सेवंथ-डे अॅडव्हेंटिस्ट समुदायाचे होते. त्यामुळं त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीबाबतही संशय आणि पूर्वग्रह मांडण्यात आले. त्यामुळं धार्मिक कृत्यांचाही आरोप झाला.

फॉरेन्सिक तपासणीत कारमध्ये लिंडा यांच्या मुलीच्या रक्ताचे नमुणे आढळले होते. सरकारी पक्षाकडून त्याचाच प्रमुख पुराव्यासारखा वापर झाला. या पुराव्याची नंतर प्रचंड चर्चा झाली. हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होतं. कारण बाळाचा मृतदेह कधी मिळालाच नाही.

लिंडी यांनी संपूर्ण कायदेशीर कारवाई आणि खटल्यादरम्यान निर्दोष असल्याचं सांगितलं. पण 29 ऑक्टोबर 1982 ला त्यांना मुलीच्या हत्येसाठी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. लिंडी यांचे पती मायकल यांच्यावरही आरोप झाले. त्यांना हत्येसाठी मदत केल्याप्रकरणी 18 महिन्यांची कैद सुनावण्यात आली.

सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून लिंडी थकल्या होत्या. पण 1986 मध्ये त्या तुरुंगात असतानाच नकळतपणे या प्रकरणी नवे पुरावे समोर आले. अजायरियाचं मॅटिनी जॅकेट नाहीच असा दावा पोलिसांनी केला होता. पण त्याच जॅकेटचा काही भाग उरुलूमध्ये मातीत अर्धा पुरलेल्या अवस्थेत सापडला.

आई

"जर त्यांनी मी खरी होते हे मान्य केलं, तर त्यांना हेही मान्य करावं लागेल की, मी सांगितलेल्या इतरही अनेक गोष्टी खऱ्या होत्या," असं लिंडी म्हणाल्या.

त्या पुराव्यानंतर लिंडी यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं आणि 1988 मध्ये या दाम्पत्यावर लावलेले सर्व आरोपही अधिकृतरित्या रद्द करण्यात आले.

1991 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि 2017 मध्ये मायकल यांचं निधन झालं.

अन्यायाच्या या प्रकरणात अजरियाच्या मृत्यूचं कारण अनेक वर्षांनंतरही संशय आणि चर्चेचा विषय बनलेलं आहे. 1988 मध्ये चेम्बरलेन यांच्या या संपूर्ण प्रकरणावर 'अ क्राय इन द डार्क' हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्यात मेरिल स्ट्रीप यांनी लिंडी यांची भूमिका केली होती, तर सॅम नील मायकलच्या भूमिकेत होते.

लिंडी यांनी 1990 मध्ये 'थ्रू माय आइज' नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी अजारियाचा गूढ मृत्यू आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर झालेल्या गंभीर परिणामाचं विस्तृत वर्णन केलं आहे. या घटनेनंतर त्यांच्या तीन मुलांच्या आयुष्यावरही परिणाम झाल्याचं त्यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

लिंडी यांच्या मते, ''त्यांच्या विरोधात अनेक चुकीची माहिती सादर करण्यात आली. माझ्या मुलांना खरं काय ते जाणून घेण्याचा अधिकार आहे. लोक रस्त्यावर जे प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं या पुस्तकात आहेत.''

एका कोरोनर (तपास अधिकारी) ने 2012 मध्ये चेम्बरलेन प्रकरणी एक अंतिम अहवाल सादर केला. त्यात अधिकृतरित्या असं म्हटलं होतं की, अजारियावर एका डिंगोनं हल्ला केला होता आणि त्या डिंगोनं बाळाचा गळा दाबला होता. लिंडी आणि मायकल सुरुवातीपासून हेच सांगत होते.

चेम्बरलेन प्रकरणाच्या निर्णयानं ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात लोकांनी आत्मपरिक्षण केलं. ऑस्ट्रेलियातील लोकांसाठी हे मान्य करणं कठिण होतं की, नागरिक, मीडिया, पोलीस आणि न्यायालयं निर्दोष महिलेला दोषी ठरवण्यासाठी आणि एका आधीच दुःखात बुडालेल्या आईला शिक्षा देण्यासाठी प्रचंड आतूर होते.

'एव्हिल एंजल्स' अजारिया बेपत्ता होण्याच्या बाबतीत असलेलं पुस्तक आहे आणि 'अ क्राय इन द डार्क' हा चित्रपटही त्यावरच आधारित होता.

'एव्हिल एंजल्स' पुस्तकाचे लेखक जॉन ब्रायसन सांगतात की, ''ऑस्ट्रेलियन नेहमी स्वतःबद्दल विचार करतात. हा देश निःपक्ष आहे, असं त्यांना वाटतं. पण या प्रकरणात तसं झालं नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)