ती लग्न करून आठवड्याभरात दागिने घेऊन पसार व्हायची...हे रॅकेट असं उघडकीस आलं

गुजरात, राजस्थान, मानवी तस्करी

फोटो स्रोत, Getty Images

अहमदाबाद जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. तिच्या आई-वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली.

अहमदाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अमित वसावा यांनी बीबीसीला सांगितलं की, “13 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची आमच्याकडे तक्रार आली. तिचे आई-वडील तक्रार कण्यासाठी जेव्हा आमच्याकडे आले, तेव्हा ते खूप रडत होते. त्यांचा संशय शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर होता. आम्ही तपास सुरू केला. या तपासात वेगळंच आमच्या समोर आलं.”

त्यांनी पुढे सांगितलं की, “जेव्हा आम्ही बेपत्ता मुलीच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले, तेव्हा बेपत्ती मुलगी रिक्षात चढताना दिसली. आणखी तपास केल्यानंतर लक्षात आलं की, अशोक पटेल नामक व्यक्तीने तिला रिक्षात बसवून नेलं होतं. आजूबाजूच्या लोकांशी चौकशी करण्यासोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला कळलं की, अशोक पटेल त्या मुलीला देहगामला घेऊन गेला आहे.”

तपासात असं समोर आलं की, अशोक पटेलच्या पत्नीने मुलीला खाण्या-पिण्याला देऊन तिचा विश्वास जिंकला होता. या पटेल दाम्पत्याची ओळख एका रुपला मॅक्वान नामक महिलेशी झाली होती.

अमित वसावा सांगतात की, “या सर्व संशयितांचा मागोवा घेतल्यानंतर लक्षात रुपल मनसानाच्या बोरू गावातल्या शेतात जात असे. या माहितीच्या आधारे आम्ही छापा टाकला. तिथे रुपलच्या मैत्रिणीचे घर असल्याचं आम्हाला आढळलं. तिथं अशोक पटेल, त्याची पत्नी रेणुका आमि बेपत्ता अल्पवयीन मुलगी सापडली.”

बेपत्ता मुलगी सापडल्यानं पोलिसांना वाटलं की, हे प्रकरणं संपलं. बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली खरी, पण तिच्या बोलण्यातून स्फोटक माहिती समोर आली. या माहितीमुळे पोलिसांना हादरा बसला. या अल्पवयीन मुलीचं बेपत्ता होणं हे हिमनगाचं केवळ एक टोक होतं.

अल्पवयीन मुलींची तस्करी करणारी टोळी

42 वर्षीय अशोक पटेलनं अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचं तिच्या बोलण्यातून समोर आल्याचं अमित वसावा यांनी सांगितलं. या दुष्कृत्यात अशोकची पत्नी रेणुकानंही मदत केली.

त्याचसोबत, अल्पवयीन मुलीशी बोलल्यानंतर पोलिसांना हेही कळलं की, अशोक मानवी तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधित आहे. ही टोळी अल्पवयीन मुलींना लग्नाळू मुलांना विक्री करतात.

शेहरसिंह सोळंकी

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

फोटो कॅप्शन, शेहरसिंह सोळंकी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या या टोळीत अशोक पटेल, त्याची पत्नी रेणुका, 70 वर्षीय अमृत ठाकोर आणि चेहरसिंह सोळंकी यांचा समावेश होता. या सगळ्यात पालनपूरचा चेहरसिंह हा या टोळीचा मास्टरमाईंड आहे, तर हे सगळे यापूर्वीही लग्नाच्या नावाखाली मुलींची विक्री करणऱ्याच्या गुन्ह्यात सहभागी झालेले होते.

अमित वसावा यांच्या माहितीनुसार, या टोळीची सदस्या असलेल्या रुपल ‘लुटेरी दुल्हन’ होती. ती लग्नाळू मुलांशी लग्न करत असे आणि लग्नाच्या आठवड्याभरात दागिने घेऊन पसार होत असे.

वसावा पुढे सांगतात की, “या टोळीची चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की, सुरेंद्रनगरमधील एका मुलीला लग्नासाठी विकलं गेलं होतं. 15 वर्षीय मुलीला आपली बहीण असल्याचं सांगत अशोक पटेलनं कोटी कादगपत्र बनवून दोन लाख रुपयात विकलं होतं. भाड्याचे आई-वडीलही त्याने आणले होते.”

याबाबत अमित वसावा सांगतात की, “सुरुवातीला अल्पवयीन मुलगी काहीच बोलायला तयार नव्हती. कारण तिला शारीरीक आणि मानसिक त्रास देण्यात आला होता.”

ही टोळी गुजरातमधून मुली पळवते आणि शेजारी राज्यात म्हणजे राजस्थानमध्ये त्या मुलींची विक्री केली जाते. काही दिवसांपूर्वी राजस्थानातून मुलींना फसवून गुजरातमध्ये आणून विक्रीचं रॅकेट पोलिसांनी समोर आणलं होतं. गुजरात पोलिसांनी राजस्थानहून तीन मुलींना सोडवलं होतं.

या प्रकरणातही मुलींना फसवून विक्रीचं काम महिलांनीच केलं होतं. या प्रकरणाचा तपास करणारे सिरोहीचे डीएसपी जेठूसिंह कनौत यांनी बीबीसीला सांगितलं की, “आम्हाला तक्रार मिळाली होती की, सिरोहीची एक मुलगी गुजरातमध्ये कामावर गेल्यानंतर परतलीच नाही. गुजरातमधील एक टोळी गरीब मुलींचं अपहरण करून विक्री करते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. ही मुलगी त्याच टोळीच्या हाती सापडली होती.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही या टोळीला 10 महिन्यात पकडलं होतं. मात्र, या टोळीचा मास्टरमाईंड नागजी आमच्या हातून निसटला होता.”

मानवी तस्करी करणारी टोळी

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

गुजरात आणि राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू आहे. काही दिवस आधी राजस्थानच्या बाडमेरमध्ये राहणाऱ्या तख्तसिंह सोढा यांच्याकडून डिसाच्या तीन दलालांनी साडेपाच लाख रुपये उकळले होते.

तख्तसिंह सोढा यांच्या दोन चुलत भावांची लग्न झाली नव्हती. त्यामुळे मुली विकणाऱ्या टोळीतल्यांनी त्यांना दोन मुली विकल्या. साडेपाच लाख रुपयांचा हा व्यवहार झाला. या दोन्ही मुली आमच्या बहिणी असल्याचं या टोळीतल्यांनी सांगिललं.

लग्न ठरलं आणि तख्तसिंह जेव्हा भावांना घेऊन डिसामध्ये आले, तेव्हा तिथं मुलीच नव्हत्या. आल्या पायी वरात माघारी नेण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांनी पालनपूर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली.

पालनपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय आर. बी. सोळंकी याबाबत बीबीसीशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करणं सोपं झालं, कारण तख्तसिंह यांनी टोळीतल्या लोकांना पाच लाखांपैकी सव्वा लाख रुपये पाठवले होते. त्यामुळे त्यांना पकडं सोपं गेलं.

पुढील तपासात असंही समोर आलं की, कलाभा ठाकोर आणि त्याच्या टोळीतले दोघेजण मध्यमवर्गीय व्यावसायिकांना शोधण्यासाठी राजस्थानात जात असत आणि अविवाहितांना मुलगी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत असत.

टोळीतल्या बऱ्याच जणांना पोलिसांनी आता पकडलंय आणि या टोळीने आणखी किती जणांना असं फसवलंय, हे ते शोधतायेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)